तू अशक्य आहेस....!!!!

Submitted by भुंगा on 14 October, 2011 - 14:48

आज जाहिर समारंभात पुरस्कार स्विकारताना
तुझ्या चेहर्‍यावरचं समाधान आणि आनंदाने भरून वाहणारे तुझे डोळे पाहिले
टचकन डोळ्यात पाणी आलं,
राहून राहून एवढंच वाटलं.....
तू अशक्य आहेस...!

परकर पोलकं नेसलेली तू माझा हात धरून
दर संध्याकाळी चिंचेच्या झाडाखाली यायचीस
सगळ्या पोरांनी गलका केल्यावर,
हाती लागलेली एखादी चिंच अर्धी तोडून माझ्या हातावर ठेवायचीस
तुझ्या त्या दाताने तोडलेल्या अर्ध्या चिंचेकडे पाहून नेहमीच वाटायचं,
तू अशक्य आहेस...!

शाळेत मास्तरांची खाल्लेली छडी असो,
मैदानात खेळताना गुढग्याला झालेली जखम असो,
किंवा घरात आईचा खाल्लेला मार....
प्रत्येक वेळी आईच्या बरोबरीनं धावत तू हजर व्हायचीस,
माझ्या जखमेला मलमपट्टी करायला
आईच्या नजरेत मी कित्येकदा वाचलंय.... तिलाही वाटायचं,
तू अशक्य आहेस...!

गावभर उनाडक्या करत फिरताना, कॉलेजात टवाळक्या करताना
विविध स्पर्धा गाजवताना..... सावलीसारखी माझ्या बरोबर होतीस
आजुबाजुला चार मुली जमल्या की तुझ्या नाकाचा शेंडा पार लाल व्हायचा
तुझा तो लटका राग... ते वादविवाद, आणि जीवापाड केलेलं प्रेम पाहून नेहमी जाणवायचं,
तू अशक्य आहेस...!

माझी वाट न पहाता स्वतःच पुढाकार घेऊन व्यक्त केलेलं प्रेम,
माझा होकार मिळताच आनंदाने मारलेली ती मिठी
आईबाबांशी झालेल्या लुटूपुटूच्या लढाया
आणि मग आंतरपाटाच्या आड उभ्या असलेल्या तुला पाहताना
कानात घुमलेलं "शुभमंगल सावधान"
तेंव्हाच्या तुझ्या चेहर्‍यावरचा निस्सीम आनंद..... जग जिंकल्याचा तुझा आविर्भाव,
पुन्हा पुन्हा एकच जाणीव करून द्यायचा....
तू अशक्य आहेस...!

दोघांनी मिळून सजवलेलं काड्या काड्या आणून जमवलेलं घर
त्या घरात लागलेली चिमण्या पावलांची चाहूल....
अगदी शेवटच्या क्षणी माझं धावत्-पळत हॉस्पिटलमधे पोचणं...
जीवाची झालेली घालमेल.....
अचानक माझ्या हातात आलेलं आपलं चिमुकलं प्रेम......
अर्धवट ग्लानीत सुध्दा तुझं स्मितहास्य..... "तुझ्यासारखी आहे का रे?? "
हे अस्फुट शब्द...... अक्षरशः आनंदानं फुटलेलं रडू...... एकच मनात येतेय,
तू अशक्य आहेस...!

वेगळ्या वाटेवर मी सुरू केलेली वाटचाल.....
आधीचा विरोध मावळून तुझं खंबीरपणे माझ्याबरोबर उभं रहाणं...
सोसलेले उन्हाळे, भिजवून गेलेले पावसाळे.....
आणि अखेर आपल्या वाटणीचा तो वसंतातला बहर.....
आज सारं सारं आठवतेय मला..... कधीही न विसरता येणारं.....
आज जे काही मी कमावलय.... ते सारं तुझ्यामुळेच शक्य आहे....
पण तरीही पुन्हा पुन्हा सांगतो......

तू मात्र अशक्य आहेस...!!!!

गुलमोहर: 

मस्त रे मित्रा. ट्रूली डेडिकेटेड कविता.
रच्याकने, 'तारीफ पे तारीफ' नक्की काय भानगड आहे रे?. Wink Light 1

भृंगराज - तुझ्या कविता वाचून हेच वाटतं -
"तू मात्र अशक्य आहेस...!!!!"
तुझ्या अशा सुंदर सुंदर कविता वाचून मन निवतं अगदी......

झक्कास आहे रे.
पण जेव्हा कविता वाचायला सुरूवात केली तेव्हा वाटल की बहीणीवर असेल. पण नतर मात्र कवितेनी एकदमच कलाटणी घेतली.
वा लगे रहो

थेट मनातून उमटलंय!!
असं "खरं" व्यक्त व्हायला, तिचं स्थान मान्य करायला, प्रत्येकालाच जमेल असं नाही, म्हणून तुझं विशेष अभिनंदन! Happy

भुंग्या, काय बोलू? थेट आतून आतून आलेले शब्द आहेत. भावना अप्रतीमरित्या व्यक्त झाल्या आहेत. अगदी भिडली रे!
सुंदरच Happy

भुंग्ज.. क्लासिक रे !

( अवांतर : नका रे असलं काही लिहीत जाऊ ! माझी बायको वाचत असते मायबोली. दहा वेळा उदाहरण देईल आता उठताबसता...

- एक त्रस्त जीव )

किरण्यके,

तुझ्या बायकोला नक्की सांग...... "बायका वाचतात त्यांचे नवरे असलं काही लिहित नाहीत, आणि ज्यांच्या बायका वाचत नाहीत तेच नवरे असलं काहीतरी लिहितात" Wink Proud Rofl

जबरदस्त केवळ जबरदस्त....
भुंगाराव - तुसी ग्रेट हो....

सुंदर !
<< तुझ्या बायकोला नक्की सांग...... "बायका वाचतात त्यांचे नवरे असलं काही लिहित नाहीत, आणि ज्यांच्या बायका वाचत नाहीत तेच नवरे असलं काहीतरी लिहितात" >> Lol

Pages