सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना
त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.
नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणार्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्द दुसर्या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल ?
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा !
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्त झाले तो तृष्णेपासून मुक्त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.
दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.
जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”
हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.
अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.
दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
आर.के.जुमळे, अकोला (महाराष्ट्र)
भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’
Submitted by rkjumle on 9 August, 2011 - 07:17
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जामोप्या वेबवर अशा अनेक साईटस
जामोप्या
वेबवर अशा अनेक साईटस आहेत ज्या सहेतुक आहेत. माझ्या लिखाणाला डी डी कोसंबी यांच्या विश्लेषणांचा संदर्भ आहे. द वंडर दॅट वॉज इंडिया आणि पं जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे ग्रंथ तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्याचा धम्म , चार वेदांचा संपूर्ण अनुवाद याशिवाय अन्य काही बौद्ध ग्रंथांचा आधार आहे. काही जणांचा व्यासंग पाहील्यास हा आधार खूपच त्रोटक आहे.
तुम्ही वज्रपाणी हा देव बौद्ध धम्माने उचलला असा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे. ऋग्वेद आणि अन्य वेदांत ज्या ऋचा आहेत त्या खूप आनंददायी आहेत. त्या नक्की वाचा. वेद, ब्राह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे मिळून धर्मशास्त्र बनते. या सर्वांचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात ऋग्वेद आहे. यामधील ऋचांत मित्र, इंद्र, वरूण आदि देवांचा उल्लेख आढळतो. विष्णु, शिव, गणेश, कार्तिक इ देवांचा नामोल्लेख देखील या वेदातील मूळ ऋचांमधे नाही. हे पाहीले असता तुमचे म्हणणे हे एकांगी वाचनातून आले असावे असा संशय घेण्यास जागा आहे.
याउलट वैदिक धर्मानंतर जैन, बौद्ध आणि अन्य काही पंथ होऊन गेले ( पहिल्या शतकातील नारायणस्वामी, चक्रधरस्वामी आणि चार्वाक इ.) यांची शिकवण नंतरच्या धर्मात (ज्याला आपण हिंदू म्हणतो) आलेली दिसते. आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि नंतरच्या काळात वैदिक साहीत्यातील मित्र, वरूण आणि इंद्र आदि देवांची पूजाअर्चा या धर्मात आढळून येत नाही. थोडा वेळ वज्रपाणी बाबतचं तुमचं म्हणणं ग्राह्य जरी धरलं तरी इथे त्या मुद्याचं प्रयोजन ही समजून येत नाही.
नितीनचंद्र
लाख पते कि बात. कुणाचंच मतपरिवर्त्न होत नाही. ऑर्कूटवर तीन चार वर्षे डोकेफोड केलेली आहे. म्हणून सध्या अशा विषयांबाबत निरूत्साही असतो. पण काय आहे ना, बायको गेलीये माहेरी, त्यात थंडीताप भरून आलेला म्हटल्यावर वेळ कसा घालवायचा ?
असो. पण काही मुद्दे मिळून जातात. जसं नागवंशियांचे वेद. याबद्दल वाचायला आवडेल.
इथे एक विषयांतर करावंसं
इथे एक विषयांतर करावंसं वाटतं.
आजच्या काळात धम्म / धर्म यातील ( कोणताही घ्या ) शिकवणीनुसार १००% आचरण करणे हे व्यवहार्य आहे का ?
saati | 13 August, 2011 -
saati | 13 August, 2011 - 17:07
बहुतेक सगळे धर्म माणसाने सुखात किंवा दु:खात अविचलित / तटस्थ रहावे असे का शिकवतात ?
जीवन समरसून कसे उपभोगावे हे कोणताच धर्म शिकवित नाही का?
निर्वाण, निब्बाण, मोक्ष अशा मार्गाला एखादा पोचला तर पुढे जगायचीच काय आवश्यकता? >>>>
याचे उत्तर अनेक जणांनी दिले आहे. एकाचे सुख हे दुसर्याचे दुख असु शकते. म्हणजे भुक लागली म्हणुन शिकार करुन प्राणी मारुन खायचा - ह्यात भुक भागल्याचा आनंद आहे त्याच वेळेस जो प्राणी मेला त्याचे दुख आहे. त्यांमुळे सुख आणी दु:ख ह्यांच्या पलिकडे जाणे महत्वाचे!
महेश यंनी भगवान बुध्दांनी
महेश यंनी भगवान बुध्दांनी सांगितलेल्या सत्यांना "आर्यसत्ये" का म्हणतात ? असे विचारले आहे. त्याबाबतची माहिती अशी आहे-
"आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो."
निधपला अनुमोदन.. खुप चांगली
निधपला अनुमोदन..
खुप चांगली चर्च्या चालु आहे... सध्या वाचतो आहे सविस्तर लिहीनच.. 
नीधपला शतप्रतिशत
नीधपला शतप्रतिशत अनुमोदन.
अनिल सोनावणे,
इथे वज्रपाणिचा उल्लेख आलाय. वज्र हाती धारण करणारा तो वज्रपाणि. साहजिकच हे इंद्राचं नाव आहे. स्वत: गौतम बुद्ध मागील अनेक जन्मांत इंद्र होते (खुद्दकनिकाय, मेत्तसुत् हा संदर्भ).
एंटर द ड्रॅगन हा ब्रूस लीचा चित्रपट जिथे चित्रित झाला ते शाओ लिन चे देऊळ चीन मध्ये आहे. त्या मंदिराची अधिष्ठात्री देवता बोधिसत्त्व वज्रपाणि आहे (जामोप्या धन्यवाद!). ही देवता नारायण आहे असं तिथले लोक मानतात. हा नारायण म्हंजे अवलोकितेश्वराचा अवतार धरला जातो. अवलोकितेश्वर म्हंजे सर्वसाक्षी आत्माच नव्हे काय? या अर्थी बौद्ध पंथ वैदिक परंपरेत अगदी चपखल बसतो. खुद्द गौतम बुद्धांचं म्हणणं होतं की मी नवीन काही सांगत नाहीये.
काही ठिकाणी (विशेषत:चीन मध्ये) बोधिसत्त्वाची प्रज्ञाकर्ती म्हणून मंजुश्री देवी दाखवली आहे. तिच्यावरून मंजुश्रीय (=मांचुरिया) हे प्रांतनाम पडले आहे. वैदिक परंपरेत शारदामाता ही प्रज्ञेची देवता आहे तशीच ही मंजुश्री.
इतिहासाचा योग्य मार्गाने वेध घेतल्यास सामंजस्य नक्कीच उत्पन्न होईल.
सध्या एव्हढं पुरे.
तत्त्वज्ञानावर वेगळे पोस्ट टाकेन.
आपला नम्र,
-गा.पै.
गापै धन्यवाद या माहीतीबद्दल.
गापै
)
धन्यवाद या माहीतीबद्दल. आपण ही चर्चा पहिल्यापासून काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. तसच मी इथून रजा घेतोय. लेखक आपल्यासाठी शंकानिरसन करू शकतीलच असं निश्चित वाटतं. ( खरं तर जाम कंटाळा आलाय
महेश यांनी विचारले आहे की,
महेश यांनी विचारले आहे की, 'गौतम बुद्धांचा धर्मस्थापनेआधी कोणता धर्म होता ?' याबाबतची माहिती अशी आहे की, भगवान बुध्दांच्या शिकवणीला धर्म म्हटल्या जात नाही, तर धम्म म्हटल्या जाते. कारण धर्माचे तत्वजान हे देवाच्या भोवती फिरते तर धम्माचे तत्वजान हे मानवी कल्यानाच्या भोवती फिरते. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' अशी त्यांची शिकवण होती. .अल्पजन हिताय, अल्पजन सुखाय अशी नव्हती.
भगवान बुध्दाच्या वेळेस अनेक विचारधारा होत्या. त्यात वेदिक तत्वजान हे प्रमुख होते. वेदा हे चातुर्वर्ण व सामाजिक विषमतेवर आधारीत असल्यामुळे बुध्दांनी ते नाकारले होते.
नमस्कार मायबोलीकरांनो आणि
नमस्कार मायबोलीकरांनो आणि मायबोलीकरीणींनो,
लेख, चर्चा आणि प्रतिक्रिया वाचल्या. एक गोष्ट जाणवली ती म्हणजे लेख आणि चर्चा बुद्धवादाकडे (Buddhism) अधिक झुकते आहे. याउलट सिद्धार्थ गौतमास झालेले होते ते दर्शन होते. इथे दर्शन हा शब्द प्रत्यक्ष अनुभूती (=experience) या अर्थी वापरला आहे. दर्शनामुळे यथार्थ ज्ञान झाल्याने लोक त्यास बुद्ध म्हणू लागले. याअर्थी सिद्धार्थाने पुढे सांगितलेले (आणि विस्तारलेले) तत्त्वज्ञान बौद्धदर्शन म्हणून प्रख्यात झाले.
दर्शन हा शब्द वैदिक तत्त्वज्ञानांच्या बाबतीतही योजण्यात येतो. वैदिक परंपरेत सहा दर्शने आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा (=वेदांत), सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिका. यांस षड्दर्शने हा शब्द प्रचलित आहे.
वैदिक मतानुसार 'एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति'. त्यामुळे प्रत्येक दर्शन हे भगवत्प्राप्तीचा मार्ग आहे. अमुक एक दर्शन खरे आहे बाकी सारी खोटी असं वैदिक लोक म्हणंत नाहीत. मात्र दर्शनाप्रमाणे साधना केल्यास अनुभूती यावी अशी अपेक्षा आहे. हे दर्शन झालेल्या व्यक्तीस (स्त्री वा पुरुष) तत्त्वदर्शी म्हणतात. सध्याच्या काळी हिंदूधर्मियांत त्यांना संत अशी संज्ञा आहे.
तत्त्वदर्शी व्यक्तीकडून साधनेस मार्गदर्शन होते. या मार्गदर्शकाला गुरु असं म्हणतात तर मार्गक्रमकास शिष्य. ही गुरुशिष्य परंपरा वैदिक आणि बौद्ध दोन्ही धर्मांत आढळून येते.
तर मग बौद्धदर्शनप्रक्रिया कशी आचरणात आणावी? त्याकरिता योगाभ्यासाची आवश्यकता आहे. वैदिक परंपरेनुसार प्रत्येक तत्त्वदर्शी हा योगी असतोच. योगाशिवाय तत्त्वदर्शन होत नसतं. इथे योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा सांगोपांग अभ्यास (=सराव=नैपुण्य) अभिप्रेत आहे. बौद्धदर्शनात काही अंगे गाळून (कदाचित) थेट ध्यान आणि समाधीवर उडी मारली असेल, मात्र अंतिम साध्य समाधी (=निर्वाण) हेच आहे.
वैदिक परंपरेनुसार भक्ती, कर्म आणि ज्ञान हे मार्गही भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग असे संबोधले जातात. षड्दर्शनांतील योगाखेरीज इतर दर्शने आकळणे योगात पारंगत असलेल्यांना सुलभ जाते.
भगवान गौतम बुद्धांबद्दल एक कथा सांगितली जाते. एकदा प्रवचनाच्या वेळी बुद्धांनी एक कमळ हातात उचलून वर करून दाखवले. आणि विचारले की कोणला काही कळलं का ते सांगा. कोणीही काहीही बोलले नाही. कोणालाच काही समजत नव्हतं काय चाललंय ते! शेवटी एक अर्धशिक्षित भिक्षू जराशी हसला. तो काही प्रकांडपंडित वगैरे नव्हता. लोकांचा त्याला गराडा पडला. काय ते कळू दे आम्हाला म्हणून. तो एव्हढंच म्हणाला की, 'प्रत्यक्ष गौतम बुद्धांना जे सांगायचं नाहीये ते मी कसं सांगू?' यावरून गौतम बुद्धांत आणि त्या भिक्षूत यौगिक रहस्याची देवाणघेवाण झाली असणार हे उघड आहे. भगवान बुद्ध स्वत: उच्च कोटीचे योगी होते. तसेच नाथपंथातले अनेक सिद्धांचे ग्रंथ तिबेटी बौद्धदर्शनांत प्रमाण मानले गेले आहेत. इथे टिचकी मारून पहा.
सारांश : बौद्धदर्शन आणि इतर वैदिकदर्शनांची प्रक्रिया एकच आहे. त्यामुळे बौद्ध धर्म वेगळा न मानता वैदिक परंपरेचाच एक भाग मानवा. या मताचा मी आहे.
आता प्रश्न पडतो की बौद्ध किंवा वैदिक धर्म आचरणार्यांचा हेतू कोणता. अंतिम ध्येय गाठणे हा असेल तर प्रश्नच नाही. कारण एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति. मात्र ऐहिक उन्नतीपुरता सीमित हा असेल तर मग पंचाईत होते. मग वादविवाद सुरू होतात. त्यातून काही निष्पन्न होईलसं वाटत नाही.
बुद्धपूर्व वैदिक दर्शनांत आणि बौद्ध दर्शनात अनेक साम्यस्थळे दाखवता येतील. मात्र तरीही एक तात्त्विक प्रश्न उरतोच. ज्ञानोबामाउलींनी ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी म्हंटलंय :
जे उन्मनीचे लावण्य | जे तुर्येचे तारुण्य ||
अनादि जे अगम्य | परमतत्त्व ||
हे परमतत्त्व म्हंजे ब्रह्मन्. तर असे काही तत्व बौद्धदर्शनात आहे का? बौद्धमतानुसार (बौद्धदर्शन नव्हे!) जीव आणि जगत यांना जोडणारा दुवा अस्तित्वात नाही. दोन्ही आपापल्या परीने स्वतंत्र आणि स्वयंभू आहेत. मात्र तरीही महाशून्य नावाच्या (जिवाच्या?) अवस्थेत जगताच्या जाणीवेचा लोप होतो. तसं असल्यास महाशून्य हे परमतत्त्व म्हणावयास हरकत नाही.
मात्र माझा बौद्धमताचा अभ्यास किंवा बौद्धदर्शनाचा सराव नसल्याने हा प्रश्न खुला सोडू इच्छितो. बाकी कोणाला याचा वेध घ्यायचा असेल तर एखाद्या बौद्ध तत्त्वदर्शीचे (निव्वळ पंडिताचे नव्हे!) मार्गदर्शन घेणे इष्ट.
आपला नम्र,
-गा.पै.
तत्वज्ञान हा सोपा विषय आहे का
तत्वज्ञान हा सोपा विषय आहे का ?
गामा पैलवान, चांगले पोस्ट.
गामा पैलवान, चांगले पोस्ट.
अरुंधती, धन्यवाद! तुमच्या
अरुंधती,
धन्यवाद! तुमच्या ब्लॉगवरचे अध्यात्मिक लेख वाचलेत. म्हणून म्हणतो की, तुमच्यासारख्यांचा हात पाठीवरून फिरल्यावर वेगळाच हुरूप येतो.
आपला नम्र,
-गा.पै.
गापै, वाह किती छान विवेचन
गापै, वाह किती छान विवेचन केलेत. तुमचा आयडी बदलून तत्वज्ञानी असा घ्या
धन्यवाद महेश! तत्त्वज्ञानावर
धन्यवाद महेश! तत्त्वज्ञानावर लिहिणं म्हंजे वैचारिक पैलवानकीच की!
आणि माबोवर दुसरी कोणतीही पैलवानकी करायची सोय नाही! 
Pages