रतनगड... प्रवरेच्या साथीने...

Submitted by सेनापती... on 31 July, 2011 - 11:06

३ वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात मी आणि माझे काही मित्र-मैत्रीणी असे एकूण १० जण रतनगड़ला गेलो होतो. रतनगड़ माहीत नसेल असा कोणी डोंगरवेडा असेल अस नाही मला वाटत. १ तारखेला रात्री शेवटच्या, म्हणजे खरतर २ तारखेला पहाटे आम्ही कल्याणहून निघालो. प्रचंड पाउस पडत होता. इतका की इगतपुरीला पोहचेपर्यंत आम्ही जवळ-जवळ पूर्ण भिजलो होतो. पहाटे ३ च्या आसपास तिकडे पोचलो आणि स्टेशनवर बसून होतो. उजाडल की शेंडी गावची बस पकडून आम्हाला रतनगडाकड़े सरकायचे होते. पहाट व्हायला लागली तशी स्टेशनवर वर्दळ वाढायला लागली. आम्ही मस्तपैकी कटिंग चहा मारला आणि बसस्टैंडकड़े निघालो.

पाउस काही थांबायचे नाव घेत नव्हता. तो आपला पडतच होता, वाढतच होता. पहाटेच्या पहिल्या गाडीने आम्ही शेंडी गावात पोचलो. ह्या ठिकाणी मी तब्बल ८ वर्षांनंतर येत होतो. २००१ साली कळसुबाई ते हरिश्चंद्रगड़ ट्रेक करताना आम्ही शेंडी गावात आलो होतो. अजुन सुद्धा सगळे तितकेच आठवत होते. गावात असलेली शाळा आणि सरळ जाणारा बाजारचा रस्ता. आता अधिक दुकाने आणि हॉटेल्स झाली आहेत म्हणा. भर पावसात एका छोट्या हॉटेलमध्ये शिरलो आणि नाश्त्याची ऑर्डर दिली. मिसळपाव, कांदेपोहे आणि गरमागरम चहा. पेटपूजा केल्यावर आता रतनवाडीकडे निघायचे होते. १० जण असल्याने एक जीप घेतली. त्या जीपमध्ये एकदम कोंबून बसलो. शेंडी गाव भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले आहे. रस्ता पुढे धरणाच्या काठाकाठाने रतनवाडी पर्यंत पोचतो. तसे शेंडीहून बोटीतुन सुद्धा रतनवाडीला जाता येते पण ऐन पावसाळ्यात ही सेवा बंद असते.

आम्ही जीपने रतनवाडीकड़े निघालो. रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमधून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत खाली कोसळत होते. उजव्या बाजूला धरणाचे पात्र आमची साथ करत होते. पाउस इतका पडत होता की कॅमेरा बाहेर काढायची सोय नव्हती. काढला तरी कॅमेरालेन्स २-३ सें. मध्ये भिजून जायची. कसेबसे काही फोटो घेता आले. अखेर तासाभराने रतनवाडीला पोचलो. डाव्याबाजूला डोंगराच्या कुशीत रतनवाडी वसलेली आहे. काही घरे नदी पात्राच्या बाजूला सुद्धा आहेत. उजव्या बाजूला थोडेच पुढे आहे रतनवाडीचे हेमाडपंथी 'अम्रुतेश्वर मंदिर'.

त्या रस्त्याला प्रवेश करताच डाव्याबाजूला एक सुंदर पुष्करणी आपले लक्ष्य वेधून घेते.

मंदिराचे मुख्यद्वार मागील बाजूने आहे. प्रवेश करताच एक देवडी आहे आणि अजून पुढे आत गेले की आहे मुख्य गाभारा. जास्त पाउस पडला की हा गाभाऱ्यामधली पिंड पाण्याखाली जाते. आत्ता सुद्धा तेच झाले होते. मंदिराचे खांब कोरीव आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. गळक्या छपराची आता डागडूजी झाली आहे पण त्यावर मारलेला पांधरा रंग मात्र विचित्र वाटतो. मंदिराच्या परिसरात बरीच शिल्पे विखुरलेली आहेत. त्यात काही वीरगळ सुद्धा आहेत. पुष्कर्णीच्या समोर गणेश, विष्णु यांच्या मुर्त्या आणि शंकरपिंड आहे. शिवाय काही युद्धप्रसंग देखील कोरलेले आहेत. रात्रीचे जेवण आणि सकाळचा चहा-नाश्ता होइल इतकी लाकडे एका घरातून नीट बांधून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या घरात थोडासा चहा-नाश्ता घेउन आम्ही अखेर रतनगडाकडे कूच केले.

आता इथून पुढच्या गावांपर्यंत कच्चा गाडी रस्ता झाला आहे. नदीच्या पात्रावर देखील पूल झाला आहे. पुलानंतर लगेचच डावीकडे वळलो की शेतां-शेतांमधून गडाकडे जायचा मार्ग आहे. इकडे काही ठिकाणी २-२ फुट पाणी भरले होते. शेती सगळी पाण्याखाली गेली होती. त्या पाण्यामधून वाट काढत आम्ही डोंगर चढणीला लागलो. पाउस असाच सुरु राहिला तर उदया परत येताना नक्कीच जास्त त्रास होइल ह्याची कल्पना येत होती. पहिल्या टप्याची चढण पार करून वर गेलो तेंव्हा कळले की आम्ही चुकीच्या वाटेवर आलो आहोत. पुढे उतार आणि खुपच झाडी होती म्हणून मग पुन्हा मागे वळलो आणि योग्य रस्ता शोधायला लागलो. १२ वाजून गेले होते. पुन्हा भूक लागायला सुरवात झाली होती. एक छोटासा ब्रेक घेतला आणि पुढच्या वाटेला लागलो. आता आम्ही अचूक दिशेने जात होतो. गर्द झाडीमधून वर चढ़णारा रस्ता आम्हाला रतनगडाच्या तुटलेल्या पायर्‍यांपाशी असणाऱ्या शिडीपाशी नेउन सोडणार होता. मंदिरापासून ट्रेक सुरु केल्यापासून जसजसे आम्ही जास्त भिजत होतो तसतसे हळू-हळू सामानाचे वजन वाढत जात होते. इतका पाउस होता की आम्हीच नाही तर संपूर्ण सामान भिजले होते. सामान प्लास्टिकमध्ये बांधून सुद्धा काही ठिकाणी तरी पाणी नक्की शिरले होते कारण घेतलेल्या बैगचे वजन वाढले होते. मला वाडीनंतर ट्रेकमध्ये पावसामुळे फोटो घेता येत नव्हता. संपूर्ण ट्रेकभर गप्पा मारत-मारत आम्ही अखेर त्या शिडीपाशी पोचलो.

खालची शिडी काही फार चांगल्या स्थितीमध्ये राहिलेली नाही. एका वेळेला फार तर २ जणांनी चढावे. शिवाय पावसामुळे कोपरे निसरडे झाले होते आणि हाताने आधार घ्यायच्या शिडीच्या रेलिंगचा भरोसा राहिलेला नाही. १० जणांमध्ये कोण कितवा चढणार हे ठरवले आणि राजेश सर्वात पुढे निघाला. मी सर्वात मागे होतो पण फोटो मात्र काढता येत नव्हते ह्याचे दुःख: होते. पहिल्या शिडीनंतर थोड़ासा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर डावीकड़े वळलो की लागते दूसरी शिडी. पुढचे भिडू जसे दुसऱ्या शिडीकड़े पोचले तसे आम्ही मागचे पहिल्या शिडीवर सरकू लागलो. दूसरी शिडी अजून भन्नाट स्थितीमध्ये होती. वर पोचल्यानंतर उभी रहायची जागाच मोडून गेली होती आणि वरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने पत्रा वाकून बाहेर आला होता. पत्रा टिकून रहावा म्हणुन खाली घातलेल्या मेटल फ्रेम वर वजन टाकुन स्वतःला उजवीकड़े सरकवल्याशिवाय वर जाणे अशक्य होते. आता एक-एक करून ते दिव्य काळजी घेत आम्ही करू लागलो कारण डाव्या बाजूला तोल गेला तर कपाळमोक्ष नक्की होता. एकतर पावसाने सगळ निसरडे झाले होते. त्यात वर अजून पाउस पडतच होता. दुसऱ्या शिडीच्या वरच्या टोकाला पोचलो की गडाचा दरवाजा दिसू लागतो. हा टप्पा अतिशय निमूळता आहे आणि सवय नसेल तर मोठी सॅक घेउन चढणे अशक्य.

एक-एक करून आम्ही वर सरकू लागलो. डाव्या-उजव्या बाजूला दगडांमध्ये पकड घेण्यासाठी खोबण्या केलेल्या आहेत. त्या धरून-धरून सगळे वर पोचलो. दरवाजावरुन सरळ पुढे गेलो तर गडाच्या माथ्यावर जाता येते. पण आम्ही आधी उजवीकड़े मागे वळून गुहेकडे निघालो. राहायची सोय करणे महत्त्वाचे होते नाही का... गुहेकड़े पोचलो तर तिकडे आधीच काही ग्रुप्सनी कब्जा केलेला होता आणि सगळी गुहा ओली करुन टाकली होती. आता राहायचे कुठे असा प्रश्न पडला. बाहेर राहावे तर पाउस जोरदार सुरूच. बाजूला असलेल्या गणेशगुहेमध्ये आम्ही मुक्काम टाकायचे ठरवले. ह्या गुहेमध्ये ७-८ जण सहज राहू शकतात. आम्ही १० जण त्यात घुसणार होतो. सामान टाकून स्थिरस्थावर व्हायच्या आधी ती साफ करणे गरजेचे होते. आम्ही अख्खी गुहा साफ केली आणि आम्ही त्या गुहेमध्ये राहते झालो.

दिवसभर पावसात भिजून जबरदस्त भूक लागली होती. नशीब आमचं की आणलेली लाकडे सुकी राहिली होती. पावसामुळे लाकडे भिजली नव्हती पण दमट मात्र नक्की झाली होती. नुसता धुर करत होती पण जळत मात्र नव्हती. आम्ही गुहेमध्येच एका कोपऱ्यात चूल बनवली आणि त्यावर कसाबसा चहा बनवला. रात्र झाली तसे गप्पा मारत बसलो. इतक्या पावसामुळे उदया तरी गड बघायला मिळणार का? असा विचार आमच्या मनात होता. पण रात्रीचे जेवण कसे बनवणार हा ही प्रश्न होताच. अखेर रात्रीच्या खिचडीभातचा प्लान कैन्सल करून आम्ही फ़क्त म्यागी बनवायचे ठरवले. शिवाय सोबत नेलेली खिर बनवून खावी असे देखील मनात होते. म्यागी होईपर्यंत सटर-फटर खाउन आधीच सगळ्यांची पोट भरली होती. त्यामुळे शेवटी बनवलेली बरीचशी खीर तशीच राहिली. कोणीच ती संपवेना. उरलेली खिर झाकून ठेवून देउन आम्ही सगळे झोपेपर्यंत गप्पा मारत बसलो. बाहेर पाउस जोरात सुरूच होता. पावसाची झड़ आत येऊ नये किंवा इतर कुणीहि आत येऊ नये म्हणुन आम्ही दारावर अडसर लावून झोपायची तयारी केली. वरच्या रांगेत ७ जण तर मध्ये मूर्तिसमोर मी, राजेश आणि अमेय असे ३ जण दाटीवाटीने झोपलो. पण लवकरच लक्ष्यात आले की आमच्या १० जणांशीवाय एक ११ वा कोणीतरी तिकडे होता जो आम्हाला रात्री अधून मधून जागा करणार होता.
.
.
.
.
.
रात्री १२ नंतर तो ११ वा जण हालचाल करू लागला. दूडूदूडू त्या गुहेमध्ये धावायला लागला. दिसत मात्र नव्हता. अखेर काही वेळानी खीर ठेवलेल्या टोपाचा आवाज आला. राजेशने त्या दिशेने विजेरीचा प्रकाश टाकताच टोपाच्या काठावर बसून खीर खाणारा तो उंदीर आता आम्हाला दिसला. अंगावर प्रकाश पडल्यामुळे उंदीर आता पळापळ करू लागला होता. तिकडून तो जो पळाला तो थेट मयूरच्या अंगावरून विदुलाच्या अंगावर. आता विदुला अशी काही ओरडली की आख्खा गड जागा झाला असता. तिने उंदराला जो उडवला तो थेट माझ्या उजव्या पायावर येऊन पडला. एका घातीकेसाठी आमची चक्क नजरानजर झाली... Happy पण मी त्याला काही करायच्या आत तो पसार झाला. नंतर काही तो आम्हाला दिसला नाही.

आम्ही सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजत आले होते. पाउस रात्रभर बाहेर कोसळतच होता. गडावर सगळीकड़े धुके पसरले होते. समोर ५ फूटांवरचे सुद्धा काही दिसत नव्हते. आम्ही अखेर परत निघायचे ठरवले. आवराआवरी केली, चहा बनवला आणि पुन्हा परतीच्या मार्गावर निघालो. पुन्हा एकदा गडाचा दरवाजा आणि त्या खालचा निमूळता भाग सावकाश उतरून त्या फाटक्या-तुटक्या शिडीकडे पोचलो. पुन्हा तीच कसरत. ह्यावेळी जास्त काळजी कारण आता उतरत होतो. एक-एक करून आम्ही दोन्ही शिड्या उतरून खाली आलो आणि डोंगर उतरायला लागलो. आता रस्ता चुकायचा प्रश्न नव्हता. उतरायचा वेग सुद्धा चांगला होता. पण आता काळजी होती ती प्रवरा नदीच्या प्रवाहाची.

अर्ध्याअधिक अंतर पार करून आम्ही खालपर्यंत येउन पोचलो होतो. प्रवरा नदीचा घोंघावणारा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. गेल्या २ दिवसात पडलेल्या तुफान पावसाने नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते. आम्ही जेंव्हा प्रवाहांसमोर येउन उभा ठाकला, तेंव्हा मात्र आम्ही थक्कच झालो. कारण प्रथमदर्शनी तो पार करून जाणे अशक्य वाटत होते. आता मागे फिरणे सुद्धा शक्य नव्हते. आम्ही थोड़े पुढे सरकून प्रवाह पार करायला योग्य जागा शोधू लागलो. काही वेळात अशी एक जागा सापडली. इथे पात्र तसे जास्त मोठे नव्हते पण पाण्याला प्रचंड वेग होता. कारण पाण्यात पाय टाकल्या-टाकल्या मला ते जाणवले. ह्या आधी सुद्धा आम्ही उधाणलेली उल्हासनदी २-३ वेळा पार केली आहे पण हे प्रकरण सोपे असणार नाही ह्याची जाणीव आम्हाला आली होती. १५ मीटर रुंद पात्राच्या बरोबर मध्ये एक झाड़ आणि त्याखाली थोडी उथळ जमीन होती. आधी तिथपर्यंत जायचे असे मी ठरवले होते. माझ्या मागे राजेश होताच. आम्ही आमच्या जड सॅक्स घेउन त्या प्रवाहात शिरलो खरे पण त्या फोर्सने वाहुन जायला लागलो. पाय पाण्याखालच्या जमिनीवर टिकेनाच. कसेबसे स्वतःला सावरले आणि पुन्हा माघारी फिरून बाहेर आलो. ह्यावेळी अधिक जोमाने आत शिरलो आणि जोर लावून पुढे सरकायचा पर्यंत करू लागलो. एक-एक पाउल टाकायला खुप वेळ लागत होता. कारण पाउल उचलले की तुमचा तोल गेलाच म्हणून समजा. जमिनीलगत पाउल पुढे सरकवणे इतकेच काय ते शक्य असते. इतका वेळ मागे उभे राहून बाकी सगळे आमची प्रत्येक हालचाल बघत होते. विदुलाच्या डोळ्यात तर आता आपण इकडेच अडकलो असे भाव होते. शेवटी अथक प्रयत्न करून काही मिनिटांनी मी आणि राजेश त्या उथळ जागेमध्ये पोचलो. आता हातांची साखळी करून एकेकाला ह्या साइडला आणणे गरजेचे होते. ह्या सगळ्या मध्ये बराच वेळ गेला. अखेर एक-एक करून सर्वजण मध्ये येउन उभे राहिलो. काही फोटो टिपावेत असे वाटत होते, पण प्रसंग बघता तिकडून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. पुढचा ७-८ मीटरचा प्रवाह भलताच वेगात होता. पाय टाकल्या-टाकल्या मी सरकून पुढे जात होतो. मागून राजेशचा आधार घेत-घेत कसाबसा पुढे सरकत होतो. अचानक राजेशचा तोल गेला. प्रवाह बरोबर तो वाहून जायला लागला. मी फार काही करू शकत नव्हतो. मी आधार घेत असलेल्या हातानेच त्याला थोडा आधार दिला. हुश्श्श्श्श ... दोघे पण स्थिर झालो.

वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पाय चांगलेच भरून आले होते. ह्या ठिकाणी अजून काही वेळात मी टिकणार नाही हे समजायला लागले होते. आता उरलेला टप्पा लवकर पार करणे गरजेचे होते. पुढच्या ७-८ मीटरच्या टप्यात बरोबर मधोमध एक पक्की जागा मिळवून तिकडे काही वेळ ठाण मांडून बसायचे (म्हणजे उभे राहायचे) असे मी ठरवले होते. त्याशिवाय सगळ्यांना ह्या बाजूला आणणे शक्य झाले नसते. पुन्हा राजेशचा आधार घेत पायाखाली दगड चाचपडत मी हळूहळू पुढे सरकलो. पाणी सारखे मागे लोटत होते. एके ठिकाणी मला हवी तशी जागा सापडली. तिकडेच पाय घट्ट रोवून उभा राहिलो. आता वेळ दवडून उपयोग नव्हता. मी राजेशला पुढे सरकायला सांगितले आणि अभि आता राजेशच्या जागी येउन उभा राहिला. आता राहिलेला प्रत्येक जण आधी अभि, मग मी आणि शेवटी राजेश अश्या साखळीमधून पार जाणार होता. एक-एक जण आता मानवीसाखळी करत प्रवाह पार करू लागले. पहिली विदूला आली पण ती थोडी घाबरलेली वाटत होती. मी तिला मजेत म्हटल "काळजी करू नकोस.. आम्ही तूला सोडून जाणार नाही. जाऊ तर घेउनच ... " तिने पहिला पाय पाण्यात टाकला आणि ती पाण्यामध्ये वाहुन जायला लागली. तिला उभे सुद्धा राहता येइना. शेवटी मला माझी जागा सोडून मागे सरकावे लागले आणि तिला थोडा आधार द्यावा लागला. अखेर ती हळूहळू सरकत सरकत राजेशपर्यंत पोचली. आता त्या मागुन मग दिपाली, अमृता, मयूर, कविता, अमेय, मनाली असे एका मागुन एक जण पार करून राजेशकड़े पोचले. अभि सुद्धा पुढे सरकला. आता मीच तेवढा पाण्यात होतो. राजेश पुन्हा थोडा मागे आला आणि मला हात देऊन बाहेर काढला. अखेर अजून एक दिव्य पार करून आम्ही सर्वजण सहीसलामत पलिकडे आलो होतो. आता पुन्हा रस्त्याला लागणे गरजेचे होते. २-५ मिं. मध्ये तो सापडला. नुकताच पार पडलेला प्रसंग सारखा आठवत होता.

खरच... मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही.

काही वेळातच आम्ही रतनवाडीच्या अगदी जवळ येऊन पोचलो. पाउस सुद्धा कमी होत होता. जणू काही २ दिवस आमची परीक्षा पाहण्यासाठीच तो कोसळत होता. वाडी जवळ पोचलो तेंव्हा पाउस चक्क पुर्णपणे थांबला होता. ऊन-पावसात मंदिर आणि परिसराचे रूप खुलून आले होते. काल न घेता आलेले काही फोटो आम्ही घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. आल्या मार्गाने शेंडीला पोचलो आणि तिकडून S.T. ने कसाऱ्याला. एक थरारक ट्रेकची सांगता करत आम्ही कसाऱ्यावरुन घरी जायला निघालो होतो. अर्थात पुढच्या ट्रेकची प्लानिंग करतच...

ह्या २ दिवसात प्रचंड पावसामुळे रतनगड़ किंवा वाटेवरचे फोटो मला काढता आले नाहीत पण रतनवाडी येथील 'अमृतेश्वर मंदिर' परिसर आणि पुष्कर्णीचे काही फोटो घेता आले ते देत आहे...

पुष्करणी --->>>

पुष्करणी समोरील श्री गणेश आणि भगवान विष्णु यांच्या मुर्त्या.--->>>

कोरलेले युद्धप्रसंग --->>>

अमृतेश्वर मंदिराचे कोरीव खांब.--->>>

विखुरलेली शिल्पे --->>>

आणि त्या ट्रेकमधला हा माझा सर्वात आवडता फोटो... Happy

*****************************************************************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान वर्णन. अजून फ़ोटो असायला हवे होते.
त्या भागातल्या गडांवरच्या शिड्या आता बदलायल्या
हव्यात. आता त्यांचा आधार न वाटता भितीच वाटते.

दिनेशदा, त्या शिड्या तशाच स्थितीत असल्या तरच बरे असेही बरेचदा वाटते. परवा शनी/रवी आणि गटारीच्या सोमरसयोगामुळे पावसांतही चिंग नि चिंब पब्लिक तिकडे होतीच. ट्रेकर्सना शिड्या नसल्या तरी जातात आपले दोर लावून.. बाकी ही डोंगररांग ऑगस्टांत भटकायला कंड लागतो आणि असा कंडाळू भटक्या सापडल्याबद्दल आनंद झाला.

मस्त वर्णन... Happy
आणि प्रकाशचित्रे ही खासच.
भंडारदरा, कळसूबाई, रतनगड एकदा का या परीसरात गेले कि इथला निसर्ग वेढ लावतो. पुन्हा परतण्याचे.

सही रे रोहन Happy
... पावसाळ्यात तुम्ही रतनगडाला गेलात ... मानल पाहिजे तुम्हाला..
त्या नदिच्या वाटेने जात असताना दोन-तीन वेळा ओलांडुन जावे लागते.आम्ही हिवाळ्यात त्याच वाटेने गेलो होतो.तुम्ही ज्या गुहेच्या बाजुला असलेल्या मंदिरात राहिला होता.तेथेच आम्ही पण राहिलो.
आमचा हा रतनगडाचा अनुभव ... http://www.maayboli.com/node/12976

अरे तुम्ही गडावर होता आणि आम्ही खाली.

सोबत माझा १० वर्षाचा मुलगा बघुन, रतनगडवाडीच्या लोकांनी आम्हाला पुढे जाऊच दिले नाही. तेव्हा हळहळले होते पण आता हे वाचून वाटते बरे झाले आम्ही परत फिरलो ते Happy

असाच माझा अनुभव - चक्क राजमाचीला, दुसरया ओढ्यापाशी एक मुलगी वाहता वाहता वाचली होती.
त्या आठवणी जाग्या झाल्या.

वाचतानासुद्धा दडपण आले, श्रेय वातावरणाला, रतनगडाला आणि तुमच्या लेखनशैलीला Happy

वा छान वर्णन. अजून फ़ोटो असायला हवे होते.
त्या भागातल्या गडांवरच्या शिड्या आता बदललेल्या आहेत.आम्ही octmber महीनेत ट्रेक केला.आहे.

पावसाळ्यात ह्या भागात जाण हे मोठ्या धोक्याच आणि धैर्याच काम आहे. तूमच्य धैर्याच कौतुक करावस वाटत. मस्त वर्णन

<<<<माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही.>>>>>> धाडसाबद्दल कौतुक, पण जरा जपून रे बाबा......
सर्व प्र चि अतिशय सुंदर, एवढ्या भर पावसातही हे फोटो काढले हे तर फारच विशेष........