अण्णा, कोंडी फोडा आता !

Submitted by असो on 22 August, 2011 - 22:05

आदरणिय अण्णा

हे अनावृत्त पत्र तुम्हाला लिहीत आहे. मायबोली हे संकेतस्थळ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असावं असा विश्वास आहे. तुमचे लॅपटॉपधारी सैनिक कुठे काय छापून आलेय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असावेत ही आशा आहे.

अण्णा, भ्रष्टाचार हवा कि नको असं एखाद्याला विचारलं तर त्याचं उत्तर काय येईल ? कुणालाच नकोय तो. तुमचं अभिनंदन याचसाठी करायला हवं कि सरकारला आज तुम्ही लोकपाल बिल मांडायला प्रवृत्त केलंत. जनता तुमची याबद्दल कायमच ऋणी असेल. गेल्या ६४ वर्षात हे बिल मांडलं गेलं नाही असं म्हटलं जात असलं तरीही ही सकल्पना गेल्या ६४ वर्षातली नाहीच. १९१८ साली एखाद दुस-या देशात ते होतं पण त्याचं स्वरूप वेगळं होतं. १९६४ च्ञा दरम्यान काही युरोपीय देशात ही संकल्पना मांडली गेली आणि ७० ते ७४ च्या दरम्यान लोकपाल काही देशात अवतीर्ण झाले. अर्थात तरीही भ्रष्टाचाराविरूद्ध जनमत असेल तरच लोकपाल प्रभावी आहे असा त्यांचा अनुभव सांगतो.

तुम्ही जे जनलोकपाल बिल जनतेसमोर ठेवलं आहे त्यामागचा उद्देश निश्चितच चांगला आहे. तुमच्या उद्देशाबद्दल कुणालाच शंका नाही. हे असं का व्हावं ? तर तुमची साधी राहणी, किमान गरजा आणि ज्या कारणासाठी तुम्ही उपोषणाला बसताय त्याबद्दल कुणालाच विरोध नसावा. एप्रिल महिन्यात लोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्याबाबत आंदोलन झालं. तर आता ते लागू करण्याबाबत आंदोलन चालू आहे.

पण अण्णा, यादरम्यान ते बिल काय आहे याबद्दल आम्हाला कुणीच विश्वासात घेतलेलं नाही. सिव्हिल सोसायटी जनतेचं प्रतिनिधित्व करतेय असं तुम्हीच ठरवून टाकलं. अण्णा नि:स्वार्थी आहेत तेव्हां ते चुकीचं काही करणार नाहीत असा विश्वास जनतेने टाकावा असं गृहीतक त्यामागे होतें का ? केजरीवाल सांगतात आम्ही जन्तेकडे गेलो. जागोजागी त्याचं वाचन केलं... पण हे मलाच काय माझ्या मित्रपरिवारात, आजूबाजूला कुठेही दिसलेलं नाही. जर हे बिल सर्वांना माहीत आहे असा केजरीवालांचा विश्वास आहे तर जमलेल्या गर्दीला ते रोज जनलोकपाल बिल काय आहे याचा सारांश का समजावून सांगताहेत ? गर्दीला माहीत व्हावं म्हणूनच ना ? (ते जनतेला माहीत व्ह्यायच्या आधीच ते पास होण्याची मुदत देखील ठरलीय).

त्याचवेळी सरकारी बिल म्हणजे प्रमोशन टू करप्शन असं सांगायला ते विसरत नाहीत. हे म्हणजे एखाद्या बनियाने आमचाच माल कसा चांगला हे सांगण्यासारखं झालं. रामलीला मैदान म्हणजे दुकान नव्हे. लोकांना दोन्ही बिलं समजावून घेऊ द्यात, काल अतुल कुलकर्णीची मुलाखत पाहिली. त्याला विचारलं कि तू इतक्या दिवसांनी प्रतिक्रिया क देतोहेस ? तर त्याने सांगितलं कि मुळात हे लोकपाल, जनलोकपाल बिल काय आहे हेच मी समजून घेतोय. ते समजून घेतल्यानंतरच मला प्रतिक्रिया देता येईल. हा प्रश्न इतका ऐरणीवर का आणला जातोय हेच मला समजत नाही. मला वाटतं ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.

जर जनलोकपाल बिल हाच पर्याय सशक्त असेल तर जनमत त्याच बाजूला जाइल. पण झुंडशाहीचा वापर करून विधेयकाचं मार्केटिंग हा प्रकार गांधीजींना तरी सहन झाला असता का असा प्रश्न आज पडतोय. एकीकडे जनलोकपाल बिलाचा आग्रह धरताना त्यामागील लोकांना सरकार चालवायचं नाही. सरकार चालवताना कराव्या लागणा-या कसरतींशी आंदोलनाला घेणंदेणं नाही. जनता म्हटली कि सरकार हवेच. प्रत्येक जण मालक झाला तर कुणीच कुणाला भीक घालणार नाही ना ? अण्णा तुम्ही लोकांना कसलं शिक्षण देताय ? आपला व्याप सांभाळून कुणी प्रतिनिधी होत असेल तर त्याला नोकर म्हणायचं ? आधीच चांगली माणसं या उठाठेवींपासून दूर असतात मग त्यांची जागा दुस-या कुणी घेतली तर व्यवस्थेला दोष का म्हणून द्यावा ? या आंदोलनाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास व्यक्त होतोय त्याबद्दल अनेक जण असमाधानी आहेत. शिवसेनेच्या आंदोलनाला झुंडशाही असं म्हणणारे अण्णा काल आठवले या निमित्ताने...!

केजरीवालांच वक्तव्य आम्हाला पाठ झालंय. आम्हाला सरकारचंही बिल वाचायचंय त्यानंतर ठरवू ना केजरीवाल बरोबर कि चूक ते. काही तरतुदी तर आम्हाला सरकारच्या योग्य वाटल्या. सरकार पंतप्रधानांना कार्यकाल संपल्यावर लोकपालाच्या कार्ककक्षेत आणू पाहत आहे तर त्यामागचा विचार लोकांना समजू दे ना ! पंतप्रधानांविरूद्ध लोकपालाची चौकशी सुरू असेल तर त्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. म्हणजेच राजीनाम्याच्या मागणीवरून संसद स्थगित होईल. तुम्ही तर कुणालाही आरोप करायचं स्वातंत्र्य दिलंय. त्याला आम आदमी म्हटलंय. अण्णा... भाई ठाकूर, अरूण गवळी, येडियुरप्पा, कलमाडी, अंबानी, नीरा राडीया, अमरसिंग इ. लोकही आम आदमीच आहेत. या तरतुदींचा वापर म्हणण्याऐवजी गैरवापर होणार नाही याची लेखी हमी तुम्ही द्याल का ? आणि तशी हमी दिलीत तरी एकदा गैरवापर झाला तर त्या हमीला काय अर्थ राहणार आहे ?

कालच अरूणा रॉय म्हणाल्या कि देशातल्या ज्या न्यायमूर्तींचं रेकॉर्ड चांगलं आहे त्यांनीही न्यायसंस्थेला स्वातंत्र्य हवंच याचा पुनरूच्चार केलाय. काही तत्त्वं त्यात भ्रष्ट आहेत म्हणून संपूर्ण व्यवस्थेच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावायची गरज नाही. नुकतंच सौमित्र सेन यांना जनतेच्या प्रतिनिधींनी अपात्र ठरवल्याचं राज्यसभा या वाहिनीवरून दिसलं. इतर वाहिन्यांना या घडामोदी दाखवायला सध्या वेळच नाही. सौमित्र सेन प्रकरणातून न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य जनतेच्या हातातच असल्याचा संदेश दिला गेलाय. आजवर संसदेने जाणीवपूर्वक या अधिकाराचा वापर केलेला नाही.

अण्णा, ज्या ज्या वेळी संसदेत कायदे बनतात त्या प्रत्येक वेळी संसदेत चर्चा होते. त्या चर्चांचा तुमचा अभ्यास असेलच. त्या चर्चा वाचल्या तर जाणवतं आपण जितके नालायक समजतो तितके नालायक हे प्रतिनिधी नाहीत. निवडणूक सुधारणा विधेयकाबाबत झालेल्या चर्चेचं उदाहरणच घ्या. त्या मंथनातून निवव्ळ गुन्हे नोंदवलेले असणे हे अपात्रतेचं लक्षण नव्हे हे ज्येष्ठ सदस्यांनी सप्रमाण दाखवून दिलं. त्यानंतरच गुन्हा शाबीत झाल्याशिवाय अपात्र म्हणता येणार नाही असं म्हटलं गेलं. नाहीतर कुणाविरूद्धही खडीभर एफआयआय नोंदवले गेले असते आणि मधू दंडवतेंसारखे निस्पृह लोकही अपात्र ठरले असते. अण्णा विधेयक आनताना साधकबाधक विचार आपली संसद करत असते.

माहिती विधेयकाचं श्रेय तुम्हालाच दिलं जाईल. पण अण्णा तुम्हीदेखील मान्य कराल , जो मसुदा तुम्ही दिला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं बिल सरकारने पास केलंय. अरूणा रॉय यांचं त्यातलं ९० %योगदान तुम्हीदेखील नाकारू शकणार नाही. महाराष्टृ आणि केंद्राविरूद्ध तुम्ही आजवर अकरा वेळा उपोषण केलं त्यातल्या सहा वेळा सरकारने तुम्ही सुचवलेले कायदे केले आहेत. इतर पाच वेळा मंत्री आणि अधिकारी बडतर्फ केले आहेत. या घटना तुमची सचोटी आणि सरकारने तुम्हाला दिलेला प्रतिसाद हे दोन्ही दर्शवते. या प्रत्येक वेळी तुमच्या जोडीला आजच्या सारख्या वाहीन्या नव्हत्या यातलं मर्म लक्षात घ्या. त्या प्रत्येक वेळी दोन्ही बाजूंनी लवचिक भूमिका घेतली गेल्यानं कोंडी झाली नाही.

हे सगळं पाहीलं तर आता सरकार चर्चेला तयार होत असताना, वृत्तपत्रात जाहिराती दिल्या जात असताना आणि स्टॅण्डिंग कमिटीसमोर सर्व पर्याय खुले असताना ठरलेल्या मुदतीतच बिल पास करा हा आग्रह योग्य आहे का ? आमचंच जनलोकपाल बिल योग्य आहे हा आग्रहही योग्य आहे का ? आज गर्दी पाहून सिव्हिल सोसायटीचे नेते जी भाषणं देताहेत त्यांना प्रक्षोभक असा शब्द वापरला तर ते चुकीचं होईल का ? पोलिसांच्या अटी मान्य करताना अशी भाषणं करणार नाही असं या नेत्यांनी मान्य केलं होतं ना ?

या प्रश्नांची उत्तरं तुमच्यावरच सोडतोय अण्णा. कारण सिव्हिल सोसायटी वगळता इतर कुणाला मत द्यायचा अधि़कार आहे किंवा नाही हेच समजेनासं झालंय. अनंत बाङाईतकर म्हणतात त्याप्रमाणे सिव्हिल सोसायटीवर दोन मेगॅसेसे पुरस्कार विजेते लोक हवेत हे त्या संघटनेच्या घटनेत लिहीलय हे खरं आहे का ? तसं असेल तर अभिनंदन करायला हवं. पण असे लोक नसते तर ? किंवा या लोकांची मुदत संपली आणि कुणालाचा हा पुरस्कार मिळाला नाही तर काय करायचं ? या सोसायटीची घटना लिहीणारे लोक देशाच्या राज्यघटनेबद्दल विचार करणार आहेत , चांगलं आहे... पण ही सोसायटी बनवताना लोकांचा सहभाग मागवला होता का ? भूषण पितापुत्रांना संधी देताना सोली सोराबजी आणि इतर घटना तज्ञ विचारात घ्यावेसे वाटले नाहीत का ? कि भूषण पिता पुत्र हेच एकमेव आहेत या देशात ? इथेच आपला शोध संपला का ? असो. अण्णा या क्षणी तरी हे प्रश्न विचारणं चुकीचं आहे. कारण काफिला चल चुका है.

जनतेला सरकारची भलावण नको आहे किंवा अराजकही नको आहे. जनतेला हवय एक सशक्त बिल (ज्याच्या आग्रहाबद्दल आधीच धन्यवाद दिलेत तुम्हाला). पण, तुम्ही जितकी आडमुठी भूमिका घेत जाल तितकी हळूहळू सरकारला सहानुभूती वाढत जाईल हे माझ्यासारख्या क्षुद्र नागरिकाने सांगायची गरज नाहीच. विशेषतः तुमच्या दबावाखालीच का होईना सरकार प्रस्ताव देऊ करत असताना अमूक एक रँकच्या लोकांशीच चर्चा होईल हे आजूबाजूचे लोक सांगाताहेत ते कशाच्या जोरावर ? अण्णा ते उड्या मारताहेत तुमच्या उपोषणाच्या जोरावर. बेदी, केजरीवाल, भूषण उपोषणाला बसले असते तर कुणी ढुंकूनही पाहीलं नसतं. मेधा पाटकरांना त्याचा दांडगा अनुभव आहेच. एक पाऊल मागे घेणं या आडमुठ्या नेत्यांना आवडेल का ? गर्दीला संबोधून केलेल्या सध्याच्या भडकाऊ भाषणांनतर ते शक्य होईल का ? त्यांना आवरा अण्णा !

अण्णा, तुम्ही योग्य वेळी आंदोलन स्वतःच्या हातात घ्याल आणि ही कोंडी फोडाल अशी आशा वाटते. तुमच्या तब्येतीची गर्दीलाच नाही तर प्रत्येक विवेकी नागरिकाला काळजी वाटते. ती सरकारला किंवा सिव्हील सोसायटीला आहे किंवा नाही हे कसं सांगणार ? पण वेळेवर लवचिकता दाखवणं हे शहाणपणाचं ठरणार आहे हे तुम्हाला माहीत आहेच... !

तेव्हा अण्णा आता वेळ आलीये कोंडी फोडायची. बॉल आता निर्विवाद पणे तुमच्या कोर्टात आहे. तुम्ही कराल ते योग्यच असेल हा आशावाद आहे. अण्णा, आगे बढो !!

- एक सामान्य नागरिक

गुलमोहर: 

भूषण पितापुत्रांना संधी देताना सोली सोराबजी आणि इतर घटना तज्ञ विचारात घ्यावेसे वाटले नाहीत का ? कि भूषण पिता पुत्र हेच एकमेव आहेत या देशात ? असो. >>> अनिल तुमच्या बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरं इथे मिळ्तील http://www.youtube.com/watch?v=mPIW_NPaRt0&feature=related

CHHAN AAHE LEKH....YA ANDOLANA ADHI KUNALACH CIVIL SOC MAHIT NAVHTI...JI JANTELACH MAHIT NAHI TI TYANCHI PRATINIDHI KASHI...? CORPORATE SECTOR , MEDIA LA YA SOC. NE KAA JANLOKPAL PASUN BAHER THEVLE...? TYANCHYA JORAVAR AAHE HE SAGALE MHANUN ?

प्रचंड अनुमोदन.
जनलोकपाल विधेयक सिब्बल यांच्या मतदारसंघातल्या लोकांपर्यंत पोचवून त्यानंतर जनलोकपाल विधेयक वि. सरकारी विधेयक असा सर्व्हेही घेण्यात आला होता. त्यात अर्थातच जनलोकपाल प्रचंड बहुमताने जिंकलं (म्हणे).

लोकांना हवे तसे कायदे बनवून घेण्यासाठी हा वस्तुपाठ ठरेल काय? उद्या खाप पंचायतींनी हिंदू विवाह कायद्यात आंतरजातीय विवाहाला बंदी घाला म्हणून चक्काजाम केलं तर काय करायचं?

मयेकर,
अहो, आज लोक जो या मसुद्याला पाठिंबा देत आहेत, तसा तो खाप पंचायतींना मिळेल का?

सुप्रीम कोर्टानंही त्यांना अनधिकृत म्हणून घोषित केलं आहे.

केजरीवाल सांगतात आम्ही जन्तेकडे गेलो. जागोजागी त्याचं वाचन केलं... पण हे मलाच काय माझ्या मित्रपरिवारात, आजूबाजूला कुठेही दिसलेलं नाही.

सरकार तरी कुठं कायदे करताना प्रत्येक नागरिकाकडे येतं? कुठेतरी वेबसाइट्वर कोपर्‍यात मसुदा पब्लिश करतं. आण्णाना विचारलं तुमचा मसुदा आम्हाला दाखवा तर ते दाखवतील की...

मुळात नेता हा स्वघोषेतच असतो.... कुणी मला नेता म्हणा म्हणून जनतेची चाचपणी करत नसतो. शिवाजी असो वा औरंगजेब, गावापासून दिल्लीपर्यंत सगळे नेते स्वतःच्या ताकतीवरच नेतेपद भूशवतात. आण्णांची ताकद सच्चाई ही आणि तळमळ आहे, इतर नेते मसल, मनी वापरतात इतकेच.

प्रतिसादांबद्दल सर्वांचेच आभार !
सरकार तरी कुठं कायदे करताना प्रत्येक नागरिकाकडे येतं? कुठेतरी वेबसाइट्वर कोपर्‍यात मसुदा पब्लिश करतं. आण्णाना विचारलं तुमचा मसुदा आम्हाला दाखवा तर ते दाखवतील की...

स्पष्टीकरणाची गरज आहे का खरच ? असो.
ज्याला नोकरी हवी असते तो वर्तमानपत्रात सगळे कोपरे शोधत असतो, जमिनीच्या वादासंदर्भातल्या नोटीशी संबंधित प्रत्येक जण खप नसणा-या वृत्तपत्रातूनही शोधत असतात. कारण ते जिव्हाळ्याचे विषय असतात. सरकार अचानक बिल आणत नाही. कालबद्ध कार्यक्रम असतो. खासदारांना माहीत असत, आपल्या आवडत्या प़क्षाला माहीत असतं आणि कोप-यात का होईना जाहीरातही असते , ती ही सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात. आपल्या नजरेला ती पडत नाही कारण आपण ती शोधत नाही. तरीदेखील यात उणिवा आहेत हे मान्यच करूयात.

पण मग ज्या कारणासाठी सरकार वर टीका करायची त्याच कारणासाटी सिव्हील सोसायटीचं समर्थन का बरं करायचं ? अण्णा मसुदा दाखवतील. कधी ? पास केल्यावर ? तसा आग्रहच आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे, ज्या जनतेसाठी इतका अट्टाहास केला, जी जनता सुप्रीम आहे असं सांगत संसदेला आव्हान दिलय त्या जनतेला वाचू तरी द्या कि एकदा ! चुकलं का ?

कमीत कमी संसद सदस्य जन्तेने निवडून तरी दिलेले असतात. सिव्हील सोसायटीला असं क्वालिफिकेशन आहे का ?

अण्णा, माझ्या प्रश्नांची उत्तरं राहू देत आता. पहिल्यांदा हे सांगा कुठे आहात तुम्ही ?
बोलणी करायला पण केजरीवाल, भूषण आणि बेदी जाणारेत म्हणे. काल रात्रीपासून तुम्ही कुठल्या गुप्त खोलीत गेला आहात ? वाहिन्यांवर पण तुमची जुनीच दृश्य दाखवत आहेत. तुम्ही का नाही जात बोलणी करायला ? काही कळेनासं झालंय अण्णा !

कमीत कमी संसद सदस्य जन्तेने निवडून तरी दिलेले असतात.>> आपल्या देशात ५०% मतदान होतं त्यात बहूमत मिळालेले, म्हणजे ते त्या त्या प्रभागातल्या संपूर्ण लोकसंख्येच्या २०-२५% लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. आणि त्या २०-२५% टक्यातले किती मतदार पैसे / इतर 'सुविधांसाठी' मत देतात ह्याची नक्कि टक्केवारी माहिती नाही पण आकडा मोठा असेल. (मतदान न करणार्‍या ५०% लोकांमधे बर्‍याच लोकांची निराशा ह्यामुळे असते कि कोणताच प्रतिनीधी मला लायक वाटत नाही.)
आणि मग कलमाडीसारखे नेते निवडून येतात जे शहरासठी काहीच करत नाहीत पण पैसे भरपूर खातात. मी स्वतः त्या माणसाला कधीही मत दिलं नाही. माझ्या अनेक मित्रांनी दिलं नाही पण तरीही तो निवडून आला म्हणजे आमच्यापेक्षा त्याला मत देणारे लोक जास्त होते. अशा अनुभवांनंतर जनतेचा प्रतिनीधी म्हणून आम्ही त्याच्यावर कसा विश्वास दाखवायचा? आणि तोच खासदार संसदेत पारदर्शी लोकपाल विधेयकाला समर्थन देईल ही कल्पनाही हास्यास्पद आहे. आता कलमाडी हे प्रतिनिधिक उदाहरण झालं. पण संसदेतल्या बहुतांशी खासदारांबद्दल जनतेच हेच मत आहे.

केजरीवाल सांगतात आम्ही जन्तेकडे गेलो. जागोजागी त्याचं वाचन केलं... पण हे मलाच काय माझ्या मित्रपरिवारात, आजूबाजूला कुठेही दिसलेलं नाही. जर हे बिल सर्वांना माहीत आहे असा केजरीवालांचा विश्वास आहे तर जमलेल्या गर्दीला ते रोज जनलोकपाल बिल काय आहे याचा सारांश का समजावून सांगताहेत ? गर्दीला माहीत व्हावं म्हणूनच ना ? (ते जनतेला माहीत व्ह्यायच्या आधीच ते पास होण्याची मुदत देखील ठरलीय). >>> एक अब्जापेक्षा जास्त लोकसंख्यच्या आपल्या देशात किती लोक रोज व्यवस्थित वृत्तपत्र वाचतात? आणि रोजच्या धकाधकिच्या दिवसात ते विधेयकाचा मसूदा वगैरे काही शोधून वाचतील अशी अपेक्षा जरा जास्तच नाही का? आम जनतेची स्मरणशक्ती छोटी आहे कारण सामान्य माणसाला त्याच्या कुटुंबाकडे लक्ष देण जास्त महत्वाच असतं. अशा वेळी विधेयकावर दिवसेंदिवस चर्चा होत राहिल्या तर ते विस्मृतीत जाईल. आंदोलनाचा मोठा आवाज काढून एकदम जास्त लोकांचं लक्ष वेधून घ्यायच आणि आपलं म्हणण सांगायच ही युक्ती सगळीकडेच वापरली जाते आहे.

हे सगळं पाहीलं तर आता सरकार चर्चेला तयार होत असताना, वृत्तपत्रात जाहिराती दिल्या जात असताना आणि स्टॅण्डिंग कमिटीसमोर सर्व पर्याय खुले असताना ठरलेल्या मुदतीतच बिल पास करा हा आग्रह योग्य आहे का ?>>> सरकारला एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत वेळ होता, मधल्या ३ महिन्यात अण्णांशी चर्चा करून सरकारच्या विधेयकात बदल का केले गेले नाहीत? आणि वेळेचं बंधन घातलं नाही तर त्यावर चर्चा महिनोन्महिने चालेल, विरोधी पक्ष दंगा घालेल; संसदेचं कामकाज ठप्प होईल वगैरे वगैरे..

या आंदोलनाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास व्यक्त होतोय त्याबद्दल अनेक जण असमाधानी आहेत.>> मान्य. पण संसदीय लोकशाही भ्रष्टाचाराला थांबवू शकली नाही आणि घोटाळ्यांच्या रकमा वाढतच जात आहेत. त्यामागे असणारे नेते काही काळ तुरुंगात जातात पण पुढे आपली संसदीय लोकशाही त्यांच्याकडून दंड वसूल करते? नाही. जनतेचा अण्णांना पाठिंबा आहे कारण त्यांच्या मसुद्यात ह्यावरची उत्तरं आहेत.

आमचंच जनलोकपाल बिल योग्य आहे हा आग्रहही योग्य आहे का ?>>> सहमत.
पंतप्रधानांविरूद्ध लोकपालाची चौकशी सुरू असेल तर त्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.>>> सहमत. जनलोकपाल बिलात काही सुधारणा केल्याच पाहिजेत. आणि अण्णांची भुमिका आडमुठेपणाची आहे.
गांधीजींनी दाखवलेल्या सत्याग्रहाच्या मार्गापेक्षा हा मार्ग वेगळा आहे हे तुमचं मत पटलं. पण मुळात सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध पारदर्शी विधेयक आणु ईच्छित नाही कारण त्यानी मंत्र्यांची गोची होईल. तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आडमुठेपणाची भुमिका घेउन मग सरकारशी चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड करणे हा अण्णांचा हेतू असू शकतो.

@ चिनूक्स
माहीत नाही. मी आत्ता सकाळ पाहिला. अण्णा नजरकैदेत असं म्हटलंय. आणि आता पाहिलं तेव्हां केजरीवाल अण्णांच्या कानाशी लागताना पुन्हापुन्हा दाखवलं जातंय. हे लाईव्ह असेल ?

चौकट राजा
तुमचं मत निराळं असू शकतं. फक्त एक नवीन विधेयक येतंय तर ते घाईत का आणावं ? त्यावर अधिक सखोल आणि व्यापक चर्चा होऊन ते आत्ताऐवजी हिवाळी अधिवेशनात मांडलं गेलं तर काय बिघडणार आहे ? दुस-या एका धाग्यावर जनलोकपाल बिलाच्या तरतुदींवर चर्चा झालेली आहे. हीच चर्चा नामवंत वकिलांकडून व्हावी, घटनातज्ञ, न्यायाधिश किंवा समाजशास्त्री यांचेकडून व्हावी ही अपेक्षा आहे.

भ्रष्टाचार हा सत्तेतून येत असेल तर सर्वशक्तिमान लोकपाल भ्रष्ट नसेल असं कसं म्हणता येईल ? याआधी लोकपाल हवा म्हणून लढा दिला, नंतर लोकपाल काढून टाका म्हणून लढा द्यायचा का ? थोडी चर्चा होऊ दे कि !

अनिल,
अहो, अनेकदा लाइव्ह कव्हरेज दाखवलं गेलं आहे. आज सकाळी राजदीप सरदेसाई अण्णांना भेटून आले. नंतर निखिल वागळे. नजरकैदेत वगैरे जरा अतिच होतं आहे. दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण सुरू असूनही नजरकैदेत आहेत, असं म्हणणं हा खोडसाळपणा आहे.

अतिशय चांगलं लिखाण.

केजरीवाल आणि कंपनी अण्णांचा वापर करुन घेत आहेत असे एकंदरीत आंदोलनाचे स्वरुप पाहुन वाटले. सरकारशी बोलणी करण्यासाठी अण्णा जाणार नसुन इतर जण जात आहेत हे वाचुन आश्चर्य वाटले.

मसुदा समितीच्या बैठकीत अण्णा हो नाही शिवाय काही बोलत होते का? इथे त्यांना कमी लेखण्याचा हेतू नाही. पण वाटाघाटी विधेयकातल्या मुद्द्यांबद्दल असतील तर चर्चा/वादविवाद करणे हा त्यांचा प्रांत नाही.

भारताची घटना अद्याप सरकारने अधिकृतपणे भाषांतरीत केलेली नाही. १९५० साली साधारण २० वर्ष बय असलेल्या कोणत्याही व्यक्तीने घटनेचा मसुदा सामान्य जनतेला वाचुन दाखवल्याचे ऐकीवात नाही. सरकार पक्षाने सुध्दा इतके महत्वाचे बील संसदेत मांडण्यापुर्वी जनतेसमोर आणले नाही. चुक काय तर फक्त अण्णांची किंवा केजरीवाल आणि टिम ची ?

अण्णांच्या विरुध्दचा काही प्रचार हा पेड न्युज आहे अशी माझी खात्री आहे.

नितीनचंद्रजी

हे बघाल का ?
http://lawmin.nic.in/coi/part1.pdf

इन्डिया.जीओव्ही इथे देखील उपलब्ध आहे. पण माझ्याइथे तो फॉण्ट डाऊनलोड करता येत नाहीये. राजभाषा समितीने अनेक महत्वाच्या डॉक्युमेंटसचं हिंदीकरण केलेलं आहे. तुम्हाला राजभाषाच्या संकेतस्थळावर पण पाहता येईल.

आता काय तोडगा निघेल याचीच प्रतिक्षा आहे. एका बाजूला सरकार आणि एका बाजूला टीम अण्णा आहे. पण तिसराही पक्ष आहे जो तटस्थ आहे. जर तुम्ही अण्णांच्या टीममधे नसाल तर तुम्ही सरकारी एजंट / देशद्रोही ते पेड न्यूजवाले हे अतीच झालंय. या तिस-या पक्षाला कुठेच संधी मिळालेली नाही. आता जे झालं ते झालं.

मला या निमित्ताने एक प्रश्न विचारावासा वाटतो. एप्रिल ते आज अखेर ज्या वाहीन्यांनी अण्णांची दोन्ही आंदोलनं आणि बाबांच्या आंदोलनाचं २४ X ७ कव्हरेज केलं आणि हा असं म्हणाला तो तसं म्हणाला, अण्णांनी दाढी केली कि नाही अशा बातम्या दिल्या त्यातल्या एकाही वाहीनीला लोकपाल आणि जनलोकपाल समोरासमोर ठेवून तज्ञांची चर्चा घडवून आणता येऊ नये ?

या वाहिन्या राष्ट्रीय वाहिन्या आहेत ? असेल तर चौथ्या स्तंभाची काळजीच वाटू लागलीय.

मैत्रेयी,
अशा चर्चा रोजच सुरू आहेत की..फक्त लोकपाल वि. जनलोकपाल कशाला, बहुतेक सर्व वाहिन्यांवर अरुणा रॉय यांच्यासुद्धा मुलाखती झाल्या.

चिनूक्स

उणीदुणी काढणा-या चर्चा कि तुलना करून सांगणा-या चर्चा होत्या त्या ? मला खरच खूप कष्ट पडतात नेमकी माहिती मिळवायला. हा प्रश्न माझ्या माहितीसाठीच आहे.

NDTV, CNN-IBN, Times Now, आयबीएन लोकमत या वाहिन्यांवरच्या चर्चा मला खरोखरच आवडल्या. कोणा एका पक्षाची बाजू घेण्याचा प्रयत्न मला चर्चांमध्ये तरी दिसला नाही. अण्णांचे समर्थक या चर्चांमध्ये होते, तसे विरोधकही होते. अरुणा रॉयांच्या तीन मुलाखती मी पाहिल्या. तिन्ही अतिशय उद्बोधक. परवा नंदन निलेकणी वि. मोहनदास पै अशी चर्चा रंगली होती. उलट यावेळी बहुतांश चर्चांमध्ये निव्वळ पक्षीय राजकारणापेक्षा दोन्ही बिलांचे मसुदे, संसदेचं, न्यायपालिकेचं सार्वभौमत्व, लोकशाहीची तत्त्वे असे मुद्दे येत आहेत.

आणि दोन्ही मसुद्यांची तुलना गेले काही दिवस सर्व वृत्तपत्रांमध्ये येते आहेच. उपोषण सुरू झाल्यानंतर आता दोन्ही मसुद्यांमधला फरक परत परत टीव्हीवर समजावून सांगण्यात अर्थ नाही.

या वाहिन्या राष्ट्रीय वाहिन्या आहेत ? असेल तर चौथ्या स्तंभाची काळजीच वाटू लागलीय. >> मागे अमेरिकेने आण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असे, बेभरवश्याचे वार्तांकन केले होते ह्या वाहिण्यांनी.

NDTV, CNN-IBN, Times Now ऑक्के !

हो, आणि आता वेळ गेलीच आहे ती. घडतंय ते पाहणे फक्त..

आरडी

हा धुरळा खाली बसू देत. एकदा यावर पण नक्की बोलूचयात. अगदी २६ जुलैच्या प्रलयापासून ते मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यापर्यंत. आता मात्र थांबूयात.

कोंडी फुटली. म्हने!
http://www.esakal.com/esakal/20110823/5017919482447269649.htm

"दरम्यान, श्री. पवार व श्री. देशमुख यांचे अण्णांच्या आंदोलनाबाबत मत जाणून घेतल्यानंतर प्रणवदांनी ते पंतप्रधानांच्या कानावर घातले. मिळालेल्या माहितीनुसार दोन्हीही ज्येष्ठ मंत्र्यांनी, सरकारने अण्णांच्या सहकाऱ्यांऐवजी प्रामुख्याने त्यांच्याशीच (अण्णा हजारे) थेट चर्चा करावी, असे मत व्यक्त केल्याचे समजते."

हाहा. पवार साहेबांची खेळी सुरू झाली वाटतं

Pages