केळफुलाची भाजी

Submitted by सायो on 6 November, 2011 - 19:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

एक केळफुल, शिजायला कठीण असं कोणतंही कडधान्य- काळे वाटाणे, हरभरे इत्यादी- केळफुलाच्या प्रमाणात घेतलं तरी चालेल, फोडणीकरता हिंग, हळद, मोहरी, भाजीत घालायला गूळ, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर, वरुन सुक्या मिरच्यांची फोडणी. रात्रभर भाजी भिजत घालायला थोडं ताक.

क्रमवार पाककृती: 

केळफुल निवडण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा.

http://www.youtube.com/watch?v=lhCYK5U52VA

१.ह्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केळफुल निवडून बारीक चिरुन घ्यावे. चिरल्यावर पाण्यात थोडं ताक घालून त्यात भाजी रात्रभर भिजवावी. असं केल्याने केळफुल खाजरं असल्यास खाज निघून जाते.

२.सकाळी भाजी चांगली निथळून घ्यावी. काळे वाटाणे, हरभरे वगैरे शिजायला कठीण कडधान्य असल्यास कुकरमध्ये एकाच भांड्यात घेऊन ३ शिट्ट्या पुरतील. (मूग, मटकी असल्यास वेगवेगळं शिजवून घ्यावं. कडधान्याला एकच शिट्टी पुरेल पण केळफुलाला ३ लागतील)

३.भाजी शिजल्यावर पातेल्यात हिंग, हळद, मोहरीची फोडणी करुन त्यावर शिजलेली भाजी घालावी. त्यात गोडा मसाला, लाल तिखट, गूळ, मीठ घालून चांगली वाफ काढावी. वाढताना वरुन लाल सुक्या मिरच्यांची फोडणी, ओलं खोबरं, कोथिंबीर घालून वाढावी.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक २,३ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१. केळफुल निवडायला भरपूर वेळ लागतो. तेव्हा हातात वेळ असतानाच ह्या भाजीचा घाट घालावा.
२. मूग, मटकी वगैरे घालायची असल्यास केळफुलाबरोबर न शिजवता वेगळं शिजवावं. आणि एखादी शिट्टीच पुरे. नाहीतर भाजीचा गचका होईल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृतीचं शीर्षक वाचून मी भावूक झालेय. आमची आजी ही भाजी करायची. केळफुलाची सालं आम्ही पायात घालून घरभर हिंडायचो. (एवढं लिहून थांबते, नाहीतर माझा आयडी हॅक झाल्याची शंका यायची! Proud )

घटक पदार्थ सगळे चांगले आहेत, लहानपणी ही भाजी का आवडत नव्हती कोणास ठाऊक, आता कोणी आयती दिली तर खाऊन बघायला हरकत नाही. Wink

फारशी कधी खाल्ली नाहीये पण काळ्या वाटाण्याबरोबर आवडेलच. फार खटाटोप असतो भाजीला हे लहानपणापासून ऐकल्याने मी करुन बघेन अशी शक्यता वाटत नाही Happy

सायो, धन्यवाद.

आज सकाळी केली होती हरभरे घालून. ताक नव्हते घरी त्यामुळे रात्रभर लिंबूपाण्यात ठेवली होती. पण मला वाटते ताकात ठेवल्यास अजून छान चव येईल. केळफुळ सोलताना जुन्या मायबोलीवर सूचनांप्रमाणे हाताला थोडे खोबरेल तेल लावले होते. त्यामुळे चीक हाताला चिकटला नाही. चिरून होईल तसे / झाल्यावर लगेच पाण्यात टाकले नाही तर चिकामुळे लगेच काळी पडायला लागते.

हो, ते राहिलं. आवडली. Happy

निवडताना संयमाच्या अंतिम टप्प्यात कळीतल्या काही दांड्या काढायच्या राहून गेल्या (?) त्या शिजवलेल्या भाजीत वाळलेल्या गवताच्या काड्यांसारख्या कडक झाल्या होत्या. Proud