मोहमद रफी - विसरलेले सोनेरी पान

Submitted by मनीषा- on 29 July, 2011 - 12:40

मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....

सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.
लता मंगेशकर गानसरस्वती आहेत. आशा भोसले रसिकांच्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. किशोरकुमार यांना तरुणाच्या मनात विशेष स्थान आहे. ह्या सगळ्यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख, त्यांची महती अनेकदा वृत्त माध्यमातून ऐकू येते. पण तितक्या प्रमाणात रफी साहेबांची थोरवी गायलेली आढळत नाही.

विरोधाभास असा की ४-५ वाहिन्यांवर जी जुनी हिन्दि गाणी लावतात त्यात मोहम्मद रफींना पर्याय नसतो. कार मधे, बस मधे , मोबाईल मधे भरून गाणी ऐकणार्‍यांमधे रफीसाहेबांचे अगणित चाहते सापडतात. असे रफीसाहेब आपल्यामधे अजूनही सर्वार्थाने जिवंत असताना, माध्यमामधे त्यांना अशी वागणूक का असावी?

खरे तर मोहमद रफी खेरीज हिंदी चित्रपट संगीत अपूर्ण आहे. पण तरीही भारताच्या या सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकाच्या वाट्याला अशी उपेक्षा का येत असावी? तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आराधना नंतर रफिला थोडी कमी गाणी मिळत होती, पण त्यानंतर त्याने भरारी घेतलीच. (लता,आशा, रफी, किशोर हि आमच्याशी नातं जोडलेली माणसं, त्यांचा आदरार्थी अनेकवचनात उल्लेख शक्य नाही.)

संजय गांधीच्या एका कार्यक्रमात गायला नकार दिल्याने, किशोरकुमारवर सरकारी माध्यमांनी बंदी घातली होती. पण ती लवकरच उठली. इंदिरा गांधी गेल्यावर, तो स्वतः, अमित आणि लिना एकत्र गायले होते, दूरदर्शनवर.

पण आजही त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेतच, कायम राहतील.

थोडी आणखिन माझ्या आवडीची

छ्लकाये जाम आईये आपके आंखोके नाम (मेरे हमदम मेरे दोस्त)
अकेले है चले आओ कहां हो (राझ)
ये जो चिलमन है दुश्मन है हमारी (मेहबुब की मेंहेंदी)
तुम बिन जाउ कहां (प्यार का मौसम) (हे किशोर कुमार ने पण गायले आहे)
आजा रे आ जरा( लव्ह इन टोकियो)
तुम जो मिल गये हो (हसते जख्म)
to be continued... स्मित

हीरा तुम्ही दिलेली माहिती अचूक आहे. धन्यवाद. माझ्याकडून चूक झाली. माझी पिढी अशी आहे कि ज्यांना जन्माच्या आधीचे समकालीन आणि आता येणारे युग अशा तिन्हींचा स्पर्श झालेला आहे. मागच्या पिढीकडून जुनी गाणी, सिनेमे यांच्याबद्दल इतकी भरभरून माहिती मिळाली कि ते कधीच जुनं वाटलं नाही. अर्थात माहितीमधे चुका असू शकतातच :). असो.

मेरे मेहबूब तुझे, मेरी मुहब्बत कि कसम

हे गाणं माझं विशेष आवडतं आहे.

जुन्या नव्या अश्या कोणत्याच काळातील गायकाच्या गायकीला 'रफ्फी'ची सर येणार नाही....

एकाच चित्रपटात ६ गाण्यात एकच गाणे ज्याने गावे आणि तेच गाजावे....देशभक्तिपर गीत गाताना ज्याचा कंठफुटून रक्तस्त्राव व्हावा....सरकारने संपुर्णपणे आयकर उठवावा..... अशी ज्याची महती तो 'रफ्फी'...आणि 'रफ्फी'च.

खास आकर्षण:
चलो रे डोली उठाओं कहार -
दोंनों ने किया था प्यार मगर -
मैने पूछा चाँद से -
मै कहीं कवि न बन जाउं-
नफरत की दुनिया को छोड के -
कौन है जो सपनों मे आया-
आजा तुझको पूकारें मेरे गीत -
मै इक राजा हुं तु इक रानी है -
नजर न लग जाये किसी की राहों में-
तुम जो मिल गये हो-
तेरी गलीयों मे न रखेंगे कदम -
बाबुल की दुआएं लेती जा-
.
.

क्रमशः-

आजच्या लोकसत्ता-लोकरंग मधे सुनील देशपांडे यांचा काहिसा याच विचारावरचा लेख :

त्यातला हा एक परीच्छेदः

लोकांनी एकदा एखाद्यावर मान्यतेची मोहर उठवली, की बस. बाकी सारं झूट! आता ज्या चित्रपटानं राजेश खन्नाला यशोमंदिराची वाट दाखवली, त्या ‘आराधना’मध्येही रफीनं दोन गाण्यांत राजेशला आवाज दिलाच होता ना! पण लोकांनी फक्त किशोरला पसंती दिली. पुढल्या काळातही रफीनं राजेशकरिता ‘गुलाबी ऑँखें’ (दि ट्रेन), ‘ये रात है प्यासी प्यासी’ (छोटी बहू), ‘नफरत की दुनिया को’ (हाथी मेरे साथी), ‘ये जो चिलमन है’ (मेहबूब की मेहंदी) ही गाणी गाताना तो कुठंच कमी पडला नव्हता. पण तोवर किशोर खूप पुढे निघून गेला होता. नवनवी शिखरं गाठत होता. राजेश-युग अस्ताला जाऊन अमिताभचा करिश्मा आला तरी किशोरच्या स्थानाला धक्का बसला नाही.
या घसरणीनं कुणीही हताश झाला असता. पण रफी डगमगला नाही. त्यानं चाहत्यांचा हा कौल खिलाडूपणे स्वीकारला. ‘एवढे दिवस मी गात होतोच ना, आता किशोरला यश मिळतंय तर मिळू देत, त्याचा तो हक्कच आहे,’ असं रफीनं खासगीत बोलून दाखवलं होतं. खुद्द किशोरनंदेखील या यशानं हुरळून न जाता रफीचा योग्य तो मान राखला. (त्या दोघांनी एकत्रितपणे गायलेल्या गाण्यांची संख्या सत्तरच्या घरात आहे. त्या अर्थानं त्या दोघांचा ‘दोस्ताना’ अखेपर्यंत सलामत राहिला. दोन प्रतिस्पर्धी गायकांमधलं हे जिव्हाळ्याचं नातं फार कमी अनुभवायला मिळतं.)
रफी अपयशानं डगमगणारा नव्हता. पण अपप्रचाराला तो घाबरत असावा. ‘रफीचा आवाज पूर्वीसारखा राहिला नाही,’ अशी कुजबुज काही हितशत्रूंनी केली तेव्हा तो नक्कीच अस्वस्थ झाला असणार. मदनमोहनचा मुलगा समीर कोहलीनं एके ठिकाणी सांगितलेली आठवण इथं स्मरते. १९७२-७३ चा काळ असावा. रफी एका भेटीत मदनमोहनना म्हणाला, ‘मदनजी, अलीकडे गाण्यात मन लागत नाही. माईकसमोर जाताक्षणी वाटतं- आपण गातोय खरं, पण लोकांना आपला आवाज आवडेल का?’ त्यावर मदनमोहन त्याला म्हणाले, ‘तुझ्या आवाजाला काहीएक झालेलं नाही. उणीव आहे ती फक्त या आवाजाचा योग्य वापर करणाऱ्यांची. तुझ्यासाठी मी एक उत्तम गाणं बनवलंय बघ. तू पूर्ण समरसून गा. लोक तुला पुन्हा डोक्यावर घेतील.’ मदनमोहन यांनी रफीला दिलेलं ते गाणं होतं ‘हॅँसते जख्म्म’मधलं- ‘तुम जो मिल गये हो..’ रफी खराखुरा ‘दिसतो’ तो या गाण्यात!

संपूर्ण लेख इथे वाचा.

खरंच आहे "किंग इज ऑलवेज किंग!"

रच्याकने, रफीची सगळीच गाणी आवडतात, त्यातल्या त्यात "तुम जो मिल गये हो" आणि "कही एक मासूम नाजुक सी लडकी" हि दोन गाणी जरा जास्तच. Happy

श्री.जिप्सी ~ चांगली माहिती पुरविली आहे. [त्यातील मदन मोहन यांचा किस्सा यापूर्वी अन्यत्र वाचलाही होता, पण आता या धाग्याच्या निमित्ताने तो परत नवा वाटतोय.]

मिरज येथील जावेद मुल्लाणी या तिशीतील युवा चित्रकाराने "महंमद रफी" या एकाच विषयावर जीवतोड मेहनत करून, प्रसंगी कर्जबाजारी होऊन एक विलक्षण असा फोटोग्राफ्स संग्रह तयार केला आहे, ज्याचे कौतुक खुद्द रफी कुटुंबातील सर्वच घटकाने केले आहे. शाहीद या रफी पुत्राने तर त्यातील अनेक फोटोग्राफ्स स्वत:कडेही नसल्याचे प्रांजळपणे कबुल केले आहे. रफीवर जावेदने चितारलेल्या पेंटिंग्जचे लवकरच [कदाचित मार्च २०१२ च्या आगेमागे] प्रदर्शन पुणे आणि मुंबई येथे भरले जाईल. त्याचा तपशिल जसजसा उपलब्ध होईल तसे इथे जाहीर करण्याचा मानस व्यक्त करीत आहे. अर्थात त्या त्या वेळी स्थानिक पेपर्समध्ये सूचना येईलच.

रफीवर जावेदने चितारलेल्या पेंटिंग्जचे लवकरच [कदाचित मार्च २०१२ च्या आगेमागे] प्रदर्शन पुणे आणि मुंबई येथे भरले जाईल. त्याचा तपशिल जसजसा उपलब्ध होईल तसे इथे जाहीर करण्याचा मानस व्यक्त करीत आहे. अर्थात त्या त्या वेळी स्थानिक पेपर्समध्ये सूचना येईलच>>>>>धन्यवाद अशोकजी. Happy

परवा ३१ जुलै ला रफी यांच्या ३१ व्या पुण्यतिथिनिमित्त विविधभारतीने दिवसभर अनेक उत्तमोत्तम गाणी ऐकवली. मी अगदी दुपारी १/२ वाजल्यापासुन रात्री ११ पर्यंत अनेक वेगवेगळे कार्यक्रम आवर्जुन ऐकले. एका कार्यक्रमात नौशाद यांचे निवेदन (रफीच्या आठवणी) होते. त्यांचे ते उर्दुप्रचुर निवेदन ऐकायला फार मजा वाटत होती. आजकाल अशी भाषा अभावानेच (जवळ जवळ नाहीच) ऐकायला मिळते.
तसेच एका कार्यक्रमात संपुर्ण जिवनपट सांगितला, कारकिर्द, मिळालेले पुरस्कार, इ.
विशेष म्हणजे दिवसभर एवढी गाणी ऐकली त्यात युगल गीते नव्हती, तसेच प्रसिद्ध गीतांबरोबरच अप्रसिद्ध पण चांगली गीते पण होती.
मला तरी वाटते की हे "सोनेरी पान" जरूर आहे पण "विसरलेले" नाही. निदान अजुनतरी.

रफीची गाणी आणि रफी एकमेवाद्वितीय आहे. लता शी वाद होऊन ही त्याच्या गाण्यांवर आजिबात परिणाम झाला नाही. तो तेव्हढ्याच जोमाने गात होता उदा. सांज और सवेरा, सुरज, ममता, गझल गाईड, आणि किती सांगू? आणि मुख्य म्हणजे रफीने कधीच राजकारण केले नाही जे एका महान गायिकेने नेहेमी केले. त्यामुळे रफी च्या काळात इतर अनेक गायक अस्तित्वात होते. तरीही रफी हा पार्श्वगायनात शिखर स्थानी होता. रफीच्या प्रचंड प्रभावापुढे किशोर सारखे अप्रतिम गायक हि १९७० पर्यंत म्हणजे २० वर्षे पुढे येऊ शकले नाहीत. रफीने जसे काही आपल्या आवाजाच्या प्रभावाने बेधुंद केले होते. पण आज ची पिढी हि निश्चित उथळ आहे.वर-वर चांगले असले कि ते त्यावर पटापट उड्या मारतात. आजच्या पिढीला किशोर आणि आर डी शिवाय दुसरे माहित नाही. नौशाद, मदन, चित्रगुप्त, एन.दत्ता, सी रामचंद्र, रोशन, हेमंत कुमार, तलत शकील बदायुनी, कमर जलादाबादी यांचेही असेच झाले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी कि रफिचे नाव अनेक वेळा टाळले जाते कारण चुकून तो किशोर पेक्षा प्रसिद्ध झाला तर? अर्थात रफी काय आणि किशोर काय स्वत: एकमेकांचे उत्तम मित्र होते. किशोर हा रफीचा मोठा चाहता होता. आणि रफिनेही त्याला स्वतःचा प्रतिस्पर्धी मानले नाही. ते म्हणतात न! कि महापुरुषांचे अनुयायीच त्यांचा पराभव करतात.मग ते आंबेडकर असोत व शिवाजी राजे.
आणि अलीकडे असेही एक समीकरण बनले आहे. कि चांगली अभिनेत्री म्हणजे रेखा, सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला गायक म्हणजे लता![बाप रे ! ते एक वेगळेच प्रकरण आहे लताला तर या लोकांनी (आणि तिने स्वतः हि स्वतःला) देवी बनवले आहे.] जसे कि तलत, मुकेश, सैगल, मन्ना, हेमंत गायकच नव्हते. साधना, मीना कुमारी श्यामा, अभिनेत्र्याच नव्हत्या.
असो याला कारण आजच्या मुलांना खोलात जायची अधिक काही माहित करून घ्यायची इच्छाच नाही हेच आहे.

रफीची गाणी आणि रफी एकमेवाद्वितीय आहे. लता शी वाद होऊन हि त्याच्या गाण्यांवर आजिबात परिणाम झाला नाही. तो तेव्हढ्याच जोमाने गात होता उदा. सांज और सवेरा, सुरज, ममता, गझल गाईड, आणि किती सांगू? आणि मुख्य म्हणजे रफीने कधीच राजकारण केले नाही जे एका महान गायिकेने नेहेमी केले. त्यामुळे रफी च्या काळात इतर अनेक गायक अस्तित्वात होते. तरीही रफी हा पार्श्वगायनात शिखर स्थानी होता. रफीच्या प्रचंड प्रभावापुढे किशोर सारखे अप्रतिम गायक हि १९७० पर्यंत म्हणजे २० वर्षे पुढे येऊ शकले नाहीत. रफीने जसे काही आपल्या आवाजाच्या प्रभावाने बेधुंद केले होते. पण आज ची पिढी हि निश्चित उथळ आहे.वर-वर चांगले असले कि ते त्यावर पटापट उड्या मारतात. आजच्या पिढीला किशोर आणि आर डी शिवाय दुसरे माहित नाही. नौशाद, मदन, चित्रगुप्त, एन.दत्ता, सी रामचंद्र, रोशन, हेमंत कुमार, तलत शकील बदायुनी, कमर जलादाबादी यांचेही असेच झाले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी कि राफिचे नाव अनेक वेळा टाळले जाते कारण चुकून तो किशोर पेक्षा प्रसिद्ध झाला तर? अर्थात रफी काय आणि किशोर काय स्वत: एकमेकांचे उत्तम मित्र होते. किशोर हा रफीचा मोठा चाहता होता. आणि रफिनेही त्याला स्वतःचा प्रतिस्पर्धी मानले नाही. ते म्हणतात न! कि महापुरुषांचे अनुयायीच त्यांचा पराभव करतात.मग ते आंबेडकर असोत व शिवाजी राजे.
आणि अलीकडे असेही एक समीकरण बनले आहे. कि चांगली अभिनेत्री म्हणजे रेखा, सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला गायक म्हणजे लता![बाप रे ! ते एक वेगळेच प्रकरण आहे लताला तर या लोकांनी (आणि तिने स्वतः हि स्वतःला) देवी बनवले आहे.] जसे कि तलत, मुकेश, सैगल, मन्ना, हेमंत गायकच नव्हते. साधना, मीना कुमारी श्यामा, अभिनेत्र्याच नव्हत्या.
असो याला कारण आजच्या मुलांना खोलात जायची अधिक काही माहित करून घ्यायची इच्छाच नाही.

असो याला कारण आजच्या मुलांना खोलात जायची अधिक काही माहित करून घ्यायची इच्छाच नाही.
अहो सुहासिनीआजी! आमचं सोडा, आधिच्याच पिढीतले लोक्स सांगतात की या गोष्टी... Happy

कारमध्ये माझ्या पेन ड्रा. त असलेली .. यातील बरीचशी उडती गाणी आहेत excellnt..
१. धीरे चल धीरे चल ऐ झुकी हवा
२. तेरी जुल्फों से
३. ये आंखे उफ यु मा
४. अय्यय्या सुकु सुकु
५. मुझे अपना यार बनालो फिर हो जाउ संसार का
६. मेरी मोहोब्बत जवॉ रहेगी
७. जिया ओ जिया कुछ बोल दो
८. बिन देखे और बिन पहचाने
९. आइगो आइगो .आइगो ये क्या हो गया
१०. गोविंदा आला रे
contd...

ही तर झलक आहे. हल्लीच्या श्वान विव्हळ स्वरांत गायलेली गाणी (सुफी श्टाईल म्हणे.. श्या:!)मिर्चीवर ऐकण्यापेक्षा मी ही गाणी पसंत करतो. ही सर्व गीते इन्टरनेटवर आहेत.
मला नाही वाटत रफींना underestimate केलं जातंय..!! आत्तासुध्धा 'रुख से जरा नकाब.." ऐकतच टाइपणे चालू आहे.
- रफीप्रेमी हेम

ता.क.- वर कुणीतरी नमुदलेलं 'इक बुत बनाउंगा' - असली नकली चित्रपटातलं आहे.

मलाही जाणवलेली गोष्ट आहे ही. पण त्याचं उत्तरही बघायला हवं.

रफी साहेब बरेच आधी गेले (गुगळून नाही बघत). त्यांचे युग आराधना नंतर संपले. त्याचा दोष आरडीला दिला जातो. सचिनदादा आजारी असताना आरडींनी रफींच्या वाटेची गाणीही किशोरकडून गाऊन घेतली असा आक्षेप आहे. पण माहिती घेतली तर असे कळाते की रफी तेव्हां हज यात्रेवरून आले होते. ते खूपच देवभोळे आणि धार्मिक होते. त्यांना कुणी तरी सांगितले की हज वरून आल्यानंतर अल्लाने दिलेल्या देणगीचा (गायकीचा) उपयोग करून पैसे कमावता येत नाही. त्यांनी विश्वास ठेवला आणि ते बराच काळ गाणी गात नव्हते. त्याच काळात आराधनाची गाणी रेकॉर्ड होत होती. रफी साहेबांना जेव्हां धार्मिक गुरूकडून असे काही नसते असे समजले तेव्हां त्यांनी पुन्हा गाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांना दोन गाणी मिळाली. पण तोपर्यंत राजेश खन्ना = किशोर हे रूढ झाले होते. पुढचा काळ राजेश खन्नाचा असल्याने किशोरकुमार फॉर्म मधे राहीले.

दुसरे कारण म्हणजे रफी कुठल्याच गाण्याला नाही म्हणत नसत. त्यामुळे काही काही भिकार गाणीही त्यांच्या वाट्याला आली. किशोर कुमार यांना करीअरचं भान होतं. ते हिट होऊ शकणारीच गाणी म्हणत. त्यामुळे त्यांना मागेल ती फीस मिळत असे.

ऋषीकपूरच्या लैला मजनू मुळे रफी पुन्हा आघाडीवर आले. त्यानंतर पाच सहा वर्षे ते असतील बहुतेक. मला नेमके माहीत नाही. किशोरकुमार यांचे बर्मन घराण्याशी घरगुती संबंध होते तसे रफी यांचे कुणाशीच नव्हते. ते पार्ट्यांना जात नसत. कामाशी काम ठेवल्याने ते गेल्यानंतर त्यांचं विस्मरण होत गेलं.
त्यांचा मुलगा गायक नसल्याने ते घराणं दूर फेकलं गेलं.

रानभुली किती छान किस्सा. माझ्या वडीलांचे आवडते गायक रफी,मुकेश,तलत आणि हेमंत कुमार. कधी कधी किशोर पण.

रफी ची गाणी मलाही आवडतात. कश्मिर की कलि मधिल दिवाना हुआ बादल गाणे सुरू होण्याआधी हो हो हो चा सुर लावला आहे तो फक्त रफी नेच.

रफी आणि लताचा एक किस्सा मी वाचला होता. तस्वीर तेरी दिल में या गाण्यात अंतरा गाताना लताचा आवाज सुरात येत नव्हता पण तेच रफिचे मुखडा आणि अंतरा दोन्ही कुठेही चुकले नाहीत. बरेच रिटेक झाले गाण्याचे. त्यामूळे लताला रफिचा राग आला होता. पण त्यांचे रॉयल्टी वरुन भांडण नंतर झाले. ते गाणे कधी ऐकून पहा लगेच आवजातील फरक कळतो

युट्यूबला आहे हा किस्सा. लताचा आग्रह होता कि हे गाणे अमूक एका स्केल मधे असावे. पण लताचा स्वर दोन ठिकाणी कातर झाला. ते दोन तीनदा बदलले गेल्यावर रफी कधी नाही ते चिडले. मी कुणाचं ऐकायचं ? संगीतकाराचं की या महाराणींचं असं ते म्हणाले यावरून वाद झाले.

वाह! अचानक रफिंचा धागा वर आलाय. अतुल ठाकूर यांचे रफिंवरचे धागे वाचत आलो. पण हा त्याही आधीचा बराच जुना दिसतोय. नक्की वाचायलाच हवा.

राभू खूपच रोचक व पूर्वी कधी न वाचलेले किस्से.
@सियोना: हे माहीत नव्हते. आता ऐकून पाहतो.

>> तसे रफी यांचे कुणाशीच नव्हते. ते पार्ट्यांना जात नसत. कामाशी काम ठेवल्याने ते गेल्यानंतर त्यांचं विस्मरण होत गेलं.

यालाच दुजोरा देणारी अजून एक रोचक गोष्ट ऐकली, ती म्हणजे लता-रफी यांनी इतकी सारी गाजलेली गाणी एकत्र गायली आहेत. पण इतक्या दीर्घ कारकिर्दीत रफी यांचे कुटुंबीय व लता मंगेशकर यांची एकदाही भेट झालेली नाही. रफिंच्या कुटुंबियांपैकी कोणाच्यातरी (बहुतेक कन्या) मुलाखतीत हा उल्लेख आहे.
गाण्याच्या रेकॉर्डिंग वा रिहर्सलसाठी घर ते स्टुडिओ, आणि गाणे झाले की पुन्हा घर असा रफिंचा शिरस्ता असे Happy

रफी आणि लताचा एक किस्सा मी वाचला होता. तस्वीर तेरी दिल में या गाण्यात अंतरा गाताना लताचा आवाज सुरात येत नव्हता पण तेच रफिचे मुखडा आणि अंतरा दोन्ही कुठेही चुकले नाहीत. बरेच रिटेक झाले गाण्याचे. त्यामूळे लताला रफिचा राग आला होता. पण त्यांचे रॉयल्टी वरुन भांडण नंतर झाले. ते गाणे कधी ऐकून पहा लगेच आवजातील फरक कळतो>>

हा किस्सा माहिती होता. तसंच जंगली आणि आरजू चित्रपटात रफी आणि लता यांनी सेमच गाणं म्हटलं आहे (एहसान तेरा होगा मुझपर आणि अजि रूठकर अब कहा जाईयेगा) पण रफीच्या पट्टीशी समतोलता ठेवण्यासाठी लताला खूप वरच्या पट्टीत गावे लागे त्याबद्दल तिने संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडे नाराजी दर्शवली होती. ही गाणी ऐकल्यावर लताचा आवाज किती कमालीच्या टिपेवर लागला आहे ते समजतं, बेसुरं नाही पण ऐकायला थोडे कर्कश नक्की वाटते.

सारेगम कारवॉं ऐकताना जाणवतं की स्किप करावी अशी गाणी खूपच कमी आहेत. रफी लवकर गेल्यामुळे सिनेसंगीताच्या पडत्या काळातली गाणी गायची वेळ त्यांच्यावर आली नाही.
तेच किशोर कुमारने ( आणि आशाने) जितेंद्रच्या साऊथच्या सिनेमातली झोपडीमें चारपाई टाइप गाणी मोठ्या संख्येने गायली.

लता मंगेशकर ही जबरदस्त गायिका आहे. काही गाण्यात टीपेला जाऊनही तिने केलेली कमाल पाहता अंगावर अक्षरशः रोमांच उठते. एक कलाकार म्हणून लताला शतशः नमन. ती आशापेक्षाही उजवीच ठरते. मात्र काही गाणी तिच्या नाजुक किणकिणत्या आवाजाला सूट होत नसत. तिथे आशाचं अष्टपैलुत्व कामी येत असे. रफी आणि लता यांच्यातला वाद जगजाहीर आहे. पण दोघात कुणी श्रेष्ठ कनिष्ठ असे ठरत नाही.

रफीच्या गायकीला सुफी गायकीची जोड आहे. त्याने तालीम घेतली तीच एका सुफी संताकडे. आता ब-याच जणांना हे माहीत असेल. सुफी गायकीमधे खड्या आवाजाला महत्व आहे. त्यामुळे जिथे नॉर्मल गायकांची रेंज संपते तिथेही ही मंडळी आरामात गातात. रफी वरच्या पट्टीतही कधीच फॉलसेटो मधे जात नसत. स्त्री गायिकांची रेंजच पुरूष गायकांपेक्षा वरच्या पट्टीत असते. हा नैसर्गिक फरक आहे.

त्या गाण्यात लताचा आवाज कातर का झाला याची अनेक कारणे असतील. पण तिची दादागिरी चालायची त्याबद्दल लोकांची प्रतिकूल मतं आहेत. गाण्यात ढवळाढवळ, संगीतकाराने ठरवलेल्या स्केलमधे बदल असे प्रकार ती करत असे. त्यामुळे तिच्याबद्दल तक्रारी असत पण लोक बोलून दाखवत नसत. ती दादा होतीच. एखाद्या गाण्यात आवाज लागण्यावरून ती रफीपेक्षा कनिष्ठ ठरत नाही किंवा त्यावरून रफी तिच्यापेक्षा महान ठरत नाहीत. कलाकार म्हणून ती काय चीज आहे हे सांगण्यासाठी धागाच काढावा लागेल. एक व्यक्ती म्हणून तिच्याबद्दलचे पूर्वग्रह बाजूला ठेवून गायिका म्हणून पाहिले तर लता अद्भुत आहे. रफी लता हे आवाज एकमेकांना पूरक होते. आपण भारतीय खूप सुदैवी आहोत. आपल्याला असे गंधर्व ऐकायला मिळाले.

रफी सोबत गाणार नाही असे लताने जाहीर केले. लता नाही तर रफीला गाणी मिळणार नाहीत असे अनेकांना वाटले. पण या काळात रफीमुळे आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या दोघींना शेकडो गाणी मिळाली. आशा भोसलेची लताच्या सावलीत झाकली गेलेली गायकी या काळात झळाळून उठली. अजून एक गायिका पुढे आली होती. पुढे मागे नाव देईन. याचा परिणाम उलटाच होऊन लताची गाण्यांची संख्या कमी झाली. शेवटी लताने शरण येत रफीसोबत तह केला.

नंतर पुन्हा रफी वर लिहायला येतो.

पा आ किती छान लिहिले आहे. लता ती लताच आहे ही गोष्ट खरी. गायिका म्हणून तीचे अढळ धृवपद आहे. लताची दादागिरी हे कदाचित तिच्या त्यावेळी असणारया गरीब परिस्तिथीमुळे असावे. जास्तीत जास्त गाणी गायला मिळून पैसे कमवावे हा उद्देश कारण घराच्या पालनपोषणाची जबाबदारी लतावर होती.

लता आणि रफी दोन्ही महान गायक आहेत. आपण ह्या ज्या चर्चा करतो त्या त्यांच्या गाण्यावरील प्रेमामुळेच.

रफिवर आणखी किस्से लिहा. आम्हालाही वाचायला आवडेल.

पा आ , लताजीं बद्दलचा एकूण एक शब्द खरा. खूप मोठी माणसं होऊन गेली. त्यांचे आपसात काय वाद असतील ते असतील. आपल्यासाठी काय ठेवून गेले ते महत्वाचं. मला तर अजून लतादीदीची कित्येक गाणी धड गुणगुणतासुद्धा येत नाहीत.

मी काही युट्यूब चॅनेल्स फॉलो करते त्यात गायकांबद्दलची अशी बरीच माहिती असते. काही काही चॅनेल्स ऑथेन्टिक माहिती देतात. लिंक्स दिल्या तर चालतील का इथे ? टंकायचे कष्ट वाचतात.

रफी दुर्लक्षित ह्या मूळ विषयाला सोडून हा धागा लता बॅशिंगवर का उतरला कळले नाही.

लताची रॉयल्टीबद्दलची मते रफिला पटली नाहीत. गायकाने गायचे पैसे एकदा घेतले की विषय संपला, मग भले रेकॉर्ड कंपनी आयुष्यभर ती रेकॉर्ड वाजवून करोडो का कमवेनात, गायकाने तिकडे लक्ष देऊ नये हे त्याचे मत होते. त्याच्या स्वभावाला अनुसरूनच ते होते. पण लताला रेकॉर्ड कम्पनीच्या नफ्यातील भाग हवा होता व तो फक्त गायकच नाही तर गीतकार व संगीतकारासाठी ही हवा होता. तिच्या ह्या हट्टामुळे दोघांनी एकत्र गायले तर रॉयल्टीसाठी एकजण भांडतोय व दुसरा सोडून देतोय असे चित्र होत होते. रफीने नाराजी व्यक्त करताच लताने तुला त्रास होतोय तर मी गात नाही तुझ्यासोबत ही भूमिका घेऊन गाणे बंद केले. नंतर दिलजमाई।झाली तेव्हा रफी फुलांचा मोठा गुलदस्ता घेऊन तिला स्टुडिओत भेटले व मध्ये काही घडलेच नव्हते अशा सुरात गप्पा सुरु केल्या असे स्वतः लताच एका मुलाखतीत रफीचे मोठेपण सांगताना म्हणाली होती.

लताच्या ह्या हट्टामुळे सगळ्यांना रॉयल्टी मिळायला लागली हेही तितकेच खरे आहे. नाहीतर रेकॉर्ड कंपन्या गाणी विकून पैसे कमवायचे आणि ज्यांनी गाणी बनवलीत्यांना एकदाच पैसे देऊन वाटेला लावायची.

ह्या दोधांच्या एकत्र न गाण्याच्या तीन चार वर्षाचा जसे सुमन कल्याणपूरला भरपूर फायदा झाला तसाच महेंद्र कपूरलाही झाला. युगुलगीतांमध्ये रफीसोबत सुमन कल्याणपूर गायली आणि लतासोबत महेंद्र कपूर.

लताचा स्वभाव सडेतोड होता. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की एस डी बर्मनने तिच्याकडून गाऊन घेतलेले एक गाणे त्यांना परत रेकॉर्ड करायचे होते पण कामात व्यग्र असल्यामुळे लताला वेळेत जाता आले नाही. यावर रागावून एसडी काहीतरी बोलल्यावर लताने 'तुम्हाला माझा त्रास होतो तर मी तुमची गाणी गात नाही' म्हणून सांगितले. नंतर त्यांच्यातही दिलजमाई झाली.. तेव्हाच्या टॉपच्या काही हिरॉइन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये माझी गाणी लताच गाईल असेच लिहून घेत असल्यामुळे आणि जे विकले जाते तेच विकण्यासाठी निर्माते आग्रही असल्यामुळे लताला पर्याय नव्हता... शेवटी चित्रपटावर जो पैसा लावतो त्याचे बाकीच्यांना ऐकावे लागते. नदीम-श्रवण जोडीतील श्रवणकुमार राठोड हल्लीच गेल्यावर विजयेता पंडितने त्याला श्रद्धांजली वाहताना म्हटले की चित्रपटात गायची माझी तीव्र इच्छा होती पण संधी मिळत नव्हती, माझा संगीतकार नवराही मला गाण्याची संधी देऊ शकला नाही पण श्रवणकुमार राठोडने निर्मात्याच्या विरोधात जाऊन ती हिम्मत दाखवली.

लताला कितीही नावे ठेवली तरी त्यामुळे तिच्या गाण्यांचा गोडवा कमी होत नाही, ना तिचा सूर ढासळतो. आता ती नव्वदीत गेल्यावर तिच्यावर टीका करून तिला काहीही फरक पडत नाही. तिच्यापेक्षा दैवी सूर असलेली कोणी तेव्हा झाली नाही, झाली असती तर लोक तिच्यामागे धावले असते. जे लोक रफी सोडून किशोरच्या मागे धावू शकले ते लता सोडून अन्य कुणामागे नक्कीच धावले असते. रफी असतानाही किशोर स्वतःचे स्थान मिळवू शकला, लता असतानाही आशा समोर उभी राहू शकली. आशा एका मुलाखतीत म्हणालेली की मी लतासारखे गायचा कधीही प्रयत्न केला नाही. तिच्यापेक्षा वेगळे गायचा कायम प्रयत्न केला व त्यामुळे मी यशस्वी झाले. इतर गायिका का अयशस्वी झाल्या याचे उत्तर आशाच्या या विधानात सापडते.

लता असतानाच अनुराधा पौडवाल या एक दशकभर क्रमांक एकच्या गायोका होत्या. पण लताबाईंच्या गायकीशी त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही. एखादा डिमांड मधे आहे म्हणजे बाकीचे कुणीच चांगले गाणारे नाहीत हे मत तितके पटणारे नाही. लता असताना त्यासारख्या आवाजाचीच डिमांड होती. सुमन कल्याणपूर या कुठेही त्यांची नक्कल करत नव्हत्या. नैसर्गिकरित्या त्यांचा आवाज सारखा वाटतो, तसा तो नाही. जातकुळी एक आहे. त्या काळी वेगळ्या जातकुळीचे आवाज ट्राय केले जात नव्हते. अगदी लतानंतरही अनुराधा पौडवाल आणि नंतर अलका याज्ञिक हे आवाज त्याच टाईपातले होते. उषा उत्थुप वगैरे वेगळे आवाज खूप कमी होते. वाणी जयराम यांचा आवाज थोडा वेगळा होता.

किशोर कुमार आणि रफी यांच्यातही गायकी मधे रफी उजवेच होते. कित्येक गाणी किशोरकुमार यांनी स्वतःच साहब से गवाओ असे म्हणून त्यांच्याकडे पाठवली आहेत.

लोकप्रियता आणि गायकी यांचा संबंध असेलच असे नाही. अल्ताफ राजा, शब्बीरकुमार, मुन्ना अजीज हे सुद्धा काही काळ लोकप्रिय होते. हा काही मापदंड नाही.

रफीचा एक किस्सा हल्लीच विविधभारतीवर ऐकला. जुन्या मुलाखती पुनःप्रसारित करतात त्यात एका गीतकाराची की अजून कोणाचीतरी मुलाखत सुरू होती, त्याच्या तोंडून ऐकला. एका गरीब फटीचर संगीतकाराची इच्छा रफीने आपले गाणे गावे ही होती. रफीच्या सेक्रेटरीने 18,000 फी सांगितली. संगीतकाराने असमर्थता दर्शवली. सेक्रेटरी म्हणाला 15,000. संगीतकाराला तेही परवडणारे नव्हते, शेवटी सेक्रेटरी बोलला तू रफीसाबशीच बोल. रफीशी बोलल्यावर रफीने त्याला विचारले तू किती देऊ शकतोस. संगीतकार बोलला दोन हजार. रफी म्हणाला ठीक आहे, मला चालेल. तो गीतकार ह्या सगळ्याचा साक्षी होता. त्याने रफीला विचारले की तू दोन हजार तरी का घेतलेस, तू फुकटही गाऊ शकला असतास. त्यावर रफी म्हणाला मी फुकट गायलो असतो तर त्या संगीतकाराच्या मनावर आयुष्यभर माझ्या ऋणाचे ओझे राहिले असते आणि मला कदाचित अहंकार वाटत राहिला असता. मला ह्या दोन्ही गोष्टी नकोत.

Pages