The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला
प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे
लेखकाची माहिती: नरेन्द्र सिंग नरीला हे मूळचे सरीला संस्थानचे वारस, नंतर लॉर्ड माउंट्बॅटन यांचे सहाय्यक (Aide-de-camp) आणि पुढे १९४८ ते १९८५ इतकी - तब्बल ३८ वर्षे- भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते. या तीनही रोल्स मधे येथे उल्लेख केलेल्या 'गेम' मधल्या, त्यावर प्रभाव पाडणार्या असंख्य लोकांशी त्यांचा जवळून संबंध आलेला असेल. त्यांची राजकीय विचारसरणी माहीत नाही, पण निदान या विषयावर लिहीण्यासाठी फाळणीचे राजकारण इतक्या जवळून पाहिलेली व्यक्ती मिळणे अवघड आहे. तसेच ब्रिटन मधे नुकतीच काही वर्षांपूर्वी खुली झालेली तेव्हाची कागदपत्रे त्यांनी यासाठी वापरली आहेत.
या परीक्षणात पहिले १० मुद्दे ही लेखकाची मला समजलेली मते आहेत. पुढचे बाकीचे मुद्दे हे मला हे पुस्तक वाचल्यावर, त्यातील अनेक संदर्भांबद्दल आणखी माहिती वाचल्यावर काय वाटले, याबद्दल आहेत. प्रतिक्रियांत सोप्या संदर्भासाठी प्रत्येक मुद्द्याला वेगळा नंबर मुद्दाम दिला आहे.
द ग्रेट गेम
ब्रिटिश साम्राज्य भरात असताना ब्रिटन व रशिया यांच्यात भारत व मध्य आशिया वर सत्ता गाजवण्यासाठी वर्षानुवर्षे चाललेले डावपेच म्हणजे "The great game". विकीपेडिया व इतर ठिकाणी याची आणखी माहिती मिळेल.
लेखकाने भारताची फाळणी हा या गेमचा मुख्य भाग होता, या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहीलेले आहे. आत्तपर्यंत निदान मी तरी फाळणी फक्त काँग्रेस-जीना, हिंदू-मुस्लिम यातील सत्तास्पर्धेतून/वैमनस्यातून झाली असावी अशाच दृष्टिकोनातून पाहात होतो. या पुस्तकाने त्यावेळचे आंतरराष्ट्रीय राजकारण व भारतीय नेत्यांची त्याबाबतीत असलेली अनभिज्ञता/उदासीनता फाळणीला कशी कारणीभूत झाली हे पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे.
प्रथम लेखक काय म्हणतो ते मुद्दे:
१. १९४० च्या सुमारास ब्रिटिशांना भारताला कोणत्या तरी स्वरूपात स्वातंत्र्य लौकरच द्यावे लागेल याची जाणीव झाली होती. पण आपल्या साम्राज्याचा हा मोठा भाग सोडताना जवळच असलेल्या "तेल क्षेत्रा" च्या जवळचा भाग आपल्या हातात राहावा, आणि तेथे रशियाचा/कम्युनिझम चा प्रभाव वाढू नये हा त्या "ग्रेट गेम" चा एक मुख्य भाग बनला. अमेरिका, ब्रिटन आणि इतर बलाढ्य राष्ट्रे यांचे मुख्य उद्दिष्ट त्यावेळेस हेच होते (अजूनही हेच आहे).
२. जीनांच्या मुस्लिम लीग ला भारतात अगदी १९४०-४२ सालापर्यंत मुस्लिम लोकांचा अजिबात पाठिंबा नव्हता. वेगळ्या पाकिस्तान च्या मागणीत बहुसंख्य मुस्लिमांना रस नव्हता. तेव्हाच्या मुस्लिमांपैकी अगदी कमी लोकांचे ही मुस्लिम लीग प्रतिनिधित्व करत होती. "ब्रिटिश इंडिया" (नोट-१) मधे जे "प्रांत" होते त्यापैकी "वायव्य सरहद्द", "पंजाब", "बंगाल" ई. ठिकाणी मुस्लिम लोकांचा सत्तेत बराच वाटा होता, त्यामुळे आणखी वेगळे राष्ट्र काढण्याची मागणी त्यांची नव्हती. फक्त जेथे मुस्लिम अल्पसंख्य होते तेथेच आपल्याला वेगळे राष्ट्र हवे या मागणीला पाठिंबा मिळू शकत होता, पण तेथेही तो सरसकट जीनांना मिळत नव्हता. १९३७ सालच्या प्रांतीय निवडणुकांत मुस्लिम लीग ची धूळधाण उडाली होती. मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागांपैकी सुद्धा एक चतुर्थांश जागाही लीगला मिळाल्या नाहीत. या निवडणुकांमधे काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले होते आणि लीग कोठेच नव्हते. म्हणजे तोपर्यंत पाकिस्तानच्या मागणीला कोठेही पाठिंबा नव्हता.
३. १९३९ मधे (तेव्हा प्रांतीय निवडणुकांमुळे मर्यादित सत्ता असलेल्या) कॉंग्रेस ला न विचारता भारताला दुसर्या महायुद्धात खेचल्याचा निषेध म्हणून काँग्रेस पुढार्यांनी सरसकट राजीनामे दिले आणि ब्रिटिश सरकारच्या युद्धप्रयत्नांवर प्रभाव पाडण्याची संधी घालवली. आता ब्रिटिश सरकार त्यांच्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ शकत होते. तसेच १९४० मधे लॉर्ड लिनलिथगोशी बोलताना गांधींजींनी हिटलर बद्दल केलेले वक्तव्य (नोट-२) व एकूणच अहिंसेच्या धोरणामुळे युद्धाला विरोध यामुळे युद्धातील मदतीकरिता तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वाला पर्याय शोधण्याची गरज ब्रिटिशांना जाणवली.
४. थोडे नंतर सुद्धा महायुद्ध ऐन भरात असताना काँग्रेस नेतृत्त्वाने पुकारलेल्या चले जाव चळवळीमुळे ब्रिटनमधील जनमत भारताच्या विरोधात गेले. ब्रिटन त्यावेळेस (१९४२) प्रचंड अडचणीत होते. अशा वेळेस त्यांच्या भारतातून सैन्य उभे करण्याच्या व भारतातून रसद जाऊ देण्याच्या विरोधात झालेल्या हालचाली त्यास कारणीभूत होत्या. त्यात चले जाव मधले बरेचसे काँग्रेस नेते ब्रिटिशांनी लगेच तुरूंगात टाकले व काँग्रेस चा विरोध असून सुद्धा ब्रिटिशांना भारतातून सैन्यात लोक भरती करायला फारशी अडचण आली नाही.
५. अशा अनेक गोष्टींमुळे काँग्रेस नेतृत्व आपल्याला स्वातंत्र्यानंतर फारसे उपयोगाचे नाही हे ब्रिटिश व्हाईसरॉय व इतर मंडळींनी ब्रिटनमधे ठसवायला सुरूवात केली होती, त्यामुळे सगळा ब्रिटिश इंडिया काँग्रेसच्या हातात जाणे ब्रिटनच्या हिताचे नव्हते. येथेच "तेल क्षेत्रा" जवळचा भाग काहीही करून आपल्या कंट्रोल मधे ठेवायचा हे मुख्य सूत्र ठरले. मग भारताबद्दल उघडपणे वाईट बोलणारा चर्चिल असो की वरवर सहानुभूती दाखवणारा अॅटली असो, ब्रिटिशांचे हे धोरण कधीच बदलले नाही. मात्र हे जाहीर धोरण नव्हते हे येथे महत्त्वाचे आहे.
६. ब्रिटिश इंडियाचा थोडा भाग आपल्या कंट्रोल मधे ठेवायचा असेल तर फाळणी करणे आवश्यक आहे हे ब्रिटिशांनी ठरवले. पण फाळणीची जबाबदारी स्वतःकडे घ्यायची नाही (आंतरराष्ट्रीय प्रतिमा राखणे हे कारण, अमेरिकेचा दबाव हे दुसरे), उलट भारताच्या नेत्यांवर टाकायची हे ही ठरले.
७. त्यासाठी तेव्हा नगण्य असलेल्या जीनांना मोठे करणे चालू झाले. कारण जीनांची तेव्हाची महत्त्वाकांक्षा आणि ब्रिटिशांचे धोरण हे एकत्र जुळत होते. जीनांच्या मुस्लिम लीगला पाठिंबा नसलेल्या पंजाब, वायव्य सरहद्द ई. प्रांतांमधे त्यांना अनुकूल नसलेल्या तेव्हाच्या नेत्यांना हलवणे वगैरे फासे टाकणे चालू झाले. अगदी १९४३ पर्यंत ब्रिटिशांचा मुख्य इंटरेस्ट असलेले वायव्य सरहद्द व पंजाब प्रांत काँग्रेसबरोबरच होते. पण वायव्य सरहद्द प्रांतात निवडून आलेले सरकार "बायपास" करून सार्वमत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य करणे व पंजाबबाबत केलेल्या इतर काही "चालीं" मुळे तेथे ब्रिटिशांनी जीनांना पाठिंबा असलेले लोक सत्तेवर आणले. १९३९ मधे प्रांतिक सरकारांमधील काँग्रेस नेते राजीनामे देऊन गेल्याने तेथे (ब्रिटिश) गव्हर्नर रूल चालू होता व तेथे पाहिजे तसे बदल करायला ब्रिटिशांना मोकळे रान मिळाले. फाळणी चा मार्ग येथेच खुला झाला. त्यानंतर मग पाकिस्तान होत आहे कळल्यावर इतर लोक त्यामागे आले.
८. शेवटचे व्हाईसरॉय माउंटबॅटन सुद्धा ब्रिटिशांचा हा छुपा अजेंडा घेउनच आले होते. आणि याच माउंटबॅटनना "निष्पक्ष निवाड्यासाठी" काही ठिकाणी कॉंग्रेसने पाकिस्तानच्या मुद्द्यावर निवड करायची जबाबदारी दिली. (हवे असलेले दोन प्रांत नक्की ब्रिटिशांच्या कंट्रोल मधे राहतील हे पाहिल्यावर मात्र माउंटबॅटननी उरलेला भारत एकसंध राहील - तेव्हाची संस्थाने स्वतंत्र राष्ट्रे होणार नाहीत - यासाठी काँग्रेसला खूप मदत केली. किंबहुना संस्थाने भारताला मिळण्यात त्यांचाच मुख्य हात होता असे लेखकाचे मत आहे).
९. १९४५-४७ च्या सुमारास भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि एकसंध ठेवण्याबद्दल अमेरिकन सरकारने ब्रिटिशांवर प्रचंड दबाव आणला होता. १९४१ साली ब्रिटन व अमेरिकेने केलेला "अटलांटिक करार" भारतालाही लागू असावा याबाबत अमेरिका आग्रही होती. या करारानुसार लोकांचा स्वतःचे सरकार स्वतः निवडण्याचा हक्क ही दोन्ही राष्ट्रे मान्य करत होती. पण ब्रिटनने भारतीय नेते जपानच्या बाजूने आहेत असे निर्माण केलेले चित्र, भारताच्या नेत्यांची अमेरिकेविषयी उदासीनता किंवा त्यांचे अमेरिकन लोकांना (सांस्कृतिकदृष्ट्या) तुच्छ लेखणे आणि त्यावेळेस कम्युनिस्ट विचार असलेल्या लोकांचा परराष्ट्र धोरणावर असलेला प्रभाव यामुळे हा दबाव हळुहळू कमी करण्यात चर्चिल्/ब्रिटिशांनी यश मिळवले.
१०. स्वातंत्र्यानंतर काश्मीरसाठी झालेल्या युद्धातही अत्यंत महत्त्वाचे असलेले "गिलगीट" वगैरे भाग भारताकडेच राहावेत यासाठी अमेरिका शेवटपर्यंत दबाव टाकत होती (हा भाग मूळचा काश्मीर संस्थानचा, मधे काही वर्षे ब्रिटिश ईंडियात होता, पण स्वातंत्र्याच्या वेळेस तो परत काश्मीरला दिला गेला होता त्यामुळे ते संस्थान भारतात विलीन झाल्यावर तो भागही भारतात जायला हवा होता). पण नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांनीच तो आग्रह सोडल्यावर यूनो मधे अमेरिकेच्या दबावातील हवा निघून गेली. (भारताच्या नकाशात हा भाग अजूनही भारतात दाखविला जातो. हा भाग जर भारतात राहिला असता तर पाक व चीन एकमेकांना जोडणारा जमिनीचा भाग शिल्लकच राहिला नसता.)
आता हे वाचल्यावर व यात असलेल्या संदर्भांबद्दल अजून माहिती काढल्यावर माझी काही मते:
११. नेहरू, कृष्ण मेनन वगैरे नेते इंग्लंड मधे शिकलेले, तेथे बराच काळ घालवलेले होते. मेनन तर युद्धाच्या काळात सुद्धा तेथेच होते व माउंटबॅटन वगैरे लोकांशी संपर्कातही होते. तेथील सर्कल्स मधून यांना या "गेम" ची काहीच कल्पना आली नसेल हे अवघड वाटते. कदाचित नेहरूंच्या डोक्यात असलेला अलिप्ततावाद किंवा आशियाचे नेतृत्व करून अमेरिका व रशियाला पर्याय म्हणून एक तिसरा दबावगट निर्माण करण्याच्या कल्पनेमुळे त्यांना असे वाटले असेल की अमेरिका/ब्रिटनच्या विरोधात राहूनही आपण पाहिजे ते मिळवू शकू
१२. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हवे होते. पण ते मिळाल्यावर त्यांच्याशी वैर घेण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे त्यावेळच्या नेतृत्वाने भारत ब्रिटनला अनुकूल असणारी आंतरराष्ट्रीय धोरणे राबवेल (भारताच्या हिताला बाधा न येता, मुख्यतः तेलाच्या राजकारणाबद्दल) असे वातावरण का निर्माण केले नाही ते कळत नाही.
१३. त्यावेळेस अमेरिकेबद्दल दाखवलेल्या उदासीनतेमुळे भारताचे नुकसानच झाले असे वाटते. अमेरिकेचा पाठिंबा व नेहरूंसारखे निदान देशांतर्गत बाबतीत सुजाण नेतृत्व हे एकत्र झाले असते तर भारताचा फायदाच झाला असता. अमेरिकेलाही कम्युनिस्ट चीन पेक्षा लोकशाही असलेला भारत व्यापारासाठी, जे मोठे अमेरिकन उद्योग नंतर चीनकडून आपली उत्पादने बनवून घेऊ लागले त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय झाला असता. आणि नेतृत्व ब्रिटन ला अनुकूल आहे म्हंटल्यावर एकतर भारत एकसंध राहिला असता किंवा किमान नंतर अमेरिकेने पाकला जेवढे महत्त्व व साहाय्य दिले तेवढे दिले नसते.
१४. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका एवढा बलाढ्य देश असून व लोकशाही राष्ट्र असून सुद्धा भारताने अमेरिकेबद्दल एवढी उदासीनता का दाखवली असे मला नेहमी वाटते. त्याचे एक उत्तर या पुस्तकात मिळाले: तेव्हाचे बरेच भारतीय नेते इंग्लंडमधे शिकलेले होते, व त्यावेळेस ब्रिटिश लोकांचे अमेरिकनांबद्दलचे मत एकदम तुच्छता दर्शविणारे होते (संस्कृतीहीन, उर्मट लोक वगैरे). तेव्हाच्या भारतीय नेत्यांची मतेही त्याच सर्कल्स मधे वावरल्याने तशीच झाली होती असे दिसते.
१५. वायव्य सरहद्द प्रांत पूर्ण स्वतःच्या कंट्रोल मधे असताना १९४०-४५ च्या दरम्यान कॉंग्रेसने अचानक त्यावर पाणी का सोडले? (सरहद्द गांधी) खान अब्दुल गफारखानांना काँग्रेसने आवश्यक तेव्हा साथ दिली नाही असे पूर्वी वाचले होते. हा प्रांत व पंजाब प्रांत जर काँग्रेसकडे राहिला असता तर फाळणीला काही अर्थच राहिला नसता. पण या प्रश्नाचे नीट उत्तर या पुस्तकात तरी मिळाले नाही.
१६. सगळे मुस्लिम पाकमधे का गेले नाहीत असा प्रश्न कधीकधी विचारला जातो. हे पुस्तक वाचल्यावर असे वाटते की थोडेफार जीनांचे मूळचे समर्थक सोडले तर इतर कोणालाच असे फुटून जायचे नव्हते. हे भूत ब्रिटिशांनीच उभे केले नसते तर फाळणी झालीच नसती.
१७. वरती ४ नं च्या मुद्द्यात ब्रिटिश जनमत भारताच्या विरोधात गेले असा उल्लेख आहे. भारताला त्याची फिकीर करायची काय गरज? तर त्याचे कारण हे की तेव्हाच्या काँग्रेसच्या लढ्यात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे व खुद्द ब्रिटनमधे आपले मित्र निर्माण करणे व ब्रिटिश सरकारवर अंतर्गत दबाव आणणे हे एक मुख्य उद्दिष्ट होते. जर तेथील जनमत विरोधात गेले तर ते साध्य होणार नव्हते.
१८. या सबंध राजकारणामधे भारताला स्वातंत्र्य म्हणजे एक Dominion State म्हणजे राणीचे नेतृत्व मानणारा घटक देश या स्वरूपातच द्यायचे असेच ब्रिटिशांचे ठरले होते. माउंटबॅटन भारतात आले ते हेच गृहीत धरून. पण भारत पूर्ण स्वतंत्र राष्ट्र होणार (Republic) हे काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या गळी कसे उतरविले याबाबत आता उत्सुकता आहे, या पुस्तकात ते मिळाले नाही.
नोट-१: फाळणीपूर्वीचा भारत म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर भारत, पाक व बांगलादेश एकत्र असलेला नकाशा उभा राहतो. पण याच नकाशात बरीच संस्थाने होती (एकूण ३५०), जी "ब्रिटिश इंडिया" मधे गणली जात नसत. त्यांच्यावर अंतिम सत्ता ब्रिटिशांचीच असली तरी बाकी ब्रिटिशांच्या थेट अंमलाखाली असलेल्या भागाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेली धोरणे या संस्थानांना आपोआप लागू होत नसत. उदा: प्रांतिक सरकारे ही फक्त मुंबई, मद्रास, बंगाल वगैरे प्रांतांमधे होती, हैदराबाद, काश्मीर, जुनागढ सारख्या संस्थानांमधे नाही. म्हणजे आजूबाजूला पसरलेला ब्रिटिश इंडिया व मधे मधे हे असंख्य स्वतंत्र पुंजके असा तो नकाशा होता.
नोट-२: १९४० च्या मध्यावर नाझी फौजा फ्रान्स काबीज करून ब्रिटनच्या जवळ पोहोचल्या होत्या तेव्हा ब्रिटिश सरकार युद्धाच्या तयारीत असताना गांधीजी लॉर्ड लिनलिथगो ला भेटले होते व हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता. मौलाना आझादांच्या "India wins freedom" मधेही याचा उल्लेख आहे (पान ३५).
उत्तम माहिती. पुस्तक परिचय
उत्तम माहिती. पुस्तक परिचय आवडला.
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.
उत्तम पुस्तक परिचय धन्यवाद
उत्तम पुस्तक परिचय धन्यवाद अमोल. वाचायला हवं हे.
नेहमीच्या शिवराळ
नेहमीच्या शिवराळ चिखलफेकेपेक्षा निराळे काहीतरी वाचायला मिळाले .धन्यवाद. मूळ पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
उत्तम लेख. खरे तर हा विषय
उत्तम लेख.
खरे तर हा विषय फार गहन !
भारताला महात्मामूळेच स्वातंत्र मिळाले, हा सर्व साधारण ( गैर) समज आता तरी दूर व्हावा !!
अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र मिळवता येत नाही, पण भिक मात्र मिळू शकते. आणी हे तर सर्व श्रुत च आहे.
BEGGARS CAN'T BE CHOOSERS !!
जि कॉंग्रेस अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र मिळवयच्या मागे होती तिच आता अण्णा हजारेंच्या विरोधात मात्र
दंड ठोकून उभी आहे.
छान परिचय, फारेन्ड!
छान परिचय, फारेन्ड!
उत्तम लेख. (या वरच्या
उत्तम लेख. (या वरच्या प्रतिसादात नेहमीचाच वाद ना होवो अशी मनापासून इच्छा.)
स्वातंत्र्य घेतल्यानंतर ब्रिटीशांना विरोध करायचा नाही, याबद्दल मला जरा शंका आहे.
कारण त्याकाळात दादाभाई नौरोजी यांनी एक अहवाल / पुस्तक लिहून ब्रिटिशांनी भारताची कशी आणि किती लूटमार केली, त्याची आकडेवारी दिली होती. त्याचा संदर्भ मी वाचला होता पण मूळ पुस्तक नाही.
दुसरे म्हणजे सामान्य लोकांतही ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड तिरस्कार होता. परदेशी मालावर बहीष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार हे अगदी सामान्य घरातूनही पाळले जात होते. हे लोण आमच्या घरातही होतेच.
उत्तम लेख, जीनांचे नेतृत्व
उत्तम लेख,
जीनांचे नेतृत्व सर्व मुस्लिमांना मान्य नव्हते आणि त्या सर्वांना पाकिस्तान नको होता या खुलाशाने इथल्या अनेकांची आवडती गृहितके अडचणीत येतील!
या लेखावरुन 'भारताला महात्मामूळेच स्वातंत्र मिळाले, हा सर्व साधारण ( गैर) समज आता तरी दूर व्हावा' हा निष्कर्ष कसा काय काढला ते कळले नाही.
' १९४० च्या सुमारास ब्रिटिशांना भारताला कोणत्या तरी स्वरूपात स्वातंत्र्य लौकरच द्यावे लागेल याची जाणीव झाली होती.' - आता ही जाणिव त्यांना आपोआप, कळवळा येऊन झाली त्यात गांधींच्या आंदोलनाचे काहीच योगदान नाही असे म्हणणे असेल तर प्रश्नच मिटला.
नाईक, निष्कर्ष थोडा लवकर
नाईक, निष्कर्ष थोडा लवकर काढला जातोय बहुतेक. भूमिका पहिल्यांदा ठरवूनच वाचले तर वाचनाचा फायदा होतो का? म्हणजे भूमिका ठरवण्यासाठी वाचायचे की आधीच ठरवलेली भूमिका प्रमाणभूत (रॅशनलाइज) करण्यासाठी? (मला उत्तर नको. प्रत्येकाने शोधावे असे वाटते.) असो.
फारेंड, परीक्षण-विश्लेषण खूप आवडले. 'मला समजलेले' आणि 'त्यावर माझी प्रतिक्रिया' या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येणे..... हे मला फारच अवघड वाटते. तुला त्याबद्दल सलाम.
भारत-पाकिस्तान वेगळे करणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा/राजनीतीचा परिपाक होता हे मत पूर्वी कानावर आले आहे. पण त्यामागील 'तेल' हे कारण माहिती नव्हते. मी जे ऐकले त्यानुसार, ही एवढी, बर्यापैकी एकजिनसी लोकसंख्या (=लोकशक्ती) एकच 'राष्ट्र' म्हणून राहू दिली असती तर काही काळातच हे राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर डोईजड होईल असा अंदाज ब्रिटिशांना आला होता, त्यामुळे फाळणी त्यांच्यासाठी अपरिहार्य होती.
पाकिस्तान-चीन यांना जोडणारा भूभाग होऊ नये म्हणून अमेरिकेने दडपण आणणे, यावरून अमेरिकन नेतृत्व मात्र फार पूर्वीपासूनच दूरगामी विचार करणारे आहे असे वाटायला लागले आहे. दूरगामी म्हणजे अर्थात स्वतःला दूरगामी फायदा होईल असे.
>>या लेखावरुन 'भारताला
>>या लेखावरुन 'भारताला महात्मामूळेच स्वातंत्र मिळाले, हा सर्व साधारण ( गैर) समज आता तरी दूर व्हावा' हा निष्कर्ष कसा काय काढला ते कळले नाही.
झालं यांचं सुरु परत
फारएन्डा, खूप छान लिहिले
फारएन्डा, खूप छान लिहिले आहेस.
छान पुस्तक परिचय... वाचायला
छान पुस्तक परिचय... वाचायला हवे.
>>या वरच्या प्रतिसादात
>>या वरच्या प्रतिसादात नेहमीचाच वाद ना होवो अशी मनापासून इच्छा
अनुमोदन.
फारेन्ड तुझी मते असलेल्या काही मुद्द्यांबद्द्ल शंका आहे. पण ते तू काय वाचलेस त्यावर अवलंबून आहेत त्यामुळे चूक म्हणता येणार नाहीत. तरीसुद्धा "जे मोठे अमेरिकन उद्योग नंतर चीनकडून आपली उत्पादने बनवून घेऊ लागले त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय झाला असता" हे म्हणणे जरा धाडसाचे आहे.
अमोल, परिचय मस्त. दुसर्या
अमोल, परिचय मस्त.
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका एवढा बलाढ्य देश असून व लोकशाही राष्ट्र असून सुद्धा भारताने अमेरिकेबद्दल एवढी उदासीनता का दाखवली असे मला नेहमी वाटते >>>
कारण बहुतांश भारतीय नेते समाजवादाकडे झुकलेले होते. नेहरूंनी मग मिश्र अर्थव्यवस्था आणली, ज्यात भांडवलशाही व साम्यवाद ह्यांचे मिश्रन होते.
नोट-१: फाळणीपूर्वीचा भारत म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर भारत, पाक व बांगलादेश एकत्र असलेला नकाशा उभा राहतो. पण याच नकाशात बरीच संस्थाने होती (एकूण ३५०), जी "ब्रिटिश इंडिया" मधे गणली जात नसत >>> एकुण ३५० नाही तर ५२३ !
हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता. >> हो. तो लगेच त्यांनी धुडकावून लावला व शस्त्राने प्रतिकार केला. अन्यथा पोलंड सारखे ब्रिटनही गिळले असते हिटलरने.
त्यावेळेस अमेरिकेबद्दल दाखवलेल्या उदासीनतेमुळे भारताचे नुकसानच झाले असे वाटते. अमेरिकेचा पाठिंबा व नेहरूंसारखे निदान देशांतर्गत बाबतीत सुजाण नेतृत्व हे एकत्र झाले असते तर भारताचा फायदाच झाला असता. >> सहमत आहे. कारण फक्त काही नेते जसे मोरारजी व वल्लभभाई अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था स्विकारू, अमेरिकेशी मैत्री करू असे म्हणत होते पण समाजवादाच्या पगड्यामुळे आपण रशीयाकडे गेलो. व शितयुद्धात विनाकारन अप्रत्यक्षरित्या गुंतले गेलोच. अन्यथा पाक ऐवजी भारताला मोठा मित्र मिळाला असता त्याचा फायदा झालाच असता.
१९४० च्या सुमारास ब्रिटिशांना भारताला कोणत्या तरी स्वरूपात स्वातंत्र्य लौकरच द्यावे लागेल याची जाणीव झाली होती.' >> कारण युद्धामुळे ब्रिटन पूर्ण खचला तसेच हा काळ पाहिला तर ब्रिटीशांनी फक्त भारतालाच स्वातंत्र्य दिले असे नाही तर त्यांच्या पूर्ण साम्राज्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य थोड्याफार वर्षाच्या फरकाने मिळालेच. आपल्याही मिळाले असते ह्यात वादच नव्हता. उलट १९४२ मध्येच मिळाले असते. पण गांधींनी आंदोलन अचानक रात्रीतून बंद केले त्याचा फायदा ब्रिटीशांना झाला हा ही इतिहासच आहे. अन्यथा आपण ५ वर्षे आधीच स्वतंत्र झालो असतो. (कदाचित)
गांधींच्या आंदोलनाचे काहीच योगदान नाही असे म्हणणे असेल तर प्रश्नच मिटला. >> योगदान कसे नाही. आहेच. पण जसा फायदा होता तसेच नुकसानही झाले आहे हे मान्य करायला काय हरकत आहे. बाकीच्या देशात कुठे गांधी होते? उदा श्रीलंका १९४८, म्यानमार १९४८ इत्यादी इत्यादी. गांधी म्हणलं की फक्त केवळ विरोध आणि केवळ गुणगान असेच हवे का? मोठ्या माणसांच्या चुकाही मोठ्याच उदा १९२१, १९३२, १९३७, १९४२, १९४८ असे अनेक वर्षे राजकारणात धर्म आणायचे पाप जेंव्हा घडले तेंव्हाच ही फाळणी निश्चित झाली होती. आंबेडकरांना विरोध करणारे गांधी, मुस्लीम लिगला बळी पडलेच की. अर्थात मुळ विषय हा नाही म्हणून आवरते घेतो. पण सांगायचे असे की दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात.
खान अब्दुल गफारखानांना काँग्रेसने आवश्यक तेव्हा साथ दिली नाही असे पूर्वी वाचले होते. हा प्रांत व पंजाब प्रांत जर काँग्रेसकडे राहिला असता तर फाळणीला काही अर्थच राहिला नसता. >>> हा मुद्दा थोडा पटला नाही कारण खुद्द गफारखानांना फाळणी मंजूर नव्हती पण काँग्रेसने तत्वतः मान्य केल्यामुळे फाळणीही झालीच. ३७ नंतर काँग्रेस नेते हेच मुळी आता लिग आणि खलिस्तानी हे पंजाब, पाक आणि भारत असे तुकडे करणार असे गृहित धरून चालत असावीत असे कधी कधी मला वाटते, अन्यथा खुद्द १९४७ मध्येही खलिस्तान व्हावा हा हट्ट धरणारे काही नेते होतेच.
उत्तम लेख अमोल. भूमिका
उत्तम लेख अमोल.
भूमिका ठरवण्यासाठी वाचायचे की आधीच ठरवलेली भूमिका प्रमाणभूत (रॅशनलाइज) करण्यासाठी? (मला उत्तर नको. प्रत्येकाने शोधावे असे वाटते.) असो.
फारेंड, परीक्षण-विश्लेषण खूप आवडले. 'मला समजलेले' आणि 'त्यावर माझी प्रतिक्रिया' या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येणे..... हे मला फारच अवघड वाटते. तुला त्याबद्दल सलाम.>>आरभाट +१
हा विषय इतका जटील आहे कि कुठलीच बाजू बरोबर आहे असे म्हणने धाडसाचे होईल. ५० वर्षांनंतर त्या निर्णयांचे बरे वाईट परीणाम दिसल्यावर त्या कालखंडांमधील व्यक्तिमत्वांना चूक-बरोबरच्या तागडीमधे तोलणे कितपत योग्य हे ज्याचे त्याचे ज्याने त्याने ठरवायचे. 'अमके केले तर तमके झाले असते' हे काय झाले हे माहित असल्यावर म्हणणे नि 'अमूक केले तर तमूक होईल' हे त्या वेली उपलब्ध माहिती, विश्वास नि प्रचलीत समजूती ह्यांच्या जोरावर ठरवणे ह्यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. ह्या सर्व सव्यापसव्यातून शिकण्यासारखी एकमेव गोष्ट म्हणजे "प्रत्येक देश आपल्या सोयीनुसार आपल्याला फायदेशीर होतील अशी धोरणे आखतो".
फारेन्ड, चांगली परिक्षण
फारेन्ड, चांगली परिक्षण लिहिले आहे. तरी एकदोन गोष्टी लिहिल्या पाहिजे होत्या.
१. हे आशियातले तेल साठे नक्की कुठे आहेत
२. फाळणी करून त्या साठ्यांवर कोणत्या प्रकारे नियंत्रण ठेवता येते.
३. ह्या इंग्रजांच्या स्ट्रॅटेजीला कोणत्या प्रकारे यश/अपयश आलेले आहे.
तिसर्या प्रश्नावर पुस्तकात काहीतरी लिहिलेच असेल. नसेल तर लेखकाने मांडलेले मुद्दे ही नुसतीच थीअरी ठरते.
पण जसा फायदा होता तसेच नुकसानही झाले आहे हे मान्य करायला काय हरकत आहे
>> सहमत. गांधींकडे political acumen नव्हते असे माझे मत आहे. ब्रिटीश, जीना, नेहरू, सगळ्यांनी त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेतले.
तसेच तुझा पहिला मुद्दा इतका बरोबर नाही वाटला. अलिप्त राहून कोणत्याही बलाढ्य देशांवर दबाव टाकता येईल असे वाटत नाही. तसेच (काश्मीरसारख्या) आपल्या भूभागावर नियंत्रण मिळविण्यात जिथे उदासीनता दाखविली तिथे संपूर्ण आशियाचे नेतृत्व वगैरे नेहरूंच्या मनात होते असे काही वाटत नाही.
श्री. नरहर कुरुन्द्कर यान्चे
श्री. नरहर कुरुन्द्कर यान्चे या विषयावर एक सुन्दर पुस्तक आहे. त्यामधे ते, नेहरु आणि माउंटबॅटन याना,फाळणीसाठी जबाबदार धरत नाहीत. पण तेसुद्धा पूर्वग्रहमतान्चे पाठीराखण करतात असे वाटते.
फारेंडा. उत्तम लेख आणि चांगली
फारेंडा. उत्तम लेख आणि चांगली चर्चा.
पाकिस्तान वेगळा काढून आणि त्याच्यावर नियंत्रण ठेऊन मध्यपूर्वेतले तेलसाठे कंट्रोल करणं ब्रिटीशांना कसं जमणार होतं ? तसचं एव्हडं सगळं घडवून आणून आज ब्रिटनला (किंवा अमेरीकेला) त्याचा खरच फायदा होतो आहे का? (बाकी राजकीय हेतूंसाठी होत असेल पण स्पेसिफीकली तेलसाठ्यांवरच्या नियंत्रणाबद्दल) ह्याची माहिती कोणाला असेल तर लिहा प्लीज.
पण सांगायचे असे की दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. >>> ह्याला अनुमोदन.
तसच अमेरीकेचे भारत एकसंध ठेवणे तसेच चीन आणि पाकिस्तान कनेक्टीव्हीटी न ठेवणे वगैरे मतांमागे चीनचा प्रभाव वाढू न देणे किंवा चीनला पर्याय निर्माण करणे ही कारणे खरच असतील का ? कारण हा काळ तर माओ क्रांतीच्या आधीचा होता. तेव्हा चीनचा प्रभाव आज इतका नसेलच ना?
भारताच्या स्वातंत्र्याच्या
भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात बर्याच गोष्टींचा अजूनही खुलासा झाला नाही आणी आता होणार नाही !!
ऐरवी ह्या वरील लेखा मूळे बर्याच गोष्टींचा उलगडा होउ शकेल !
जापान, जर्मनाकडे झुकणार्या नेताजी सुभाषचंद्र याचा संशयास्पद म्रूत्यु !
ह्यात सरदार पटेलांएवजी पं. नेहरुंची पंतप्रधानासाठी निवड,
सरदार पटेला चा सगळ्याच संस्थानाच्या खालसा करणातला सहभाग फक्त काश्मिर सोडून !!
लॉर्ड मांउटबेट्न यांची नेहरूशी असलेली मैत्री व नेहरूंची लेडी मांउटबेट्नशी असलेली घसट.
ह्या लेखातच स्पष्ट आहे कि ईंग्रजांना भारतात काही एक स्वारस्य राहील नव्हत.
मी स्पष्टच म्ह्णालोय की आपला असा (गैर) समजआहे की आपल्याला स्वातंत्र फक्त महात्मा गांधी
मूळेच मिळाले आहे आणी बाकी कुणीच काहीच केल् नाही. ह्या समजाला कारणे आहे कारण तसाच गाजावाजा
केला जातो.
भारतात फक्त महात्मा गांधीजीची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. सर्व जागी सर्व शासकीय
ईमारतीत कार्यालयात फक्त गांधीजीचें फोटो. कधीतरी एखादा भगत सिंघाचा फोटो.
एरवी साधारण समाजाला भगतसिंघ, राजगुरु व सुखदेव ह्या त्रिकुटातील राजगुरु हे महाराष्ट्रातील क्रूष्णा
शिवराम राजगुरु होते ह्याची ही सुधा माहीती नाहीय. ह्या त्रिकुटाचातर NCERT च्या शाल्य पुस्तकात अतिरेकी
म्हणूनच उल्लेख आहे म्हणजे गांधीजी महात्मा आणी ज्यांनी देशासाठी जीव दिला ते अतिरेकी ??
ह्या अहिंसाची दुसरी बाजू:
भारताच्या आताच्या SOFT STATE IMAGE च्या मागे आपलाच अहिंसा मधील अती विश्वासच कारणी भूत
आहे असे वाटायला लागले आहे.
कोण कुठचा झाकी उर रहमान लाखवी तो सुधा भारताला धमकावतो.
The Great Game or other wise: फाळणी झाली ते एका अर्थी चांगलेच झाले.
भारताला महात्मामूळेच
भारताला महात्मामूळेच स्वातंत्र मिळाले, हा सर्व साधारण ( गैर) समज आता तरी दूर व्हावा !!
उत्तम माहिती आणि
उत्तम माहिती आणि परिक्षण.
तिसर्या प्रश्नावर पुस्तकात काहीतरी लिहिलेच असेल. नसेल तर लेखकाने मांडलेले मुद्दे ही नुसतीच थीअरी ठरते. >> असे मलाही खूप प्रकर्षाने वाटले. त्याबद्दल काही माहिती पुस्तकात असेल तर नक्की लिही. (तब्बल ३८ वर्षे- भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते >> यामुळे लेखकाला ते सहज शक्य होते.) वरवर पहाता तरी असे दिसते की ब्रिटीशांचा प्रभाव पाकिस्तानावर कधी राहिलाच नाही. मग गेमचा काय फायदा?
भारत - पाकिस्तान फाळणी फार
भारत - पाकिस्तान फाळणी फार म्हणजे फारच गहन, जटिल विषय - याच्यावर होणार्या चर्चा - वादविवाद हे देखील अगणित - प्रत्येकजण थोडा फार पूर्वग्रहदूषित असताना समोरचा किंवा दुसरा कसा जास्त चूक हेच ठरवायच्या नादात असताना तिर्हाईत (unbiased) पद्धतीने कसे विश्लेषण करता येणार (कोणालाही....)...
या लेखाने अजून एक नवीन बाजू कळली एवढेच म्हणता येईल.
फारेंड, परीक्षण-विश्लेषण खूप आवडले. 'मला समजलेले' आणि 'त्यावर माझी प्रतिक्रिया' या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येणे..... हे मला फारच अवघड वाटते. तुला त्याबद्दल सलाम.>> अरभाटना अनुमोदन
ब्रिटीशानी प्रत्येक वसाहत
ब्रिटीशानी प्रत्येक वसाहत सोडताना काहीतरी काडी घालून विशेष्तः संदिग्ध सीमा करून कायमस्वरूपी भांडणे लावण्याचे व्यवस्था केलेली दिसते. अर्थात त्याचा फायदा शीतयुद्धात अमेरिका आणि रशियानेच घेतलेला दिसतो . पॅलेस्ताईनमधून बाहेर पडताना जागेचे विषम वाटप, बाप्ल्फोर जाहीरनामा, भारत पाक, भारत चीन, पाकिस्तान्-अफ्घाण या त्यानी आखलेल्या संदिग्ध सीमा ही ब्रिटीशांच्या 'काड्याघालू' नीतीची उदाहरणे . तेलाचे तरी अतिरंजितच वाटतेय कारण १९४० ते ४७ च्या सुमाराला मध्यपूर्वेतले तेल फारसे शोधलेचगेले नसावे. अजूनही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तेल निर्यातदार राष्ट्रे कुठे आहेत?
पुस्तक परिचय छान आहे आवडला.
पुस्तक परिचय छान आहे आवडला.
तेल क्षेत्र म्हणजे कुठले ?
तेल क्षेत्र म्हणजे कुठले ? त्या काळात मध्यपुर्वेत तेलाचे मोठे साठे सापडले होते का ?
दुसरे म्हणजे भारतातच नव्हे तर आफिकेतील देशांतून माघार घेतानाही, वसाहत केलेल्या देशांनी हिच विभाजनाची निती अवलंबली होती. त्याचे पडसाद अजून उमटत असतात. इथे पुर्व भागात तरी तेल नव्हते पण चहाचे मळे, खनिजे वगैरे होतेच. तंबाखूची शेती होती.
इथे साधारण १९६० नंतर स्वातंत्र्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी भारताचा स्वातंत्रानंतरचा काळ, या वसाहत केलेल्या देशांनी बघितला होताच.
भारतासाठी भारतीय नेत्यांना
भारतासाठी भारतीय नेत्यांना कम्युनिझम किंवा कॅपिटलिझम का बरोबर वाटला नाही, नि समाजवादच का चांगला वाटला याची काही कारणे कुणाला माहित आहेत का?
आमच्या आधीच्या पिढीतले, आमच्या ओळखीचे अनेक लोक म्हणत असत की समाजवादच बरोबर आहे.
कम्युनिझम व कॅपिट्लिझम याबद्दल थोडी तरी माहिती आहे, समाजवादाची तत्वे काय?
कम्युनिझम काही एव्हढा चांगला नाही, हे आपले इंग्लंडमधे शिकलेले, राहिलेले नेते समजत होते. नाहीतर अजूनहि, मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब व सतत गुलामगिरीत राहिलेल्या जनतेसाठी कम्युनिझमच चांगला असे काही लोक म्हणतात!! कारण कम्युनिझम मधे धर्म नाही, आपोआपच जाती पाती, एका जातीचे वर्चस्व वगैरे प्रकार बंद होतील, निदान कडक कायदा करून तरी, असे वाटले बर्याच लोकांना!
आता फाळणी का? तर समजा अखंड भारत ठेवला नि त्याचे नेते नेहेरू, गांधी झाले तर ते ना रशियाला पाठिंबा देणार ना अमेरिका, इंग्लंडला. म्हणून एक पाकीस्तान केले. तिथले नेते अमेरिका, ब्रिटनच्या आहारी गेले. पश्चिम पाकीस्तानचा भाग राजकारणात अतिशय महत्वाचा आहे, तिथे तेल नसले तरी. अमेरिका ब्रिटनला रशियावर हेरगिरी करायला जागा मिळाली. आता पाकीस्तान नि चीन जवळ आले, रस्ते बांधले तर उद्या तेच रस्ते वापरून अमेरिका, ब्रिटनला चीनच्या जवळ जाता येईल. म्हणूनच पुढे अगदी ब्रिटिशांच्याच नियमांनुसार संपूर्ण काश्मीर भारताचे असूनहि कित्येक दशके भारताविरूद्ध या राष्ट्रांनी व्हिटो वापरले!
दुर्दैवाने अमेरिका, इंग्लंड एव्हढे वाईट असूनहि जगात काय वाट्टेल ते, वाट्टेल तिथे करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.
जेंव्हा भारत समर्थ होईल, (झाला तर), तेंव्हा हे सगळे अन्याय दूर करेल.
>>मोठ्या प्रमाणावर अशिक्षित,
>>मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब व सतत गुलामगिरीत राहिलेल्या जनतेसाठी कम्युनिझमच चांगला असे >>काही लोक म्हणतात
हो. चीनने आत्ता जगात जे स्थान मिळवले त्यात कम्युनिझमचा मोठा वाटा आहे. याचा अर्थ तिथली सगळी जनता सुखात आहे असा मात्र होत नाही.
हेहि भारतातल्या सुजाण जनतेला
हेहि भारतातल्या सुजाण जनतेला समजते, म्हणूनच भारतात कम्युनिझम येणार नाही. भारतात डिक्टेटरशिपहि चालणार नाही. इंदिरा गांधींनी काही वर्षे तसे केले, पण पुनः लोकशाही प्रस्थापित झाली.
समाजवाद म्हणजे काय? एक माहित आहे, अनेक वर्षे परकीय मालाची आयात करू दिली नाही, भारतातल्या उद्योगधंद्यांना वाव मिळावा म्हणून. बर्याच गोष्टी, जसे फोन फक्त सरकारी असत. पण आता तसे नाही. खाजकीकरणहि झाले आहे. म्हणजे आता भारतातला समाजवाद संपला का? भारत कॅपिटॅलिस्ट झाला का? सध्या कॅपिटलिस्ट अमेरिकेतहि बरेचसे लोक सुखात नाहीत!
आता काय करायचे बुवा?? नशीब परवापासून क्रिकेट सुरु होत आहे परत. म्हणजे तीन चार महिने तरी ही काळजी नको!! तेंडुलकरची सेंच्युरी कधी होते एव्हढीच एक काळजी.
जाता जाता काडी घालण्याचे
जाता जाता काडी घालण्याचे इंग्रजांचे धोरण होते हे पटते पण तेलाचे मात्र थोडेसे ओढून ताणून Conspirecy Theory सारखे वाटते. पुस्तक वाचायला हवे.
खुप छान लेख आणी परिक्षण..
खुप छान लेख आणी परिक्षण.. सविस्तर लिहीन लवकरच.. अरभाट ला आणी दिनेशदाना अनुमोदन..:)
तेल हा मुद्दा तेंव्हा न्हवताच.. कारण तेंव्हा हे तेल साठे सापडलेच न्हवते..
<<<<कारण तेंव्हा हे तेल साठे
<<<<कारण तेंव्हा हे तेल साठे सापडलेच न्हवते ??? >>
तेलाचे राजकारण १९ व्या शतका च्या पुर्वी पासून चालले होते.
१८८६ मध्ये इंग्लंड मधील ग्लॉसगो येथे "डेवीड कारगील" यांनी भारत उपखंडातील तेल साठ्याच्या विकासा साठी कंपंनी स्थापन केली. ह्याच कंपंनीने पुढे BP ( British Petroleum) व बर्मा शेल मध्ये मुख्य शेअर निवेश केला.
बर्मा पेट्रोही फक्त भारत, ब्रम्हदेश ह्या देशा पुरती तेला च उत्पादन व पुरवठा करणारी कंपंनी होती.
१९४५ पर्यंत मध्य पुर्व देशाचे तेल उत्पादन वाढीला लागले होते. त्यात प्रमुख देश होते. ईराण ईराक व साउदी, जागतीक् स्तरावर ह्या देशांपूढे फक्त अमेरीकाच होती.
आता त्याना स्थानीक Oil Refinery ची गरज पडली व त्यासाठी एड्न ( यमन ) येथे पहीली मदर
रिफाईनरीची स्थापना झाली. १९५४ साली ही रिफाईनरी कार्यरत झाली. एडनचीच निवड का ? कारण त्या ला पूरेशे व साजेशे पर्याय नव्हते.
आता ह्या मदर रिफाईनरी साठी जास्त उपयुक्त जागा ही भारता चा वायव्य भाग म्हणजे आ ता चे
पाकिस्तान ठरू शकले असते.
तेल हे सर्वात प्रमूख शस्त्र होणार हे चतूर ब्रिटीशांनी १९ व्या शतकाच्या सुरवातीलाच ओळखल होत व त्याचा कंट्रोल आपल्याच हाती रहावा यासाठी त्यानी प्रयत्न केले !
माहीती स्त्रोतः
एडन मदर रिफाईनरीमध्ये स्वता: काम केलय.
१९५० साल पर्यंतची तेल उत्पादनाची आकडेवारी माहीती जालावर उपलब्ध आहे.
Pages