बाप

Submitted by मंदार-जोशी on 9 January, 2012 - 09:46

डावी उजवीकडे बघत
एखादी चुकार गाडी,
सावलीलाही स्पर्श करणार नाही
एखादा मुजोर ट्रकवाला,
शिंतोडे उडवणार नाही
अशा बेताने...
...खांद्यावर डोकं ठेऊन
शांत झोपी गेलेल्या आपल्या पोराला जपत
त्याच्या स्वप्नांची स्पंदनं ऐकत
त्याचा श्वास
मनात, खोल आत भरून घेत
भर पावसात, छत्री सावरत
रस्ता पार करणारा तो दिसतो रोज

तो रस्ता मोठा करणार आहेत म्हणे यंदा
पाऊस तर असाच असतो दर वर्षी
खड्डेही वाढतील कदाचित

पण तो मात्र
जसा आज दिसला होता...व्रतस्थ...
पोराला घेऊन तोच रस्ता पार करताना
अगदी तस्साच दिसेल
....उद्याही!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Naomi Shihab Nye यांच्या Shoulders या कवितेचं मराठीकरण करण्याचा एक प्रयत्न.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

सुंदर जमली आहे कविता.
बापावर कोणी फारसं कविता लिहित नाही. त्याची प्रतिमाही सर्वसाधारण पणे कठोर अशीच असते. काही वर्ष आधी अफगाणिस्तान वर एक डॉक्युमेंटरी बी बी सी वर पाहिली होती. सतत च्या युध्दाचे लोकांवर झालेले परिणाम असा विषय होता. त्यातला एक प्रसंग आठवला. बेघर झालेले लोक स्थलांतर करत असतात, एक नदी आडवी येते पाणी गुडघाभर किंवा थोड जास्त असेल पण एका छोट्या मुला करता गळ्या पर्यंत असं, तर डॉक्यु. दिग्दर्शक त्या छोट्याला कडेवर घेतो नदी पार करतो, नंतर उतरवतो. पुढे जे घडत ते मी विसरु शकत नाही. त्या छोट्याचा बाप येतो; त्या छोट्याला रागावतो अन एक थोबाडीत ठेउन देतो. दिग्दर्शक विचारतो का मारलस? तो म्हणतो काळ कठिण आलाय. या युध्दामुळे मीही किती दिवस जिवंत राहिन काय माहित, त्याला आत्ता पासुनच दुसर्‍यांच्या मदती विना स्वतःला जगता/जगवता आलं पाहिजे.........

छान मराठीकरण.पण कविता मनाची पकड नाही घेऊ शकली.

<<<<डावी उजवीकडे बघत
एखादी चुकार गाडी,
सावलीलाही स्पर्श करणार नाही
एखादा मुजोर ट्रकवाला,
शिंतोडे उडवणार नाही
अशा बेताने...
"भर पावसातसुद्दा, छत्री सावरत"
खांद्यावर डोकं ठेऊन
शांत झोपी गेलेल्या आपल्या पोराला जपत
त्याच्या स्वप्नांची स्पंदनं ऐकत
त्याचा श्वास मनात,
खोल आत भरून घेत....
रस्ता पार करणारा तो दिसतो रोज>>>>

मंदार,

कल्पना खुप छान आहे.

बापाचा खांदा ही खुप महागडी वस्तु आहे याची जाणीव बाप झाल्याशिवाय येत नाही. अनेकांना बाप नसतात. अनेकांना अनेक बाप असतात. काहींना बाप असुन त्याच्या खांद्यावर मान टाकायच्या वयात त्याची मान खांद्यावर घ्यावी लागते. फारच थोडे नशीबवान ज्यांना आश्वस्तपणे बापाच्या खांद्यावर मान टाकता येते.

मंदार खुप छान लिहिली आहेस कविता. हे खरंच आहे की बापावर कुणी सहसा कविता लिहित नाही, किंवा असंही असेल कदाचित की, आईच्या महतीपुढे बापाचं महत्व कमी वाटत असेल कित्येकांना. श्रीकांत यांनी दिलेलं उदाहरण पाहता बापाचा ही मुलांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो हे स्पष्ट होते....कविता छान जमली त्याबद्दल अभिनंदन. Happy

स्वतंत्र कविता म्हणून आवडली.

पण तो मात्र
जसा आज दिसला होता...व्रतस्थ...
पोराला घेऊन तोच रस्ता पार करताना
अगदी तस्साच दिसेल
....उद्याही!

इथून पुढे मराठी कविता फसल्यासारखी वाटली.

अनुवाद करताना आशयातही थोडा फरक पडलाय असे वाटले.

तरीही उत्तम प्रयत्न, अभिनंदन!

! Happy !

Hats off bro !

सर्वांनाच धन्यवाद Happy

>>स्वतंत्र कविता म्हणून आवडली.
धन्यवाद बेफी, विजय Happy

>>अनुवाद करताना आशयातही थोडा फरक पडलाय असे वाटले.
विजय, खरं तर मूळ इंग्रजी कविता शेवटी शेवटी थोडी प्रचारकी अंगाने जाणारी आहे. तो आशय मला आवडला नाही म्हणुन थोडा बदल केला. अर्थात म्हणूनच अनुवाद करण्याच्या भानगडीत पडलो नाही, मराठीकरणच म्हटलंय. Happy

Shoulders मूळातच अतिशय सुंदर आहे कविता आणि मराठीकरणही चांगले झाले आहे!
एक चांगला प्रयत्न.

छानच.

हम्म, एक स्वतंत्र कविता म्हणून आवडली. मूळ इंग्रजी कविता माहीती नसल्याने मराठीकरणात काय झालंय हे समजायला मार्ग नाही. मूळ इंग्रजी कविताही बरोबर दिली असती तर बरं झालं असतं.

अरे हो खरंच की. काय आहे नं की बर्याच आयडींच्या स्वाक्षर्या असतात नं मला ते त्यातलंच वाटलं म्हणून वाचायचं सुटलं. दाखवून दिल्याबद्धल आभार्स. Happy

Pages