"देऊळ" प्रिमियर — "फोटो वृत्तांत"

Submitted by जिप्सी on 4 November, 2011 - 14:51

'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुसर्‍या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणुन माझं नाव घोषित झाले :-). नीलवेदने तर फोटो पोस्ट करायच्या आधीच सांगितले होते कि, "जिप्स्या, "देऊळ" या विषयावरच्या फोटोला तुलाच बक्षिस मिळणार, आणि त्यातील एक तिकिट मला पाहिजे Proud आणि झालंही अगदी तसंच 'देऊळ' - प्रकाशचित्र स्पर्धा निकाल जाहिर झाला आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मला जाहिर झाले. "देऊळ" चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी असे बक्षीसाचे स्वरुप होते. खरंतर मायबोलीवर या चित्रपटाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं यामुळे या चित्रपटाविषयी आकर्षण खुपच वाढले होते. त्यामुळे देऊळचा "फर्स्ट शो" पाहवयास मिळणार याचा कोण आनंद झाला होता.

दुसर्‍या दिवशी मंजुडीचा फोन आला आणि तिने चित्रपटाची वेळ, ठिकाण सगळं व्यवस्थित सांगितलं. आधी कबुल केल्याप्रमाणे प्रथम नीलला फोन करून येणार का विचारले असता काही कामानिमित्त त्याला जमण्यासारखे नव्हते. माझ्याकडची एक तिकिट तशीच असल्याने यो रॉक्स आणि मामीला विचारले, पण दोघांनाही अर्जंट कामं असल्याने जमण्यासारखे नव्हते. शेवटी माझ्या एका मित्राला प्रसाद कुलकर्णीला (मायबोली आयडी प्रकुल) तयार केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझीही हि पहिलीच वेळ असल्याने बराचसा आनंद आणि थोडीशी धाकधुक मनात घेऊन
ठिक ७:३० ला पीव्हीआर सिनेमा, फिनिक्स मॉल लोअर परळ, स्क्रिन नंबर सात इथे पोहचलो.
येथे पोहचल्यावर समोरच देऊळचे पोस्टर दिसले आणि त्यावर "मायबोलीचा" लोगो :-). पटकन एक फोटो काढुन घेतला ;-). थोड्याच वेळात मंजुडीही आली. तेव्हढ्या सगळ्या भागात त्यावेळेस आम्ही तीघेच होतो. इतर मायबोलीकर येण्याच्या आधीच आम्ही बक्षीस मिळाल्याच्या आणि प्रिमियर शोचा आनंद तिघांनी "Baskin Robbins" मधुन मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन साजरा केला. Proud

सर्वप्रथम ठिक ७:३५ वाजता सुलभाताई देशपांडे यांचे आगमन झाले. त्यानंतर आठ वाजल्यानंतर एकेक तार्‍यांचे आगमन व्हायला सुरूवात झाली. याच तारे तारकांच्या मधे आपल्या मायबोलीकरांचेही एक एक करून आगमन व्हायला लागले आणि अगदी घरचे कार्य असल्याप्रमाणे मी आणि प्रसाद त्यांना अश्विनी, साधना, गजानन, आनंदयात्री यांना रीसीव्ह करायला खाली जात होतो. :फिदी:, त्यामुळे अधुन मधुन का होईना पण रेड कार्पेट सोहळा पाहता येत होता. हळुहळु मराठी चित्रपटसृष्टीतले एक एक तारे तारके हजर होऊ लागले आणि इतका वेळ शांत असलेला तो लाउंज गजबजु लागला. मंजुडीने सांगितल्याप्रमाणेच सगळे कलाकार घरगुती कौतुक समारंभाला यावे तसे अगदी जिव्हाळ्याने आलेले होते. यात गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, विभावरी देशपांडे, मन्वा नाईक, प्रतिक्षा लोणकर, संदीप सावंत, ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, आतिषा नाईक, स्वानंद किरकिरे, स्मिता तांबे, नितीश भारद्वाज, प्रतिमा कुलकर्णी इ. कलाकारांनी हजेरी लावली होती. माझा पहिलाच अनुभव असल्याने सुरूवातीला सगळ्या सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो, पण नंतर मात्र सर्रास फोटो काढायला लागलो पण तेव्हढ्यात मंजिरीला समीरने 'तुम्ही आत आल्याशिवाय मला स्क्रिनींग सुरू करता येणार नाही' असा आग्रह करत आत नेले होते. तिकिटे घेताना मंजिरीशी झालेली ओळख त्या गर्दीतही तो विसरला नव्हता, अगदी नावासकट. मायबोली किती स्पेशल आहे ते तेव्हा लक्षात आले. Happy आमच्या जागा शोधुन एकदाचे स्थानापन्न झालो आणि माना वळवुन वळवुन अजुन कोणकोण आलेय हे पाहात होतो तोपर्यंत स्टेजवर निर्माते अभिजीत घोलप आले आणि सिनेमाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, कथा-पटकथाकार आणि मुख्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, कार्यकारी निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्धी प्रमुख समीर जोशी आणि राम कोंडिलकर यांची ओळख उपस्थित प्रेक्षकांना करून दिली.

अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासुनच चित्रपटाने पकड घ्यायला सुरुवात केली आणि आम्हीही त्या "मंगरूळ" गावचा एक भाग होऊन राहिलो. इरसाल गावच्या इरसाल माणसांप्रमाणे त्यांची नावेही तशीच इरसाल. कविता करणारा "पोएट्या", मुंबईत राहणारा "ऑडीयन्स", पत्रकार "महासंग्राम", जांबूवंतसिंग ऊर्फ टोम्या :फिदी:. खरं सांगायचा तर यातील प्रत्येकजण ती भूमिका अक्षरश: जगत होता. जेंव्हा केशा आजारी पडतो तेंव्हा गावच्या बायका घरात येऊन सांत्वन करताना "ताप आहे का?" ........."खरंच ताप आहे कि" म्हणतात तो प्रसंग तर अगदीच लाजवाब. यात ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, विभावरी देशपांडे, सरपंचबाई आतिशा नाईक यांचा अभिनय ग्रेटच. उषा नाडकर्णीचे "टराटरा फराफरा", काळा चष्मा घालुन टिव्ही बघणारी म्हातारी, सिरीयलच्या ब्रेकमध्ये स्वत:च्या पोराचे कौतुक करणारी आणि ब्रेक संपताच परत सिरीयल बघायला जाणारी आई, केश्या सोनालीबरोबर बोलत असताना नानाची होणारी घालमेल, शेवटचा नाणेघाटातला प्रसंग, केश्याला पिंकीने म्हटलेले "आय हेट यु" त्यावर केश्याचे "म्हंजी काय?" असा प्रश्न, इ. सारेच प्रसंग जबरदस्त. :-). नाना पाटेकरांच्या अभिनयाविषयी तर काय बोलावे? ग्रामसभेच्या वेळी भाषण करणारा नाना, सागरगोट्या/कांदाफोडी खेळणारा नाना, त्यांचे "शुन्य मिनिटातले" प्रत्येक काम, टोलनाक्यावर "टोल देऊ का?" असे विचारणे, त्यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणार्‍या मुलाने नका देऊ म्हटल्यावर "देतो ना" म्हणत केलेला अभिनय, बेरकी राजकारणी नानाने मस्तच रंगवलाय Happy

नाना आणि दिलीप प्रभावळकरांमधील "अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे. कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील" हा संवादही खासच. थोडक्यात काय तर सगळ्यांचे अभिनय, कथा, पंचेस, गाणी, सगळंच कसं मस्तच. :-), सुरुवातीला करडी गाईला हाका मारत धावणारा आणि तिच्यामृत्यू नंतरचा, देवळात देवालाच शोधायला निघालेला केश्या, गिरीश कुलकर्णींने अत्यंत सहज सुंदर अभिनय केला आहे. ऑलराऊंडर गिरीश कुलकर्णी बेस्टच. उत्तम अभिनय, संगीत, चित्रिकरण, दिग्दर्शन इ. गोष्टी चित्रपटाच्या जमेच्या बाजु आहेत. चित्रपटाचा शेवट हा देवळाचा "कळस" आहे.

बराच उशीर झाल्याने मध्यंतरानंतर मंजूडी, अश्विनी,साधना आणि साधनाची आई असे परत निघाले. आम्हाला (मी, प्रसाद, आनंदयात्री, जीडी & फॅमिली) मात्र मंगरूळ गावाने आणि गावकर्‍यांनी मोहिनी घातल्याने संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थांबलो. Happy

प्रत्येकानी आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. एका दर्जेदार चित्रपटाचा प्रिमियर शो मायबोलीमुळे पाहवयास मिळाल्याबद्दल मायबोलीचे मनापासुन आभार!!!!!!

सगळेच गडबडीत असल्याने कलाकारांसोबत मायबोलीकरांचे फोटो घेता आले नाही पण प्रिमियर शोच्या वेळेस टिपलेली काही हि प्रकाशचित्रे. पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो. त्यातीलच हे काहि निवडक फोटो:

नाना पाटेकर
दिलीप प्रभावळकर
स्वानंद किरकिरे
सोनाली कुलकर्णी/मोहन आगाशे
मोहन आगाशे
सोनाली कुलकर्णी
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, नितीन वैद्य,समीर जोशी, राम कोंडिलकर

नितीश भारद्वाज
गिरीश कुलकर्णी
तुषार दळवी
उषा नाडकर्णी
उमेश कुलकर्णी आणि मन्वा नाईक
स्मिता तांबे
मिता सावरकर
प्रतिक्षा लोणकर
प्रतिमा कुलकर्णी

Groups audience: 

मस्त फोटोज. फोटोतली बरीच मंडळी माहीत नाहीत. शक्य असेल तर फोटोसोबत त्यांची नावं पण दे जिप्सी.
दिलीप प्रभावळकरच्यानंतरच्या फोटोतला कोण आहे, मायबोलीकर असूदे असाच दिसतो ना. वविच्या फोटोत होता बहुदा.

सुंदर आहेत फोटो. बक्षीसविजेत्या मायबोलीकरांच्या उपस्थितीमुळे हे सगळं बघायला, वाचायला मिळतंय. मस्तं वाटलं.

रुनी म्हणते तसं फोटोतले तरूण चेहरे ओळखू आले नाहीत. Proud कृपया नावं द्या.

प्रभावळकरांनंतर सगळे माबोकरच आहेत की काय असे वाटले.. तरी म्हटलं कोणी ओळखेनात का Wink
जीटीजीला आल्यासारखे आलेत सगळे.

फोटो छान आलेत.

धन्स लोक्स Happy
फोटोतली बरीच मंडळी माहीत नाहीत. शक्य असेल तर फोटोसोबत त्यांची नावं पण दे जिप्सी.
>>>>>जितकी नावे माहिती होती तितकी अपडेट केली. Happy

दिलीप प्रभावळकरच्यानंतरच्या फोटोतला कोण आहे, मायबोलीकर असूदे असाच दिसतो ना. वविच्या फोटोत होता बहुदा>>>>स्वानंद किरकिरे आहेत Happy

शेवटून तिसर्‍या फोटोतली प्रतिक्षा लोणकर आहे का?>>>> येस्स पराग.

बक्षीसविजेत्या मायबोलीकरांच्या उपस्थितीमुळे हे सगळं बघायला, वाचायला मिळतंय. मस्तं वाटलं.>>>>अगदी अगदी Happy मायबोलीमुळेच आम्हालाही हा सोहळा अनुभवता आला. धन्यवाद मायबोली आणि टिम. Happy

शबाना आझमी छाप अवतार केलेल्या बाई कोण आहेत ?>>>>>प्रतिमा कुलकर्णी Happy

प्रभावळकरांनंतर सगळे माबोकरच आहेत की काय असे वाटले.. तरी म्हटलं कोणी ओळखेनात का
जीटीजीला आल्यासारखे आलेत सगळे.>>>>> Happy Wink

मस्त रे!

तुला प्रीमिअर बघायची संधी दिल्याबद्दल मायबोलीला आणि मला प्रीमिअर बघायची संधी दिल्याबद्दल तुला धन्स!!:)

जिप्स्या नेहमीप्रमाणेच मस्त.........

स्मिता तांबे आणि प्रतिक्षा लोणकरच्या मधे आहे ती "मिता सावरकर" आहे रे (चुकले असल्यास पोस्ट एडिट करण्यात येईल Proud )...... चित्रपटात फार दिसली नसली तरी असंख्य अ‍ॅड्समध्ये मराठी झेंडा फडकवत असते ती..... Happy

जेंव्हा केशा आजारी पडतो तेंव्हा गावच्या बायका घरात येऊन सांत्वन करताना "ताप आहे का?" ........."खरंच ताप आहे कि" म्हणतात तो प्रसंग तर अगदीच लाजवाब>>> आई गं! हा प्रसंग पडद्यावर पाहताना मी अतोनात हसत होते. खरोखर लाजवाब!

जिप्सी, सगळेच फोटो मस्त!!
तू खुर्चीवर बसल्या बसल्याच स्टेजवरच्या त्या सहा जणांचे फोटो टिपत होतास त्या फोटोंची मला जरा शंका होती Proud (माझ्या कॅमेरा आणि फोटोग्राफीच्या अज्ञानाला क्षमा करावी) पण ते फोटो मस्त आले आहेत.

छान वृत्तांत आणि फोटोही! धन्यवाद जिप्सी.

असुदे स्वानंदसारखा दिसतो? असुदेचं अपग्रेडेशन झालं की Proud Light 1

मराठी सिनेमाला लोक काय ऑस्करसारखे गाऊन-टक्स घालून येणार काय? Happy असेच येणार की साड्या-जॅकेटात.

प्रभावळकरांनंतर सगळे माबोकरच आहेत की काय असे वाटले.. तरी म्हटलं कोणी ओळखेनात का
जीटीजीला आल्यासारखे आलेत सगळे>>>>

लालू Lol

त्या फोटोतली तुला 'मी' कोणती वाटले? Proud

असुदे स्वानंदसारखा दिसतो?>>>> Lol

पिंकीची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीचं नाव सांगा कोणीतरी पटकन.... मी परवापासून आठवायचा प्रयत्न करतेय.

मस्त फोटो रे. नावे दिलीस ते बरे केलेस. मलाही बरेच लोक ओळखता आले नव्हते.

सोनालीने केवढा अंबाबाईचा टिळा लावलाय
तिला खाली रेड कार्पेटवर पाहिले तेव्हा माझ्या मनातही हाच विचार आलेला. पण चित्रपटात साधारण असाच गेटप आहे तिचा. त्या हिशोबाने ती आली असावी अंबाबाईचा टिळा लावुन. काळी साडी मात्र अतिशय सुंदर होती. Happy

असुदे स्वानंदसारखा दिसण्यासाठी त्याला (म्हणजे असुद्याला) आठवडाभर सर्फ एक्सेलमध्ये भिजत घालावे लागेल...
(दिवा घे रे असुद्या Happy )

पण सोनालीला ते उत्तम दिसतं. तिला साडी किंवा एथ्निक कपडे आणि सॅच्युरेटेड रंग सगळ्यात जास्त सूट होतात.

Pages