रोट

Submitted by नलिनी on 11 October, 2011 - 08:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

रवा अर्धा की.
मैदा ५० ग्रॅम
तूप ५० ग्रॅम
मार्गारीन ७५ ग्रॅम
साखर १५० ग्रॅम
दुध २०-३० मिली
बेकिंग पावडर दिड टिस्पून
मिठ चिमुटभर
वेलची पावडर, केशर व सुका मेवा आवडीनुसार.

मार्गारीन न वापरता फक्त तूप वापरणार असाल तर २०० ते २५० ग्रॅम घ्यावे.

क्रमवार पाककृती: 

* रवा, मैदा व मार्गारीन एकत्र करून घ्यावे. रवा दोन्ही हाताने मार्गारीन सगळीकडे लागेल असा चोळून घ्यावा.
* बेकिंग पावडर, वेलची पावडर, केशर, सुक्या मेव्याचे तुकडे, मिठ हे सगळे रव्यात व्यवस्थित कालवून घ्यावे.
* एका दुसर्‍या भांड्यात तूप व साखर चांगली फेटून घ्यावी. त्यात वरीलप्रमाणे एकत्र केलेले मिश्रण घालावे.
* सगळे मिश्रण एकत्र केल्यावर अगदी थोडे थोडे गरज वाटेल तसे दुध घालून मिश्रण मळून घ्यावे.
* मिश्रण मळतानाच हाताने गोळा होतोय का ते पहावे. गोळा होत असेन तर दुध घालणे थांबावे.
* अर्धा ते एक तास हे मिश्रण भिजू द्यावे.
* बेकींग ट्रे ला तुपाचा हात लावून घ्यावा व त्यावर मोठ्या सुपारीच्या आकाराचे गोळे जरा चपटे करून अंतरावर ठेवावेत.
* १८० डी. से. तापमानाला २०-२५ मिनिटे भाजावेत.
* ट्रे बाहेर काढून जरा थंड होवू द्यावे.
* लगेच खायला सुरवात करावी Happy किंवा डब्यात भरून ठेवावेत.

roT_1.jpgroT_2.jpgroT_3.jpg

टेस्टर
roT_4_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२०-२५ रोट होतील.
अधिक टिपा: 

ईद साठी बेकरीत रोट बनायला सुरवात झाली की काकू १-२ पायल्या (५-१० की) गव्हाचा रवा काढून घ्यायची. लागणारे साहित्य घेवून बेकरीत जावून थांबायला लागायचे. माझा नंबर येई पर्यंत मी तिथून हलत नसे. खरतर दिलेल्या सामानातून त्यांनी काही काढून घेऊ नये म्हणून मी रखवालदारी करायचे.
बर्‍याच वर्षांपासून रोट बनवणे पण बंद झाले. सणाच्या वेळी अजुनही ओळखीतल्यांकडून रोट येतात पण तेव्हा तिथे नसल्याने रोट खायला जमाना होऊन गेला.
अर्धा रवा, अर्धा मैदा घेऊन प्रयोग करून झाले पण ते काही यशस्वी झाले नाही. मैदा कमी करू का म्हणून दिनेशदादाला विचारून घेतले. मग विचार केला की काकूलाच विचारू की रोट करायला आपण काय आणि किती सामान द्यायचो ते.
बेकरीत द्यायला लागते ते प्रमाण १ की रवा, पाव की मैदा, अर्धा की वनस्पती तूप, अर्धा की साखर, आपल्या आवडीचा सुकामेवा.
ह्या प्रमाणात मी घरचे तूप वापरून एक वाटी रव्याचे रोट करून पाहिले. झाले छान पण जरा जास्तच कडक झाले.
मग प्रमाण बदलून वरच्याप्रमाणे हे रोट काल करून पाहिले.

रोट तसेही खायला छानच लागतात पण जरा कोमट दुधात भिजवून खाल्ले तर एकदम भारी लागतात.

माहितीचा स्रोत: 
काकू
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाककृती. साखर न घालता केले तर मसालेदार रश्श्यांशी खाता येतील असं वाटतंय. (कोंबडी -वडे, मटण -वडे यांत वड्यांना सबस्टिट्यूट).

मृ, Happy
पण मार्गारीन ला काही substitute आहे का?>>> २००-२५० ग्रॅम तूप वापरावे. घरच्या तूपाने बेकरी पदार्थ कडक होतात म्हणून बेकरीवाले डालडा तूप वापरतात.

रोट भाजताना मस्त दरवळ सूटतो.. पारंपारीक ईदच्या रोट मधे बदामाची पुड असते.
....आणि छोट्या साहेबांना खुप आवडलेले दिसताहेत.

इंदोर ला रहात असताना "नफीस" बेकरीत असे रोट मिळायचे.. इतर दुसर्‍या बेकरीपेक्षा नफीस चे रोट आणि टोस्ट सरस असायचे.तिथे मार्गरीन व तुपाच्या जागी बटर/लोणी वापरायचे..त्यांची खारी खुप पातळ पापुद्रे सुटलेली असायची .खुपच आवडतात..

धन्यवाद सर्वांना.

छोट्या साहेबांना खुप आवडलेले दिसताहेत.>>> भाजून होईस्तोवर तो ओवन समोरच बसलेला होता, तळ ठोकून. Happy

तिथे मार्गरीन व तुपाच्या जागी बटर/लोणी वापरायचे>>> प्रमाण सांगू शकाल का?

चित्रातला टेस्टर गोड आहे>>> Happy

मार्गरीन हवेच आहे कारण त्यामुळे खुसखुशीत पणा [लेयर सुटतात] येतो..फक्त तुप वापरते त्याजागी बटर वापरायचे..
केक्/बिस्किट्स शिकवणार्‍या एका बाईंनी मार्गरीन घरी बनवण्याची पद्धत सांगितली---डालडा /सनफ्लोवर डबल ब्रायलर मधे वितळवायचे..रुम टेम्परेचर ला आले कि फ्रीज मधे ठेवायचे..घट्ट झाले कि मार्गरिन तयार झाले..वापरायच्या वेळेस थोडे चमच्याने फेटुन घ्यायचे..तेव्हा मार्गरिन सगळीकडे मिळायचे नाही..

मस्तच पाककॄती. नक्कीच करुन बघणार Happy
रोट पूर्वी कधी खाल्ले नाहीयेत म्हणून विचारते हे नानकटाईसारखे असतात की आतून थोडे अजून मऊसर असतात. मॄण्मयीने कोंबडीवड्यांच्या जागी सब्स्टिट्यूट म्हणून वापरता येतील असं म्हटलंय म्हणून शंका आली.

धन्यवाद!
इंदोर ला रहात असताना "नफीस" बेकरीत>> बाजारात जे 'नफिस' चे टोस्ट मिळतात ते ह्याच बेकरीतले का? मला आवडतात ते.
तिथे मार्गरीन व तुपाच्या जागी बटर/लोणी वापरायचे..>> पुढच्यावेळी गावाकडच्या बेकरीतून काही करून घेतले तर बटर/लोण्याचा पर्याय विचारून पाहीन कारण आमच्याकडे वनस्पती तूप घेतात बेकरीवाले.
मार्गरीन हवेच आहे कारण त्यामुळे खुसखुशीत पणा [लेयर सुटतात] येतो..>>> अगदी अगदी. मी बालूशाही करताना पण मार्गरीन वापरते. पण कोणाला नकोच असेन तर तूप किंवा लोणी वापरू शकता.
नानकटाईसारखे असतात की आतून थोडे अजून मऊसर असतात. >> खाताना कुरकुरीतपणा जाणवतो परंतू जर दुधात भिजवले तर २-३ मि. नंतर ते मऊ होतात. त्यामुळे मृण्मयीने सुचवल्याप्रमाणे कोंबडीवड्यांच्या जागी वापरले जाऊ शकतात.
मृ, तू करून पाहीलेस की नक्की सांग.( मी केकमधल्या अंड्यापुरतीच नॉनव्हेजीटेरीयन आहे.)

आम्हीपण लहानपणी ईद आली की बेकरीत सामान देऊन रोट बनवून घ्यायचो.
एक आख्खा रोट घ्यायचा बशीत आणि वरून गरम दूध घालायचे. मग चमच्याने खायचे....यम्मी!!!
धन्स ग. खूप दिवसांत खाल्ले नाहीत रोट. आता ह्या पद्धतीने करून बघते. Happy

मैदा अजिबात न वापरता पण व्हायला हवेत.( असा माझा अंदाज)
मैद्याऐवजी गव्हाचे पिठ वापरून बघायला हवे एकदा. जाणकार सांगतिलच.

मी आताच रोट केले. भाजताना वास सुंदर सुटला होता (लेकीने ह्या वासाचा डिओ का मिळत नाही म्हणुन दु:ख व्यक्त केले).

मी रोट कधी खाल्ले नाही त्यामुळे चव, पोत माहित नाही. खाताना थोडा रवा लागतो तोंडात. बिस्कीटासारखा पिष्टमय फिल येत नाही तोंडात लगेच. लेकीने शाळेत खाल्लेत रोट, तिच्या मते असेच असतात फक्त थोडे पातळ असतात.

बेकरीवाले वनस्पती तुप च घेतात..या तुपाने खुटखुटीत पणा येतो ,पापुद्रे सुटतात्,अर्थात रव्यामुळे लेयर्स येणार नाहीत..पण बारीक रवाच वापरला पाहिजे..रोट ला बिस्किटा सारखा [मैद्याचा]फील येत नाही.. तोंडात रवाळ पणा जाणवतो..फारसे गोड ही नसतात बिस्किटांसारखे..मधे बदाम लावलेला असतो तो छान क्रिस्पी लागतो..अगदी थोडा बदाम इसेन्स घालतात..
नफीस चे टोस्ट खुपच छान [अतुलनीय]लागतात..गोडसर चव असते..नफीस ची खारी बिस्किट्स तर लाजवाब..एकेक लेयर दिसतो..नफीस चे बटर,पाव्,ब्रेड्,बिस्किटे,केक,क्रिम रोल्,पेस्ट्रीज,बिन अंड्याचा केक खुपच छान असतात..वाव, नफीस के क्या कहने?

केले आज रोट. पहिल्यांदा केले तेंव्हा रव्याची बर्फी झाली Happy तुप जास्त झाले बहुतेक. पण चव मस्त आली होती.

आज आकार-उकार पण जमले. Happy

मैद्या ऐवजी मी काजुपुड वापरली.

पहिले पण चवीला छानच लागत होते. आता हे दुसरे नक्की झिपलॉकमधे पाठव. म्हणजे डबा परत करायला नको. Proud

50 ग्राम मैद्याचे काय करायचे ?? क्रमवार कृतीत नाही सांगितले आहे म्हणून विचारत आहे.(अक्चुअली मी क्रमवार कृतीनुसार वाचत होते)