पालक वड्या (फोटोसहित)

Submitted by दिनेश. on 17 October, 2011 - 05:42
palak wadya
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) एक जूडी मोठ्या पानांचा पालक किंवा वडीचे अळू
२) १ कप बेसन
३) आवडिप्रमाणे हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले लसूण वाटण, गूळ वा साखर
४) आंबटपणासाठी एक टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा दोन टेबलस्पून दही (अळू असेल तर कोळच )
५) एक टिस्पून तेल (वरुन फोडणी द्यायची असेल तर जास्त + फोडणीसाठी तीळ, मोहरी, हिरवी मिरची)
६) वरुन पसरण्यासाठी कोथिंबीर आणि ओले खोबरे

क्रमवार पाककृती: 

हा काही नवीन पदार्थ नाही. पुर्वी फॉईलवर पालकाची पाने पसरून त्यांचा अळुवडीप्रमाणे रोल केला होता. पण त्यापेक्षा हि कृति खुपच सोपी आहे.

१) पालकाची किंवा अळूची जी पाने घेतली असतील त्याचे शिरा वगळून मोठे मोठे तूकडे करून घ्या.
२) बेसनात दही वा कोळ आणि बाकी मसाले घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट भिजवा. (हे थोडे जास्त तिखट / आंबट असू द्या)
३) कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा.
४) त्यावर पालकांच्या पानाचा एक थर द्या
५) पण बाकिचे तूकडे बेसनात घोळवून वर पसरत जा आणि त्याचे थर करा.
६) वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता (जे काही उरेल त्यावर अवलंबून)
७) कूकरमधे शिटी न ठेवता २० मिनिटे वाफवा.
८) पूर्ण थंड झाले की आवडीप्रमाणे वड्या कापा.
९) पथ्यासाठी या नुसत्यास कोथिंबीर घालून खाता येतील, नाहीतर तेलाची तीळ, जिरे मिरची घालून फोडणी करून वर ओता, व खोबरे कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

तेल / तळणे वगळले तर हा पथ्याचा प्रकार होईल. उपहार म्हणून भरपेट होतो.

माहितीचा स्रोत: 
अळुवड्या वळायचा आळस आला म्हणून हा प्रयोग केला.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक लिहिण्याचं मनावर घ्याच्च!

पुस्तक नाही.. पुस्तके म्हणा.. एका पुस्तकात सगळे बसणार नाही.

<<<<पुस्तक नाही.. पुस्तके म्हणा.. एका पुस्तकात सगळे बसणार नाही.>>>>> १००% अनुमोदन
खरंच खूपच छान दिसतायत वड्या.

मस्त

फार छान प्रकार्..मी आज पालकाऐवजी कोबीची पाने वापरून हा प्रकार केला. तोही छान झाला.

जालीम फोटोज ............... भुक लागली बघुन आणी वड्याच खायच्या असा मनाचा हट्ट आहे Happy

आंबट जास्त नको असेल तर आलेमिरचीचे वाटण थोडे जास्त घालायचे.
अळूसोबत चिंच वापरायची ती खाजरेपणा जाण्यासाठी. पालकासाठी
नाही वापरले तरी चालेल.

दिनेशदा आज करून पाहिल्या या वड्या. मस्त झाल्या. २० मिनिटामधे पूर्ण शिजल्या नाहीत.अजून १० मिनिटे म्हणजे एकूण ३० मिनिटे लागली. नुसत्या उकडलेल्या पण अळूवडी प्रमाणे छान लागतील असे वाटले पण पालकाचा वास थोडा उग्र वाटला. मग हिंग, मोहरी, हळद, कढीलिंब आणि तीळ अशी फोडणी करून परतल्या जरा कुरकरीत. खूप छान झाल्या. धन्यवाद, चविष्ट पाककृती बद्दल!!

हे फोटो

ह्या उकडलेल्या
photo-1.JPG

आणि ह्या परतलेल्या
photo_1.JPG

फक्त आम्ही केल्यावर (म्हणजे मी केल्यावर हं!) ते फोटोतल्या सारखे दिसत नाहीत......>> शांकली, अनुमोदन.
वड्या बघण्यात समाधान मानून घेते. इथे पालक नाही मिळत.

दिनेशदा,
चाळीस वर्षांपुर्वी अमेरीकेत अळुची पाने मिळत नव्हती. माझ्याकडे जेव्हा माझी आजी आली होती तेव्हा तिने इथे मिळणार्‍या ग्रीन कोलार्ड नावाच्या मोठी पाने असणार्‍या पालेभाजीच्या पानांची वडी केली होती. अगदी अळुच्या वडी सारखीच चवीला लागली. त्यामुळे तीच आमची अळुची पाने झाली.
मात्र अळुच्या पातळ भाजीसाठी पालकाचाच उपयोग करतो.
आपल्या पाकृची मी नेहेमीच वाट पहात असते. तुमच्या बर्‍याच पाकृ माझ्या सुगरण आजींच्या सारख्याच असतात ह्याचे मला नेहेमीच नवल वाटत आले आहे आणि आनंदही वाटतो.
आपल्याला माझ्या अनेक शुभेच्छा!

काल केल्या..आणि जमल्या Happy सगळ्यात वरचा थर सारणाचा आहे. कुकर मधून काढल्यावर थोड्या कच्या रहिला तर मा वो मधे ३ मिन ठेवल्या.
photo(1).JPG

दीपा, यापेक्षा आनंद देणारा प्रतिसाद काय असू शकतो ?
आदी, मस्त जमल्यात कि.

रुणुझुणु, तूमच्याकडच्या स्टार रीसॉर्टमधे सगळे ग्रीन्स बघितले होते. पण शाकाहारी प्राण्यांना फार चॉईस नाही, हे खरेय.

पन्नासावा प्रतिसाद Happy
आज केल्या होत्या ह्या वड्या. फार छान झाल्या आहेत. बेबी स्पिनॅच चवीला अतिशय सौम्य असतो त्यामुळे अळूवड्यांसारख्याच लागत आहेत. धन्यवाद दिनेशदा Happy

Paalak-vadya.jpg

इमेज रिसाईझ केल्यावर थोडी धूसर होते आहे. का ते माहीत नाही.

दिनेशदा,

रेसिपी खूप आवडली. Happy

मला कोकणस्थी पध्दतीच्या अळुवड्या नेहेमीच आवडायच्या. तळणे टाळायचे म्हणुन गेल्या काही वर्षात त्या करायच्या बंदही झाल्या. इथे सारस्वती पध्दतीच्या वड्या एकदाच (सा.बां.नी केल्या म्हणून) खाल्या होत्या. खरं सांगायचे तर त्या फार आवडल्या नाहीत. (तसाही त्यांचा तेल आणि नारळावर हात फारच आहे म्हणुनही असेल) पण पुन्हा कधी त्याही मी केल्या नाहीत. नवर्‍याला माझ्या पध्दतीच्या अळुवड्या आवडत नाहीत. एकूण काय तर ह्याच क्लॅशमध्ये अनेक पदार्थ मी करायचीच बंद झाले आहे. मायबोलीवर नवनवीन पदार्थ पाहिले तरी करायचे मन होत नाही. पण हा प्रकार करून बघायची ईच्छा आहे. एकच विचारायचे होते.. पूर्ण बेसन न वापरता माहेरी घालायचो तसे थालिपिठाची भाजणी वापरून केलं तर असा उंडा शिजेल का (रोल न करता भांड्यात लावलेला)? आणि पालकाबरोबर कसा लागेल चवीला ? जमेल तेव्हा सवडीने सांगा. तसेही म्हटले म्हणून लगेच बनवण्याचा साटकपणा माझ्यात आता राहिला नाहीए. पण इथे नाही तर माहेरी जाईन तेव्हा नक्की करून बघेन.

सोनचाफा,
भाजणी ठिसूळ असल्याने वड्या पडणार नाहीत. थोडेतरी बेसन किंवा कणीक
घालावी लागेल. शिवाय थरही जरा कमी जाडीचा द्यावा लागेल.
भाजणीपेक्षा मिश्र पिठ वापरले तर चांगले, त्यात कणीक, बेसन, तांदळाचे
पिठ घेता येईल.
भाजणी शिजेलही पण त्या पिठाची आणि खमंगपणाची आपल्या जिभेने
सांगड घातलेली आहे ना, म्हणून चवीबद्दल शंका आहे. पालकाबरोबर
चांगलीही लागेल पण पानाला चिकटणार नाही.
आता माझ्याकडे भाजणी असती, तर मीच प्रयोग केला असता.

दिनेशदा,
लगेच उत्तरही दिलत ? ग्रेट आहात.
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. मी बेसन जरा वातूळ म्हणुन टाळण्यासाठी म्हणत होते. पालकाला भाजणी चिकटणार नाही हे बरोबर आहे. त्यामुळे तांदळाचे पीठ, कणीक वगैरे वापरलेले बरे.. आणि हो बरं झाले तुमच्याकडे भाजणी नाही ते.. नाहीतर बिघडलेल्या वड्यांचा फोटो टाकायची वेळ आली असती.. खाली टीप देऊन की 'हे करण्याच्या फंदात पडू नका.' आणि तुमचं मत न विचारता मी केल्या असत्या तर त्या बिघडलेल्या वड्या मला एकटीला संपवायला लागल्या असत्या ते वेगळच !!

>>> पूर्ण थंड झाले कि आवडीप्रमाणे वड्या कापा.
हा कि दुसरा असावा.
अर्थात आमचेही शुद्धलेखन यथातथाच आहे पण जेवढे जाणवते तेवढे शुद्ध लिहावे असा कल असतो.

फोटो पाहून पालकवड्या छान झाल्या असतील यात शंका नाही. या वड्यांचे पालक व्हायला आवडेल.

Pages