१ की. बेसन
१ की. साखर( कमी गोड हवे असल्यास जरा कमी घ्यायची)
वेलची ४-५
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
तळायला तूप
शक्य असेल तर हरभरा डाळ गिरणीतून दळून आणायची. अगदी बारीक न दळता जराशी जाडसर दळायला सांगायची.
पुर्या साठी मळतो साधारण तसेच घट्ट पिठ मळायचे. ह्यात मोहन घालायची गरज नसते.
ह्या पिठाच्या जाडसर पुर्या लाटायच्या. पातळ केल्या तर तळताना कडक होतात.
ह्या पुर्या तुपातच तळायच्या. तेलात तळल्या तर हवी ती चव येत नाही.
गरम असतानाच चुरल्या म्हणजे लवकर आणि बारीक चुरल्या जातात . काय करायचे पहिल्या दोन तीन पुर्या हाताने तोडुन घ्यायच्या जराश्या गार झाल्या की मग दोन्ही हाताने चुरायच्या. पुढच्या पुर्या चुरायला घेताना पुरीसोबत हा चुरा पण हातात घ्यायचा म्हणजे हाताला भाजत नाही. एकीकडे तळायचे आणि एकीकडे चुरायचे काम सुरु असते. सगळे चुरुन झाले कि दळण साफ करायच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. बारिक न चुरला गेलेला चुरा शिल्लक असतो, तो गार झाल्यामुळे हाताने चुरणे शक्य नसते तर पुर्वी तो खलबत्त्यात घालून कुटला जाई. आता मिक्सरमध्ये बारीक करु शकतो
वरच्या चुरण्याच्या कामाला शॉर्ट्कट म्हणजे सगळ्या पुर्या तळून झाल्या की मग त्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे.
हा सगळा चुरा एका परातीत घालुन ठेवायचा. वेलचीची पुड ह्यातच टाकायची.
पुर्या तळायला घेतानाच पाक करायला ठेवायचा. गोळीबंद पाक व्हायला हवा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी एका छोट्या ताटलीत पाणी घेऊन ठेवायचे. पाक सतत ठवळत रहायचे आणि मधुनच थोडासा पाक पाण्यात टाकून पहायचा. बोटांनी गोळा करायचा प्रयत्न करायचा. आधी तो पाण्यात टाकता क्षणीच पसरतो. पाण्यात त्याची गोळी झाली म्हणजे पाक पक्का झाला असे म्हणतात.
थोडा चुरा वाटीत काढून ठेवायचा. हा पाक ताबडतोब परातीतल्या चुर्यावर पसरवून टाकायचा. काढून ठेवलेल्या चुर्याने कढई पुसुन घ्यायची आणि परातीत टाकायचा. उलथण्याने खालीवर करुन चांगला मिक्स करायचा. एकसारखा करुन कापड टाकुन झाकुन ठेवायचा.
तासाभराने बघायचे की लाडू बांधायला जमतात की नाही. अजुनही जरासे ओलसर वाटले तर थोडावेळ राहू द्यायचा. लाडू हलक्या हाताने बांधायचे. काजू, बदाम, बेदाणे लाडू वळताना त्यात घालू शकता किंवा आधीच चुर्यात मिसळून घेवू शकता.
शुभ दिवापली!
हे लाडू थंड झाले की जरा कोरडे होतात. अगदीच कोरडे नको असतील तर पाक गोळीबंद होण्याआधीच काढून घ्यायचा.
दिवाळीच्या स्वयंपाकात आई सुगरण होती. तिच्या हाताखाली गिरवलेले हे धडे. आईकडून सगळ्या गोष्टींचे प्रमाण लिहुन घ्यायचेच राहून गेले.
नगर भागात हे लाडू लग्नात रुखवदात तसेच पाटीसोबत देण्याची प्रथा आहे. लेकीला सासरी जाताना तर सुनेला माहेरी जाताना दिवाळीची बुथ देतात, त्यात हि दिले जातात.
इथे अधिक चर्चा वाचायला मिळेल. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115678.html
खुप फेमस झाले होते लाडू
खुप फेमस झाले होते लाडू त्यावेळी !!
नलिनी माझी आजी करायचि हे
नलिनी माझी आजी करायचि हे लाडू. फारच छान असतात.
मस्तच! माझे फार आवडते लाडू
मस्तच!
माझे फार आवडते लाडू आहेत हे!
मध्य प्रदेशात हे लाडू खांडवा
मध्य प्रदेशात हे लाडू खांडवा गव्हाच्या रव्याचे करतात. तळणाची आणि चुरण्याची पद्धत हिच असते. फक्त पाकाएवजी गुळ घालतात. हे सुद्धा खुप छान असतात.
मस्तच. सचित्र स्टेप बाय स्टेप
मस्तच. सचित्र स्टेप बाय स्टेप कॄती दिल्याबद्दल धन्यवाद
मी राजस्थानात बाट्या चुरुन भरपूर तुपात केलेले लाडू खाल्ले होते. बहुतेक त्यालाही चुरमा लड्डूच म्हणतात. सोळा सोमवारच्या उद्यापनालाही चुरम्याचे लाडू असतात ना ? ते ही बहुतेक कणकेचेच असतात.
मस्तच, माझ्या सासुबाई फार
मस्तच, माझ्या सासुबाई फार सुरेख करतात हे लाडू.
आमच्या इकडे त्याला दामट्याचे लाडू म्हणतात.
दिनेशदादा, कंसराज, मैना,
दिनेशदादा, कंसराज, मैना, गेहना, अगो, अनु ३, धन्यवाद.
खुप फेमस झाले होते लाडू त्यावेळी !!>>दिनेशदादा, म्हणून नव्या मायबोलीत आणली.
आमच्या इकडे त्याला दामट्याचे लाडू म्हणतात.>> माझ्या घरी याला डाळीचे लाडू म्हणतात.
गेहना, अगो, नवी माहीती मिळाली.
मस्त! मलाही कणकेचेच चुरमा
मस्त!
मलाही कणकेचेच चुरमा लाडू माहित होते. बेसनाचे पहिल्यांदाच बघत्येय, पण यांचीही चव अल्टीमेट असणार यात वादच नाही
हे लाडू छान होतात. अगदी
हे लाडू छान होतात. अगदी मोतीचूराच्या लाडूसारखे दिसतात आणि लागतातपण. जुन्या मायबोलीवर नलिनीने दिल्यावर केले होते. टिकतातपण चांगले.
वा! काय सुरेख दिसत आहेत.
वा! काय सुरेख दिसत आहेत.
ह्या वर्षीचे लाडू तयार. या
ह्या वर्षीचे लाडू तयार. या फराळाला.
नलिनी खुप भारीये पा.कृ... खुप
नलिनी खुप भारीये पा.कृ... खुप ऐकले होते या लाडवा बद्द्ल, आता एकदा करुन पाहिन म्हणते..
लाडवाचा फोटो अगदी तो.पा.सु...