दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १

Submitted by वेताळ_२५ on 26 July, 2011 - 06:48

300px-RaigadFort31-tile.jpg
दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २

http://www.maayboli.com/node/27608

शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करताना सह्याद्रीच्या पर्वतराजीतील उत्तुंग दुर्गांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करुन घेतला होता. गडाचे महत्व विशद करताना रामचंद्रपंत आमात्यनी आज्ञापत्रात ’संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ असे सांगून हे राज्य तर तीर्थरुप थोरेले कैलासवासी स्वामींनी (शिवाजीमहाराजांनी) गडावरुनच निर्माण केले, असा निर्वाळा दिलेला आहे.
शिव चरित्राचा अभ्यास करताना सह्याद्रीच्या कुशीतील गिरीदुर्गानी स्वराज्यबाधंणीमध्ये किती महत्वपूर्ण कामगीरी बजावली होती हे निदर्शनास येते. राजधानीसाठी शिवाजीमहाराजांनी रायगड हा अभेद्द किल्ला निवडला. महाराजांनची निवड स्पष्ट करताना सभासद लिहितो, `पुढे रायगड अदिलशाही होता तो (महाराजांनी) घेतला. राजा खास जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचें कडे तासिल्या प्रमाणे, दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव, एकच आहे.--- दौलताबादहि पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी गड उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले, ‘तस्तास जागा गड हाच करावा,‘
दौलताबादचे किल्यापेक्षा रायगड राजधानीसाठी जास्त सुरक्षित आहे याचा विचार शिवाजीमहाराजांनी केला होता किंव्हा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु राजधानी ठरवताना महाराजांनी सुरक्षिततेचा सर्वांगीण विचार केलला होता हे निश्चित.

जयसिंगच्या स्वारीमुळे (१६६५) मावळ भागातील असुरक्षितता महाराजांच्या लक्षात आलेली होती. शिवाय जंजि-याच्या सिद्दींच्या हलचालींचा पायबंद घालण्यासाठी आपले राजकीय केंद्र तळ कोकणात एखाद्या अभेद्य गिरीदुर्गावर असणे त्यांना सोयीचे वाटले असावे. दक्षिणेत राज्यविस्तार करताना जलचर शत्रुवर मात करण्यासाठी आरमारी सामर्थ्य वाढविण्याची गरज होतीच. त्या दृष्टीने समुद्रापासून केवळ वीस कोस दुर असलेला रायगड किल्ला राजधानी म्हणून शिवाजीमहाराजांना योग्य वाटला असावा. शिवाय रायगडाच्या माथ्यावर विस्तीर्ण मैदान असल्यामुळे राजधानीसाठी आवश्यक असलेल्या इमारती उभारणे सहज शक्य होते. महाराजांचे प्रारंभीचे राजकीय केंद्र राजगड हे होते. राजगड हा अभेद्द व दुर्गम किल्ला असला तरी तेथे विस्तीर्ण मैदानाचा अभाव होता. या सार्‍या गोष्टी लक्ष्यात घेऊनच शिवाजीमहाराजांनी रायगडची निवड राजधानीसाठी केली. असे जरी असले तरी इतर गिरीदुर्गांचे महत्व महाराजांनी कधीही कमी लेखले नाही. किंबहुना तोरणाला ज्याप्रमाणे खिळे बळकटी आणतात त्याप्रमाणे गड राज्याला बळकटी आणतात हे त्यांचे राजकीय सूत्र होते. या सूत्राच आशय त्यांच्या घरगड्यांना उमजलेला होता आणि म्हणूनच महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळलेले असतानाही मराठ्यांनी गिरीदुर्गांचा कौशल्याने उपयोग करुन स्वराज्याचे रक्षण केले.
अमात्यांच्याच भाषेत औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखी महासंस्थाने आक्रमिली, संपूर्ण तीस बत्तीस वर्षपर्यंत या राज्यांशी अतीश्रम केला, त्यांच्या यत्नास असाध्य काय होते ?... ``परन्तु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहीले---"

तख्ताचा दुर्ग - कैदखाना

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजकारणाचे रंग बदलले. संभाजीचा पुत्र शाहू याची सुटका झाली. महाराणी ताराबाईचा पक्ष निस्तेज करुन स्वराज्याचे अर्धसत्य शाहुने मिळवले. सातार्‍याला जानेवारी १७०८ मध्ये शाहुने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शाहूंचा मुत्सद्दी पेशवा बाळाजी विश्वनाथ याने ’मराठा मंडळाची' स्थापना करून अनेक कर्तबगार मराठे सरदारांना राज्यविस्तारासाठी भव्य क्षेत्र उपलब्ध करून दिले. त्यानंतर केवळ २०-२५ वर्षात मराठ्यांनी दक्षिणेत आणि उत्तरेत विलक्षण गतीने राज्यविस्तार केला. दिल्लीच्या बादशहावर आणि झर मुधळ सुभेदारांवर वर्चस्व निर्माण केले.

राज्याच्या चौफेर विस्ताराबरोबर सह्याद्रीच्या कुशीतील गिरीदुर्गांचे महत्व आपोआप कमी झाले. तरी पण रायगड ही 'तख्ताची जागा' असल्यामुळे त्याचे महत्व ओसरले नाही. छत्रपती शाहूने प्रतिनिधींना पाठवून ५ जून १७३३ मध्ये सिद्दीचा पराभव करून रायगड ताब्यात घेतला. परंतु रायगडचे पूर्वीचे वैभव संपुष्टात आलेले होते. स्वतः शाहू रायगडावर जाण्यास उत्सुक होता. पण त्याला तो योग कधी आलाच नाही. रायगड घेण्याचा प्रदेश मात्र त्याने स्वत:च्या आधिपत्याखाली ठेवला.
यशवंत महादेव याला रायगड तालुक्याचे पोतनीस म्हणून नेमण्यात आले. १७७२ मध्ये 'तख्ताची जागा' (म्हणजे रायगड) पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असतांना पेशव्यांनी शिवाजीमहाराजांच्या सिंहासनाचा आदर करण्यासाठी खास व्यवस्था लावून दिली. सिंहासनाच्या खांबासाठी लाल मखमल वापरण्यात आली. रोज सांयकाळी सिंहासनाजवळ दिवाबत्ती लावून सरकारी अधिकार्‍यांनी मुजरे करावेत अस ठरविण्यात आले. सिंहासनासमोरील नगारखान्यात चौघडा, ताशे वाजाविण्याची व्यवस्था करण्यात आली. थोडक्यात, पेशव्यांनी सिंहासनाची प्रतिष्ठा चांगल्याप्रकारे जोपासली. परंतु रायगडचा उपयोग कैदखाना म्हणून करण्यात येऊ लागला.

ऑगस्ट १७७३ मध्ये ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्याचा खून झाला. रघुनाथरावाला पेशवेपद मिळू नये म्हणून नाना फडणविस, सखारामबापू बोकिल, महादजी शिंदे वगैरे बारा मुत्सद्द्यांनी बारभाई संघ उभारला (बारभाई संघ इतिहासात 'बारभाई कारस्थान' म्हणून प्रसिद्द आहे.) बारभाईचा कारभार चालू असताना सखाराम बापूने आपल्या स्वभावानुसार पगडी बदलली व रघुनाथरावाच्या पक्षात जाण्याचे ठरविले. तेंव्हा त्यानां पुरंदर किल्ल्यावर कैद करण्यात आले. या सुमारास शिवकालातील अभेध्द गिरीदुर्गांचा उपयोग तुरुंग म्हणून सूरू झाला होता. सिंहगड, प्रतापगड या किल्ल्यांवर राजकीय कैदी ठेवण्यात येऊ लागले.
रायगडचा उपयोगही कैदखाना म्हणून सूरू झाला. सखाराम बापूंना १७८१ मध्ये रायगडावर कैदी म्हणून आणण्यात आले. बापूंचे निधनही कैदेत असताना रायगडावर झाले. सखाराम बापू प्रमाणे मोरोबा फडणीस, सदाशीव धोंडो, शिवाजी कान्हो, बापूजी जनार्दन इत्यादी कितीतरी राजकीय कैदी बारभाई काळात रायगडावर तुरूंगाची हवा खात होते. रायगड जवळील लिंगाणा किल्ल्याचा उपयोगही कैदखाना म्हणून करण्यात येऊ लागला होता. गणेशभट परांजपे, मोरोजी नाईक वगैरे राजकीय कैदी लिंगाण्यावर होते. शिवशाहीतील महत्वाच्या आणि मोक्याच्या जागी असलेल्या गिरीदुर्गांना असे तुरुंगाचे स्वरुप आले. राजकीय हलचालींसाठी आणि शत्रूविरूद्ध डावपेच लढविण्यासाठी शिवाजीमहाराजांनी गडकोटांचा कौश्याल्याने उपयोग केलेला होता. किंबहुना महाराजांच्या यशाचे ते मोठे मर्म होते. महाराजांनीही काही किल्ल्यांचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केलेला होता. उदाहरणार्थ रायगड जवळ असलेल्या सोनगड नावाच्या किल्ल्यावर काही इंग्रजाना महाराजांनी कैदी म्हणून ठेवले होते.

परंतु उत्तर पेशवाईत महत्वाच्या किल्ल्यांचा उपयोग ही कैदखान्यासाठी होऊ लागला. रायगडही त्यातून सुटला नाही. मराठ्यांचा राज्यविस्तार उत्तर आणि दक्षिण भारतात चौफेर झालेला असल्यामुळे मावळ, घाटमाथा आणि कोकण भागातील गिरिदुर्गांवरुन राजकारण करण्याचे कारण उरले नव्हते. किल्ल्यांचा उपयोग कैदखाने म्हणून करण्यापाठीमागे मराठे मुत्सद्याचे दोन हेतू असावेत. एक म्हणजे नवे कैदखाने बांधण्यापेक्षा दुर्गम आणि अभेद्द गिरिदुर्ग 'अधिक सुरक्षित तुरुंग' म्हणून वापरणे मुत्सद्दांना अधिक सोयीचे वाटले असावे. शिवाय कैदखान्याच्या निमित्ताने किल्ल्यांची डागडुजी आणि इतर व्यवस्था अनायसे करता येणे शक्य होते. किंल्ल्यांवरील शिबंदी कैद्यांची देखभाल करण्यास उपयुक्त ठरणार होती. कोणत्याही रूपात किल्ल्यांचा वापर असावा असे मात्र मराठेशाहीतील मुत्सद्यांना निश्चित वाटत होते. कारण आणिबाणिच्या प्रसंगी किल्ले राजकारणाला उपयुक्त ठरतील अशी खात्री मराठ्यांना होती. म्हणूनच नारायणरावाच्या वधानंतर (१७७३) पुरंदर किल्ल्याचा उपयोग 'बारभाई' मुत्सद्यांनी राजकाराणासाठी केला.

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर (ऑक्टोबर १७९५) पेशवेपदासाठी आपल्याला पाहीजे ते प्यादे पुढे करून शिंदे, होळकर, नाना फडणीस इत्यादी मुत्सद्यांनी
डावपेच खेळायला सूरवात केली होती. इतर मुत्सद्यांवर मात करण्यासाठी नाना फडणीसाने महाड रायगडचा आश्रय घेतला व आपले राजकारण यशस्वी करण्यासाठी कारस्थान रचले. यावेळी नानाने रायगडच्या बंदोबस्ताची खबरदारी घेतली होती हे समकालीन पत्रावरून स्पष्ट होते. थोडक्यात, किल्ले राजकारणासाठी सुरक्षित असतात हे नाना फडणीसाने ओळखले होते.

बाजीराव आणि किल्ले

पेशवेपदाच्या सामन्यात शेवटी दुसरा बाजीराव यशस्वी झाला. (डिसेंबर १७९६) दुसर्‍या बाजीरावला पेशवेपद मिळाल्यामुळे मराठ्यांची मध्यवर्ती सत्ता निस्तेज बनली. मराठे सरदारांमध्ये दुही व एकमेकांविषयी संशय व द्वेष निर्माण होऊन बजबजपुरी माजली. दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतल्यामुळे यशवंतराव होळकरांसारख्या तडफदार सरदारांची घोर निराशा झाली. स्वत: यशवंतराव मराठा मंडळाचा ढासळू पहाणारा डोलारा सावरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. पंरतु बाजीरावाला मनातून यशवंतरावाची भीती वाटत होती.
अशा अस्थिर राजकीय परस्थितीत दुसर्‍या बाजीरावाला शिवाजी महाराजांच्या राजधानीविषयी - रायगडाविषयी- विलक्षण प्रेम वाटू लागले. डोंगरी किल्ल्यांच्या सहाय्याने आपण सर्व संकटावर मात करू असा फाजील आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण झाला. शिवाजीमहाराजांनी रायगडावरून राजकारण केले तसे आपल्यालाही करता येणे शक्य आहे असे त्याला वाटू लागले. परंतु बाजीरावाचे हे मनोरथ त्याच्या भयगंडातून निर्माण झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा उपयोग करून घेण्याचे शिवाजीमहाराजांचे असामन्य कर्तॄत्व बाजीरावाजवळ मुळीच नव्हते.

क्रमश.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजांच्या निधनानंतर शंभूराजांनी प्रथम नऊ वर्षे आणि नंतर राजांच्या सुनांनी येसूबाई आणि ताराबाई यांनी; तसेच धनाजी आणि संताजीने औरंगजेबासारख्या कळीकाळाविरुद्ध सह्याद्रीच्या साक्षीने स्वातंत्र्याचे होमकुंड तेवतच ठेवले. चार-दोन महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र गिळण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाला सलग २७ वर्षे "दे माय धरणी ठाय' करून सोडले.

महाराज हयात असतानाच हा राजपुत्र मोगलांना जाऊन मिळाला होता हे खरे आहे काय ?
महाराजांच्या सर्वसमावेशक स्वभावामुळे त्यांनी शुन्यातुन राज्य उभे केले होते.
असाच स्वभाव जर शंभूराजाचा असता तर बलिदान देण्याची वेळ आली नसती.
मला नेहेमी प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांच्या बाबतीत कधी फितुरीचे प्रसंग कसे घडले नाहीत.
त्यांच्या सर्वांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे का ?
कारण तेव्हाही वाईटावर टपलेले लोक असतीलच की. मग हे दुर्भाग्य संभाजीच्याच बाबत का घडावे,
आणि ते सुद्धा एवढ्या लवकर ?

औरंगजेबाने सह्याद्रीची, इथल्या गिरिशिखरांची, किल्ल्यांची आणि नेरांची खूप भीती खाल्ली होती. शंभूराजाच्या हत्येनंतरही तो पुणे किंवा साताऱ्याकडे सरकला नाही.

>>> मग दस्तुरखुद्द बादशाहने सिंहगड आणि राजगड कधी जिंकले? संताजी शिळीमकर कधी धारातीर्थी पडले? ते साल कृपया सांगावे..

महाराज हयात असतानाच हा राजपुत्र मोगलांना जाऊन मिळाला होता हे खरे आहे काय ?>>>>
हो हे खरे आहे. पण हा कदाचीत महाराजांच्या कूटनितीचा भाग असावा. त्यावेळी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी चालले होते आणि दिलेरखान स्वराज्याच्या सीमेवर होता. संभाजी महाराज मोगलांना मिळाल्यानंतर आणि महाराज माघारी येईपर्यंत मोगलांचे कोणतेही मोठे आक्रमण झाले नाही.(चु.भु.दे.घे.)

महाराजांच्या सर्वसमावेशक स्वभावामुळे त्यांनी शुन्यातुन राज्य उभे केले होते.
असाच स्वभाव जर शंभूराजाचा असता तर बलिदान देण्याची वेळ आली नसती.>>>>>>>>>>
एक लक्षात घ्या कि महाराजांनी शुन्यातुन राज्य उभे केले होते. श्री. छत्रपती संभाजी महाराज हे एका सार्वभौम राज्याचे स्वामी होते. त्यांच्या पुढची आव्हाने आणि प्रश्न्न वेगळे होते.
महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांविरूद्ध सोयराबाई,अण्णाजी वगैरेनी कारस्थान केले होते तरीही त्यांना माफ केले होते. तरीही त्यांचा स्वभाव तापट, उतावीळ कसा?

मला नेहेमी प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांच्या बाबतीत कधी फितुरीचे प्रसंग कसे घडले नाहीत.>>>>

श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे "प्रति-शिवाजी" नेताजी पालकर, संभाजी कावजी शत्रूला जाऊन मिळाले होते.

महाराज पन्हाळगडावर वेढ्यात अडकले असताना इंग्रजांनी तह मोडून तोफा डागल्याच की.

मग दस्तुरखुद्द बादशाहने सिंहगड आणि राजगड कधी जिंकले? संताजी शिळीमकर कधी धारातीर्थी पडले? ते साल कृपया सांगावे...>>>>>>>>> ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाने घेतला.

@प.भा. >>> चुकीबद्दल क्षमस्व. योग्य तो बदल केला आहे.

महाराज हयात असतानाच हा राजपुत्र मोगलांना जाऊन मिळाला होता हे खरे आहे काय ?>>>>
हो हे खरे आहे. पण हा कदाचीत महाराजांच्या कूटनितीचा भाग असावा >>>.

अजिबात नाही. संभाजीला थोर संभाजी रंगविन्यासाठी आता लोक असे म्हणतात की तो कूटनितीचा भाग असावा. शिवाजीचा मुलगा असे काही कसे करेल हे रंगविन्यासाठी ही अफवा पसवरलेली आहे.

त्याचे पहिलेच भूपाळगड युद्ध वाचावे, शरनआलेल्या मराठ्यांचे ( ७००) एकेक हात संभाजी-दिलेर च्या सैन्याने गरज नसताना तोडले, तसा प्रघातच नव्हता. शिवाय भूपाळगड आल्यावर त्याने खुद्द शिवाजीलाच पत्र पाठविले की, आता मी सह्याद्री जिंकायला येतो, तयार राहा!! नाजूक मन (भावना) व त्याचे अहंकारात रुपांतर हे संभाजीच्या बाबतीत हमेशा होत होते. उदा प्रभावळीचे कागदपत्र वाचावेत. इतकेच काय खुद्द रामदासाने त्याला जे "जाणता राजा" काव्यात्मक पत्र पाठवले ते वाचावे. त्यात राजा कसा असावा ह्याचे वर्णन असून तुझा पिताच तो आहे, तू थोडे तरी शिक असे लिहिले आहे. कारण संभाजी शूर पूरूष होता पण थोर राजा होऊ शकत नव्हता, तो भावूक होता. प्इतकेच नाही तर महाराजांज स्वराज्याचे दोन तुकडे करणार होते (एक संभाजी,एक राजाराम) हे आता किती जण पचवतील ते माहित नाही.

मलाही संभाजी आवडतो, पण जे खरे आहे, कागदपत्र उपलब्ध आहेत, त्याला दुर्लक्ष करता येत नाही. संभाजी शूर होता, शिवाजी एवढा द्रष्टा नव्हता असे त्यामुळेच मला वाटते. त्याच्या बलिदानामुळे तो तेजस्वी ठरला, जिथे गरज आहे, तिथे हिंदवीराज्यासाठी उभा राहिला.

छान माहिती आहे मित्रा !
खरोखर........
पण वरील लेखाचा विषय काय?..आणि प्रतिसाद काय देतायतात.
बाकी 'रामराव चिटणीसाचे' वंशज अजून जिवंत आहेत समाजात....:फिदी:

मित्रानो, चर्चा पेशवेकालीन दुर्गांची परिस्थिती यावरच मर्यादित ठेवावी ही नम्र विनंती.

इतिहास हा कायमच संदिग्ध असतो, पण किमान स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तीला तरी कमी लेखू नये.
इतर कोणत्याही प्रांती असे उदाहरण पाहावे व निदान एक मराठी माणूस म्हणून तरी छत्रपती संभाजी महाराजांवर टीका करू नये.

|| जय भारत ||

महेश,

>>पानिपताच्या पराभवाने त्या वाढत्या वैभवाला दृष्ट लागली. ही एक मोठी घटना वगळता, बाकी राज्याची घडी >>आणि विस्तार या बद्दल नावे ठेवण्यासारखे काही नव्हते.

नानासाहेब पेशव्यांवरचा अजून एक कलंक म्हणजे मराठा आरमाराची नासाडी हा होय. त्यांना सेखोजी आणि तुळाजी या आंगरेबंधूंचा समेट घडवता आला नाही. शेवटी इंग्रजांची मदत घेऊन तुळाजीचे आरमार सुवर्णदुर्गाच्या लढाईत जाळले (इ.स. १७५५). ही नानासाहेबांची अक्षम्य चूक झाली. याची भरपाई कधीच झाली नाही. पानिपताची लढाई मराठे जरी हरले असले तरी अफगाण अतिशय कमकुवत झाले होते. हे महाराजा रणजितसिंगांच्या राज्यविस्तारावरून सहज ध्यानी येते. तसेच माधवराव पेशव्यांनी पानिपताची हानी बरीचशी भरून काढली होती. तशी मर्‍हाटा आरमाराची भरपाई होऊ शकली नाही.

मात्र नानासाहेबांच्या कार्यकाळात मर्‍हाटा सत्तेस एक प्रकारचे स्थैर्य लाभले. हे कर्तृत्व उल्लेखनीय आहे.

चूक भूल द्यावी घ्यावी.

आपला नम्र,
-गा.पै.

आशुचँप,

>>सिद्दी मसूदला स्वराज्याच्या सरहद्दीवरच रोखून धरण्यासाठी राजांनी पन्हाळगडाची निवड केली.

यात धोका निश्चित होता. मात्र (माझ्या माहितीप्रमाणे) सिद्दी जौहरच्या वेळी शायिस्तेखान पुण्याच्या लालमहालात ठाण मांडून बसला होता. दोन शत्रूंशी एकच वेळेस लढा नको म्हणून त्यांची सैन्ये जवळ येत काम नयेत असा विचार महाराजांनी केला असावा. म्हणून स्वराज्याच्या आतल्या किल्ल्याकडे न येत सीमेवरचा पन्हाळा त्यांनी निवडला असावा.

चूकभूल द्यावीघ्यावी!

आपला नम्र,
-गा.पै.

दोन शत्रूंशी एकच वेळेस लढा नको म्हणून त्यांची सैन्ये जवळ येत काम नयेत असा विचार महाराजांनी केला असावा. म्हणून स्वराज्याच्या आतल्या किल्ल्याकडे न येत सीमेवरचा पन्हाळा त्यांनी निवडला असावा.

अरे होय की, ही शक्यता लक्षातच आली नव्हती माझ्या...धन्स मामा

आशुचँप,

मममोद, अर्थात My pleasure ! Happy

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रानुसार सिद्दी जौहर आणि शायिस्तेखान यांच्या एकच वेळी आलेल्या मोहिमा समन्वय साधून आखलेल्या होत्या. आम्ही एकीकडून सैन्य घुसवतो तुम्ही दुसरीकडून घुसवा अशी पत्रापत्री आदिलशाह आणि औरंगजेबात झाली होती.

चूक भूल द्यावी घ्यावी.

आपला नम्र,
-गा.पै.

मस्त लिखाण...:स्मित:
मराठा इतिहास बद्दल याआधीच कागदोपत्री फार कमी माहीती उपलब्ध, त्यात बामणी इतिहासकारानी त्यांच्या सोयीनुसार सामन्य जनतेला सांगीतलेला खोटा इतिहास यामुळे "मराठा इतिहास" इतिहास कमी दंतकथा जास्त होऊन गेलाय.

नारायणरावांच्या खुनाबद्दल राघोबादादांना रामशास्त्री प्रभुणे यांनी देहान्ताची शिक्षा सुनावली होती. त्याचे पुढे काय झाले? रामशास्त्री शेवटपर्यंत पेशव्यांच्या सेवेत होते का? राघोबादादांचे पुढे काय झाले? त्यांचा मृत्यु कधी व कोठे झाला?>>

मास्तुरे, आपण श्री. अजेय झणकर लिखित " द्रोहपर्व " हे पुस्तक जरुर वाचावे.

नारायणरावांच्या खुनाबद्दल राघोबादादांना रामशास्त्री प्रभुणे यांनी देहान्ताची शिक्षा सुनावली होती. त्याचे पुढे काय झाले? रामशास्त्री शेवटपर्यंत पेशव्यांच्या सेवेत होते का? राघोबादादांचे पुढे काय झाले? त्यांचा मृत्यु कधी व कोठे झाला?>>

मास्तुरे, आपण श्री. अजेय झणकर लिखित " द्रोहपर्व " हे पुस्तक जरुर वाचावे.
>>>>>>
गूगलून पहा. सगळी माहिती मिळते. माझ्या कडे "पेशवे घराण्याचा इतिहास" हे पुस्तक आहे ( लेखक प्रमोद ओक ) झक्कि नि दिलेली माहिती बरोबर आहे. १७७६ मध्ये राघोबा इन्ग्रजान्चे मान्डलिक होते. ते सुरत ला रहात होते. त्यान्नि पोर्तुगिजा ना मदत करायचा अयशस्वि प्रयत्न केला. त्या वेळेस ते मुम्बई ला रहात होते. वरळी ला एका मोठ्या राजवाड्यात ते रहात होते. ह्या पुस्तकात तो वाडा नक्कि कुठे आहे/होता ते पण लिहिले आहे. नन्तर १७८२ ला ते वारले. इन्ग्रजान्नि बारभाई च्या काळात त्यान्ना निशप्रभ्र केले होते.

रामशस्त्रि नी खटल्याचे काम यशस्वि पणे चालवले. पण त्याची अम्मलबजावणी होवु शकलि नाहि. तरी राघोबान्चि सत्ता उलटुन टाकायचे महत्वाचे काम त्यान्नि केले.ते नन्तर आपल्या माहुलि गावात जावुन राहिले. ते कुराण आणि बायबल चे चान्गले अभ्यासक होते.

>>यशवंतराव होळकर राजे होते सरदार नव्हे
काहीही, तुम्हाला कोणी सांगितले ? स्वप्नात आले होते की काय ? Angry

छान माहिती! +१
common sense ने थोडा विचार केला तर असे वाटते की युद्धात जेव्हा तुम्ही तुमच्या प्रदेशात युद्ध कराल तेव्हा गडांचे महत्त्व अधिक. शिवरायांच्या काळात पहिले स्वराज्य स्थापन करायचे होते. नंतर पेशव्यांच्या काळात जेव्हा ते महाराष्ट्रात आणि बाहेर वाढवायची वेळ आली तेव्हा सहाजिकच महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे महत्त्व कमी झाले असावे. त्यातून थोरल्या महाराजांनंतर आणि शंभू राजांनंतर तर राज्याची २ शकले पडली ( शाहू/ताराबाई) त्यामूळे रायगडाचेही महत्त्व कदाचित कमी झाले असावे.

गड आणि कैदी -
कैदी ठेवायला याहून उपयुक्त जागा कोणती असणार? मला तर पटले.

>>त्यांचा राज्यभिषेक झाला होता आणी इंग्रजांना सलग १८ लढायांत त्यांनी हरवले होते

उगाच काहीतरी दिशाभूल करू नका लोकांची. शिंदे, होळकर, गायकवाड, इ. सरदारांना पहिल्या बाजीरावाने उत्तरेकडे जाणार्‍या मार्गावर नेमलेले होते. पेशव्यांनी स्वतः कधीही राज्याभिषेक करवून घेतला नाही, भोसल्यांच्या वतीने राज्य पाहिले (पेशवे हे पद होते), तर होळकरांनी राज्याभिषेक करवून घेण्याचे काहीच कारण नव्हते. हे सर्व लोक नंतर बरेच शिरजोर झाले होते.
इंग्रजांच्या मदतीने शनिवार वाडा जाळणारे कोण होते ? पुण्याचे नुकसान करणारे कोण होते ?
खरे तर मी हे सर्व लिहिणार नव्हतो, पण जर नाही लिहिले तर तुम्ही जे लिहित आहात तेच खरे आहे असे वाटेल नविन पिढ्यांना. जा खरा इतिहास घेऊन या आणि मग लिहा. Angry

(टीप : विद्वेषाचे राजकारण करण्यात आम्हास रस नाही. उलट पुर्वीच्या चुका टाळून एकदिलाने प्रगती करणे जास्त शहाणपणाचे ठरेल, हे ध्यानी घेऊन काय लिहायचे ते लिहा.)

Pages