सांडू शेटचा फोन आलाय ....S S

Submitted by Ramesh Thombre on 19 December, 2011 - 12:36

मुंबई मधल्या एका चाळीत,
राहत असतो सांडू शेट.
चाळीमधूनच हलवत असतो,
सगळे सगळे धंदे थेट.
सांडूशेटचा धाक मोठा,
गल्लोगल्ली पेरला आहे.
सांडूशेटच्या धाका पुढं,
दिल्लीचा राजा हरला आहे.
सांडूशेटचे पंटर सारे ...
गल्लोगली हिंडत असतात.
जगण्याच्याच हप्त्यासाठी
ज्याला त्याला भांडत असतात ...

सांडू शेटचा फोन आलाय ....S S
एक नवी धडकी असते ....
अक्खा दिवस गल्ल्यांमध्ये
हप्त्यानंतर कडकी असते.
सांडू शेठ मुंबई मध्ये,
कुठल्या गल्लीत राहत असतो.
सांडू शेट मुंबई मधून,
सगळं कसं पाहत असतो ?
ज्याला त्याला प्रश्न असतो,
शेट कसा दिसत असेल ...?
एवढा हप्ता पाहून मग ...
शेट कसा हसत असेल ?

हप्त्यासाठी दर दिवशी ...
जो तो चिंता करत असतो.
सांडू शेट दिवसेन दिवस
वाढता गुंता ठरत असतो.

...
एक दिवस सकाळीच
हप्त्यावाला सुन्न झाला.
हप्ता मागणारा त्याचा आवाज
आज अगदीच खाली गेला.
आजचा हप्ता सांडूशेटच्या,
चिते साठी जाणार आहे.
सांडू शेटच्या अंत्यविधीस
सांगा कोण कोण येणार आहे.

सगळी सगळी दहशत सोडून,
सांडू शेट गेला होता ...
हप्ते वसुली साम्राज्याचा,
अखेर अंत झाला होता.
...
ज्याला त्याला उत्सुकता
आता तरी शेट दिसेल ...
एवढ्या पैश्यात मरणारा
शेट साला कसा असेल ?
सांडू शेटच्या अंत्ययात्रेस
भली मोठी रांग होती
पांढर्या कपड्या बाहेर दिसते
फक्त त्याची टांग होती.
शेवटपर्यंत दिसला नाही,
सांडू शेट होता झाकलेला.
मेलेल्या शेट समोर ...
पुन्हा जो तो वाकलेला.

शेवटी शेटला आग देऊन
सारेच मग निघून गेले ...
न दिसलेलं त्याचं रूप,
त्याच्या भीतीत पाहून गेले.
सांडू शेट गेल्यावर,
आता हप्ता बंद होणार .
जो तो आता म्हणे आपल्याच
जगण्यात धुंद होणार.
..
पण दुसर्याच दिवशी हप्तेवाला
आमच्या दारात उभा झालाय ...
म्हणे ... बघताय काय ...
छोट्या सांडूशेटचा फोन आलाय.

.
.
- रमेश ठोंबरे

गुलमोहर: 

मस्त!!!