स्वयंपाकघरातल्या युक्त्या

Submitted by आरती on 26 November, 2011 - 12:18

युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).

अशा पण काही टिपा (अनेकवचन Happy ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.

तर अशा उपयोगी सुचना प्रत्येकाकडेच असतात, त्या सगळ्या एकत्रित असाव्या, त्यासाठी हा धागा.

[त्या सगळ्या वरतीच एकत्र ठेवायचा प्रयत्न मी करेन, देणार्‍याच्या नावासहित]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>[त्या सगळ्या वरतीच एकत्र ठेवायचा प्रयत्न मी करेन, देणार्‍याच्या नावासहित]
नको.

भलेमोठे होईल नंतर आणि वाचायला अवघड. पुन्हा लिहिणारे प्रतिसादात लिहीतील तेही राहीलच. उगाच डबल काम आणि उपयोग काही नाही. 'लगेच मदत हवी' वाले दुसर्‍या धाग्यावर जातील. वाचणारे इथले वाचून लक्षात ठेवतील.

work smarter, not harder. (पहिली युक्ती)
धन्यवाद.

सर्वसाधारणपणे, अन्न शिजवण्यासाठी जे लोक प्रेशर कुकर वापरतात त्यातले कुणी ३ शिट्य़ा, कुणी ४ तर कुणी पाच शिट्ट्या वाजवून मगच कुकरखालचा गॅस बंद करतात...अंगवळणी पडलेली असली तरी ही खरं तर चुकीची पद्धत आहे...अर्थात ह्या पद्धतीनेही अन्न शिजतं...नाही असे नाही...पण ह्यात गॅस जास्त जळतो आणि अन्न शिजवण्यासाठी ज्या वाफेच्या प्रेशरचा वापर करायचा तेच प्रेशर आपण वारंवार घालवून देत असतो....प्रेशर कुकर...ह्या शब्दातच सगळं येतं..प्रेशरवर कुक होणं..शिजणं..हे त्यात अभिप्रेत आहे...म्हणून....कुकरची पहिली शिट्टी वाजण्याआधीच जेव्हा कुकर फुसफुसू लागतो तेव्हा गॅस मंद करावा आणि साधारण पाच मिनिटानंतर तो बंद करावा...कुकरमध्ये तयार झालेल्या वाफेच्या प्रेशरमुळे/दाबामुळे त्यातले अन्न...डाळ,भात...अगदी कडधान्यदेखिल व्यवस्थित शिजतात...हा माझा गेल्या कैक वर्षांचा प्रात्यक्षिक अनुभव आहे....करून पाहा आणि आपला गॅसही वाचवा.

देवकाका, हल्लीचे Futuraचे कुकर याच तत्वावर चालतात. त्यांची शिट्टी होत नाही. त्यामुळेच यात कमी वेळात अन्न शिजतं.

कांदा गॅस कींवा रेंजजवळ एग्झॉस्ट असल्यास त्याच्याजवळ चिरावा (एग्झॉस्ट सुरु ठेऊन) - डोळ्यातुन पाणी येत नाही.

कांदा सोलुन पाच मिनिटं पाण्यात घालून ठेवावा आणि मग चिरावा. असे केल्याने डोळ्यातून पाणी येत नाही.

>>>देवकाका, हल्लीचे Futuraचे कुकर याच तत्वावर चालतात. त्यांची शिट्टी होत नाही. त्यामुळेच यात कमी वेळात अन्न शिजतं
ममा,ह्याचा अर्थ मी अजून बाबा आदमच्या काळातच वावरतोय की काय? Wink

चांगला धागा.

तूरडाळ शिजवायच्या अगोदर जर ती अर्धा तास कोमट / गरम पाण्यात भिजवून मग शिजवली तर मऊसूत शिजते. खास करून थंडीच्या दिवसांत.

भाजीत कोणता मसाला घालणार असाल तर तो चिरलेल्या भाजीच्या फोडींना चोळून ठेवल्यास जास्त मुरतो व कमी पुरतो.

ज्यांना आहारातील / स्वैपाकातील मीठ कमी करायचे आहे त्यांनी पदार्थांत आमसूल, लिंबाचा रस, दही यांचा वापर करावा. तुलनेत त्या पदार्थात मीठ कमी लागते.

कोथिंबिरीच्या देठांची जुडी, कढीपत्त्याच्या काड्यांची जुडी करून ठेवली व पदार्थांत वापरली तरी त्याला कोथिंबीर, कढीपत्त्याचा स्वाद येतो.

काकडी जरा जून असेल तर चिरताना तिचा शेंडा व बुडखा कापल्यावर तो भाग काकडीच्या निमुळत्या टोकांना गोलाकार चोळावा/ घासावा. एक प्रकारचा चिकटसर द्राव निघतो. तो धुवून काढून टाकावा किंवा त्या पृष्ठभागाची चकती कापून काढून टाकावी. यामुळे काकडीचा कडवटपणा कमी होतो. (ही एका आजींनी सांगितलेली टिप आहे.)

पातळ पोहे चिवड्यासाठी जाळीच्या पिशवीत उन्हात २-३ दिवस ठेवले की खमंग निघतात. त्यांना वेगळे भाजत बसावे लागत नाही.

[ अवांतर : काल यूट्यूबवर कांदा चिरण्यासाठी हेल्मेट घालून बसलेल्या युवकांची क्लिप पाहिली! Proud ]

देवकाका, काही पण काय. अहो हे कुकर अजुन एवढे लोकप्रिय झाले नाहीत बहुतेक, त्यामुळे तुम्हाला माहित नसतील. आपल्याकडे भसाभस शिट्ट्या झाल्याशिवाय बायकांना तो भात केल्याचा फिल येत नसेल. Light 1 Futuraला कुकरच्या उभ्या शिटीऐवजी चपटी पट्टी असते अतिरिक्त प्रेशर कमी व्हायला, पण पुर्ण वाफ मात्र जात नाही.

अरुंधती अशीच चकती पिकलेल्या पपईचीही काढतात.

बर्‍याच वेळा आपल्याला कशात गुळ मिक्स करायचा असतो तेंव्हा तो फोडायचा, चुरायचा कंटाळा येतो. अशावेळी थोड्या पाण्यात तो गुळ गरम करायचा म्हणजे तो लवकर वितळतो. खास करून मालपुआ साठी.

जेवणावर पापड तळायचे असतील तर आधीच भाजी किंवा आमटी करण्याच्या भांड्यात पापड बुडेल इतकाच तेलाचा थर घेउन त्यात पापड तळून तळल्यावर प्लास्टीकच्या पिशवीत गाठ मारून ठेवावेत. त्यामुळे अतिरिक्त तेल, वेगळे भांडे लागत नाही. भाजीसाठी तेवढ्या तेलाची आवश्यकता नसेल तर ते भांड्यातून काढून ठेवावे.

कांदा सोलुन पाच मिनिटं पाण्यात घालून ठेवावा आणि मग चिरावा. असे केल्याने डोळ्यातून पाणी येत नाही.

<<<
अजुन एक अ‍ॅडिशन, कापण्या पूर्वी कांदा साल काढून धुवायचा, ५ मिनिटं 'डीप क्रिजर' मधे ठेवायचा, मग कापायचा , अजिबात पाणी येत नाही.

मस्त धागा. धन्यवाद आरती Happy
आश्चिग ह्यांनी सांगितलेली एक्झॉस्ट चालू करुन कांदा कापण्याची युक्ती उपयोगी पडली. धन्यवाद आश्चिग Happy

पोहे, कुस्करा, भाताचे प्रकार या पैकी कशातही तेल थोडे जास्त झाल्यास, नारळाच चव घालुन, व्यवस्थित हलवुन एक वाफ आणावी. तेल शोशले जाते. चवपण छान येते.

* तुरिची डाळ शिजवताना त्यात चमचाभर तेल, थोडा हिंग आणि हळद घातला तरी डाळ एकदम मऊशार शिजते आणि तिचा स्वाद ही सुंदर लागतो.
* कणिक कोमट पाण्यात भिजवली असता, पटकन भिजते आणि पोळ्या मऊसूत होतात.
* कुकरच्या भांड्यात भात लावताना, तांदूळ आणि पाणी घालून झाले की चमचाभर तूप किंवा तेल सोडावे, भात चिकट होत नाही, मऊ आणि मोकळा होतो शिवाय काढून ठेवताना कधी कधी भांड्याला चिकटतो, तसा चिकटत नाही.
* फोडणीचा भात करताना, शिळा भात कुकरच्या भांड्यातूनच थेट काढून आपण फोडणीत घालतो (निदान मी तरी तसंच करते.) तो चिकट ठिसूळ असेल तर त्याच्या गुठळ्या होतात. त्यासाठी कुकरच्या भांड्यातच तो भात किंचित सुटा करून, त्यात हळद, मीठ साखर घालून ठेवावा, एकिकडे पुर्वतयारी करावी, मग तो भात डावाने सारखा करावा, मीठ आणि साखरेमुळे हलका ओलसर होतो भात आणि गुठळ्या पटकन सुटतात, शिवाय हळद फोडणीत घातल्याने जो जर्द पिवळा रंग येतो तो येत नाही.

आलं फ्रिजमध्ये राहिलं तर काही दिवसांनी त्याला बुरशी तरी येते किंवा सुकल्यासारखं तरी होतं. त्यापेक्षा बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून सालं काढून बोटभर लांबीचे किंवा हव्या त्या आकारात तुकडे करुन झिपलॉकमध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवावं. भरऽपूर टिकतंच शिवाय पटकन हाताशी येतं. चहाला किंवा पदार्थात घालायला हवा तसा एकेक तुकडा काढून छोट्या किसणीवर पाहिजे तेव्हा किसता येतो. ( ही टिप फूड नेटवर्कवरच्या रेचल रे कडून साभार Happy )

मस्त धागा.

१. आमटी, रस्सेदार भाजी इ करताना एखाद-दोन चमचे ओटमील घालावे. रस्सा दाट होतो आणि ओटमील आपसूक पोटात जाते.

२. नेहमी २-३ टोमॅटो फ्रीजरमध्ये ठेऊन द्यावेत. ग्रेव्हीकरता टोमॅटो वापरायचे असतील तर साधे टोमॅटो कापण्यापेक्षा हे टोमॅटो किसून घेतले तर लगेच शिजतात. फ्रीजरमधून काढल्याकाढल्या लगेच किसावेत.

मश्रूम फ्रीजात, कागदी पुड्क्यात ठेवावे. जास्त टिकतात. त्यांना पाण्यात धुवू नये. फार पटकन पाणी शोषून घेतल्या गेल्यामुळे शिजवताना पांचट होतात. त्या ऐवजी स्वच्छ ओल्या (पण घट्ट पिळून घेतलेल्या) कापडानं किंवा पेपरटॉवेलानं पुसावे.

(आभार : फूडनेटवर्क.)

मामी टोमॅटोची आयडिया मस्तच,करुन बघेन. साधारण किती दिवस टिकतो टोमॅटो फ्रिझरमध्ये?

दह्याची लस्सी करताना एक ग्लासला अर्धाकप मिल्क पावडर टाकावी. क्रीम न घालता घट्ट्सर लस्सी होते आणि कॅलरीजपण वाढत नाहीत. लस्सीत केवडा नाहितर रोज इसेन्स घातल्यामुळे पावडर मिल्कचा वासपण येत नाही.

आमलेट करायला अंडी ओट्यावर ठेवली की घरंगळत जातात, फुटू शकतात. ते होउ नये म्हणून आपला गरम
भांडी उचलायचा चिमटा( पक्कड) असतो त्याच्यामध्ये ती अंडी ठेवावीत. दोन्हीकडून नीट राहतात.

वेलदोडे सोलून झाल्यावर त्यांची साले कॉफी-पावडरमध्ये घालून ठेवावीत. कॉफीला वेलदोड्याचा मस्त स्वाद लागतो.

स्वैपाकात अगदी कमीत कमी तेल वापरायचे असेल तर भाज्या उकडून / शिजवून घ्याव्यात व नंतर अगदी अर्धा चमचा तेलाची फोडणी करून मंद आचेवर परताव्यात व वाफ आणावी.

ब्रेड कापताना जर सुरीची धार बोथट वाटली तर सुरीचे पाते गॅसवर किंचित गरम करून मग त्याने ब्रेड कापावा.

लोणी, ओल्या नारळाची वाटी यांना जर वास येत असेल तर मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे व धुवून घ्यावे. वास जातो.

ताक आंबट होऊ नये म्हणून ताकात भरपूर पाणी घालून ठेवावे. प्यायच्या वेळेस वरचे पाणी वेगळे काढावे व खालचे दाटसर ताक घ्यावे.

फ्लॉवर ची भाजी करताना, फ्लॉवर ५-१० मिनीट उकळत्या पाण्यात ठेवावा, कमी तेलात, पटकन भाजी होते.
चांगला निथळुन घेतला तर भाजी पानचट पण होत नाही. Happy
(अ.कु च्या टिपवरुन लक्षात आली)

फोडणीच्या भातासाठी किंवा असेही भात मोकळा करण्यासाठी काट्याने मोकळा करावा. शिते मोडत नाहीत. बिर्याणि/खिचडी/जीरा राईससुद्धा शिजल्यानंतर काट्यानेच सारखा करावा.

उकडलेले बटाटे कुस्करायलाही काटा जास्त चांगला. बटाट्याचा गच्च/चिकट गोळा होत नाही.

Pages