पौष्टिक फज(फोटोसहित)

Submitted by मानुषी on 5 August, 2008 - 06:54
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो काळा खजूर, १५० ग्रॅम - काजू, १५० ग्रॅ. बदाम, १५० ग्रॅम आक्रोड व ५० ग्रॅम बेदाणे. पाऊण वाटी मिल्क पावडर.
अर्धा चमचा साजुक तूप. ५/६ मारी बिस्किटांचा चुरा(बारीक पावडर नव्हे.)

क्रमवार पाककृती: 

काजू, आक्रोड व बदाम मिक्सरमधून अर्धे बोबडे ग्राइंड करून घ्या. खजूर स्वच्छ धुवुन घ्या. कोरडा करा. खजुरातील बिया व नाके काढून टाका.
नॉन स्टिक पॅनमध्ये अर्धा चमचा साजुक तूप घालून त्यावर साफ केलेला खजूर घालून १ मिनिट छान परतून घ्या. त्यानंतर १ मिनिट झाकण ठेवा. गॅस बंद करा.
खजूर मायक्रोवेव्हमधेही गरम करू शकता.
खजूर मऊ झालेला असेल. तो थंड होण्याआधी पटकन काजू,बदाम,आक्रोड (हे भरड वाटलेले), बेदाणे, मिल्क पावडर, मारी बिस्किटांचा चुरा हे सर्व घालून हे मिश्रण छान मिक्स करा. हळूहळू हाताने मळून घ्या. चटके बसतील पण .....!
त्या मळलेल्या गोळ्याच्या पोळपाटावर/जाड प्लॅस्टिकवर लोळ्या(दांड्या) करून घ्या. या लोळ्या फ्रिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर छोटे छोटे तुकडे करा.

अधिक टिपा: 

करायला खूप सोपा व अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. व ड्राय फ्रूट्स चे प्रमाण थोडे कमी जास्त झाल्यास पदार्थ बिघडत नाही. एकादा इन्ग्रेडियंट नसला तरी चालते. अर्थातच खजूर हा मुख्य इन्ग्रेडियंट आहे.
मिश्रण जितके छान मळाल तितक्या दांड्या सफाईदार होतील आणि तुकडेही एकसारखे आणि सुबक कापले जातील.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे खजुर व इतर सगळं आहे. पण मिल्क पावडर नाही आहे ती घालावी लागेल काय?

लोळ्या म्हणजे? (पोळीसारखं का)

अरे मस्तच आहे हे !
हसरी, मिल्क पावडरचा छोटा पॅक आणून करुन टाक Happy

काजू, पिस्ते, बदाम मिक्सरमधून अर्धे बोबडे ग्राइंड करून घ्या. खजुरातील बिया व नाके काढून टाका. >>> Rofl

अगं हसरी लोळ्या म्हणजे.....लांब लांब दांड्या. ज्याचे आपण नंतर गोल गोल तुकडे करू शकतो.
आणि मिल्क पावडरने बाइंडिंग छान होते आणि चवही छान येते. आण ना...कुठेही मिळते.
लाजो ...नट्स बारीक केले तरी चालतील ना.

वीरा ...मी पण या शब्दांना नेहेमी हसते. मुद्दामच वापरलेत हे शब्द! अगं अगदी पारंपारिक आणि घरगुती, बायकी मराठी आहे हे. माझी आई वापरायची हे शब्द!....इव्हन लोळी सुद्धा!
आणि माहिती आहे का, शेंगदाण्यांना पण नाके असतात. ती काढून टाकण्याची पद्धत आहे. ती नाके पित्तकर असतात असा समज आहे.

लोळी माहित होता शब्द. शेंगदाण्याचे नार म्हणतो आम्ही. 'बोबडे' तर गोड आहे Happy

आणि काही शब्द त्या त्या गावचे असतात. जरा विषयांतर आहे. माझ्या माहेरी कुंड्याला कोळगा म्हणतात. या शब्दाला तर आम्ही भावंडे तेव्हाही हसायचो.

शेंगदाण्यांना पण नाके असतात. ती काढून टाकण्याची पद्धत आहे. ती नाके पित्तकर असतात असा समज आहे.

हा समज नाही, खरेच आहे हे.

पाकृ एकदम मस्त. अगदी थंडी स्पेशल. माझी आई पण असेच करते मिल्क पावडर व मारी बिस्किट वगळता. आणि ड्राय फृट्स नसले तर शेंगदाणे घालते Happy

शेंगदाण्यांना पण नाके असतात. ती काढून टाकण्याची पद्धत आहे. ती नाके पित्तकर असतात असा समज आहे.>>>प्लीज ती पद्ध्त सांगा.. मला जाम वैताग येतो या कामाचा.. पण पित्ताचा त्रास असल्याने सुटका नाही. Sad

खजुर रोल्स/फज मस्तच.. पण करण्यापेक्षा खायला जास्त चांगलं जमेल! Proud

>>शेंगदाण्यांना पण नाके असतात. ती काढून टाकण्याची पद्धत आहे.
फुड प्रोसेसर मधून १ गिरकि फिरवल्यास सालं व नाकं दोन्ही निघून येतात.

चिंगी, वेगळी पद्धत नाही. दोन हातात भाजलेले दाणे चोळले तर साले आणि नाकं ही वेगळी होतात. मग पाखडून टाकायची.

सर्वांना फज आवडला...धन्यवाद!
चिंगी ..आपण भाजलेले दाणे सुपात सोलून पाखडतो तेव्हा सालं आणि नाकं दोन्ही निघतात. ती पाखडताना निघून जातात. दिनेशदांना मोदक.

व्वा! मस्तच! आजच करते.
मानुषी, तुमची पाकृ सांगायची पद्धत आवडली. नाकं हा शब्द कित्ती वर्षांनी ऐकला!

दिवाळीत करायलाही हा पदार्थ आयडियल आहे.<<<

मानुषी, म्हणुनच तर मी दिवाळी बाफ वर टाकलिये याची लिंक Happy

असे छोटे छोटे रोल्स (काजु रोल्स सारखे) करुन, जिलेटीन पेपर/चककीत पेपर मधे गुंडाळुन कोणाकडे मिठाई म्हणुन पण नेता येतिल Happy घरची पौष्टिक मिठाई Happy हव तर वर्ख पण लावता येइल Happy

फारच क्रिएटीव्ह व्हायच असेल तर मोठा रोल करुन गोल चकत्या कापायच्या आणि एका बाजुने मेल्टेड व्हाईट चॉकलेट मधे डीप करायच्या.. थोडा नॉटी हेल्दी फज Proud

अगं उर्मी हो.....मला ही प्रतिक्रीया कुणाकडून तरी अपेक्षित होतीच.....(हाहाहाहा!)>>>>>( 'लोळी' शब्द आम्ही फार वेगळ्या context मध्ये वापरतो )
पण दुसरा काय शब्द वापरायचा...कारण हा शब्द पापडाच्या, करंज्यांच्या पिठासंदर्भात अगदी ऑथेंटिकली वापरतात. म्हणून दांड्या हाही शब्द वापरला आहे.

चिंगी, खूप सोपं आहे. भाजलेले शेंगदाणे एखाद्या नायलॉन किंवा कापडी पिशवीत घालून तीचं तोंड घट्ट बंद करुन धरा व पिशवी ओट्यावर ४-५ वेळा आपटा. साले व नाके दोन्ही निघून जाईल. नंतर पाखडून घ्या. अशा रीतीने दाणे पटकन सोलून होतात.

Pages