मनकोलाज - २

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

चालतेय. सुखद पावसाळी हवेला लपेटून. ऊन न पाऊस यातलं दोन्ही नसलेलं. मी या इथंच रहावं कायम इतकी प्रेमात या जागेच्या. अर्थात यापेक्षा सुंदर जागी मी राहिली नाहीये असं नाही पण.. बस दिल तो इसी पे आया है.. झाडं.. गवत.. बागा.. इतकं असं सुंदर असावं? ते सपर्ण सौख्य सहन न होऊन मान वळवावी तरी कुठं? इथल्या हवेलाही हिरवा वास येतो. ऑफिसेस आणि घरं यांच्या सिमेंटचाही त्रास होऊ नये इतका. कन्स्ट्रक्शन्स जणू परवानगी घेऊन या हिरवाईच्या आश्रयाला गुपचुप उभी हे ऐश्वर्य निरखत.
माझ्या क्युबिकलच्या खिडकीतून समोरच्या निलगिरींची जोडपीही मला ओळखू येतात. एक थोडं वृद्ध, पूजेला बसल्यासारखं. दुसरं अवखळ अल्लड. त्यातला तो अगदी चिमुकल्या झुळकीच्या बहाण्यानं तिच्या खांद्यावर मान ठेवणारा. मग नंतर तो त्याच्या व्यवहार आणि आकर्षणांच्या मध्ये झुलेल आणि ती तिच्या संवेदना आणि कर्तव्यांच्या मध्ये.. काय होईल ते पहिलं माधुर्य संपलं की? कोण जाणे. आत्ता मात्र दोघं शांतपणे एकमेकांच्या अस्तित्वाचा आस्वाद घेत उभी आहेत. नाती?
फोन वाजतो. कुणाशीही बोलू नये असे गोठलेले दिवस. आयुष्याच्या गुंत्याला समोर घेऊन बसलेली मी. त्या असह्य सुंदर वातावरणात. काय सोडवू? आजूबाजूला भिरभिरणार्‍या मैत्र नावाच्या झुळूका. मला लहान करणार्‍या. हातातले धागे अजून गुंतत जातायत. फोन.. या मित्राचा फोन गेले चार दिवस मी उचलला नाहीये. मेल, टेक्स्ट ला नो रिप्लाय. शेवटी तो उचलते. "का उचलत नाहीस गं? आत्ता उचलला नसतास तर डिलीट करणार होतो नंबर." मी हसते. कारण काय देऊ? ते त्याला़च काय सगळ्यांनाच माहीतीय बहुधा. " अगं तुला सांगितलं होतं तेवढं झालंय आता लिहून. पुढे ना मला हव्या त्या पॉईंटला जात नाहीये संभाषण.. " बोलणं होतं. मग तेवढ्यापुरता माझ्यात खंड पडतो. पुन्हा मी माझ्या भोवती बर्फाचे तुकडे रचायला लागते.
आत्ता आत्ता तर कुठं मी माझ्याशी बोलायला लागलीय. उजेड वार्‍याचे झोत भवताली. यांनी मला मुळापासून उखडून पार त्या पांढर्‍या पुंजक्यांच्या वर नेलं तरी चालणार आहे मला. मग माणसांचे संवाद असे कधी इतके नकोनको आणि कधी हवेहवे का होतायत? त्यांच्या अनाकलनीयतेमुळं? पण मग तसं प्रेडिक्टेबल तर काहीच नाहीये ना.. मी सुद्धा. जाऊ देत. स्वच्छ पांढर्‍या घोळदार वस्त्रांमधे, केस मोकळे सोडून, गुढग्यांना मिठी घालून त्यावर डोकं ठेवून समोर वाहाणार्‍या घटनांच्या प्रवाहाकडं पहात बसावं अन हवं तेंव्हा त्या पाण्यात हात घालावा आणि धुंद व्हावं असं स्वप्न असणं हा स्वार्थीपणा असेल. आता मी स्वत:ला स्पष्टीकरणं देणं पण थांबवलंय. हे असं आहे का.. बरं... इतकंच..
भोवतालच्या बर्फाच्या भिंतीतून अधूनमधून दिसणार्‍या रंगीत हालचाली. डिफ्रॅक्ट होऊन वेगळंच काहीतरी दिसतंय. ते जसं आहे तसं दिसत नाहीये हे मला कळतंय पण असू देत ना. जसं आहे तसं नाहीच पाहायचंय आता मला.
एका प्रसिद्ध डिझायनरचं सिग्नेचर स्टोअर. तिचे रंग बघून मी खिळून उभी. हे रंग नक्की कुठल्या संवेदनांना स्पर्शत असतील माझ्या? मी एक बॅग उचलते. "युवर चॉईस इज सो वेरी फेमिनाईन डियर" मी वळते. माझी गोडूली मैत्रीण. बाई गं रंग तिचे. मी फक्त मंत्रमुग्धा. पण हे काहीच न बोलता तिच्याकडे पहाते फक्त. "आय अ‍ॅम स्ट्रेट ओके? बट युअर चॉईस ईज रियली इट.." तिच्या हसण्याच्या खळखळाटात माझे काही बर्फ पुन्हा वितळतात. मला आठवतं परवाच मी इथल्याच एका रस्त्यावरून जाताना, शेजारच्या अ‍ॅकॅशियाच्या फांदीनं असंच माझ्या कानातल्याला हेलकावे देत विचारलेलं, "हे असं इतकं मॅचिंग खरंच कुठनं आणता तुम्ही माणसं? माझ्या एका बहराची छटा ठरवलं तरी दुसर्‍याला नाही मिळत." बाबा रे तुला गरज आहे या सगळ्याची? तुझ्या त्या जांभळ्यावर जीव टाकण्यात माझा जीव जातोय. कुठं तरी कृत्रिम, ठरवलेली, मुद्दाम केलेली का होईना रंगांची उधळण हवी की नको आयुष्यात? एक अक्खं फूल माझ्या खांद्यावर ढाळून तो पुन्हा मुकाट. पटलं नसावं त्याला. न पटो. त्याचे प्रॉब्लेम्स त्यालाच नाही का सॉर्ट करायला लागणार? मी ठरवलं की माझा गुंता त्यानं सोडवावा तरी तो करेल का ते?

उबदार शेकोटीपुढे हात चोळत बसायचं सोडून
बर्फाळ वार्‍यात फिरणंच
मला जास्त सुरक्षित वाटायला लागलंय.
गोठलेले शब्द आजूबाजूला विखुरलेले.
ताजे, जिवंत वाटणारे.
कधीपासून तिथं असतील?
कुणाच्या सृजनाचे??
मी कचरते,
मग वेचून घेते काही..
त्यांना बोलता बोलताच थांबवून,
कुणीतरी निघून गेलंय तिथून..
माझ्या हाताची उब मिळताच
ते वितळतात
आणि बोलत सुटतात सैरावैरा..
कुणीही दिसत नाहीये आजूबाजूला..
म्हणजे आता यांच्यासाठी मीच फक्त..
आणि याला आता..
तुझा-माझा किंवा कुणाचाच
काही इलाज राहिलेला नाहीये.

-संघमित्रा

------------------------------------------------------------------------------------
तशी भाग-१ आणि-भाग-२ वगैरेंना फारशी काही संगती आहे असं नाही वाटत मला. म्हणजे मी तसा काही विचार नव्हता केला. खरं तर एकमेकांशी फारसे संगत नसलेले विचार मांडत जाणं म्हणून कोलाज.. आणि त्या असंगतीची कंटीन्युईटी(!) म्हणून भाग २. तरी काहींचं ते अजून वाचायचं राहिलंय म्हणून लिंक शेयर करतेय जुन्या कोलाजची :
http://www.maayboli.com/node/20643?page=1#new

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

<< माझ्या क्युबिकलच्या खिडकीतून समोरच्या निलगिरींची जोडपीही मला ओळखू येतात. एक थोडं वृद्ध, पूजेला बसल्यासारखं. दुसरं अवखळ अल्लड. त्यातला तो अगदी चिमुकल्या झुळकीच्या बहाण्यानं तिच्या खांद्यावर मान ठेवणारा. मग नंतर तो त्याच्या व्यवहार आणि आकर्षणांच्या मध्ये झुलेल आणि ती तिच्या संवेदना आणि कर्तव्यांच्या मध्ये.. काय होईल ते पहिलं माधुर्य संपलं की? कोण जाणे. आत्ता मात्र दोघं शांतपणे एकमेकांच्या अस्तित्वाचा आस्वाद घेत उभी आहेत. नाती? >>>
भन्नाट. निव्वळ भन्नाट

व्वाह!!!
आपल्या "कोहरे का मजा.." ची आठवण आलीही आणि गेलीही - कारण हे सुद्धा खूप छान लिहिलंय.. Happy

हेही आवडलं पण पहिलं जास्त आवडलं होतं ..

ह्यातून एक प्रकारचं वैराग्य जाणवतं जे मला अपील झालं नाही .. पहिल्यातून रोजच्या आयुष्यातला एक क्षण बाजूला काढून त्या क्षणात स्वतःशी केलेल्या गुजगोष्टी दिसल्या .. ह्यातून रोजच्या आयुष्यापासून दूर जाणं तेही थंडपणे, तटस्थपणे असं वाटलं, जे आवडलं नाही ..

मला काय भन्नाट आवडलेय हे!! पण काय आणि का आवडले हे लिहू शकत नाही , तितकी जबरदस्त लेखणी नाही माझ्याकडे! सगळा लेखच कॉपी केला असता पण हे वाक्य वाचून फार मनापासून हसू आले..
त्याचे प्रॉब्लेम्स त्यालाच नाही का सॉर्ट करायला लागणार? Happy

समोर बसून बोलत आहेस असं लिहीतेस गं तू! आजचा दिवस उजळला! थँक्स!

पुन्हा एकदा प्रत्येकाला मनापासून थँक्स वाचल्याबद्दल..
सशल, अगदी व्यवस्थित सांगितलास तुझा चॉईस. अर्थात माझ्या फारसं हातात नसतं कसं लिहावं ते.. जे मनात असतं ते येतं.. तरीही पॉंईट नोटेड.. Happy
भाग्या, खरंच..?

खुप वेगळंच छान लिहिलं आहे. मस्त फिलिंग आलं वाचुन. मी ही आता पावसाळी हवेत बसुन वेगळ्याच मुडात असताना असं काही आतलं मनातलं वाचुन हरवुन गेले आहे.

तु म्हणालीस <<< बाई गं रंग तिचे. मी फक्त मंत्रमुग्धा. >>> मला वाटलं लिहिणारे हात तुझे, मी मंत्रमुग्धा. शेवटची कविता तर जबरीच.

आई ग्ग!!! कसलं सुरेख लिहीलं आहेस.

पहिल्यातून रोजच्या आयुष्यातला एक क्षण बाजूला काढून त्या क्षणात स्वतःशी केलेल्या गुजगोष्टी दिसल्या .. ह्यातून रोजच्या आयुष्यापासून दूर जाणं तेही थंडपणे, तटस्थपणे असं वाटलं,>>>>> +१

सन्मे... खूप दिवसांनी मी इथे फिरकतेय... काय काय निसटलय कुणास ठाऊक.
हे सापडलं ते एक बरच...
<<त्यांना बोलता बोलताच थांबवून,
कुणीतरी निघून गेलंय तिथून..
>>
सर्रकन काटा आला हे वाचून...
बहोत खूब

थॅंक्स ऑल..
अर्पणा लिंक दिलीय आता लेखाच्या शेवटी..
दाद, माझ्या वेळी फिरकलीस ते एक बरंच..
जीएस, इट मीन्स अ लॉट..