तू अशक्य आहेस....!!!!

Submitted by भुंगा on 14 October, 2011 - 14:48

आज जाहिर समारंभात पुरस्कार स्विकारताना
तुझ्या चेहर्‍यावरचं समाधान आणि आनंदाने भरून वाहणारे तुझे डोळे पाहिले
टचकन डोळ्यात पाणी आलं,
राहून राहून एवढंच वाटलं.....
तू अशक्य आहेस...!

परकर पोलकं नेसलेली तू माझा हात धरून
दर संध्याकाळी चिंचेच्या झाडाखाली यायचीस
सगळ्या पोरांनी गलका केल्यावर,
हाती लागलेली एखादी चिंच अर्धी तोडून माझ्या हातावर ठेवायचीस
तुझ्या त्या दाताने तोडलेल्या अर्ध्या चिंचेकडे पाहून नेहमीच वाटायचं,
तू अशक्य आहेस...!

शाळेत मास्तरांची खाल्लेली छडी असो,
मैदानात खेळताना गुढग्याला झालेली जखम असो,
किंवा घरात आईचा खाल्लेला मार....
प्रत्येक वेळी आईच्या बरोबरीनं धावत तू हजर व्हायचीस,
माझ्या जखमेला मलमपट्टी करायला
आईच्या नजरेत मी कित्येकदा वाचलंय.... तिलाही वाटायचं,
तू अशक्य आहेस...!

गावभर उनाडक्या करत फिरताना, कॉलेजात टवाळक्या करताना
विविध स्पर्धा गाजवताना..... सावलीसारखी माझ्या बरोबर होतीस
आजुबाजुला चार मुली जमल्या की तुझ्या नाकाचा शेंडा पार लाल व्हायचा
तुझा तो लटका राग... ते वादविवाद, आणि जीवापाड केलेलं प्रेम पाहून नेहमी जाणवायचं,
तू अशक्य आहेस...!

माझी वाट न पहाता स्वतःच पुढाकार घेऊन व्यक्त केलेलं प्रेम,
माझा होकार मिळताच आनंदाने मारलेली ती मिठी
आईबाबांशी झालेल्या लुटूपुटूच्या लढाया
आणि मग आंतरपाटाच्या आड उभ्या असलेल्या तुला पाहताना
कानात घुमलेलं "शुभमंगल सावधान"
तेंव्हाच्या तुझ्या चेहर्‍यावरचा निस्सीम आनंद..... जग जिंकल्याचा तुझा आविर्भाव,
पुन्हा पुन्हा एकच जाणीव करून द्यायचा....
तू अशक्य आहेस...!

दोघांनी मिळून सजवलेलं काड्या काड्या आणून जमवलेलं घर
त्या घरात लागलेली चिमण्या पावलांची चाहूल....
अगदी शेवटच्या क्षणी माझं धावत्-पळत हॉस्पिटलमधे पोचणं...
जीवाची झालेली घालमेल.....
अचानक माझ्या हातात आलेलं आपलं चिमुकलं प्रेम......
अर्धवट ग्लानीत सुध्दा तुझं स्मितहास्य..... "तुझ्यासारखी आहे का रे?? "
हे अस्फुट शब्द...... अक्षरशः आनंदानं फुटलेलं रडू...... एकच मनात येतेय,
तू अशक्य आहेस...!

वेगळ्या वाटेवर मी सुरू केलेली वाटचाल.....
आधीचा विरोध मावळून तुझं खंबीरपणे माझ्याबरोबर उभं रहाणं...
सोसलेले उन्हाळे, भिजवून गेलेले पावसाळे.....
आणि अखेर आपल्या वाटणीचा तो वसंतातला बहर.....
आज सारं सारं आठवतेय मला..... कधीही न विसरता येणारं.....
आज जे काही मी कमावलय.... ते सारं तुझ्यामुळेच शक्य आहे....
पण तरीही पुन्हा पुन्हा सांगतो......

तू मात्र अशक्य आहेस...!!!!

गुलमोहर: 

पुन्हा वाचली ... आवडली.....
थोडीशी एडिट केलीस तर तर अधिक आवडेल.

मस्तच
मास्टर पिस आहे ही कविता!!!>>>>+१११

कसली मस्त कविता आहे ही.. एकदम अगदी अगदी झालं. प्रसंग सारखे नाहीयेत,पण गोष्ट अगदी आमचीच आहे.. आत्ता शुभ मंगल पर्यंतच पोचलो आहोत,पण भविष्य असं इतकं छान असू शकतं ह्या कल्पनेने भरून आलं.कविता संग्रही ठेवण्यात आली आहे.

रिया, इतक्या सुंदर कवितेशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!! Happy

Thanks all...
Special thanks to riya fr revisiting this page again and again.

Last month eka udyojakanchya program madhe saadar keli tithehee chhan pratisad milala....

Thanks all.

Pages