आरती की 'आरती' - केदार

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:54

गणपती यायला फक्त एकच महिना बाकी होता पण आम्हा कार्यकर्त्यांच्या कामाची सुरुवात तेव्हाच होते. रीतसर शेजारच्या सरवरला कोपच्यात घेऊन मीच अध्यक्ष होणार हे 'समजावून' सांगून पुढची दोन वर्षे त्याला देऊन टाकली. पण गोष्ट ती नाही, तर गोष्ट आहे... प्रेमाची, म्हणजे प्रेमा नावाच्या मुलीची नाही तर इंग्रजीत क्रश ज्याला म्हणतात त्या प्रेमाची! तसं माझं अनेक मुलींवर प्रेम बसलं (आता प्रेम उभं टाकलं हे म्हणता येत नाही म्हणून नाहीतर ते ही म्हटलं असतं) पण त्यातल्या त्यात हे आगळंवेगळं, गणपती प्रेम. आणि म्हणून सांगण्याचा उपद्व्याप.

माझ्या घरापासून २ ओ'क्लॉकला (म्हणजे थोडे तिरकं) जिचं घर होतं ती आरती देशपांडे, जी आमच्या कॉलनीत नवीनच राहायला आली होती. (दिसायला लै म्हणजे लैच फाडू, फ टा का! ) एकतर ती नवीन आल्यापासून आम्ही आपले कधी बोलायला मिळतं ह्याची वाट पाहत होतो. तिच्या येण्याजाण्याच्या वेळी नजरेस पडू ह्याची दखल घेत होतो. त्यातच गणपती बसणार होते. मग गेम करून कोण कोण गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून सहभागी होऊ शकते ह्याची नोटीस फक्त तिच्याच घरी जाईल ह्याची व्यवस्था केली. तर ती पण उत्साहाने सामील झाली. मग काय? मस्तच, गणेश म्हाराज पावलेच म्हणा!

पण आपण थोडं रिव्हर्स गिअर मध्ये जाऊ. मला कार्सची लहानपणापासून आवड. आम्ही मित्रांनी त्या काळी कोड नेम प्रोजेक्ट राबवला होता. अर्थात जनक मी! साधारण कोड असे होते की, जी दिसायला साधारण बरी मुलगी ती म्हणजे पद्मिनी; जी साधारणमध्ये मोडत नाही ती अ‍ॅम्बेसेडर(रिअली सॉरी, पण हेच खरे म्हणून हेच लिहीत आहे - नोंद घ्यावी माझे सत्याचे प्रयोग); जी दिसायला चांगली पण शिष्ट ती कॉन्टेसा क्लासिक (तिच्या लाईन्समुळे); व जी सुंदर म्हणजे परत परत वळून जिच्याकडे पाहावे लागे, ती म्हणजे प्रिमियर ११८ NE. आता तुम्ही म्हणाल ११८ NE काय कार आहे का? पण महाराजा, ही १९९२-९३ ची गोष्ट आहे. आमची नवीन कार्यकर्ती आरतीचे कोड नेम मी ११८ NE असे ती कॉलनीत आल्यावर ठेवले होते. ११८ जिथून गेली, तिथे सुवास पसरायचा असे मला अन माझ्या मित्रांना त्या काळी वाटायचे. (कारण सेंट मारत होती!) काय ते चालणं, ते बोलणं, अबब! ११८च १००%! पण महाराजा गोष्ट आहे मंडळाची म्हणून हे ना. सी. फडके वर्णन बाजूला ठेवतो अन कहाणी सुरू ठेवतो.

वर्गणी किती ते कार्यक्रम कोणकोणते, कोण कधी कधी आरती घेणार ते विसर्जनाच्या भंडार्‍यापर्यंतची आखणी करायची होती. मग आम्ही सर्व कामाला लागलो. मग काय आम्ही काम एके काम, किंवा आरती सोबत काम करण्याचे १०१ राजमार्ग ह्याच्या शोधात होतो! काम करता करता काही दिवस निघून गेले, त्यात आरती सोबत रोज बोलणं, खाणं पिणं इ. इ. होत होतं. पण इथे आपली डाळ गळेल (की शिजेल) का हे कळत नव्हते. अन अचानक आमचे महान मित्र श्री पुरूषोत्तम वदले की आरती महोदया मला लाइन देत आहेत! अहो आरतीबाईंनी लाइन द्यावी म्हणून आम्ही बरेच परिश्रम घेतले ते साध्य झाले की काय? ह्या आनंदात आम्ही होतो. पण ते खरे असावे असे आम्हा मित्रास वाटण्याचे कारण अनेक होते, जसे आरती आमच्या घरी येऊन पोहे पण करत असे. (आता किती मुली पोह्याचा कार्यक्रम स्वतः करतात ते तुम्ही सांगा? मग त्यांनाही तसे वाटले व त्यांनी मला भरीस पाडले ह्यात चूक काय? ) मग काय, मलाही कधी एकदा हे दिल देऊ अन कधी तिचं दिल घेऊ असं झालं.

गणपती आले, रोज आरत्या होऊ लागल्या, येई हो विठ्ठले म्हणताना माझ्या आवाजात पिवळा पितांबर जरा जास्तच झळकू लागला अन मंत्रपुष्पांजलीच्या वेळेस आवाज एकदम खडा येऊ लागला हे शेजारच्या स्वाती अन वैशालीच्या लक्षात आले. (हे स्वाती अन वैशाली नावं काही माझा पिच्छा सोडत नाहीत, मायबोलीवर पण त्याच नावाच्या मैत्रिणी!) मग त्यांनी बाजूला घेऊन नक्की काय दुखणं आहे हे मोठ्या बहिणीच्या मायेने जाणून घेतले अन ह्या दिल घेण्याच्या कार्यक्रमासाठी नक्कीच काही करायचे वचन दिले.

गणपतीच्या आठव्या दिवशी स्वातीने ती मीटिंग बोलावली अन तिला प्रमुख पाहूणी म्हणून बोलावले. मी आपला हळूच माझीया मनीचे गुज तिच्या कानात कसे सांगावे ह्या विचारात स्वातीच्या घरी गेलो, तिथे पाहिले तर आरती, स्वाती, वैशाली ह्यांसोबत आणखी दोन चार मुलं बसली होती, जी अनोळखी होती. मी अन पुरष्या तिथे मध्ये गेलो तर कोणी तरी माझी अचानक गचांडीच पकडली, अन म्हणे, ओळखलं का कोण आहे ते? मी थोडे सावरून नाही ओळखलं हे उत्तर दिले. तर त्यातील एकाने चाकूच दाखवला. आँ, तिच्या मारी, चाकूची गरज काय? अन हे नक्की काय चाल्लयं हे कळायला १० मिनिटे लागली. तर घोळ असा होता की वैशालीने आरतीला थोडी कल्पना दिली, आरतीने घाबरून जाऊन आपल्या बॉयफ्रेंडला हे सांगितलं. त्या मूर्खाने भांडणं करायच्या तयारीने आणखी दोन गुंडांना सोबत आणलं. हे सर्व ना वैशालीला माहिती ना स्वातीला ना आम्हाला. तो तिचा बॉयफ्रेंड होता हेच सर्वांना त्या मीटिंगमध्ये कळले. आम्हा सर्वांचा मोरू झाला होता. आरतीने इतकी लाइन देऊन घोळ घातला असे त्या तिघांचे म्हणणे पडले. पण हे सर्व आमच्या दिलाच्या एक्सपेन्सवर झालं. मग ९ व्या दिवशीच्या आरतीच्या मंत्रपुष्पांजलीला माझा आवाज लागला नाही!

आरती की आरती मध्ये पूजेची आरती नशिबात आली हे खरे पण दुसरे दिवशी एक चमत्कार घडला. विसर्जनाच्या मिरवणुकीत समोरच्या कॉलनीतल्या काही मुली नाचायला आल्या आणि मी गाणे गुणगुणलो... आसमान मे लाखों तारे.............

पुढे काय झालं ह्याची उत्सुकता असेलच. तर आरती पुढे अनेक वर्षे आमच्याच कॉलनीत राहत होती. आणि यथावकाश (म्हणजे एका वर्षातच) तिचा प्रेमभंगही झाला. मुली गुंडांवर प्रेम का करतात? तीन-एक वर्षांनंतर तिने गुंडांना आणल्याबद्दल माफी मागितली. आणि वैशालीने पॅच-अपचा निरोप आणला. पण मी इन्ट्रेस्टेड नव्हतो कारण... तेच- आसमान मे लाखों तारे. बाकी त्या आरतीच्या गुंड बॉयफ्रेंडला, आम्हाला उगाच चाकू बिकू दाखवला ह्या रागात आम्ही (मी अन पुरषा) विसर्जनाच्या चौथ्या दिवशी अद्दल घडवली.

पहिला क्रश क्रॅशमध्ये रूपांतरित झाल्याची कहाणी संपली पण मंडळी, असाच तुमचा किस्सा नक्कीच असणार कारण... कारण काय म्हणूनी काय पुसता? अहो ज्या दिलात लव्ह नाही ते दिलच नाही!

तुमच्याकडे आहेत का आरती, पूजा, दीपक किंवा प्रसादाचे अनुभव?

- केदार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<एकतर ती नवीन आल्यापासून आम्ही आपले कधी बोलायला मिळतं ह्याची वाट पाहत होतो. तिच्या येण्याजाण्याच्या वेळी नजरेस पडू ह्याची दखल घेत होतो>>
अगदी अगदी Lol

भारी आहे की किस्सा !
११८ एन इ होतीच क्लास गाडी. काँटेसा फक्त दिसायला बरी होती पण चालवायला, आतून डिझाइन सगळं एकदम कंडम.

इथल्या गाड्यांची कोड नेम्स कधी येणार

>>पण हे सर्व आमच्या दिलाच्या एक्सपेन्सवर झालं. मग ९ व्या दिवशीच्या आरतीच्या मंत्रपुष्पांजलीला माझा आवाज लागला नाही!
Biggrin लै भारी!!

केदार Proud

>> स्वाती अन वैशाली नावं काही माझा पिच्छा सोडत नाहीत, मायबोलीवर पण त्याच नावाच्या मैत्रिणी!
हे तू अत्यानंदानेच म्हणतो आहेस असं मी ठरवून टाकलं आहे. Proud

NE 118 >> Lol
आमच्या आजोबांची सतत बंदच पडायची. त्यांनी एनी नी बाहेर जाऊ म्हटलं की घरचे हळूहळू पसार व्हायचे Biggrin

११८ Proud

धन्यवाद!

पण पब्लीक तुमच्या किश्यांचे काय झाले? अहो

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
लव्ह हे त्याच दुसर नेम असतं

तिच्याशीच लग्न झालं नाही तरी
निदान प्रेम केलं होतं, हे म्हणता येतं

केदारबुवा,

>> बाकी त्या आरतीच्या गुंड बॉयफ्रेंडला, आम्हाला उगाच चाकू बिकू दाखवला ह्या रागात आम्ही (मी अन पुरषा)
>> विसर्जनाच्या चौथ्या दिवशी अद्दल घडवली.

ह्याचा पण किस्सा सांगा ना! Happy

आ.न.
-गा.पै.

Pages