शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ३ - "नात्यातल्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2011 - 00:39

"नात्यातल्या आरोळ्या"

वसंतऋतू हा नात्यांमधला
कधी बदलतो शिशिरात
दोघांमधले नाते कसले
गुंफावे चारोळीत

काही नाती अशी असतात, की धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं... तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना! म्हणजे हेच बघा ना, नवर्‍याचं बायकोवर खूप प्रेम असतं, पण सासर्‍याबद्द्ल तेवढीच तक्रारही! आणि सासराही केवळ आपल्या लेकीकडे बघून शांत रहातो! आणि मग दोघांच्या मनातलं वादळ चारोळीत गुंफलं तर असं काहीतरी तयार होतं...

जावई :

people08c_0.gif

हिला पाहता माझ्या हृदयी
उमले हलके प्रीत अशी,
परी न उमजे वडिल हिचे हे
का करिती माझी काशी!

सासरा :

oldman_1.png

दशमग्रह हा कुंडलीतला,
म्हणती हो जामाताला,
लेक पाहुनी जीव कळवळे
काय करावे कर्माला!

***************
अर्थात इथे आहे नातेसंबंधातली 'तू तू मै मै'.

सासू-जावई, सासरा-जावई, सून-सासू/सासरेबुवा, मालक/मालकीण- मोलकरीण, ऑफिसमधला साहेब-इतर कर्मचारी असं कोणतंही नातं, त्या जोडीवर करायच्या आहेत प्रत्येकी एक अशा दोन चारोळ्या.

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. कुठल्याही एका विषयावर तुम्हाला दोन चारोळ्या करायच्या आहेत.
५. एका वेळेस, एकाच विषयावर, दोन चारोळ्या टाकाव्यात. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येकी एक चारोळी.
६. चारोळ्या विरुद्धार्थी, विनोदी कश्याही असल्या तरी चालतील.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तो:
एवढे गोकुळ कधी उभारले
अन उभारले कोणी ?
आठवतेस तू अजूनी तशीच
अल्लड माझी राणी

ती:
चळ लागला काहो तुम्हां
डोळ्या पडले फूल
अल्लड आता नातवंडे
तुमचा डब्बा गूल

आशा काळे टाइप थोरली जाऊ:
आपण दोघी जावा जावा
बहिणींवाणी राहू
चारी ठाव स्वैपाक करून
गोडीगुलाबीनं खाऊ

पद्मा चव्हाण टाइप धाकटी जाऊ :
आपण दोघी जावा जावा
संगतीनं कशा राहू?
दोन भावांना घेऊन
दोन दिशांना जाऊ

रखमे, कटाळ आला; रमंना आता हितं मन
आजकाल दिसत बी न्हायी; मानुसपन
रयाच ग्येली बग सगळ्याची
जनी न्हाई तुक्या न्हाई; सोसवना सुनंपन

हाँत्तर; मांडला येवडा पसारा; आवरेला हायेच बायको
आत्ता म्हने का करमना; उचला तंबू. फिकर कायको?
आऽवो तुमी झागिरदार, पन लोकांले इसरु नगा
सुक्कंदुक्कंचिंता तुमच्या पायी; आजबी टाकत्यात बगा
______ (फक्त खेळासाठी. खाली अगदीच रहावले नाही म्हणून पूर्ण लिहीली)______

द्येवाने द्येवासारकं र्‍हावं; ह्ये मी का सांगाय होवं?
मांडतानी इचारलतं का ; काय करु, काय न्हवं
अठ्ठाईस युगंलोटल्यावं; आता बायकुची आली याद
द्येवा द्येवा द्येवा; मले बी दिला किरपापरसाद

बगत होत्ये तुमचे कौतिक ;खोटं न्हाई बोलनार; बरं बी वाटलं
पर केवडं वो ते खटलं?
जीव दडपला की माजा, तुम्हाले हाक बी घातली,
पर तुम्ही होता कुटं; तुमी सोहळ्यात दंग
काडली अठ्ठाईस युगं डोयातील पाण्यासंग

गो भरत. Happy

सौंदर्य तिच
मंगळाने ग्रासलय,
आई वडिलाना तिच्या
वाढत्या वयान त्रासलय.

सौदर्याला तिच्या
भ्रमरान त्रासलय,
भ्रमरांच गुंजारव
वासनेन नासलय.

ती :
तुला आठवतो का रे,
तो सुंदर रेशमी प्रहर
हातात हात, डोळ्यांत डोळे
आणि चित्ती व्याकुळ काहूर

तो:
मला आठवतेय तुझ्यासाठीची खरेदी
मी घेतलेली साडी पाहिल्यावर हसलीस तू फिदीफिदी
तुझ्या संगे वणवण फिरून आली मला चक्कर
आणि तुझी अखंड बडबड... बाई गं! आता तरी आवर!! Proud

डेव्हलपर:
सम-विषम पार्किंगसारखा
बदलत राहतो त्याचा मूड
कॉपी-पेस्टच्या पाट्या टाकत
जमेल तसा मी घेतो सूड

म्यानेजर:
सूड-बीड घेण्याची
माझ्यासमोर नको हिंमत
अ‍ॅप्रायझलच्या बाजारात
मीच करणारेय तुझी किंमत Proud

सासरेबुवा :

जावईबापू माझी नवी बत्तिशी कुठाय?
लॅपटॉप आणि कॅमेर्‍याचा चार्जर तुम्ही बघितलाय?
संध्याकाळी माझे आज दोस्त येणारेत खास
ते येण्याअगोदर मला तयार व्हायचंय झक्कास!

जावई :

ओ भाऊ, सकाळपासून काय कटकट करून र्‍हायलाय!
'माझं हे कुठाय, माझं ते कुठाय'... सुट्टीचीही झोप नाय!
सगळ्या माझ्या गॅजेट्सवर ताबा तुम्ही मिळवलाय
निवांत पडा, मलाबी पडू द्या, न्हायतर तुमची खैर न्हाय!!

ती
सदा सर्वदा टिव्ही नी पेपर
आम्हाला कधी ती सुट्टीच नाही
नशिब तुमचे समजा
मी आहे म्हणून काटते सजा

तो.

सारखा असतो पिच्छा
बडबड नी तमाशा
कधी जाणो हिला कळेल
अंतरप्रेम अन आमची इच्छा.

मालकीण:
पै-पाहुणे आले की
नेमकी कशी तुझी दांडी
पाहुणचार राहतो दूर
करावी लागतात धुणीभांडी Sad

मोलकरीण:
नेमक्या बिमक्या दांडीच्या
आरोपांचा नका करु उगा दंगा
येण्याअगोदर चार दिवस
पाहुण्यांना कळवायला सांगा Happy