मायक्रोवेव्हमधल्या झट्पट सुरळीच्या वड्या

Submitted by आर्च on 26 November, 2011 - 08:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वड्यांसाठी:
१ कप डाळिचे पीठ
१ कप दही
२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा हळद
चिमुट्भर हिंग
१/४ चमचा किसलेलं आलं

फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
कढीपत्ता
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
तीळ

सजावटीसाठी
बारीक चिरून कोथींबीर
ताज्या नारळाचा चव.

क्रमवार पाककृती: 

१. एका मायक्रोवेव्हमध्ये चालणार्‍या भांड्यात वड्यांसाठी लागणारं सामान एकत्र करणे
२. विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
३. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
४. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
५. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
६. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
७. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
८. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे

आता हे मिश्रण अगदी गरम असतानाच तेल न लावलेल्या अल्युमिनम फॉईलवर कालथ्याने पट्पट पसरणे. अगदी पातळ लेअर करण महत्वाचं( मिश्रण फॉईलच्या एका बाजुला चमच्याने घालून कालथ्याने पटपट पातळ लेअर होईल असे ओढून पसरणे) हे खरं तर ट्रिकी आहे थोडं फार. मिश्रण गरमच असं पाहीजे नाहीतर पसरता येत नाही.

पातळ लेअरच्या सुरीने खूणा करून पट्या कापून घ्यायच्या.

पट्या गुंडाळून वड्या करायच्या.

सगळ्या वड्या गुंडाळून झाल्यावर त्यावर तेल गरम करून फोडणी करून पसरवायची.

वरून ताजी कोथींबीर आणि नारळाचा चव पसरायचा.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात ५० वड्या होतात.
अधिक टिपा: 

मिश्रण पटकन पसराव लागतं नाहीतर गोळा होऊ शकतो.
शिजवण्यासाठी बरोबर ४.५ मिनिटं पुरतात. ( अर्थात मायक्रोवेव्हच्या पॉवरवर अवलंबून आहे)
मिश्रण कालथ्याने एका डिरेक्शनमध्येच ओढायचं
जेवढा पातळ लेअर तेवढ्या वड्या नाजूक होतात.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट व स्वतःच थोडसंच व्हेरीएशन.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च, मस्त दिसतायंत गं वड्या Happy मलाही करुन बघायचा मोह होतोय पण ते मिश्रण पसरणं हेच कौशल्याचं काम आहे आणि तिथे शॉर्टकट नाही त्यामुळे पहिल्यांदा देखरेखीखाली कराव्या असं वाटतंय Happy

झाल्या झाल्या झाल्या वड्या.... एकदम पर्फेक्ट... आर्च तुला किती धन्यवाद देऊ गं... पहिलाच प्रयोग सफल Happy फोटो आयफोन वरून कसा अपलोड करायचा?

अरे वा मस्तच. मी मायबोलीवरचीच कृती वापरून वड्या करते पण त्या कुकरमध्ये कराव्या लागतात. आता यापण करून बघेन.
बाकी शीर्षकात ते झटपट मायक्रोवेव्हच्या झालय ते मायक्रोवेव्हच्या झटपट सुरळीच्या वड्या करशील का प्लीज?

आत्ताच या पद्धतीने सुरळीच्या वड्या केल्या, मस्त झाल्या, एकदम परफेक्ट कृती, काहीही चुका झाल्या नाहीत.
धन्यवाद आर्च

सुंदरच दिसताहेत वड्या.
आईला एवढ्यासाठी पाच ताटे तयार ठेवावी लागतात. हा एकच पदार्थ असा असेल कि, ज्यात ताटाला तेल अजिबात लावायचे नसते.

आर्च आणि रुनी, दोघींचेही फोटो एकदम मस्त!

नक्कीच करून बघणार ह्या फटाफट होणार्‍या सुरळीच्या वड्या Happy

आर्च, पाककृती सार्वजनिक करणार का प्लिज?

अरे वा मस्त!!! मावे मधील काहीही मला करायला आवडते... आणि त्यातुन आवडती रेसीपी.

आज नक्कि करणार

काल केल्या पण पार पोपट झाला. तो का झाला असावा ते ही आलं लक्षात. मावेचं टेंप कमी पडलं. माझ्या मावेत आणखी एक दोन मिनिटं चालू शकलं असतं. जेव्हा मी फॉईलवर पसरलं तेव्हाही मिश्रण बर्‍यापैकी पातळ होतं. पुढच्यावेळी जरा जास्त वेळ ठेवून बघेन.
कृती सोप्पी, सुटसुटीत आहे ह्यात वादच नाही. धन्यवाद आर्च.

मस्त दिस्ताहेत वड्या, आर्च! मागे कधीतरी तू एका खादाडी ब्लॉगाची लिंक दिली होतीस या वड्यांसाठी. जाड्याभरड्या, पण अफाट मस्त झाल्या होत्या. (पिठाचा थर जरा पातळ पसरायला हवा हे आता लक्षात ठेवून तुझ्या कृतीनं या वड्या करेन.)

हाय पॉवर म्हण्जे किती वॅट्स ते सांगता येइल का प्लीज? माझ्याकडे ६०० आणि ८०० अशी २ सेटिंग्ज आहेत.

पाकृ. फारच सुट्सुटीत आणि मस्त आहे.

अपर्णा, ८००वर ठेवा. मायक्रोवेव्ह ओव्हनाच्या कमाल पावरवर शिजवायचं.

आर्च,
केल्या या पध्दतीने , कधी जमतील असं वाटलं नव्हतं पण छान जमल्या , थँक्स कृती सोपी केल्या बद्दल :).
हा फोटो Happy
svadya.jpg

आई एक्स्पर्ट आहे यात.
माझ्या आईचं व्हॅरिएशन, वड्या गुंडाळण्या आधी ओतलेल्या मिश्रणावर हिरवी चटणी पसरते (हिरवी मिर्ची- ओलं खोबरं-कोथिंबिर एकदम घट्ट चटणी), मग गुंडाळते , शिवाय फोडणी सगळं मिळून मस्तं झणझणीत लागतात.
सर्व्ह करताना करदळीच्या किंवा केळीच्या छोट्या किंवा कट केलेल्या पानावर.

रुनी, दीप्स, आणि अंजली सगळ्यांच्याच अगदी मस्त दिसतायत वड्या. पाहुण्यांसाठी केल्यावर मात्र पटकन होतास असं म्हणायच नाही. Happy

दीपांजली, चटणी लावायची कल्पना मस्तच. पुढच्या खेपेला नक्की लावणार.

वॉव Happy तोंपासु तोंपासु ...
काय मस्त फोटो आहेत एक से बढ्कर एक सुगरणींनो. मस्तच Happy

डीजे च्या वड्यांचा रंग काय मस्तय.
मी पण रुनी सारखे वड्या वळण्या आधी कोथिंबिर खोबरं आणि फोडणी घालून मग करते गुंडाळया Happy
परवच केल्या होत्या. आता ही मावे ची सोप्पि रेसिपी करुन बघायला हवी.

Pages