डेविड

Submitted by आशयगुणे on 30 September, 2011 - 13:16

मागच्या महिन्याची गोष्टं! मी भारतात चाललोय हे बर्याच लोकांना माहिती होते. जाणे एका आठवड्यावर आले होते. तेवढ्यात 'फेसबुक' वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!' मी म्हणालो ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया. लगेच दुसऱ्या दिवशी ह्याने परत उत्तर पाठवले 'शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच! आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार कळवला.
मी लगेच 'गुगल' वर नकाशा सुरु केला! ह्याचा पत्ता शोधला आणि ते 'बस स्थानक' सुद्धा! शुक्रवारी ठरल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पोचलो आणि तिकडून मला त्याच्या घरी न्यायला, तो स्वतः आला! मी त्याला लांबूनच ओळखले! रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांमध्ये एक स्वारी सायकलवरून येत होती! तोच हा!
ह्याचे नाव 'डेविड'. माझ्या विद्यापीठातील 'म्युसिक शाखेत' माझे एका तासाभराचे 'लेक्चर' होते. त्यात पहिले २० मिनिटे माझे 'पियानो' वादन झाले आणि नंतर ४० मिनिटे 'लेक्चर'. त्या वर्गात हा होता! लेक्चर झाल्यावर आमची ओळख झाली. त्याचा शिक्षणाचा हेवा वाटत होता मला. कारण तो 'संगीत' ह्या विषयात पदवी घेत होता! माझा 'पियानो' त्याला आवडला होता...आणि मी सांगितलेल्या भारतीय संगीताबद्दल त्याला फार उत्सुकता होती! मग आम्ही त्या दिवशी आमच्या कॅम्पस' मध्ये एक 'म्युसिक ग्रुप' स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी पुढची भेट 'स्टारबक्स' मध्ये झाली. तिकडे ह्या ग्रुपबद्दल अजुन मुद्दे चर्चेत आले! त्यातच हा 'ओकारिना' नावाचे दुर्मिळ वाद्य वाजवतो हे पण कळले! इतकच काय...त्याने हे वाद्य वाजवूनसुद्धा दाखवले! आमची गट्टी जमली! त्यात मी त्याला आमच्या दिवाळी कार्यक्रमात 'ओकारिना' वाजवायला बोलावले आणि तिकडे त्याचे हे वादन खूप गाजले देखील!
त्यानंतर बरेच दिवस उलटले. मी दरम्यान म्युसिक कीबोर्ड( आपल्या भाषेत 'केसियो') विकत घेतला आणि 'यु-ट्यूब' वर माझ्या वादनाचा प्रचार करू लागलो! त्याला ह्याने पसंती दर्शवली आणि माझ्याबरोबर वाजवायची ह्याची उत्सुकता वाढू लागली! ह्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या शुक्रवारी भेटायचे ठरवले!
त्याच्या घरी आलो.हा एका छोट्याश्या घरात एकटा राहतो! समोर आल्या आल्या वाद्य ठेवलेली दिसतात. वेग-वेगळ्या प्रकारची! समोरच 'केसियो' आहे! एक गिटार आहे! आणि ह्या सगळ्याच्या बाजूला त्याचा laptop ! त्याने मला बसायला खुर्ची दिली आणि सरळ 'यु-ट्यूब' सुरु केले! आणि मग आमची चर्चा सुरु! त्याने मला त्याच्या आवडत्या सगळ्या कलाकारांची गाणी ऐकवली! अमेरिकन म्युसिक काय असतं, जाझ , पॉप्युलर म्युसिक सगळ्यांवर चर्चा झाली! त्याने ऐकवलेले संगीत खरच खूप चांगले होते! पण त्याला जास्त उत्सुकता होती ती आपल्या संगीताची! मला एक कबुली त्याने दिली, " त्यादिवशी तुझ्या लेक्चरला सर्वात काय जर आवडले तर 'झाकीर हुसैन' चा तबला! मला तबला काय असतो....कसा असतो...कसा वाजवतो ते सांग ना! त्याची भाषा मला खूप divine वाटते." त्याची उत्सुकता पाहून मी प्रसन्न झालो! आणि त्याला असंख्य 'चित्रफिती' दाखवायला सुरुवात केली! संगीतात दर्दी असलेल्या सगळ्या अमेरिकन लोकांसारखे ह्याला 'रवी शंकर' नवीन नव्हते! पण त्यांच्याबद्दल सुद्धा अजुन सांगितले! वेग-वेगळी वाद्य दाखवली! आणि मग शेवटी विषय 'गायनाकडे' आला! त्याला 'गायन' कसे करतात ह्याच्यावर जास्त माहिती हवी होती!
माझ्या मनात काय आले काय माहिती! मी त्याला 'beatles ' चे norwegian wood हे लावायला सांगितले! आम्ही दोघांनी ते ऐकले! आणि त्याला नंतर 'पवन दिवानी' हे लता चे गाणे ऐकवले! तो संगीत शिकत असल्यामुळे साहजिकच त्याला दोन्हीमध्ये साम्य जाणवले! मग त्याला 'राग' ह्या विषयाकडे मी घेऊन आलो! "हे आपण ऐकले....तो राग बागेश्री." मी सांगितले. त्याला समजत होतं! काहीतरी नवीन शिकतोय ह्याचा आनंदसुद्धा होत होता! मग त्याला त्यादिवशी सगळे प्रकार ऐकवले....अभंग, ठुमरी,कवाल्ली, ख्याल, सिनेमा-संगीत...इतकच काय लोकसंगीत सुद्धा! तो पुन्हा पुन्हा विचारात होता...हे सगळं तुमच्या एका देशात कसं काय? एवढा वेग-वेगळ्या प्रकाराने नटलेला आहे तुमचा देश? त्याला हे चमत्कारिक वाटत होतं! पण सारखा सारखा तो 'झाकीर हुसैन' कडे वळत होता! त्याच्या तबल्याने त्याला वेड लावले होते आणि ते उतरणे शक्य नव्हते! साहजिकच आहे म्हणा! आमचे कुठे उतरले आहे अजुन?
मग विषय आत्ताच्या संगीताचा सुरु झाला! त्याच्या मते, "अमेरिकन संगीतात आणि एकूण पॉप्युलर संगीत म्हणजे 'पॉप' मध्ये एकेकाळी melody म्हणजेच 'चाल' हा प्रकार होता! एकेकाळी म्हणजे अगदी ५-६ वर्षांपूर्वी! आता सगळं rhytm वर आधारित आहे! त्यामुळे तेवढी मजा येत नाही!"
आश्चर्याची गोष्टं म्हणजे आपल्याकडेसुद्धा हेच निरीक्षण मी करत आलोय! असो!
त्याला नंतर विचारले की तू 'लाइव कार्यक्रम' ऐकायला जातोस का? त्याचे थोडेफार धक्कादायक विधान आले. " आज-काल जेव्हा 'पॉप म्युसिक' गाणे गातात, तेव्हा 'माईक' च्या आधी एक software ठेवलेले असते! ते तुमचा आवाज सुधारते आणि मग तुम्ही आपोआप सुरात येत! त्यामुळे असे कृत्रिम कार्यक्रम का बघू? त्याच्यात डॉलर का खर्च करू?"
मग 'एन्रिक इग्लेसिअस', ब्रिटनी स्पिअर्स', 'लेडी गागा' सर्व अशेच करतात का, असे मी विचारले. त्यावर त्याचे उत्तर अगदी स्पष्टं होते! 'होय!'
मला हे कलाकार माहिती नसणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असं तो समजत नव्हता! माझ्या देशात अगदी उलटी परिस्थिती आहे! हे कलाकार जणू आपलेच आहेत ह्या थाटात आपण मिरवतो! आणि मग त्याने गिटार काढले आणि समोर ठेवलेल्या केसिओ वर मला बसायला सांगितले! आणि आमचे वादन सुरु झाले! कुणीही काहीही ठरवले नव्हते! त्याक्षणी वाजवायला सुरुवात केली आणि हे वादन २० मिनटे चालले! त्याने ते 'रेकॉर्ड' केले आहे.....आणि मी त्याला ते 'यु -ट्यूब' वर 'उपलोड' करायला सुद्धा सांगितले आहे! वाट बघतोय....
शेवटी बस ची वेळ झाली! दुपार कशी गेली काही कळलेच नाही! डेविड मला बसपर्यंत सोडायला आला! जाता जाता एक मिठी मारली आणि आपण 'टच' मध्ये राहू असे निश्चित केले! Happy आज त्या संगीतमय दुपारीला एक महिना लोटला! डेविड अजुन माझ्या 'friends list ' मध्ये आहे! मधून मधून बोलणे होते! संगीताची देवाण-घेवाण होते! नियतीने अजुन एका अनुभवाची भर टाकली.....त्यासाठी तिचे धन्यवाद!
आपण दुपारी मित्राकडे 'खेळायला जावं किंव्हा गप्पा मारायला जावं असाच तो प्रकार होता! अगदी एका भारतीय मित्रसारखाच!

गुलमोहर: 

छान लेख.
<<जेव्हा 'पॉप म्युसिक' गाणे गातात, तेव्हा 'माईक' च्या आधी एक software ठेवलेले असते! ते तुमचा आवाज सुधारते आणि मग तुम्ही आपोआप सुरात येत! त्यामुळे असे कृत्रिम कार्यक्रम का बघू? त्याच्यात डॉलर का खर्च करू?">> हा काय प्रकार आहे - जरा सविस्तर लिहिणार का ?

छान लेख... Happy
मला संगीत कळत नाही एवढं, पण चांगलं ते ऐकायला नक्की आवडतं... त्यामुळे हा लेखही आवडला... जमला तर तो शेवटी उल्लेखलेला विडीयो इथे शेअर करा.
हा काय प्रकार आहे - जरा सविस्तर लिहिणार का ? >>>> खरंच जमलं तर नक्की अजून लिहा.

छान