प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:20

adakari_1.jpg

**********************************************************

"हे जीवन एक रंगमंच. कधी आपण असतो या रंगमंचावरचे कलाकार. एखाद्या नटसम्राटाप्रमाणे आपण आपल्या भावना कधी हावभावातून तर कधी नुसत्या नजरेतून व्यक्त करतो आणि कधी आपण बनतो या रंगमंचावरचे सूत्रधार. मग आपला कॅमेराच बनतो आपली नजर आणि घेऊन जातो एका अनोख्या दुनियेत. पण कधी असतो आपण फक्त एक प्रेक्षक. या जीवनाच्या रंगमंचावर उमटणार्‍या सुख-दु:ख, आशा-निराशा यांची दृश्य बघणारे... नजरेने अनुभवणारे....

अश्या अद्भुत नजरेची ही वैविध्यपूर्ण अदाकारी यंदा आपण टिपणार आहोत प्रकाशचित्रांच्या माध्यमातून"

**********************************************************

विषय १: शब्दांवाचुन कळले सारे...

क्षणात रुसणे, क्षणात हसणे
कधी आसु, कधी सचिंत बसणे...

अर्थात इथे तुम्हाला टिपायचे आहेत डोळ्यातले भाव, चेहर्‍यावरचे आविर्भाव....

BhaavFinal.jpg

**********************************************************

विषय २: जादू तेरी नजर....

खरंच कुणाच्या नजरेत जादु असते का?? त्या जादुई नजरेतुन दिसणारं जगही तसंच अनोखं असेल नाही का?... मग यंदा आपण बघूया का त्या जादुई नजरेने दिसणारे नाट्य ?....

अर्थात इथे तुम्हाला दाखवायची आहे कॅमेरा आणि लेन्सची करामत. स्लो/फास्ट शटर स्पीड, हाय एक्सपोजर, आरश्याच्या वेगळ्याच कोनातली प्रतिमा, बुडबुड्यातून दिसणारी प्रतिमा, बहिर्वक्र, अंतर्वक्र भिंग इत्यादी वापरुन काढलेली प्रकाशचित्रे जी प्रेक्षकांना घेऊन जातील एका नव्याच जादुई दुनियेत....

jaadu.jpg

**********************************************************

विषय ३: "आकाश तू आभास तू"

आकाश म्हणजे प्रकाश तर आभास म्हणजे सावली. प्रकाश-सावलीचे नाट्य आपल्या आजूबाजूला सतत घडत असताना दिसते. सावलीचे अस्तित्वच मुळी प्रकाशामुळे असते.

अर्थात, तुम्हाला इथे टिपायचे आहेत ते हेच प्रकाश आणि सावलीचे खेळ, त्यांच्यातील नाट्य... तुमच्या नजरेतून....

Light colage2.jpg

***********************************************************

नियम (बदलून) :

१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. प्रकाशचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले प्रकाशचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेरा कुठला वापरला आहे (manual /digital SLR, aim & shoot, mobile, IPad etc) हे लिहिणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रकाशचित्रांची वर्गवारी केली जाईल.
५. कॅमेर्‍याच्या सेटिंगचे (शक्य तितके) तपशील देणे अपेक्षित आहे.
६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. प्रकाशचित्रात असे काही बदल केले असल्यास काय बदल केले आहेत हे नमूद करणे अपेक्षित आहे.
७. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व प्रकाशचित्राची मोठी बाजू (लांबी/रुंदी) ७५० पिक्सेल इतकी असावी.
८. प्रकाशचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता "मायबोली गणेशोत्सव २०११" असा वॉटरमार्क टाकावा.
९. स्पर्धेसाठी प्रत्येक विषयाच्या दोन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील.
१०. प्रत्येक विषयाच्या विजेत्या प्रवेशिका निवडताना त्यात (manual /digital SLR) या प्रकारच्या प्रोफेशनल कॅमेर्‍याने काढलेले प्रकाशचित्र व (aim & shoot, mobile, IPad etc) या प्रकारच्या कॅमेर्‍याने काढलेले प्रकाशचित्र अशी वर्गवारी शक्यतो केली जाईल.
११. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

**********************************************************

प्रवेशिका कशा पाठवाल?

१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha 1: bhaav (किंवा) photography spardha 2: jaadu (किंवा) photography spardha 3: aakaash असा विषय लिहावा. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, प्रकाशचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. प्रकाशचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) जास्तीत जास्त ७५० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी प्रकाशचित्र पाठवताना इ-मेल मधे प्रकाशचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा आणि या विषयाला अनुसरून प्रकाशचित्रात विषय कसा हाताळला आहे ते एका ओळीत लिहावे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.

**********************************************************
'कोलाजमधिल सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,
स्पर्धांबद्दल काही शंका, प्रश्न असल्यास संयोजकांना या पानावर विचारा. आपल्या प्रश्नांचे शक्य तितक्या लवकर उत्तर द्यायचा संयोजक प्रयत्न करतील.

दोन्ही विषय आवडले .. कोलाजमधले फोटोही मस्तच! विशेषतः रेखा, नूतन आणि कुच्चीपुडी नर्तक/नर्तिकेचा सहीच!

जादू तेरी नजर साठी SLR नसलेला पण काही मॅन्युअल फंक्शन्स असलेल्या कॅमेर्‍याने असे काही उद्योग केले असतील तर ते चालतील का?

@नीधप, हो चालेल. आपण आपला कॅमेरा कसा हाताळला आहे हे लिहावे. कृपया शक्य तितके कॅमेरा/लेन्स सेटिंग चे डिटेल्स द्यावेत.

दोन्ही विषय 'संधीचं सोनं' करण्यासाठीचे ! एका विषयात आवड,डेडिकेशन,पॅशन आणि नजरेला भावलेल्या क्षणांना न्याय देणारी कल्पना आणि दुसर्‍या विषयात तंत्रज्ञान, वेड आणि कल्पना विस्तारासाठीची मुभा.. व्वा ! दोन्ही विषय जाम आवडले.

धन्यवाद संयोजक.
या स्पर्धेसाठी एक विनंती आहे. मी किंवा माझ्यासारखे नवशिके जे बक्षिसासाठी नाही तर जाणकार परीक्षकांकडून आपण केलेला उद्योग तपासला जावा यासाठी भाग घेणार. त्यामुळे पुढे सुधारायला उपयोग व्हावा म्हणून परीक्षकांकडून प्रत्येकच प्रवेशिकेसंदर्भात थोडक्यात का होईना टिप्पणी मिळू शकेल काय?
कल्पना आहे की ह्याचा पसारा खूप होईल परिक्षकांसाठी पण तरी.. विनंती... Happy

>>>> अर्थात इथे तुम्हाला टिपायचे आहेत डोळ्यातले भाव, चेहर्‍यावरचे आविर्भाव.... <<<<
अहो सन्योजक, यात थोडी भर घालाल का? हे असे
अर्थात इथे तुम्हाला टिपायचे आहेत मानवी डोळ्यातले भाव, चेहर्‍यावरचे आविर्भाव....
काय हे ना की इथे काही [माझ्यासारखे Wink ] एक्स्पर्टस आहेत जे जनावरे/पशूपक्षीप्राणीकीटक इत्यादिक कुणाच्याही डोळ्यातले अन चेहर्‍यातले भाव टीपू शकतात Proud उगाच मागाहून गोन्धळ नको, कसे?

@limbutimbu,

इथे चेहर्‍यावरचे हावभाव, डोळ्यातले भाव अपेक्षित आहेत. कुणाच्या डोळ्यातले भाव टिपायचे हे सर्वस्वी स्पर्धकावर अवलंबुन आहे.

Pages