भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’

Submitted by rkjumle on 9 August, 2011 - 07:17

सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना
त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.
नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्द दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल ?
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्‍त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्‍तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्‍या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी हो‍ऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा !
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्‍ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्‍त झाले तो तृष्णेपासून मुक्‍त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्‍त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्‍हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.
दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्‍या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.
जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”
हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.
अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.
दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
आर.के.जुमळे, अकोला (महाराष्ट्र)

गुलमोहर: 

आर के जुमळे

इतकी वर्षे धर्म, धम्म याबद्दल वाचनाची जरा टाळाटाळच केली खरी. खरं म्हणजे माझ्या कामामुळे वेळही मिळत नाही. तुमच्यामुळे धावता आढावा वाचायला मिळाला. असो. शनिवार, रविवार या दिवसांचा वापर आता या प्रकारच्या वाचनासाठी करावासा वाटू लागलय. प्रेरणेबद्दल आभार !

पुन्हा एकदा, लेख आवडला परंतु थोडासा प्रचारकी थाटाचा (धाटणीचा) वाटला.

जाणत्यांनी जे लिहून / सांगून ठेवले आहे ते आजच्या काळात आचरणात आणणे कसे करता येईल. त्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा कसा करुन घेता येईल हे जाणणे आवश्यक आहे.

आजची परीस्थिती व त्यावरील उपाय. एकसंघ, जागृत, सशक्त व विचारी समाज बनवण्यासाठी ह्या शिकवणीचा उपयोग करुन घेणे याबाबत 'आपले' विचार जरुर मांडा.

शिर्षक "भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’ " ऐवजी "भगवान बुध्दांची, ‘चार आर्यसत्ये’ " असे हवे का ?

कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे......

हे असे वाटणे, प्रेत्येक धर्माच्या अनुयायास वाटू शकते. त्यामुळे विधानात्मकता टाळून्,जगाचा उद्धार नक्की कसा होणार आहे हे सोदाहरण्,किंवा शास्त्रोक्त रित्या विवेचित केले तर अधिक सयुक्तिक ठरावे,अन्यथा बागुलबुवा म्हणतात त्या प्रमाणे हा लेख्,माहिती-कम-प्रचारकी थाटाचा वाटू शकतो,किंबहुना वाटतो आहे.

वर्षावास सुरु असताना हा लेख चांगला वाटला,वरील काहीसा भाग वगळता. पुलेशु. Happy

बौद्ध धर्म हा जर स्वतःला हिंदू धर्माचा भाग मानत नाही तर
१. गौतम बुद्धांचा धर्मस्थापनेआधी कोणता धर्म होता ?
२. त्यांनी सांगितलेल्या सत्यांना "आर्यसत्ये" का म्हणतात ?
३. ही सत्ये त्यांनी सांगण्याच्या आधीपासून हिंदू किंवा अन्य धर्मात सांगितली गेली नव्हती का ? (कदाचित वेगळ्या स्वरूपात असेल)

१- गौतम बुद्ध धर्मस्थापने आधी क्षत्रिय्,म्हणजेच हिंदू होते.
२-त्या सत्यांना आर्य सत्ये का म्हणतात? हे माहीत नाही परंतु,ती सत्ये काय आहेत हे ज्ञात आहे.
३-ही सत्ये माझ्या माहितीप्रमाणे अन्य धर्मात सांगीतली गेली नाहीत.

बुद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. अन विज्ञान म्ह्टलं की महाघोळ............
स्थूल शास्त्र सांगतं की पृथ्वी अजस्त्र आहे, त्यापेक्षा मोठा गुरु आहे.... त्याही पेक्षा मोठा सुर्य आहे...... त्याही पेक्षा मोठा आजून कोणी आहे............ अशा प्रकारे स्थूल शास्त्र........ सांगतं.
याच्या अगदी उलट सुक्ष्म शास्त्र (मायक्रो सायंस) जातं.........
सुक्ष्म शास्त्र म्हणतं की तुमच्या समोर जी भींत आहे ती सॉलिड नसुन ट्रान्स्फरंट आहे. त्या भिंतीमधून आर पार जात...........? म्हटलं कोण जातं? तर अल्फा जातं............ गामा जातं............. कारण की ती भिंत सॉलिड नाहीच मुळी.
भिंत अनु रेणूनी बनलेली आहे, अन अनु रेणू हे गतिमान असतात....... ते फिरत असतात त्या मुळे त्यांच्यात अंतर असतं. म्हणजे जरी भिंत सॉलिड दिसली तरी ती ज्या अनुरेणूनी बनली आहे ते परस्परांमधे अंतर ठेवत असल्यामूळे भींत सॉलिड नाहीच.
म्हणजे हा सिंद्धांत स्थूल शास्त्राच्या विरुद्ध जातो.

मग मला आठवतं........................
तुजं सगूण म्हणू की निर्गुण रे.......... सगुण निर्गुण एक गोविंदू रे.
तुज स्थूल म्हणू की सुक्ष्म रे...... स्थूल सुक्ष्म एक गोविंदू रे.

-------------------------------
बौद्ध धर्माचही थोडंफार असच आहे.
हा धर्म निरिश्वरवादी आहे. पण त्रिपिटकात देव अन चमत्कार आहेत.
या धर्मात आत्म्याला स्थान नाही, पन बुद्ध स्वतः म्हणतात की पुनर्जन्म आहे.

म्हणजे बौद्ध धर्माचे सिंद्धांत परस्पर विरोधात जातात.
मग मला आठवते वरची ओळ.... तुझ सगूण म्हणू की निर्गूण...................
--------------------------------------------

पण जेंव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा बुद्ध ज्ञान वाटायला तयार नसतात. मग ब्रम्हा सहंपती प्रकटतात. ते बुद्धाला कन्वीन्स करतात की प्राप्त झालेलं ज्ञान लोकांना वाट......... मग हा ब्रह्मा कोण होता याचा पुढे कुठेच खुलासा होत नाही. आकाशातील देवतानी बुद्धांवर फुलाचा वर्षाव केल्याचाही संदर्भ आहे.

खुद्द बाबासाहेबानी सुद्धा "बुद्ध आणी त्याचा धम्म" या पुस्तकात असं लिहलं आहे की, बुद्ध सतत सहा वर्षे तप करुन संतापून जातो की आजुनही काहीच का प्राप्त झाले नाही. मग नदीच्या तीरावर उभा राहून नदीत भिक्षा पात्र फेकतो अन म्हणतो की जर मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे भिक्षापात्र प्रवाहाच्या उलट दिशेनी जाईल, नाहीतर प्रवाहाच्या दिशेनी. अन चमक्तार घडतो. ते भिक्षापात्र प्रवाहाच्या उलट दिशेनी वाहते. अन भगवान प्रसन्न होतात.
आता हा संदर्भ खुद्द बाबासाहेबानी लिहला........... हे न पटणारं आहे. तरी बाबासाहेबानी का लिहलं?

बुद्ध धर्म पुर्णत: निरिश्वरवादी नाही. दुसरा प्रश्न असा की, या धर्मात पुनरजन्माला मान्यता आहे, किमान त्रिपिटकात तरे तसे कित्येक उदाहरण दिलेले आहेत. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे धर्माचा अर्धवटपणा बाहेर पडतो. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की, त्याची प्रोसेस काय आहे? किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं? आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं?
बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगण्यात बुद्ध असक्षम आहेत, असा सरळ अर्थ निघतो. पुर्ण त्रिपिटकात कुठेच त्यानी या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तर मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं.
पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन कसे या जन्मी ईथे आले याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. पुनर्जन्म हा बुद्ध धर्मातील असा घटक आहे जो काढुन टाकल्यास बुद्धधर्मात काहीच उरणार नाही. कारण बुद्ध स्वत: पुनर्जन्माचं उदाहरण आहेत.
बुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.
आता काही संदर्भ पाहुया.

संदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय
१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग
याच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.

२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.

३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.

४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.

५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.

मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, नाग साप बुद्धाना सात/बार दिवस मुसळधार पावसातून वाचविण्यासाठी आपला फना छ् त्री रुपाने बुद्धाच्या डोक्यावर धरतो.

हिंदु धर्माच्या नाकावर टिच्चून बौद्ध धर्म जगभर पसरला हे जरी सत्य असलं तरी त्या सर्व देशात बुद्धाला मार्गदाता/गुरु म्हणून नाही तर देव म्हणून स्विकारलं गेलं.

गौतम बुद्ध धर्मस्थापने आधी क्षत्रिय्,म्हणजेच हिंदू होते.>>>
बौद्ध धर्मा आधी हिंदू धर्म नव्हता............. तेंव्हा वेदिक धर्माच्या अनेक टोळ्या होत्या. त्यामुळे बौद्ध धर्म हिंदु धर्माची शाखा नाही. वेदाना निगम म्हणतात निगमचा अर्थ नंतरचे.............. मग आगम काय आहे. तर आगम असूरवेद होय. असुरवेद, मत्स्यवेद, सर्पवेद अन नागवेद हे वेदांचे आगम आहेत. या आगमांची चोरी करुन निगम तयार करण्यात आले. आपण वेदांचे निगमच वाचतो पण वेदांचे आगम वाचल्यास मुळ नागवंशीय संस्कृतीचा उलगडा होतो.

हिंदू नावाचा धर्म कधीच नव्हता.......... वेदिक धर्माच्या संचाला हिंदु धर्म म्हणतात.

<<< हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.>>>

हे महत्त्वाचे वाटले. बौध्द धर्माच्या शिकवणुकीचा नितांत आदर आहेच! बौध्द धर्माचा अवलंब / आदर करणार्‍यांकडून ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरणेही तितकेच गरजेचे आहे.

बौध्द धर्माच्या शिकवणुकीचा नितांत आदर आहेच! बौध्द धर्माचा अवलंब / आदर करणार्‍यांकडून ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरणेही तितकेच गरजेचे आहे.

हे महत्वाचे आहे.

बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगण्यात बुद्ध असक्षम आहेत, असा सरळ अर्थ निघतो

बकासुर

माझं ज्ञान अल्प आहे. तरी पण तुम्ही जी काही चिकित्सा इथे केलीये त्यावरून जे काही थोडंफार वाचनात आलं त्यावरून खुलासा करायचा मोह टाळता येत नाही. ही चिकित्सा महत्वाची. कारण आपण धर्म/ धम्म स्वतः निवडून घेत नाही. आईवडिलांनी आपल्याला दिला म्हणजे तो चांगलाच असणार या श्रद्धेपोटी आपण धर्म स्विकारतो. इतर अनेक गोष्टीतला बदल आपण स्विकारीत असतो पण धर्माच्या बाबतीत आपण खूपच हळवे असतो. कदाचित धर्मावरून वाद होण्याची कारणेही हीच असतील जी धर्माच्या शिकवणीच्या विरूद्ध आहेत.

मला बुद्धाचं एक वाक्यं आवडतं
मी सांगितलं म्हणून स्विकारू नका. मी जे जे काही सांगितलय ते सत्याच्या कसोटीवर घासून पहा आणि स्वतःच्या बुद्धीला पटल्यावर मगच स्विकारा. आजचं विज्ञान हेच सांगतं. आजच्या विज्ञानयुगात तरी हा उपदेश स्विकारायला कुणालाच अडचण येऊ नये. अर्थात याबद्दलही मतांतरे असू शकतात.

बौद्ध धम्मात आत्म्याच्या पुनर्जन्माला मान्यता नाही. स्कंधांचा पुनर्जन्म होतो असं म्हटलय. स्कंधपरिनिर्वाण म्हणजे मृत्यू. माणसाच्या ठायी असणारे पाच स्कंध नष्ट होणे म्हणजे त्या मनुष्याचा मृत्यू होणे. स्कंध म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हां एका भन्तेंनी खुलासा केला तो असा कि स्कंध म्हणजे स्वभावविशेष, वेदना (चेतना, जाणीव इ.), गुण आणि रंग रूप इ. हे स्कंध एका पिढीतून दुस-या पिढीत संक्रमित होतात. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून डीएनए किंवा गुणसूत्रे म्हणजेच स्कंध असा अर्थ निघत असावा. अर्थात हे प्रश्नोत्तरे स्वरूपात जाणून घेतलेलं आहे. ग्रंथ वाचून नाही. चु. भू. दे. घे. हे पाच स्कंध म्हणजे पंचमहाभूतं आहेत किंवा कसे हे सांगता नाही येणार. त्याबद्दल जाणकारांनी प्रकाश टाकणं योग्य होईल.

http://books.google.co.in/books?id=fY9_X107du8C&pg=PA119&dq=what+is+skan...

थोडं इतिहासात डोकावलं तर बौद्ध तत्वज्ञानात चमत्कार कसे घुसवले गेले आणि त्यावरून भिक्खूसंघात कशी फूट पडली, महायान आणि हीनयान असे पंथ का निर्माण झाले इकडे लक्ष द्यावे लागेल. हे दोन्ही पंथ मान्य नसणारेही काही जण होते. यथावकाश वैदिक धर्माच्या ज्या कर्मकांडांना मान्यता नव्हती तीच कर्मकांडे बौद्ध धम्मातही सुरू झाली वगैरे उल्लेख आढळून येतात. हा काही आपला विषय नाही आणि तितका अभ्यासही नाही.

त्रिपिटकं पानांवर लिहीली गेली. त्रिप्टक म्हणजे तीन टोपल्या. ही पानं शिवून तीन टोपल्यात ठेवली गेली. जी उपलब्ध आहेत / नाहीत याबद्दल माहीती नाही ( मंओलियन्स टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यात ती जळून खाक झाली असे काही ठिकाणी म्हटलंय). बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मपरिषद वैशाली इथं भरली गेली तेव्हा त्रिपिटकं मौखिक स्वरूपात सांगितली गेली. दुस-या धम्मपरिषदेपर्यंत मात्र बुद्धाच्याच शिकवणीनुसार ( काळ आणि स्थळ याप्रमाणे माझ्या शिकवणीमधे बदल अनिवार्य आहे ) त्यात बरेचसे बदल करण्यात आले. पुढे पुढे तर चीन किंवा जपान मधे बुद्धीझमच्या ज्या संस्था होत्या त्यांनी आपल्या पदरची सूत्रेही त्यात घुसवली. थोडक्यात त्रिपिटकाचं मोल अनन्यासाधारण असलं तरी त्यातली बुद्धाची शिकवण शोधणं हे जिकिरीचं काम बनतं.

http://books.google.co.in/books?id=nuN9hJP2G-EC&pg=PA14&dq=is+tripitaka+...'s+original+philosophy&hl=en&ei=c-BFTsu5HITyrQeM38iJBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCsQ6AEwAA#v=onepage&q&f=false

छान

केवळ आणि केवळ दु:ख या सत्याभोवतीच बुद्धाने लक्ष केंद्रित का केले असावे ?
जगातला आनंद आणि तो जाणुन घ्यायची क्षमता देणारे मार्ग सांगणारे कोणते धर्म नाहित का ?

बहुतेक सगळे धर्म माणसाने सुखात किंवा दु:खात अविचलित / तटस्थ रहावे असे का शिकवतात ?
जीवन समरसून कसे उपभोगावे हे कोणताच धर्म शिकवित नाही का?

निर्वाण, निब्बाण, मोक्ष अशा मार्गाला एखादा पोचला तर पुढे जगायचीच काय आवश्यकता?

मला वर अनिल म्हणाल्याप्रमाणे 'अत्त दीप भव'- स्वयंदीप हो हा बुद्धाचा विचार पटतो आणि तो मी आचरते.
मग भले बुद्धाने किंवा बुद्धाच्या नावावर इतर लोकांनी काही का लिहिलेले असे ना.

जाणत्यांनी जे लिहून / सांगून ठेवले आहे ते आजच्या काळात आचरणात आणणे कसे करता येईल. त्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा कसा करुन घेता येईल हे जाणणे आवश्यक आहे.

अहो, असंख्य वेळा अनेक लोकांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्धच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम इ. सर्व धर्मांच्या बद्दल. भरपूर माहिती आहे. पण त्यांनी सांगितलेले कुणी ऐकतो का?
विषयाला धरून बोलायचे तर अरुंधती कुलकर्णी यांनी वर लिहीलेले वाचा.
मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.”

हे काही फक्त बुद्ध धर्माबद्दलच नाही तर इतरहि निरनिराळ्या धर्मांबद्दल असेच सांगितले आहे!
तेंव्हा खरी अडचण सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे वागण्यात आहे!!

असो. विषय बुद्ध धर्माचा अभ्यास असा आहे (किंवा नेहेमी प्रमाणे आधी बुद्ध धर्मातील विसंगति, त्रुटी नि शेवटी वैयक्तिक टीका असा आहे!)

विषय बुद्ध धर्माचा अभ्यास असा आहे (किंवा नेहेमी प्रमाणे आधी बुद्ध धर्मातील विसंगति, त्रुटी नि शेवटी वैयक्तिक टीका असा आहे!) >>>>> अगदी बरोबर Uhoh

माझ्या लेखाबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांचे सुध्दा म्हणने होते. लेखावर चर्चा झाल्यानंतर मी त्यावर माझे मत मांडणार आहे. सर्वांना धन्यवाद.
आपला स्नेहांकित,
आर.के.जुमळे

बौद्ध धर्मा आधी हिंदू धर्म नव्हता

Proud

मग बौद्धानी जो वज्रपाणी नावाचा देव 'उचलला' तो नेमक्या कोणत्या धर्मातून?

वज्रपाणी : वर मीमांसा केली आहे. तरीही पुन्हा एकदा तेच उत्तर द्यावं लागतंय Sad

बौद्ध धर्मातही ब-याचशा गोष्टी या नंतर घुसवण्यात आलेल्या आहेत हे आपण वर पाहीलच आहे. बुद्ध स्वतः देवाच्या विरोधात असेल तर देवांचं काय काम ? तरीही देवांचं अस्तित्व दिसतं ते फक्त पुष्पवृष्टी करण्याइतकंच. देवांच्या नावावर लोकांना धाक घालून विषमता प्रस्थापित करणे वगैरे प्रकार दिसत नाहीत. तुम्ही ज्याला हिंदू धर्म म्हणता आहात त्याला आजचं नाव कुणी दिलं हे पण पहायला हवं. पण मुळात वज्रपाणी नावाचा देव त्यात होता का ?

बौद्ध किंवा जैन हे भारतिय धर्म आहेत. यांना संस्थापक आहेत. त्याआधी वेदांचा धर्म होता जो फक्त आर्यांपुरताच मर्यादित होता. एतद्देशियांना धर्म असा नव्हताच. त्यांच्यासाठी सामाजिक नीतीनियम होते ते आर्यांनी ठरवले होते. पण संस्कृती मात्र त्याहीआधी होती. आपण धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करतो. धर्म येत गेले. संस्कृती कालानुरूप बदलत गेली. धर्माचा संस्कृतीवर थोडाफार परिणाम झाला. ज्यात एकद्देशियांना कसलेही अधिकार नव्हते. म्हणूनच बुद्धाने सामान्यांसाठी सोप्या भाषेत धम्माची दीक्षा दिली. पाली भाषा ही त्या काळची एतद्देशियांची भाषा असल्याने त्याच भाषेचा वापर बुद्धाने केला.

बुद्धाने धम्माची दीक्षा देताना पाण्यात साखर विरघळते तशी त्या त्या देशातल्या संस्कृतीत धम्माची शिकवण मिसळली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. थोडक्यात, धम्मामुळे एकदम कल्चरल चेंज वाटू नये असं बुद्धाचं म्हणणं होतं. म्हणूनच चीन किंवा जपान मधे त्यांची प्राचीन संस्कृती आणि बौद्ध धम्म एकत्र नांदताना दिसतात. म्हणूनच विरोधाभासही दिसून येतो. धम्माची तत्त्वे अंगिकारल्यानंतर आपोआपच विरोधाभासावर मनुष्य विचार करेल आणि कर्मकांड गळून पडतील असा विचार त्यामागे होता.

ऑक्सिजनचा शोध सतराव्या शतकात लागला. या वाक्याचा संदर्भ घेऊन एखादा असे म्हणू लागला की त्या आधी ऑक्सिजनच नव्हता, तर..? हिंदु धर्माचेही तसेच आहे. या धर्मला हिंदु हे नाव परकीयानी अगदी अलीकडच्या काळात दिले. पण याचा अर्थ त्यापूर्वी हिंदु धर्म नव्हता असे होत नाही.. आर्य, आनार्य, शैव, वैष्णव... असे सगळेच प्रकार विखुरलेल्या रुपात होते, त्या सगळ्यांचा संदर्भ हिंदु या आजच्या शब्दात येतो. वज्रपाणी म्हणजे स्कंद म्हणजेच्ज कुमारन, कार्तिकेय, मुरुगन, सुब्रमन्यम.. अशा विविध नावानी हा देव पूजला जात होता. कनिष्काच्या काळात हा मुळचा हिंदु देव बौद्ध धर्मात व्ज्रपाणि या नावाने शिरला. आज चीनमध्येही तिथल्या बौध्ह धर्मात हा देव दिसतो.

हिंदु धर्मातील वाढती कर्मकांडे, यज्ञयाग याना विरोध करण्यासाठी जैन, बौध्ह धर्म उदयाला आले. तेंव्हा त्यांच्या आधी हिंदु धर्म नव्हता असे म्हणता येणार नाही. ही कर्मकांडे वैदिक, अवैदिक अशा सर्वांमध्ये होती. आजही कितीतरी ग्रामदेवताना, कुलदैवताना बळी दिले जातात. तिथे बर्‍याचदा ब्राह्मणेतर पुजारी असतात.; त्यामुळे हिंसेचे खापर केवळ ब्राह्मण्/वैदिक्/यज्ञ यांच्यावर फोडणे इष्ट नाही. अवैदिक प्रवाहही हिंसेच्या बाबतीत तितकेच अग्रेसर होते.

मग आगम काय आहे. तर आगम असूरवेद होय. असुरवेद, मत्स्यवेद, सर्पवेद अन नागवेद हे वेदांचे आगम आहेत. या आगमांची चोरी करुन निगम तयार करण्यात आले. आपण वेदांचे निगमच वाचतो पण वेदांचे आगम वाचल्यास मुळ नागवंशीय संस्कृतीचा उलगडा होतो.
हे इतर वेद जितके जुने आहेत, तितकेच वैदिकांचे वेदही जुने आहेत. आगमांची चोरी करुन निगम झाले, हेही खरे नाही. वदिकांच्या देवाच्या संकल्पनाच इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. वैदिक हे मूळचे मूर्तिपूजक नव्हते. याउलट, हे इतर चार वेद मूर्तिपूजक होते. मग आगमाची चोरी करुन निगम कसे काय झाले बुवा? आणि मुळात हे इतर वेद आज उपलब्ध तरी कुठे आहेत? कुठेतरी त्यांचे संदर्भ येतात इतकेच.

कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.--------------------

बुध्दाच्या शिकवणीने , बुध्दाची शिकवन व गीतेची शिकवन शेवटी एकच आहे.

वाद विवाद वरुन वरुन आहे . (सिध्द्दान्ताविषयी)

जामोप्या

वैदिक, बौद्ध, जैन इ. धर्म इथे येण्यापूर्वी इथे जी संस्कृती होती तिला आज हिंदू संस्कृती या नावाने ओळखले जाते. तो धर्म नव्हे. डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या केसमधे सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निकालपत्रात हेच म्हटले आहे. बौद्ध धम्माच्या आधी इथे वैदिकांचा धर्म होता. नाग आणि आर्यन टोळ्यातील संघर्ष त्यानंतरचा आहे. पुराणे समुद्रगुप्ताच्या काळात लिहीली गेलीत. पुराणांमधून कालनिश्चिती करता येत नाही पण काही गोष्टींचा संदर्भ नक्कीच मिळतो.

वज्रपाणि म्हणजेच कार्तिकेयन हे कसे ठरवले हे जाणून घ्यायला आवडेल. तसच नागवंशियांच्या वेदांबद्दलची ही माहीती मला खरच नवीन आहे.

लो. टिळकांच्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज मधे वेद आर्यांचे प्राचीन धर्मग्रंथ असल्याचे आणि ध्रुवीय प्रदेशात ते रचले गेल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल ऋग्वेदामधेच मतभिन्नता आहे त्यावरून वेदांमधील प्रक्षेप शोधता येतात त्याचप्रमाणे बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा शोधला असता त्याच्याशी विसंगत असे प्रक्षेप शोधता येतात. त्यासाठी कमालीचा प्रांमाणिकपणा हवा.

बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे प्रक्षेप नाकारून शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्म स्विकारला आहे. नालंदा विद्यापीठात बौद्ध धम्मविषयक तत्वज्ञानाचे शिक्षण मिळत असे. त्याकाळी झेरॉक्सची सोय नव्हती. श्रीलंकेमध्ये नालंदा विद्यापीठातून काही विद्यार्थ्यांनी / विद्वानांनी मूळ ग्रंथांच्या प्रती (हस्तलिखीते ) नेल्या होत्या. बाबासाहेबांनी त्या प्रती मिळवून त्याप्रमाणे धम्माची नव्याने मांडणी केली. बाबासाहेबांच्या या धम्माला जगभरातील बौद्धधर्मियांकडून विरोध झाला.

अर्थात गुलामीचे मूळ हिंदू धर्माच्या असमान शिकवणुकीमधे असल्याने नवा धर्म स्विकारताना बाबासाहेब खूपच चोखंदळ होते. त्यांनी नवीन धर्म स्थापन केला असता तरीही धर्मांतर झालेच असते. केवळ बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणून हल्ली त्यावर टीका होते पण बाबासाहेबांना हा धर्म सोडण्याची पाळी का आली आणि १९३२ ला यासंदर्भातली घोषणा करूनही १९५६ पर्यंत धर्माभिमानी निष्क्रीय का राहीले याची चिकित्सा नक्की करावी असं मला वाटतं. कदाचित त्या वेळी असे प्रयत्न झाले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं.

मी आता थांबतोय कारण धागा इतिहासाकडे जाणार असं दिसतंय. काहींनी आपले आयडी कृपया सभ्य नावांचे धारण करावेत ही नम्र विनंती आहे.

धर्म कोणताही असो, त्याची मूल तत्त्वे, शिकवण, मूल्ये ही मानव कल्याणाचीच असतात असे दिसून येते. प्रत्येक धर्म त्या त्या काळात, त्या परिस्थितीत उदयाला येण्याची कारणेही भिन्न भिन्न असली तरी ती त्या त्या वेळेची गरज असते असेच दिसून येते. मात्र जसजसा काल पालटत जातो त्याप्रमाणे त्यात विभिन्न मते, वेगवेगळे विचार प्रवाह, आक्षेप, शाखा, नंतर जोडली गेलेली तत्त्वे/ विचार/ पध्दती इत्यादी दिसू लागतात. धर्म हा प्रवाही आहे. प्रत्येक व्यक्ती ज्या धर्मात जन्मते, जो धर्म पाळते त्याचा त्या त्या व्यक्तीस आदर, अभिमान वाटणे साहजिक आहे. परंतु हे करताना इतर धर्मांवर चिखलफेक करून आपलाच धर्म कसा श्रेष्ठ हे हमरीतुमरीने दाखविणे टाळले गेले पाहिजे. जेवणात वेगवेगळ्या चवी असतात, वेगवेगळे पदार्थ असतात, तेव्हाच भोजनाचा आनंद वाढतो. त्याप्रमाणेच विविध धर्म, पंथ, पध्दतींना सोबत घेऊन जाणे, त्यांचा आदर ठेवणे, त्यातील चांगल्या गोष्टी घेणे हे बुध्दिमान व विवेकी माणसाचे लक्षण आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. अन्यथा 'तू तू मी मी' करत कोण वरचढ म्हणणार्‍यांची या जगात कमतरता नाही. महत्त्वाचे आहे ते ह्या सर्वापलीकडील माणुसकीचा धर्म पाळणे. जे सर्व धर्मांचे मूलसार आहे. तेवढे जमले आयुष्यात तरी पुरेसे आहे!!

महत्त्वाचे आहे ते ह्या सर्वापलीकडील माणुसकीचा धर्म पाळणे. जे सर्व धर्मांचे मूलसार आहे. तेवढे जमले आयुष्यात तरी पुरेसे आहे!!<<<<<<
अनुमोदन....

अरुंधती यांना अनुमोदन.
मला वाटतं लेखकाने अत्यंत भाबडेपणाने आणि तळमळीने लेख लिहीलेला आहे. केवळ चिखलफेकीच्या उद्देशाने काही जण इथे हजेरी लावत आहेत त्याला त्याच पद्धतीच्या उत्तरांचा मोह इथे टाळलेला आहे.

कधी नव्हे ते चर्चा चांगली चालली आहे. चिखलफेकी आयडींकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवावी ही सर्वांनाच विनंती.

थँक्स नीधप

वज्रपाणी हे शुद्धोधन राजाने राजपुत्र सिद्धार्थाच्या संरक्षणार्थ नेमलेल्या बॉडीगार्डचे नाव होय. सिद्धार्थ गौतमाच्या द्वेषाने वेडापिसा होऊन त्याचा भाऊ देवदत्ताने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात वज्रपाणीने मोठ्या शर्थीने तो हल्ला परतवून लावला असे उल्लेख आढळून येतात.

महायानांनी त्यामुळेच वज्रपाणिला बुद्धाचा प्रोटेक्टर या स्वरूपात प्रोजेक्ट केले असावे. हीनयानांची या गोष्टींना मान्यता होती किंवा नाही हे कुठेच दिसून येते. महायाना हाच मोठ्या प्रमाणात फोफावल्याने वज्रपाणि सर्वत्र पोहोचला.

त्याचा कार्तिकेयनशी कसा संबंध जोडला गेला याबद्दल अनभिज्ञ आहे.

इथे तर स्कंद म्हणजे खंडोबा म्हणून दिले आहे.. ऐकाव ते नवलच ! Happy http://en.wikipedia.org/wiki/Murugan

असू दे कुणीही. आता चर्चा फक्त बौद्ध शिकवण एवढ्यावर राहू दे.

@जामोप्या: विकिपेडिया मुक्त स्त्रोत असल्याने तीवरील माहिती ही बरोबरच असेल ह्याची खात्री नसते. तिथल्या माहितीची सत्यासत्यता पडताळण्यासाठी मला वाटते त्यांनी संपादकांचे गट निर्माण केलेले आहेत. तरी रोज नवीन भर पडणारी माहिती व विषयांचा आवाका बघता त्या माहितीची पडताळणी होतेच असे नाही. बरेचदा तुम्हाला तिथे प्रश्नचिन्हे अथवा काही टिप्पणी (किंवा हायपरलिंक असलेले आकडे) दिसेल. त्यावर क्लिक केल्यास त्या माहितीच्या अचूकतेबद्दल शंका व्यक्त केलेली वा अधिक सूत्र/माहितीचा स्त्रोत नमूद करण्याची विनंती केलेली दिसेल.

अरुंधती आणि अनिल, निधप आपल्याला अनुमोदन. चर्चा चालु रहावी. चिखलफेक करणार्‍यांचा पुर्वग्रह दुषित असु शकतो. इतक्या गंभीर चर्चते मतपरिवर्तन करण्याचा मानस असेल तरी मिळणारे यश अल्प असते कारण समोरचा पक्ष आपले मत रेटत रहातो. सबब नाराज निराश न होता अभ्यास आणि चर्चा सुरु ठेवावी.

भगवान बुध्दांनी सांगितलेला मार्ग सामन्यांना अनुसरता येतो का ? असा माझा नम्र प्रश्न आहे. याचे उत्तर होय असे असेल तर सामान्यांनी दैंनदिन जीवनात तो कसा आचरणात आणावा यावर अभ्यासुंनी भाष्य करावे ही विनंती.
'
अत्त दीप भव'- स्वयंदीप हो हा बुद्धाचा मला सुध्दा पटतो. माझ्या गुरुंनी
त्स्यात स्मरणमात्रेन ज्ञान उपजते स्वयं: असा उपदेश मला केला आहे तो सुध्दा याच अर्थाचा आहे.

मानव जन्माचे मुख्य उद्दीष्ट दु:ख मुक्ती नसुन जन्म-मरण यातुन मुक्ती आहे असे अनेक हिंदु तत्ववेत्ते सांगतात.

दु:ख का निर्माण होतात यावर विचार केला तर त्यामागचा कर्माचा सिध्दांत पटतो आणि तो मान्य करताना जन्म-मरणाची साखळी ही पटते.

जर जन्म - मरण चुकले तर दु:ख रहाणार नाही पण किती सामान्य या मार्गाने वाटचाल करु शकतात आणि महत्वाचे म्हणजे या मार्गावर आपण कुठे आहोत याचा आढावा घेऊन शकतात ?

माझ्या मते सामान्यांकडे याची खात्रीलायक उत्तरे आहेत पण ती भोळ्या भाविकांना पटतील अशी आहेत. बुध्दी आणि तर्काला प्रमाण मानणार्‍यांना कदाचित ते पटणार नाही.

Pages