सोलाण्यांची आमटी

Submitted by अल्पना on 29 December, 2011 - 02:05
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक दिड मुठ सोलाणे, १ मोठा कांदा, ७-८ लसणाच्या (मध्यम आकाराच्या) पाकळ्या, इंचभर आल्याचा तुकडा, २ चमचे धण्याची पुड, २-३ चमचे काळा मसाला, २ चमचे तिखट, २ मोठे चमचे खोबर्‍याचा कीस, हळद, मीठ, हिंग, पाव वाटी कोथिंबीर, तेल.

क्रमवार पाककृती: 

वाटण : कांदा उभा चिरुन थेंबभर तेलावर काळा होईपर्यंत तव्यावर /फ्रायपॅनमध्ये भाजून घ्यावा. कांदा चांगला भाजला की त्याच तव्यावर खोबर्‍याचा कीस भाजून घ्यावा. भाजलेला कांदा, खोबरं, आलं-लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घावे.

सोलाणे पण त्याच तव्यावर किंचीतश्या तेलात छान भाजून घ्यावेत. भाजलेले सोलाणे खलबत्त्यात ओबडधोबड वाटून घ्यावे.

कढईमध्ये तेल गरम करून त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात हिंग, हळद आणि इतर मसाल्याचे जिन्नस घालावेत. हा मसाला छान परतला गेला की त्यात ओबडधोबड वाटलेले सोलाणे घालून परतावे. गरजेप्रमाणे पाणी घालून पातळ करावे. चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आणावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

ही आमटी बाजरीच्या भाकरींबरोबर खायला छान लागते.
अशीच ओल्या वाटाण्यांची, तुरीच्या दाण्यांची पण आमटी करतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडचा घरचा काळा मसाला संपल्याने सध्या मी ही आमटी चिकन मसाला /गरम मसाला / तंदुरी चिकन मसाला अश्या मसाल्यांचं मिश्रण करून बनवली आहे.
चांगली लागतेय अशी पण, तरीही जो रंग आणि चव काळ्या मसाल्याने येते ती अजिब्बात आली नसल्याने आमटी तयार असूनही फोटो काढलेला नाही.

छान प्रकार.

(सोलाण्याचा कुठला प्रकार आमच्याकडे करायचा तर किमान चौपट सोलावे लागतात, कारण सोलता सोलताच ते तोंडात जातात. आमच्याकडे त्याला घाटे म्हणतात.)

सोलाणे म्हणजे ओले हरबरे.
दिनेशदा माझ्या बाबांकडे पण डहाळ्याचे घाटेच म्हणतात आणि आईकडे सोलाणे म्हणतात.

इथे, दिल्लीला सोललेलेच मिळतात घाटे वजनावर पण थोडेसे पाणचट लागतात नुसते खायला.

+ वन रेसिपी, आई करायची, पण कशी ते ठाऊक नाही, कधी शिकायचा प्रयत्न केलाच नाही, आता आमच्याकडे कशी करतात हे मला इथे लिहिता येणार नाही Sad , पण मावशीला विचारुन लिहिणारच मी Proud

इकडे मिळाले तर तुझ्या पद्धतीने लगेच करणेत येईल Happy काळा मसाला आहे, फोटो काढेन केली तर (विपण्या म...:हाहा:)