परंपरा वगैरे - मंजूडी

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:37

एखादा दिवस असा उगवतो की त्या दिवशी घडणार्‍या सगळ्याच गोष्टींना एक विशिष्ट संदर्भ असतो. योगायोगच तो.. पण होतं खरं असं.

त्या दिवशी ऑफिसात आले. रीतसर स्थानापन्न वगैरे होऊन कॉम्प्युटर चालू केला. इन्बॉक्सात पडलेल्या खंडीभर मेलींपैकी त्या एका मेलीने माझे लक्ष वेधून घेतले... 'दिनूचे बिल'. काहीतरी लख्खकन् मनात चमकून गेले. इतर कामाच्या मेलींकडे दुर्लक्ष करून सगळ्यात आधी तीच मेल उघडली.

शाळेत असताना दरवर्षी पिठोरी अमावास्येला म्हणजेच श्रावणी अमावास्येला आम्हा प्रत्येक इयत्तेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात नेलं जायचं. 'मातृदिन' अशी अक्षरे रंगवलेला कापडी फलक व्यासपीठाच्या पडद्यावर लावलेला असायचा. 'आई माझा गुरू' या श्लोकाने सुरू झालेल्या कार्यक्रमात बापूसर आम्हाला आचार्य अत्र्यांची 'दिनूचं बिल' ही गोष्ट वाचून दाखवायचे. गोष्ट आहे साधीशीच, पण थोडक्या शब्दांत आईची महती सांगणारी आणि विलक्षण परिणामकारक.

दिनू हा लहानसा मुलगा आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या दवाखान्यात जात असे. तपासणी झाल्यावर, औषधं घेतल्यावर पेशंट दिनूच्या वडिलांकडे बिलाची विचारणा करीत असत. या बिलाविषयी दिनूला खूपच उत्सुकता होती. एक दिवस त्याने वडिलांना 'बिल म्हणजे काय?' असे विचारल्यावर वडिलांनी त्याला बिल बघायला दिले. त्यावरील तपशील वाचून दिनूला एक कल्पना सुचली. घरी गेल्यावर त्याने एका कागदावर आईचे नाव लिहिले आणि त्यात पुढील तपशील भरले -

आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे

बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये

शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया

दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे

__________________________________

एकूण ... ४ रुपये

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला उशाशी ठेवलेले चार रुपये दिसले आणि तो भलताच आनंदून गेला. पण त्याबरोबर एक कागदही तिथे ठेवलेला होता -

लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही

चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही

गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही

वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही

________________________

एकूण ... काही नाही.

ते वाचून दिनूला एकदम रडायला आलं. तो पैसे घेऊन धावतच आईकडे गेला आणि तिला मिठी मारून रडू लागला. आईने दिनूला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली, "तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

दरवर्षी ही गोष्ट आम्ही ऐकायचो. आणि दरवर्षी हमखास डोळ्यातून पाणी यायचेच. शाळेतून आम्हाला दोन नानकटाया आणि पार्लेची केशरी गोळी अशी पुडी मिळायची. घरी जाऊन ती पुडी आईला द्यायची आणि तिला नमस्कार करायचा अशी सूचना आम्हाला शाळेतून मिळालेली असे. हा प्रसंग आमच्यासाठी आणि आईसाठीही फारच हृद्य असायचा. आम्ही दोघी बहिणी, दोघींना एक-एक अशा दोन पुड्या मिळायच्या. 'एक पुडी बाबांना द्या' असं एका वर्षी आईने आम्हाला सांगितलं. 'नमस्कार करा' ह्या सूचनेची गरज आम्हाला भासलीच नाही. शब्दांवाचूनच भावना व्यक्त झाल्या आणि थेट हृदयापर्यंत पोचल्या. मग त्या वर्षापासून तशीच प्रथा पडून गेली.

पिठोरी अमावास्येचं व्रत हे आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी, संवर्धनासाठी करते. विदेहा नावाच्या स्त्रीची संतती जगत नव्हती. तिने पिठोरी अमावास्येचं व्रत केलं, चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाली अशी पिठोरी अमावास्येची कहाणी आहे. आणि म्हणून यादिवशी मातृदिन साजरा केला जातो.

इन्बॉक्सातली मेल वाचून एका क्षणात हे सगळं डोळ्यासमोर तरळून गेलं. कामाच्या मेलींत ती मेल हरवून जाऊ नये म्हणून माझ्या खाजगी मेल आयडीवर ढकलली. काय वाटलं माहीत नाही, पण एक प्रिंट काढून पर्समधे घालून ठेवली. ती मेल पाठवणार्‍याला मनापासून धन्यवाद देऊन कामाला सुरुवात केली.

त्याच दिवशी 'पुण्यातले पुणेकर'वर गप्पा मारताना श्रावणी-शुक्रवारी आमच्या शाळेत मिळणार्‍या गरमागरम चण्यांची आठवण निघाली. मग पिठोरी अमावास्येला मिळणार्‍या नानकटाई आणि गोळीची आठवण येणं अपरिहार्यच होतं. योगायोग! पाठोपाठच संक्रांतीला तिळगूळ, ऊसाची कांडी आणि चैत्र महिन्यात मिळणारी आंबेडाळ, पन्हं आणि कलिंगडाची फाक याही आठवणी निघाल्या. माझ्या आणि अरुणच्या पोस्टी वाचून 'पुण्यातले पुणेकर'वर केवळ वाचनमात्र असणार्‍या एका बालमोहनकरीण मायबोलीकरणीने माझ्या विचारपुशीत तिच्या आठवणी लिहिल्या. तसं आमच्या वयात खूप अंतर आहे, त्यामुळेच शालेयकालही वेगवेगळा... पण आठवणींच्या या धाग्याने आम्हाला एकत्र आणले. ओळख वाढली आणि पटलीदेखील.

त्याच दिवशी अजून एका मायबोलीकरणीने 'मी पण बालमोहनचीच आहे' असं आवर्जून माझ्या विचारपुशीत लिहिलं होतं. अजून एक योगायोग!

प्रोफाइलमध्ये शाळेचं नाव लिहिल्याचा फायदा त्यादिवशी मला जाणवला. त्याचबरोबर आम्हाला आपल्या परंपरांचे पाईक करण्याचे प्रयत्न आमची शाळा, आमचे आई-बाबा किती सहजतेने करत होते याची जाणीव मला झाली.

संध्याकाळी ऑफिसातून घरी जाताना एक मैत्रीण ट्रेनीमधे बर्‍याच दिवसांनी भेटली.

मैत्रीण म्हणजे नेहमीच्या संपर्कातली अशी नाही, ऑफिसच्या वेळा साधारण सारख्या असल्याने बर्‍याच वेळेला एकाच ट्रेनीमधे असायचो आम्ही. तश्या रोजच्या सहप्रवासी असतात बर्‍याच, पण हिच्याशी जरा गप्पागोष्टी व्हायच्या, विचारांची नाळ जुळतेय असं वाटायचं.

एकदा कधीतरी तिने स्वतः घरी केलेली नानकटाई डब्यात आणली होती. त्या आठवड्यात 'मदर्स डे' झाला होता आणि तिच्या आईसाठी आवडीचा खाऊ म्हणून तिने स्वतः ती नानकटाई केलेली होती. मदर्स डे - मातृदिन - नानकटाई... सगळे दिवे डोक्यात पेटले आणि मी तिला आसुसून सांगायला सुरुवात केली.

"आमच्या शाळेत मातृदिनाच्या दिवशी आईसाठी खास नानकटाईचा खाऊ द्यायचे."

"हो का? किती छान असतं नं हे मदर्स डेचं सेलिब्रेशन.."

"हम्म्.."

"एरवी कुठे गं आपण मुद्दाम आईजवळ कृतज्ञता वगैरे व्यक्त करतो. किती छान वाटतं नं आपल्या आईला एखादं ग्रीटिंग कार्ड द्यायला.. सोबत एक छानसा बुके आणि तिच्या आवडीचा खाऊ. मी गेल्या वर्षी तिला साडी घेतली होती. आपल्यात नाही अश्या सेलिब्रेशनची पद्धत."

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेम्यातील भालचंद्राच्या तोंडी असलेल्या 'सं कृ ती म्हणजे काय?' या वाक्याची मला प्रकर्षाने आठवण झाली.

मी 'मातृदिन' म्हणत होते त्याला ती 'मदर्स डे' समजत होती. हिच्याशी आपलं जमतं असं मला का वाटलं होतं कोणास ठाऊक.

मनातले विचार दाबून मी तिला म्हटलं , "अगं असतो ना मातृदिन आपल्यातही... पिठोरी अमावास्येला असतो."

"पिठोरी अमावास्या म्हणजे?" काहीतरी अनपेक्षित ऐकल्याचा भाव तिच्या तोंडावर होता.

"श्रावण महिन्यातली अमावास्या.. त्याच दिवशी बैल पोळा पण असतो."

"ओ! अच्छा... पण तो बैल पोळा वगैरे आपण कुठे करतो? ते तर गावठी लोक, आय मीन, जे शेतकरी असतात त्यांच्याकडेच तर असतो. पुरणपोळी वगैरे करतात तोच नं?"

'मला अगदीच काही 'ही' समजू नकोस' अश्या थाटात ती म्हणाली होती. मी पुढे काहीच न बोलता माझ्या स्टेशनला उतरले होते.

त्यानंतर ती फारशी कधी दिसली नव्हती. ऑफिसच्या वेळा/ जागा बदलली असेल. कोणास ठाऊक!

आता आज पर्समधे दिनूच्या बिलाची प्रिंटआऊट असताना तीच मैत्रीण, नव्हे सहप्रवासी, भेटली.

त्यादिवशी वर्तमानपत्रातील राशिभविष्य मी वाचलं नव्हतं, पण ते 'योगायोग संभवतात' असंच असणार नक्की .

गेल्यावेळेच्या अनुभवावरून तिच्याशी त्याविषयाबद्दल एकही अक्षर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण कसा कोण जाणे काहीतरी विषय निघाला आणि 'नानकटाई'वर येऊन स्थिरावला.

"अगं तू गेल्यावेळी म्हणाली होतीस नं आपल्याकडे कुठल्यातरी सणाला 'नानकटाई' करतात असं..."

मला हसायलाच आलं.

"हो.. पिठोरी अमावास्येला मातृदिन असतो आणि आमच्या शाळेत...."

माझं वाक्य मध्येच तोडत ती ओरडलीच, "आठवलं आठवलं.. त्यादिवशी आईला नानकटाई द्यायची आणि नमस्कार करायचा.. करेक्ट? अगं आई कधीची पाठी लागली आहे की मागच्या वेळेसारखी नानकटाई कर म्हणून. तू दिसल्यावर मला ते आठवलं आणि म्हटलं आता तुला विचारून त्या सणाच्या दिवशीच करेन ना नानकटाई..."

मला पु. लं.चं वाक्य आठवलं, 'सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.'

तर असो, नानकटाईच्या निमित्ताने का होईना, पण माझ्या त्या मैत्रिणीच्या 'मातृदिन आपल्यातही असतो' एवढे लक्षात राहिले तरी पुरे झाले.

- मंजूडी

(आचार्य अत्रे यांच्या 'दिनूचे बिल' या कथेतील भाग लेखात वापरावयाची परवानगी दिल्याबद्दल श्री. आप्पा परचुरे, परचुरे प्रकाशन गृह, मुंबई यांचे आभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी, हे आत्ताच वाचलं.

छान लिहिलयस. Happy बालमोहनकरांसाठीतर खासच आहे.

दरवर्षी श्रावणी अमावस्येच्या दिवशी मी आईला न विसरता मात्रूदिनाच्या शुभेच्छा देते आणि काहितरी लहानसं गिफ्टही घेते.

थोडक्यात, बालमोहनची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. Happy

छान

छान Happy

छान .. Happy

भावना महत्वाच्या हेही बरोबर, पण आपल्याला माहित असलेल्या, हृद्य अशा गोष्टी जास्त जवळच्या वाटणंही साहजिकच आहे ..

मलाही माहित नव्हतं पिठोरी आमावस्येल असा मातृदिन साजरा करतात ते ..

>>एम्बीला अनुमोदन. भावना महत्त्वाच्या.

पटलं. बाकी पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा होतो हे मला माहित नव्हतं. धन्यवाद! Happy

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!! Happy

मदर्स डे साजरा केला म्हणजे आईबद्दल जे वाटते ते कुठे कमी होते का?

रागवू नकोस, मला जे वाटले ते लिहिले. >>>>>>>

एम्बी, रागवायचा प्रश्न नाही. लेखात मी कुठेही 'मदर्स डे' साजरा करणं चुकीचं अश्या अर्थाचं मत व्यक्त केलेलं नाही. 'फक्त मातृदिनच महत्त्वाचा' असंही माझं म्हणणं नाही. तू लेख नीट वाचला असतास, विशेष करून शेवटचं वाक्य; तर मला काय म्हणायचंय ते तुला व्यवस्थित कळलं असतं. असो. Happy

गणपती बाप्पा मोरया! Happy

Pages