जावे त्याच्या वंशा (लेखमालिका) ४ : पहिलं प्रेम

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जावे त्याच्या वंशा (४): पहिलं प्रेम
ऑगस्ट ३, २०११

असं म्हणतात, भारतात त्यातही मुंबईत जन्मलेलं प्रत्येक मूल रांगायला, चालायला शिकतं त्याचबरोबर एखादी खेळायची पहिली वस्तू हातात कुठली धरत असेल तर बॅट आणि बॉल. घरात "लकडी की काठी" चा घोडा नसला तरी कुठला तरी बॉल आणि एकतरी बॅट असतेच. याला कुणीही अपवाद नाही, मी ही त्यातलाच.

थोडक्यात बॅट बॉल किंवा क्रिकेट च वेड हे असं जन्मजात आपल्या रक्तात असतं. वयाने, मनाने, आणि शरीराने मोठे होण्याच्या प्रक्रीयेत, क्वचित आयुष्याच्या शर्यतीत अनेक गोष्टी घडतात, काही कायमच्या लक्षात राहतात काही विस्मरणात जातात. पण मला पहिली विकत घेवून दिलेली बॅट मी विसरलेलो नाही. त्यातही ती बॅट माझ्यावर माझ्या खुद्द वडीलांपेक्षा जास्त जीव लावणार्‍या शेजारच्या काका-अजोबांनी दिलेली असेल तर त्याचं भावनिक मूल्य बेहीशेबी मालमत्तेपेक्षा कईक पटींने जास्त! तर ती पहिली बॅट, त्यावर कपिल देव चं ते चित्र, त्याची खाली असलेली सही, त्याच्या हँडल वर लावलेल्या रबराचा वास आणि त्या बॅट ने पहिला फटका मारल्यावर त्यावर चेंडूचा ऊठलेला तो लाल रंगाचा छप्पा! सगळं अगदी काल परवा घडल्या सारखं. मग तीच बॅट वापरून गल्ली क्रिकेट मध्ये ठोकलेल्या धावा, जिंकलेले सामने, मग कालांतराने तीचे हँडल तुटल्यावर मैदानावर रडलेला मी, मग रात्रभर फेवीकॉल च्या सहाय्याने पुन्हा ते हँडल जोडायला केलेले ऊपद्व्याप, या सर्व प्रवासात त्या बॅट चा भावनिक कोशंट ईतर कुठल्याही व्यावहारीक नाते संबंधापेक्षा किती मोठा झाला हे कळलेच नाही.

मग मध्यमवर्गीय नियमानुसार, ठाण्याच्या दादोजी कोंडदेव मैदानावर क्रीकेट कोचिंग क्लासेस ला जाणे (त्या काळी बारावी परीक्षांसाठी अगरवाल, व आय आयटी क्लासेस पेक्षा या अशा कोचिंग क्लासेस चं महत्व जास्त होतं). स्पाईक चे न परवडणारे बूट,न परवडणारी असली सिझन/काश्मिर विलो ची क्रिकेट बॅट, हे सामान घेता न येण्यामूळे प्रसंगी कोच च्या शिव्या खाणे, यातून या खेळाशी नातं अधिकच घट्ट होत गेलं. पुढे काही स्थानिक, आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, लीग मधून खेळताना या खेळाने किती लोकांना किती मोठ्या प्रमाणावर भारावून टाकलय याचे याची देही याची डोळा प्रात्यक्षिक अनुभवलं. ईथेच या अनुशंगाने खेळपट्टी, माती, गवत, मशागत, याचं बाळकडू मात्रं मिळालं जे आजही ऊपयोगी पडतं- खेळताना, झाडे लावताना, अगदी गवत कापताना देखिल.

पुढे पुन्हा एकदा मध्यमवर्गीय मानसिकतेला धरून, "काय आयुष्यभर क्रिकेटच खेळायचय काय? आता पुरे, जरा अभ्यासात लक्ष द्या.." या प्रवादा विरुध्द काही ठोस ऊत्तर नसल्याने काळाच्या ओघात हातातून बॅट सुटली आणि त्या हातात डिगरी सर्टिफिकेट, मग रेलवेचा पास, मग पहिला पगार, मग पहिल्या मैत्रीणीसाठी घेतलेला गुलाब गुच्छ ,अशा अनेक गोष्टी येवून गेल्या, प्रत्येकाने ठरल्या वेळी आपापली भूमिका चोख बजावली आणि मीही त्यांना मदतीचा हात देत गेलो. कधीतरी कॉलेजात, हॉस्टेल मध्ये, वा एखाद्या गल्लीतल्या सामन्यात खेळायच्या निमित्ताने बॅट हातात येत राहिली. पण या सर्व धकाधकीत जिथे स्वताच्या कपड्यावरील धूळ झटकायलाही ऊसंत नव्हती तिथे एव्हाना घराच्या कोनाड्यात साठलेल्या बॅटस ना तेल लावणे, बॅट च्या ब्लेड ला झोंक/तोल देणे, हँडल चे रबर उलटे सुलटे करून बदलणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ तरी कसा राहणार. ती पहिली कपिल देव ची बॅट सोडली तर बाकी मग ईतर गरजू-क्रिकेट वेड्या मुलांना देवून टाकल्या.

कालांतराने अमेरीकेच्या दिशेने वाहणार्‍या शर्यतीत सामिल झालो आणि तब्बल एका दशकानंतर पुन्हा या खेळाशी अगदी नेमाने संबंध येवू लागला. अमेरीकेतही असेच माझ्या सारखे क्रिकेट वेडे, पीर, खेळलले वा न खेळलले सर्वच असल्याने चक्क स्पर्धात्मक लीग च्या तत्वावर वर्षातील चार महिने अश्या मोठ्या स्पर्धांतून खेळलो. मग मे ते ऑगस्ट अशा तब्बल चार महिने चालणार्‍या या १२ संघांच्या लीग साठी ईतर सहा महिने सातत्याने केलेली तयारी, दैनंदीन व्यायाम, खेळाचा सराव या सर्वातून पुन्हा एकदा या खेळाचा भरभरून ऊपभोग घेतला. गंमत म्हणजे या लीग मध्ये अनेक संघांतून पूर्वी भारतीय संघासाठी (under 19) किंवा रणजीतून खेळलेले काही खेळाडू देखिल असायचे. त्यामूळे लीग चा एकंदर दर्जा आणि चुरस हे सर्व निश्चीतच ऊच्च दर्जाचे होते.

दर शनिवारी, रविवारी सकाळी १० ते सं ४ पर्यंत चालणार्‍या या सामन्यातून खेळताना प्रत्यक्षात आपले भारतीय खेळाडू आंतर राष्ट्रीय सामन्यात किती कठोर मेहेनत घेत असतील याचा पदोपदी प्रत्यय येत असे. मिशिगन मध्ये या आमच्या लीग स्पर्धा/संघाच्या-LCC वेबसाईट वर अजूनही ते क्षण शब्दरूपात जगू शकतो. http://www.lansingcricket.us/Home/tabid/36/Default.aspx
(लेकांनी LCC संघातील खेळाडूंच्या यादीत माझ्या आडणावाचा जोशी बदलून शर्मा केलाय तो भाग वेगळा.. तेलुगू, नॉर्थ, मुंबईकर, बंगाल, लंका, अश्या प्रांतातून एकत्र आलेल्या आमच्या संघात नावाची वाट लावणे काही नविन नव्हते.. मित्रांचे चेहेरे हृदयात कोरलेले असताना, नावाची कुणाला पडली आहे?).

आधी मिशीगन मध्ये तब्बल ४-५ वर्षे मग कोलोरॅडो मध्ये ही अशी उच्च दर्जाची स्पर्धात्मक लीग खेळताना या खेळाच्या निमित्ताने आयुष्याचा वैयक्तीक खजिना असा काही भरून गेला की अलीबाबाला देखिल हेवा वाटावा. त्या दरम्यान अन त्या निमित्ताने जोडलेले अनेक मित्र, यांत देशातून सर्व प्रांत, भाषा, ई. संस्क्रूती, परंपरा व विचारसरणी घेवून आलेले सर्वच प्रकारचे लोक होते. स्पर्धा लीग हे निमित्त मात्र- त्यातून अशा लोकांबरोबर राहिल्याने, भेटल्याने, मनावर घडलेले संस्कार, मनाच्या आणि जाणिवांच्या रुंदावलेल्या कक्षा, परस्पर देवाण घेवाणीतून मिळालेली शिकवण, अनुभव संपन्नता, आणि जोडीला आपलं शरीर, फिटनेस, ईच्छाशक्ती, आणि क्रयशक्ती यांचं जोपासलं गेलेलं महत्व, हे सर्व कुठल्याही प्रसिध्द विश्वविद्यापिठात देखिल एका जागी मिळालं नसतं. "आयुष्यभर काय क्रीकेटच खेळायचय काय"? या प्रश्णावर आधी पालकांचा कितीहि राग आला असला आणि मन हिरमुसलं झालं असलं तरी त्यातील खरी मेख ही अशी समजल्यावर त्यांच्याबद्दल असलेला आदर, प्रेम खेळा ईतकच मोठं झालं. त्याही खेरीज या खेळाकडे, त्या अनुशंगाने करायची चर्चा, त्यातील बरे वाईट या सर्वाकडे पहायचा सर्वसमावेशक दॄष्टीकोन लाभला.

मग अमेरीकेतील त्या लीग मध्ये काही महत्वाचे टप्पे लक्षात राहिले. युनिवर्सिटीत पाकींच्या संघाविरुध्द खेळलेल्या "कट्टर" चुरशीचे सामने, मिशिगन लीग मध्ये खेळताना आधीच्या वर्षी ऊपांत्यपूर्व सामन्यात हार पत्करायला लागल्यावर दुसर्‍या वर्षी अंतीम सामन्यात जिंकलेला कप, अंतीम सामन्याचा मानकरी म्हणून त्या लीग मध्ये मिळालेला पुरस्कार, त्या नंतर आजतागायत दिवाणखान्यात मांडणीमध्ये ठेवलेला तो कप.
२००० सलातील अंतीम समान्यात आम्ही जिंकलेल्या सामन्याचं शब्दांकनही अजून वाचले तरी रोमांचं ऊभे राहतातः
http://www.lansingcricket.us/MatchReports/2000MatchReports/FinalsLCCvsJu...
खेरीज 1999 to 2003 पर्यत लीग मधे खेळलेल्या ४ वर्षांतील अनेक सामन्यांचा रेकॉर्डही पब्लिक ने Match Reports व History सदरात जतन करून ठेवला आहे. टेक्नॉलॉजीचे आभार मानावे तितके थोडे.

त्या आमच्या लीग संघातील विजू नामक मित्राने/खेळाडूने खास भारतातून सचिन ची स्वाक्षरी असलेली फेमस महाजड MRF ची महागडी बॅट मला प्रत्त्येक सामन्यात खेळायला म्हणून दिलेली अजून आठवते. "योगी ये ले. अब बस तू बॅटींग कर..." "ती" बॅट हातात घेतल्यावर अंगात काय संचारायचं ते शब्दात सांगणं कठीण आहे. मला ती बॅट दिली तेव्हा विजू मध्ये मला शेजारचे काका-आजोबा पुन्हा भेटले. मी अमेरीकेला जायच्या आधी एक वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालेलं. मी अगदी लहान असताना आकाशातील विमानाकडे बोट दाखवून "काका मी पायलट होईन आणी तुम्हाला अमेरीकेला घेवून जाईन" असे नेहेमी म्हणायचो असे आई बाबा सांगत. ते क्षण मी अजूनही विसरलेलो नाही.

असं म्हणतात मनुष्य पहिलं प्रेम कधिही विसरत नाही. मी माझी पहिली बॅट, तीला हातात धरल्यावर अंगात ऊठलेला थरार, पहिला बॉल, पहिला फटका, आणि पहिला स्पर्धा विजेता कप विसरलेलो नाही आणि अर्थातच या खेळावरील पहिलं प्रेम देखिल! लौकीक अर्थाने आणि जगाच्या हिशेबात मी अशाच करोडोंपैकी एक क्रिकटप्रेमी, क्रिकेट खेळणारा असेन."जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" या न्यायाने या खेळात भारतीय संघाच्या वाट्याला आलेले पराभव, विजय, अलिकडचा विश्वकप, अन सध्या ईंग्लंड च्या दौर्‍यातील आपल्या संघाने सपाटून खाल्लेला मार या सर्वातून पुन्हा एकदा याच ईथे, याच खेळाने, तेही "खेळाच्या मैदानात" Happy (http://www.maayboli.com/node/2705) "अदृष्य" का होईना मित्र दिले. त्यांचही पहिलं प्रेम हेच आणि असच असेल अशी खात्री आहे. त्यांची ईथली नावे भाऊ, मास्तर, रंगाशेठ, केदार, फारेंड, विक्रम, असामी, अशी वा ईतर काहिही असतील, त्यांच्यात हे पहिलं प्रेम पुन्हा नव्याने भेटतं, कडू-गोड वैचारीक देवाण घेवाणीतून वाढत रहातं, आणि जिवंत रहातं. आयुष्याच्या ऊत्तरार्धात आणखिन काय हवे?

आपले लाडके कवी, कविवर्य पाडगावकर म्हणतात-
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!

जाता जाता: सचिन च्या दिवाणखान्यात विश्वचषक नाही याची कायम हुरहुर तो व्यक्त करायचा.. त्याची ती तगमग काही अंशी तरी मी समजू/जगू शकलो हे पुरेसे आहे. एक खंत मात्रं आहे की भारतीय संघात निवड होण्याची कुवत असली/नसली तरी आपल्या संघाबरोबर दौर्‍यावर पाणी द्यायला निवड झाली असती तरी चाललं असतं. विरुध्द संघाला आपल्या फलंदाजीने लोळवून आलेल्या थकल्या भागल्या सचिन ला एक ग्लास स्वताच्या हाताने बनवलेलं चवदार लिंबू सरबत तरी देता आलं असतं- "साहेब थकला असाल, हे घ्या"!

माझी दोन स्वप्ने आयुष्यात अधूरी आहेतः एक जे कधी पुरे होणार नाही- स्वर्गीय किशोरदांच्या समोर त्यांचच एखादं गाणं म्हणणं, दुसरं- सचिन बरोबर बसून क्रिकेट वर खास मराठीत गप्पा मारणं. हे पुरे होण्याची वाट बघतोय आणि झालच तर तो "संवाद" तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन, आमेन!

विषय: 
प्रकार: 

योग, सही.
तुमच आमच सेम हो. Happy
क्रिकेटवर फारच भावनात्मक लेख लिहिलाय हो तुम्ही. पोचला.
माझ्या घरी मी एक बॉल ठेवलाय. ४-५ ओव्हर झालेला. सुवास घेण्यासाठी. Happy

मस्त लिहीले आहे. सचिन रॉक्स. तुम्ही त्यांना भेटा व आम्हाला त्यांच्या फॅमिली बद्दल पण खूप प्रेम आहे ते सांगा. माझ्याकडे चौघांचा फ्रेम्ड फोटो आहे. किशोर पण लाडका. छू कर मेरे मन को म्हणा आणि यू ट्यूबवर टाका. आम्ही नक्की ऐकू. Happy

खूपच छान अप्रतिम Happy तुमचे दुसरे स्वप्न लवकरच पूर्ण होवो ही ईश्वराजवळ प्रार्थना ! रच्याकने क्रिकेट खेळता येवो न येवो तुमचं जे दुसरं स्वप्न आहे ते प्रत्येक मराठी माणसाचं असणार यात शंका नाही Happy