प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - इंद्रधनुष्य

Submitted by इंद्रधनुष्य on 5 September, 2011 - 09:09

(५) ट्रेनमधल्या डब्यात : एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत

अभिनंदन मित्रा... काय मग? कधी ठरलं?
गेल्याच आठवड्यात... सिंहगडावरून आल्यावर आईने घोषित करून टाकलं... "आधी लगिन दगडाच मग बाकीच्या गडांच"

'अरे व्वा... आता ठरलंच आहे तर करून टाक लवकर... शेवटचा ट्रेक म्हंटलं' (आमचा हिटचिंतक Wink )
'एकदा का 2 X 4चा तह झाला की मग कसला ट्रेक नी कसला ट्रॅक'... अरे.. प्रत्येकाला जिवनात कधी ना कधी उडी ही माराविच लागते. काय करणार? ना ईलाज असतो... आणि तूझ्या उड्यांची ख्याती तर प्रत्येक ट्रेकच्या पाना पानावर पसरलियं. :p

असले गळे भरू सल्ले रिचवत शेवटी त्याने 'ती' उडी मारलीच...

तर झाले असे... मुंबई वरून सुटणार्‍या शेवटच्या लोकलने कसारा गाठले तेव्हा मध्यरात्रीचे अडीच वाजले होते. मार्चचा महिना असल्यामुळे हवेतील चैतन्य गायब होते. नाशिकला जाणार्‍या एस्टीची चौकशी करण्यासाठी एस्टी स्टॅण्ड गाठले तर तिथे नावाला एक कुत्रं हजर होतं. एस्टीसाठी पहाटे पर्यंत वाट पाहवि लागणार यात काहीच शंका नव्हती. 'जल्ला वाट पाहिन पण एस्टीनेच जाईन' या बाण्याला एस्टी स्टॅण्ड वरच ठेऊन आम्ही स्टेशनवर परतलो... म्हंटल मिळेल्या त्या मेलने ईगतपुरी गाठू आणि पहाटेची पहिली एस्टी पकडू... नशिब चांगलं म्हणून की काय प्लॅटफॉर्मवर कुत्र सोडलं तर एक रेल्वे गार्ड भेटला... त्याच्याकडे इगरपुरीला जाणार्‍या ट्रेनची चौकशी केली.

"ये क्या जाऽरेली है!"... समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक मेलगाडी सिग्नल मिळाल्यामुळे सुटण्याच्या पवित्र्यात होती... "इसके बाद कोई गाडी नही है!"

तो, मी आणि हिटचिंतक एकमेकांच्या तोंडाकडे बघत असताना अचानक गार्डने मदतीचा दांडका उगारला. निवांत झोपलेल्या एका डब्याच्या दरवाजावर गार्डने दांडका आपटून दरवाजा उघडायला लावला आणि आम्हा तिघांना त्या धावत्या ट्रेनमधे जबरदस्तीने घुसवलं. जल्ला म्हणतात ना ते... काय ते 'दैव देते नी ट्रेन नेते'.

ट्रेन मधुन उतरावे तर तीने बराच वेग घेतला होता. कोणती ट्रेन? कुठे जातेय? काहीच अतापता नसताना आम्हाला जबरदस्तीने डब्या मधे कोंबून गार्डने स्वत:ची सुटका करवून घेतली होती.

थोड इकडे तिकडे केल्यावर कळलं की, स्लिपर कोच मधे घुसलोय आणि ते ही WT Uhoh ^&%$@%$^ कपाळा वर 'गर्दिश में हो ताँरें' चमकत होते... रुमालाने 'ताँरें' टिपत असताना पाया खाली पसरलेल्या जनतेकडे लक्ष गेले... एव्हढ्या मध्यरात्री अचानक डब्यात घुसल्यामुळे दरवाजा जवळील जनता अचंबित नजरेने आमच्याकडे बघत होती.

त्यातला एक अचंबित... "किधर जाना है?" काय उत्तर द्यावे तेच सुचेना. (पन आमी बी काय कमी नाय... हाडांचे नसलो तरी दगडांचे ट्रेकर आहोत.)
आमचा पलटवार "आप को किधर जाना है?" (म्हणतात ना ते काय ते चोरांच्या उलट्या उड्या... असो.)
"वारानसी"... पायाकडून उत्तर आले.
'हम लोग अगले स्टेशन पे उतर जायेंगे'... असे ठोकून देताच, त्यांची विकेट पडली.

स्लिपर कोच असला तरी डबा बर्‍यापैकी फुल्ल होता... ईगतपुरी येण्यास कित्ती वेळ लागेल याचा काहीच अदमास नव्हता. वरील संभाषण ऐकल्यामुळे दरवाज्या जवळील उतारू आमच्या कडे विचित्र नजरने पहात होते. जसजशी गाडी वर जाऊ लागली तसा घाटातला थंडगार वारा डोक्यातील चक्रे फिरवू लागला. ईगतपुरीवरून किती वाजताची एस्टी मिळेल? चहाची टपरी उघडली असेल का? स्टेशन किती वेळात येईल? सुई दोरा मिळेल का? TTE आला तरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......... TTEचा विचार येताच पोटात गोळा आला.... लगेच तो गोळा मी पुढे पास केला.

गाडीची धडधड कमी होऊन छातीतली धडधड वाढली होती. काही क्षण विचार करून आम्ही जनरल डब्यात घुसण्याचे ठरविले... लटलटत्या पायांनी डगमगत्या डब्यातील अडथळा शर्यंत पार करत दुसर्‍या टोकाकडे गेलो आणि तिथेच नशिबाने हाय खाल्ली... पुढच्या डब्यात चक्क TTE हातातला पॅड सावरत मन लाऊन काम करत होता. आमची वरात लगेच मागे फिरली... काय करावे सुचेना?

त्या वेळी हितचिंतकाच्या डोक्यात काय कीडा वळवळला कोण जाणे... पाठी वरच ओझं खाली उतरवून तडक त्या TTE कडे गेला... आम्ही इकडे बधिर होऊन ते दृष्य पहात होतो... तो गेला तसाच अर्धा मिनिटात परत आला... "काय विचारले? काय म्हणला तो?"
तो म्हणतोय "गाडी स्टेशन के बाहर सिग्नल पे खडी है|"

ठरलं तर.... तिघांच्या डोक्यात एकच विचार... ना मागचा ना पुढचा... जो दरवाजा दिसला तो उघडला नी थेट ट्रॅकवर उड्या मारल्या... दरवाज्या जवळील अचंबित जनता आऽ वासून मध्यरात्रीच्या 'उड्या" उघड्या डोळ्यांनी पहात होती. :d

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

'एकदा का 2 X 4चा तह झाला की मग कसला ट्रेक नी कसला ट्रॅक'... >>>>>>>>
अस्मादिकांची हिच शोकांतिका...

बाकी छानच लिहिलंय.

>>> निवांत झोपलेल्या एका डब्याच्या दरवाजावर गार्डने दांडका आपटून दरवाजा उघडायला लावला आणि आम्हा तिघांना त्या धावत्या ट्रेनमधे जबरदस्तीने घुसवलं. जल्ला म्हणतात ना ते... काय ते 'दैव देते नी ट्रेन नेते'.

ट्रेन मधुन उतरावे तर तीने बराच वेग घेतला होता. कोणती ट्रेन? कुठे जातेय? काहीच अतापता नसताना आम्हाला जबरदस्तीने डब्या मधे कोंबून गार्डने स्वत:ची सुटका करवून घेतली होती. >>> Biggrin

धमाल प्रवासवर्णन !.........:स्मित: