मनकोलाज - १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सकाळच्या पारी जीमचा रस्ता पकडते तेंव्हा बर्‍यापैकी काळोख असतो. त्या धूसर अंधारात दवात न्हाल्या रस्त्याचा, झाडापानांचा मिळून येणारा ओला वास माझी पहाटे उठण्याची नाराजी घालवतो.
नेहमीच्या झाडाखाली मी गाडी पार्क करते. एक मोठ्ठा श्वास घेऊन आत शिरते. शूज चढवून अवयवांना चालू करते.
स्वत:ची अशी निरुपद्रवी पाच मिनिटं मला सध्या मिळत नाहीत. वर्क आऊट चालू असतानाही पुढं दिवसात घडतील अशा आणि मला घडवायलाच हव्यात अशा गोष्टींची यादी फ़िरत असते.
सगळ्या शरीराला व्यवस्थित ताबडवल्यावर, जीव नको नको झाल्यावर मग मोठ्या मनाने इन्स्ट्रक्टर बाई शवासन करायला लावतात. मला वेगवेगळ्या ठिकाणी शिकवलेलं शवासन आठवतं. सगळं शरीर रिलॅक्स करून मन शून्य करायचा प्रयत्न. श्वासाची मंदगती. कापसाचं पोतं उघडून त्यातल्या पिसांच्या अगणित म्हातार्‍या सगळ्या अवकाशभर फिरतायत. मन शून्य करणं म्हणजे त्या गोळा करून पुन्हा पोत्यात भरणं. आजूबाजूला येणारे आवाज चालूच. एरोबिक्स वाल्यांची द्रुतलयीतली परदेशी गाणी. झाडणार्‍या मावशींच्या झाडूची फसफस. त्या जाता जाता झाडूचा एक फराटा माझ्या अंगावरही मारतील ही भिती. इतर बायका बोलतायत. वजन कमी होत नाहीये, डाय़ट, चांगलं जिमवेयर, दिवाळीची शॉपिंग, कुठलंसं बुटिक. एखाद्या हट्टी, रडणार्‍या पिल्लाला झोपवायचा आईनं प्रयत्न करावा आणि त्यानं नेटानं ते परतवून लावावं तसं माझं आणि मनाचं चालू आहे. मी जोजवतेय, बाहेरच्या आवाजांना बंद करतेय, तो ते हट्टीपणानं अजूनच सैरावैरा पळतंय. मग मी तो प्रयत्न सोडून देते आणि त्याच्या त्या असंबद्ध बडबडीत मला खूप रस असल्यासारखं दाखवते. आईनं त्या पिल्लाच्या चिवचिवाटात दाखवावा तसा. त्याला बाहेर चाललेलं सगळं ऐकू देते. ते सोनुलं मग हळूहळू पेंगायला लागतं. बडबड आणि तक्रारींच्या मधून डोळे गपागपा मिटायला लागतात. एक शांत लहर बाहेरच्या गोंगाटाला दुर्लक्षून माझ्या आत आत पसरायला लागते. असंख्य दगड पडून डहुळलेलं पाणी आणि उमटलेले थरथर तरंग मावळायला लागतात. त्यांची वर्तुळं मोठीमोठी होत नाहीशी व्हायला लागतात. आणि त्या शांततेत दूरवरचे रंग नि:शब्द झाडावर पक्षी उतरावेत तसे उतरायला लागतात माझ्या मनाच्या कॅनव्हास वर. त्यांना कसली संगती नसते, त्यांचा कसला आग्रह नसतो, अर्थांची लेबलं नसतात, आपण स्मार्ट असलं पाहिजे, चांगलं प्रेझेंट झालं पाहिजे असा हट्ट नसतो, ते येत रहातात त्यांच्या नैसर्गिक रूपात. एकमेकांशी संधान बांधून त्यातून काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करावं असा टीमवर्क छाप प्रयत्न नसतोच त्यांच्यात.
नाटक म्हणजे कोलाज नाही असं अनिरुद्ध सर म्हणाले होते. ती एक सुसंगत बांधणी आहे. विचारपूर्वक करण्याची. मजा येते. आणि मी वाट बघते पुढच्या सेशनची.
हेमिंग्वे म्हणतो चांगलं वाचा म्हणजे चांगलं लिहाल. रोज काहीतरी लिहायला हवं. सुचेल का पण? अनुभव हवेत खूप. जो माणूस भावनांना वाट करून देत नाही तो कसला कलाकार.. कोण बरं? नवे अनुभव घ्यायला मोकळा वेळ तर हवा. नवीन ऑफिसचा कॅंपस या देशातला वाटत नाही. मोठा, शांत आणि स्वच्छ. हिरवागार. सगळं आखीवरेखीव. अनोख्या रंगाची फुलं. माझ्या नवीन पिस्ता रंगाच्या टॉपवर जांभळी एम्ब्रॉयडरी छान दिसेल. किती कपडे घेतो आपण. कन्झ्युमरीझमचा निषेध करायला त्या कुठल्या तरी दोन बायांनी कमी कपड्यांच्या जोडांमधे कितीतरी दिवस काढले. पंधरा जोड म्हणजे फारसे कमी नाहीत खरेतर. पूर्वी एक अंगावर आणि एक दांडीवर अशी पारिस्थिती असायची. त्यातलं अंगावरचं होपफुली मानवजात संपेपर्यंत एकच राहील. पण उरलेले मात्र दांडीवर, बेडवर, खुर्चीवर, कपाटात, धोब्याकडे, ऑल्टरेशनसाठी दिलेले. आणि इतकं असून येताजाता दुकानांच्या खिडक्यांमधून नवनवीन कपडे आम्हाला घ्या म्हणून खुणावत असतातच. गाणी श्रवणीय असतात पण ती प्रत्येक वेळेस ऐकू वाटतीलच असं नाही. कधीकधी चांगल्या गाण्यांचाही गोंगाट वाटायला लागतो. कुणी कितीही तयारीचं गात असो श्रोता म्हणून माझी तयारी नसेल तर नकोच होऊन जातं ते. असंच एखाद्या वेळी कुणीही नको असेल आजूबाजूला तर अगदी आवडीची माणसंही आपल्या स्पेसमधे आलेली नको वाटतात. त्यांनी तेही समजून घ्यावं ही एक निष्फळ अपेक्षा. चित्रांचं प्रदर्शन एकटीनंच पहावं. नि:शब्द पणे. त्यात चर्चा करण्यासारखं काय असतं? चित्रं कळायला कशाला हवीत? एकमेकांत मिसळून गेलेले रंग, आपआपल्या आकारांसकट. आपआपले आकार तसेच ठेवून, न बदलता. तुम्हाला हवा तो अर्थ. आणि तोही कशाला? कोलाजला कशाला हवा अर्थ? आपल्या मनातही असे कोलाज उमटत रहातातच की. त्यांच्या अर्थांच्या मागे लागून का शिणवतो आपण स्वत:ला?
स्वप्नांतून उठल्यासारखी मी उठते. शवासनाची घडी घालून आत ठेवून देते, उद्यासाठी. इन्स्ट्रक्टर विचारते. आज लौकर संपलं शवासन? हो? मला काय पत्ता असणार किती वेळ गेला त्याचा? तरीही मी म्हणते हो दिवस सुरू झाला ना आता.. आणि तिथून बाहेर पडते. सकाळी भेटलेले वास आता नाहीसे झालेत. झाडंही वर्षानुवर्षं एकाच परिसरात राहून आणि नेहमी एकमेकांना नुसतंच पाहून असणार्‍या माणसांसारखी अनोळखी. वाहनांचे नेम चुकवत उभी. या गर्दीत रस्त्यावर उभं रहाणार्‍या झाडांचं बीपी चेक केलं पाहिजे एकदा. गाडीच्या समोरच्या काचेवर वरच्या झाडाचा एक मातकट फुलोरा पडलेला. तेवढीच त्याची नि माझी काही वेळापूर्वी ओळख असल्याची खूण. गाडी सुरू करते. त्याच वेगात दिवसही चालू होतो.

हे द्यायचं राहिलं होतं ते देऊन टाकते :

मन आकाशाची लादी, मन रांगोळी रांगोळी.
मन वाह्त्या पाण्यात, बदकांच्या शुभ्र ओळी.
मन जांभळ्याची माया, मन कषाय निवृत्ती.
मन हिरवं संपन्न, लक्ष पानांच्या आवृत्ती.
मन भंडार्‍यात लीन, गुलालात अनिवार.
मन अज्ञात प्रवासी, झेप घेई अर्थापार.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सुंदर Happy
<<त्या धूसर अंधारात दवात न्हाल्या रस्त्याचा, झाडापानांचा मिळून येणारा ओला वास >> अगदी.
<<कापसाचं पोतं उघडून त्यातल्या पिसांच्या अगणित म्हातार्‍या सगळ्या अवकाशभर फिरतायत. मन शून्य करणं म्हणजे त्या गोळा करून पुन्हा पोत्यात भरणं.>> वा!

मन आकाशाची लादी, मन रांगोळी रांगोळी.
मन वाह्त्या पाण्यात, बदकांच्या शुभ्र ओळी.
मन जांभळ्याची माया, मन कषाय निवृत्ती.
मन हिरवं संपन्न, लक्ष पानांच्या आवृत्ती.
मन भंडार्‍यात लीन, गुलालात अनिवार.
मन अज्ञात प्रवासी, झेप घेई अर्थापार. >>>> अप्रतिम.

तुमचं आधीचे लेखन सुद्धा वाचलं होतं. एक लेख वाचल्यावर बाकीचे बरेच शोधुन वाचले होते. पण तेव्हा रोमातच होते मायबोलीवर. तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी अस हजारदा वाटून सुद्धा बहुधा दिली गेली नव्हती. मस्त लिहिता.

मन आकाशाची लादी, मन रांगोळी रांगोळी.
मन वाह्त्या पाण्यात, बदकांच्या शुभ्र ओळी.
मन जांभळ्याची माया, मन कषाय निवृत्ती.
मन हिरवं संपन्न, लक्ष पानांच्या आवृत्ती.
मन भंडार्‍यात लीन, गुलालात अनिवार.
मन अज्ञात प्रवासी, झेप घेई अर्थापार.
>>
अप्रतीम..
फारच सुन्दर..

छान लिहीलंय.

>> तुझ्या मनातले विचार कुठलेही कोटिंग न चढवता जसेच्या तसे उतरलेत असं वाटलं.

सिंडीला अनुमोदन!

वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मित्रांनो. काहीतरी स्फुरत असतंच मनात. पण तुम्ही वाचता म्हणून तुमच्यासाठी कागदावर, स्क्रीनवर उतरतं ते. चांगलं, वाईट, भिकार कसं वाटत असेल ते बेधडक कळवत जा. वाईट आहे असं लिहायचा संकोच असेल किंवा काहीच प्रतिक्रिया नसेल तर नुसतं वाचलं इतकं तरी लिहा. काहीही सुचलं की मायबोलीवर धाव घ्यावी वाटते ती तुम्ही वाचता म्हणूनच.

पुन्हा धन्स सगळ्यांना.
फारेंडा अरे ते रंग मला त्या त्या गोष्टींशी रिलेटेड वाटतात म्हणून लिहीलेय. जांभळा हा खूप आसक्ती दाखवणारा आणि आयुष्य साजरं करणारा तर कषाय (भगवा चहासारखा) हा तर वैराग्याचा आहेच.

वा मस्त लिहिलं आहेस संघमित्रा. Happy
वर्षभरापूर्वीचं दिसतय... तेव्हा कसं सुटलं काय माहित !

Pages