"देऊळ" प्रिमियर — "फोटो वृत्तांत"

Submitted by जिप्सी on 4 November, 2011 - 14:51

'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुसर्‍या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणुन माझं नाव घोषित झाले :-). नीलवेदने तर फोटो पोस्ट करायच्या आधीच सांगितले होते कि, "जिप्स्या, "देऊळ" या विषयावरच्या फोटोला तुलाच बक्षिस मिळणार, आणि त्यातील एक तिकिट मला पाहिजे Proud आणि झालंही अगदी तसंच 'देऊळ' - प्रकाशचित्र स्पर्धा निकाल जाहिर झाला आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मला जाहिर झाले. "देऊळ" चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी असे बक्षीसाचे स्वरुप होते. खरंतर मायबोलीवर या चित्रपटाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं यामुळे या चित्रपटाविषयी आकर्षण खुपच वाढले होते. त्यामुळे देऊळचा "फर्स्ट शो" पाहवयास मिळणार याचा कोण आनंद झाला होता.

दुसर्‍या दिवशी मंजुडीचा फोन आला आणि तिने चित्रपटाची वेळ, ठिकाण सगळं व्यवस्थित सांगितलं. आधी कबुल केल्याप्रमाणे प्रथम नीलला फोन करून येणार का विचारले असता काही कामानिमित्त त्याला जमण्यासारखे नव्हते. माझ्याकडची एक तिकिट तशीच असल्याने यो रॉक्स आणि मामीला विचारले, पण दोघांनाही अर्जंट कामं असल्याने जमण्यासारखे नव्हते. शेवटी माझ्या एका मित्राला प्रसाद कुलकर्णीला (मायबोली आयडी प्रकुल) तयार केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझीही हि पहिलीच वेळ असल्याने बराचसा आनंद आणि थोडीशी धाकधुक मनात घेऊन
ठिक ७:३० ला पीव्हीआर सिनेमा, फिनिक्स मॉल लोअर परळ, स्क्रिन नंबर सात इथे पोहचलो.
येथे पोहचल्यावर समोरच देऊळचे पोस्टर दिसले आणि त्यावर "मायबोलीचा" लोगो :-). पटकन एक फोटो काढुन घेतला ;-). थोड्याच वेळात मंजुडीही आली. तेव्हढ्या सगळ्या भागात त्यावेळेस आम्ही तीघेच होतो. इतर मायबोलीकर येण्याच्या आधीच आम्ही बक्षीस मिळाल्याच्या आणि प्रिमियर शोचा आनंद तिघांनी "Baskin Robbins" मधुन मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन साजरा केला. Proud

सर्वप्रथम ठिक ७:३५ वाजता सुलभाताई देशपांडे यांचे आगमन झाले. त्यानंतर आठ वाजल्यानंतर एकेक तार्‍यांचे आगमन व्हायला सुरूवात झाली. याच तारे तारकांच्या मधे आपल्या मायबोलीकरांचेही एक एक करून आगमन व्हायला लागले आणि अगदी घरचे कार्य असल्याप्रमाणे मी आणि प्रसाद त्यांना अश्विनी, साधना, गजानन, आनंदयात्री यांना रीसीव्ह करायला खाली जात होतो. :फिदी:, त्यामुळे अधुन मधुन का होईना पण रेड कार्पेट सोहळा पाहता येत होता. हळुहळु मराठी चित्रपटसृष्टीतले एक एक तारे तारके हजर होऊ लागले आणि इतका वेळ शांत असलेला तो लाउंज गजबजु लागला. मंजुडीने सांगितल्याप्रमाणेच सगळे कलाकार घरगुती कौतुक समारंभाला यावे तसे अगदी जिव्हाळ्याने आलेले होते. यात गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, विभावरी देशपांडे, मन्वा नाईक, प्रतिक्षा लोणकर, संदीप सावंत, ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, आतिषा नाईक, स्वानंद किरकिरे, स्मिता तांबे, नितीश भारद्वाज, प्रतिमा कुलकर्णी इ. कलाकारांनी हजेरी लावली होती. माझा पहिलाच अनुभव असल्याने सुरूवातीला सगळ्या सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो, पण नंतर मात्र सर्रास फोटो काढायला लागलो पण तेव्हढ्यात मंजिरीला समीरने 'तुम्ही आत आल्याशिवाय मला स्क्रिनींग सुरू करता येणार नाही' असा आग्रह करत आत नेले होते. तिकिटे घेताना मंजिरीशी झालेली ओळख त्या गर्दीतही तो विसरला नव्हता, अगदी नावासकट. मायबोली किती स्पेशल आहे ते तेव्हा लक्षात आले. Happy आमच्या जागा शोधुन एकदाचे स्थानापन्न झालो आणि माना वळवुन वळवुन अजुन कोणकोण आलेय हे पाहात होतो तोपर्यंत स्टेजवर निर्माते अभिजीत घोलप आले आणि सिनेमाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, कथा-पटकथाकार आणि मुख्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, कार्यकारी निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्धी प्रमुख समीर जोशी आणि राम कोंडिलकर यांची ओळख उपस्थित प्रेक्षकांना करून दिली.

अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासुनच चित्रपटाने पकड घ्यायला सुरुवात केली आणि आम्हीही त्या "मंगरूळ" गावचा एक भाग होऊन राहिलो. इरसाल गावच्या इरसाल माणसांप्रमाणे त्यांची नावेही तशीच इरसाल. कविता करणारा "पोएट्या", मुंबईत राहणारा "ऑडीयन्स", पत्रकार "महासंग्राम", जांबूवंतसिंग ऊर्फ टोम्या :फिदी:. खरं सांगायचा तर यातील प्रत्येकजण ती भूमिका अक्षरश: जगत होता. जेंव्हा केशा आजारी पडतो तेंव्हा गावच्या बायका घरात येऊन सांत्वन करताना "ताप आहे का?" ........."खरंच ताप आहे कि" म्हणतात तो प्रसंग तर अगदीच लाजवाब. यात ज्योती सुभाष, शर्वाणी पिल्ले, विभावरी देशपांडे, सरपंचबाई आतिशा नाईक यांचा अभिनय ग्रेटच. उषा नाडकर्णीचे "टराटरा फराफरा", काळा चष्मा घालुन टिव्ही बघणारी म्हातारी, सिरीयलच्या ब्रेकमध्ये स्वत:च्या पोराचे कौतुक करणारी आणि ब्रेक संपताच परत सिरीयल बघायला जाणारी आई, केश्या सोनालीबरोबर बोलत असताना नानाची होणारी घालमेल, शेवटचा नाणेघाटातला प्रसंग, केश्याला पिंकीने म्हटलेले "आय हेट यु" त्यावर केश्याचे "म्हंजी काय?" असा प्रश्न, इ. सारेच प्रसंग जबरदस्त. :-). नाना पाटेकरांच्या अभिनयाविषयी तर काय बोलावे? ग्रामसभेच्या वेळी भाषण करणारा नाना, सागरगोट्या/कांदाफोडी खेळणारा नाना, त्यांचे "शुन्य मिनिटातले" प्रत्येक काम, टोलनाक्यावर "टोल देऊ का?" असे विचारणे, त्यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणार्‍या मुलाने नका देऊ म्हटल्यावर "देतो ना" म्हणत केलेला अभिनय, बेरकी राजकारणी नानाने मस्तच रंगवलाय Happy

नाना आणि दिलीप प्रभावळकरांमधील "अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे. कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील" हा संवादही खासच. थोडक्यात काय तर सगळ्यांचे अभिनय, कथा, पंचेस, गाणी, सगळंच कसं मस्तच. :-), सुरुवातीला करडी गाईला हाका मारत धावणारा आणि तिच्यामृत्यू नंतरचा, देवळात देवालाच शोधायला निघालेला केश्या, गिरीश कुलकर्णींने अत्यंत सहज सुंदर अभिनय केला आहे. ऑलराऊंडर गिरीश कुलकर्णी बेस्टच. उत्तम अभिनय, संगीत, चित्रिकरण, दिग्दर्शन इ. गोष्टी चित्रपटाच्या जमेच्या बाजु आहेत. चित्रपटाचा शेवट हा देवळाचा "कळस" आहे.

बराच उशीर झाल्याने मध्यंतरानंतर मंजूडी, अश्विनी,साधना आणि साधनाची आई असे परत निघाले. आम्हाला (मी, प्रसाद, आनंदयात्री, जीडी & फॅमिली) मात्र मंगरूळ गावाने आणि गावकर्‍यांनी मोहिनी घातल्याने संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थांबलो. Happy

प्रत्येकानी आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. एका दर्जेदार चित्रपटाचा प्रिमियर शो मायबोलीमुळे पाहवयास मिळाल्याबद्दल मायबोलीचे मनापासुन आभार!!!!!!

सगळेच गडबडीत असल्याने कलाकारांसोबत मायबोलीकरांचे फोटो घेता आले नाही पण प्रिमियर शोच्या वेळेस टिपलेली काही हि प्रकाशचित्रे. पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने सेलेब्रीटीजचे फोटो काढायला थोडासा बिचकत होतो. त्यातीलच हे काहि निवडक फोटो:

नाना पाटेकर
दिलीप प्रभावळकर
स्वानंद किरकिरे
सोनाली कुलकर्णी/मोहन आगाशे
मोहन आगाशे
सोनाली कुलकर्णी
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, नितीन वैद्य,समीर जोशी, राम कोंडिलकर

नितीश भारद्वाज
गिरीश कुलकर्णी
तुषार दळवी
उषा नाडकर्णी
उमेश कुलकर्णी आणि मन्वा नाईक
स्मिता तांबे
मिता सावरकर
प्रतिक्षा लोणकर
प्रतिमा कुलकर्णी

Groups audience: 

Happy Happy

पिंकीची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीचं नाव सांगा कोणीतरी पटकन.... मी परवापासून आठवायचा प्रयत्न करतेय.>>>>मी सुद्धा हेच लिहायला आलो होतो परत Happy ती "वळु" चित्रपटातसुद्धा होती ना?

स्मिता तांबेने खास तुला पोज दिलेली दिसतेय...>>>>>>येस्स Happy फोटोविषयी तिला विचारले तर ती पटकन तयार झाली Happy हातात पॉपकॉर्न असल्याने ते फोटोत येणार का? असा प्रश्न विचारला Proud म्हणुन मी फक्त हाफ फोटोच काढला. Wink

हां, ती दोन वेण्या घालून पोस्टरमध्येही दिसत आहे मुखपृष्ठावर. ती नाही वीणा. पण ती नीट दिसतच नाहीये कोणत्याही फोटोत. गिरिशसोबतही फक्त प्रोफाईलच दिसतेय. नाही येते ओळखायला. (आणि आता ओळखायची बक्षिसंही संपली :फिदी:) जिप्सी, तिचा एक्स्क्लूझिव्ह फोटो असेल तर टाकतोस का?

ज्योती माळशे..............(बरोबर ओळखायची बक्षिस पाहिजे :स्मित:)

नीलवेदने तर फोटो पोस्ट करायच्या आधीच सांगितले होते कि, "जिप्स्या, "देऊळ" या विषयावरच्या फोटोला तुलाच बक्षिस मिळणार>>>>> Happy जिप्सी, अरे मला पण माहित होतं कि तुच ती स्पर्धा जिंकणार आहेस. बघ मी म्हणाले नाही त्यामुळे माझा तोटा झाला. नाही तर दुसरं तिकिट तु मला ऑफर केलं असतंस. नै का? Wink

मस्त लेख आणि नेहमीप्रमाणेच मस्त मस्त फोटो. Happy

जिप्सी, येडा आहेस का तू? प्रीमीयरला जातो आणि फिल्लम लाईनमधल्या लोकाचे फोटो काढायला बिचकतोस? अगदीच पापारझीसारखे नव्हे, पण विचारून पोझेस घ्यायला तसा काही प्रॉब्लेम नसतो. जनरली मराठी सेलेब्ज हे खूप छान कोऑपरेट करतात.

नशीब समज, इथे कुणी हिंदी टीव्ही सीरीयलमधल्या बाया नव्हत्या. टीव्हीभर साडी आणि पदर घेऊन मिरवणार्‍या या बायाना पार्टीमधे तुझा ड्रेस छोटा की माझा ड्रेस छोटा अशी स्पर्धा असते. वर मीडीयामधले कुणी कॅमेरा अथवा माईक घेऊन उभे असलेले दिसले की भयाण पोझेस द्यायला सर्वात पुढे. मिड डे अथवा मुंबई मिरर अवश्य बघा. Proud

तुझ्या या फोटो वृत्तांतामुळे सोहळा बघायला मिळाल्यासारखा झालं. रच्याकने, मराठी चॅनल्सवाले नव्हते का तिथे? आणि फोटोग्राफर्स?

नावं दिलीत हे बरं झालं. बरीचशी माहीत नव्हती. नितीश भारद्वाजलाही ओळखलं नव्हतं.
सोनाली कुलकर्णी छान दिसतेय. मन्वा नाईकही आवडली मला.

जिप्सी
छान वृत्तांत आणि फोटो.
तू कोणता फोटो स्पर्धेसाठी दिला होतास आठवत नाही. पण कुणीतरी" जिप्स्याला या स्पर्धेत भाग घेऊ देऊ नका" अशी कमेंट केली होती, ते आठवते! हाहाहाहा!

जिप्स्या, मस्त वृत्तांत आणि फोटो. या सिनेमातील अजून एक प्लस पॉइंट म्हणजे माळरानावरले रात्रीचे चित्रिकरण. प्रकाश योजना अगदी परफेक्ट चांदणी रात्र दाखवते. माळावर मचाणावर असलेल्या दिलिप प्रभावळकरांपाशी येऊन गिरिश कुलकर्णी दत्त दिसल्याचे सांगतात तेव्हाची प्रकाश योजना इतर कुठल्या चित्रपटात एवढी प्रभावी वाटली नव्हती. तेव्हाचं दिलिप प्रभावळकरांचं एक वाक्य तर कोरुन ठेवण्याजोगं आहे. "अनुभव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो आणि म्हणूनच ज्याला देव हवा आहे त्याने तो शोधावा, ज्याला नको आहे त्याने तो शोधायच्या फंदात पडू नये" अशा काहिशा अर्थाचं वाक्य आहे ते.

आज दुपारीच आम्ही ३ माबोकरणीं या सिनेमाला जात आहोत Happy प्रिमियरला अर्धाच पाहिला होता.

Pages