दाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 August, 2011 - 07:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप खोवलेला नारळ
एक मध्यम आकाराचा कांदा, चार तुकडे करून
एक टीस्पून लाल तिखट
मीठ

फोडणीसाठी :

शुध्द तूप
कढीपत्ता
मोहरी

क्रमवार पाककृती: 

खोवलेला नारळ व कांदा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा. त्यात लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवावे. आपल्याला चटणी जेवढी दाटसर हवी असेल तितपत किंवा थोडे कमी पाणी घालावे. (नंतर अनेकदा चटणीला पाणी सुटते.)

लहान कढईत तूप गरम करावे. मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात कढीपत्ता घालून परतावा. गॅस बंद करावा. फोडणी गार झाल्यावर चटणीत घालावी. इडली / डोसा / आप्प्यांबरोबर द्यावी. सँडविच/ पोळी/ भाकरी/ भाताबरोबर ही छान लागते.

(फोटो काढायच्या अगोदरच चटणीचा फन्ना उडाल्यामुळे इथे आता चटणीचा फोटो देता येत नाहीए, क्षमस्व!

पण ती अशी दिसते

फोटो, साभार सुजीथकडून!)

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढी!
अधिक टिपा: 

ह्या चटणीत दक्षिणेत घरोघरी थोडेफार फरक आढळतात.

* काहीजण लाल तिखटाऐवजी सुक्या लाल मिरच्या थोड्या तेलात परतून त्या नारळाबरोबर वाटून घेतात.

* काहीजण फोडणीत थोडी उडीद डाळ घालतात, कुरकुरीतपणा येण्यासाठी. तसेच हिंगही घालतात.

* काहीजण नारळाबरोबरच थोडा चिंचेचा कोळही ह्या चटणीत घालतात. त्याने चवीत थोडा आंबटपणा येतो. तोही मस्त लागतो.

* कोथिंबीरही घातली जाते.

माहितीचा स्रोत: 
आपुनका दोस्त/ बडिंग शेफ सुजीथ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी लागते ही.. माय फेवरीट, ही अन त्यांची टोमॅटो चटणी.
दोस्त शेफ है तो अने दो सब सौदिंडीयन यम्मी चटणी रेसिपीज...

थँक्स मवा, साक्षी!

मवा, तो खराखुरा शेफ नाहीए गं, हौशी शेफ आहे, व्यवसायाने सी. ए. आहे, पण सगळे पदार्थ बनवायला आणि लोकांना खाऊ घालायला जाम आवडते त्याला! Proud
त्याची आई आणि वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो तो बरेच पदार्थ.

अकु, थॅंक्स. या चटणीची वेगळी चव कांदयामुळे आहे तर. मला आवडते, पण नारळाला वेगळा स्वाद कसला आहे ते कळत नव्हतं. मला त्यांची टोमॅटोची चटणी पण फार आवडते, पण कशी करायची माहित नाही. तुझ्या मित्राला विचारुन सांगणार का, प्लीज?

काल केली मी ही चटणी, पण काही जमली नाही. 'चविष्ट' नाही झाली. काय चुकले ते ही कळाले नाही Sad

'अम्बई' वाचत होते, त्यात इतक्या वेळा तव्यावर 'चर्र' 'चर्र' डोसे घातले आहेत की शेवटी न रहवुन मी काल संध्याकाळी केलेच Happy आणि सोबत ब.भा आणि तुझी चटणी.

अकु, हो गं. एकदम यम्म असते ती टोमॅटो चटणी. मी तुझा पाठपुरावा करु का गं त्या रेसिपीसाठी? कि ठेवशील लक्षात त्याला विचारायचं?

बरं नारळाची चटणी करायला घेतली आहे. कशी झाली सांगेनच.

आरती, ही चटणी सौम्यच लागते चवीला (किमान सुजीथच्या रेसिपीनुसार)!! त्यात तिखटाचे प्रमाण वाढवले तर कदाचित आणखी टेस्टी/ तिखट होईल.
काल आमच्याकडेही पुन्हा हीच चटणी केली होती डोश्यांबरोबर. पण आईने त्यात लसूणही ढकलून दिला!! Lol

मनिमाऊ, त्याला विचारलंय टो च्या च विषयी. अजून रिप्लाय नाही आला त्याचा.

होय दिनेशदा, नक्की! त्याचे प्रयोग सध्या सर्व मित्रमंडळींमध्ये इतके पॉप्युलर झालेत की अनेकांनी त्याच्या घरी येऊन त्या पदार्थांचे ''टेस्टर्स'' बनण्याची ऑफर त्याला आपण होऊन दिली आहे! Proud

अरुंधती मस्तच ग. मला ह्या प्रकारची चटणी आवडते. कांदा घालतात हे माहीत नव्हत.
मी कधी कधी फोडणी देते घरी. त्यातली राई मला आवडते.
काही जण उडीद आणि चणाडाळही टाकतात ह्या चटणीत फोडणीला.

धन्स जागू, नलिनी.
हो जागू, चणा डाळही घालतात फोडणीत. कुर्रुम कुर्रुम खायला मजा येते! Happy

मनिमाऊ, आली एकदाची सुजीथकडून टोमॅटो - कांदा चटणी कृती!

ही त्या चटणीची कृती :

साहित्य :

२-३ कांदे, १ टोमॅटो, ८-१० कढीपत्ता पाने, ३-४ लाल मिरच्या, मीठ, परतण्यासाठी तेल व फोडणीसाठी तेल-मोहरी.

कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा तांबूस लाल रंग येईपर्यंत परतायचा. तो बाजूला काढून त्याच कढईत चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचा. त्यातला ओलसरपणा जाईपर्यंत, म्हणजे साधारण ३-४ मिनिटे परतायचा. त्यानंतर कढीपत्ता व लाल मिरच्या २-३ मिनिटे परतून घ्यायच्या. हे सर्व परतलेले जिन्नस मिक्सरमध्ये वाटायचे. त्यात मीठ घालून पुन्हा मिक्सर फिरवायचा. एका कढल्यात / लहान कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की कढीपत्ता घालून गॅस बंद करायचा. फोडणी गार झाल्यावर चटणीत घालायची व नीट मिसळायची.

ही चटणी इडली / डोसा/ वडा बरोबर किंवा पोळीबरोबरही छान लागते. Happy