दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १

Submitted by वेताळ_२५ on 26 July, 2011 - 06:48

300px-RaigadFort31-tile.jpg
दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २

http://www.maayboli.com/node/27608

शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करताना सह्याद्रीच्या पर्वतराजीतील उत्तुंग दुर्गांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करुन घेतला होता. गडाचे महत्व विशद करताना रामचंद्रपंत आमात्यनी आज्ञापत्रात ’संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ असे सांगून हे राज्य तर तीर्थरुप थोरेले कैलासवासी स्वामींनी (शिवाजीमहाराजांनी) गडावरुनच निर्माण केले, असा निर्वाळा दिलेला आहे.
शिव चरित्राचा अभ्यास करताना सह्याद्रीच्या कुशीतील गिरीदुर्गानी स्वराज्यबाधंणीमध्ये किती महत्वपूर्ण कामगीरी बजावली होती हे निदर्शनास येते. राजधानीसाठी शिवाजीमहाराजांनी रायगड हा अभेद्द किल्ला निवडला. महाराजांनची निवड स्पष्ट करताना सभासद लिहितो, `पुढे रायगड अदिलशाही होता तो (महाराजांनी) घेतला. राजा खास जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचें कडे तासिल्या प्रमाणे, दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव, एकच आहे.--- दौलताबादहि पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी गड उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले, ‘तस्तास जागा गड हाच करावा,‘
दौलताबादचे किल्यापेक्षा रायगड राजधानीसाठी जास्त सुरक्षित आहे याचा विचार शिवाजीमहाराजांनी केला होता किंव्हा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु राजधानी ठरवताना महाराजांनी सुरक्षिततेचा सर्वांगीण विचार केलला होता हे निश्चित.

जयसिंगच्या स्वारीमुळे (१६६५) मावळ भागातील असुरक्षितता महाराजांच्या लक्षात आलेली होती. शिवाय जंजि-याच्या सिद्दींच्या हलचालींचा पायबंद घालण्यासाठी आपले राजकीय केंद्र तळ कोकणात एखाद्या अभेद्य गिरीदुर्गावर असणे त्यांना सोयीचे वाटले असावे. दक्षिणेत राज्यविस्तार करताना जलचर शत्रुवर मात करण्यासाठी आरमारी सामर्थ्य वाढविण्याची गरज होतीच. त्या दृष्टीने समुद्रापासून केवळ वीस कोस दुर असलेला रायगड किल्ला राजधानी म्हणून शिवाजीमहाराजांना योग्य वाटला असावा. शिवाय रायगडाच्या माथ्यावर विस्तीर्ण मैदान असल्यामुळे राजधानीसाठी आवश्यक असलेल्या इमारती उभारणे सहज शक्य होते. महाराजांचे प्रारंभीचे राजकीय केंद्र राजगड हे होते. राजगड हा अभेद्द व दुर्गम किल्ला असला तरी तेथे विस्तीर्ण मैदानाचा अभाव होता. या सार्‍या गोष्टी लक्ष्यात घेऊनच शिवाजीमहाराजांनी रायगडची निवड राजधानीसाठी केली. असे जरी असले तरी इतर गिरीदुर्गांचे महत्व महाराजांनी कधीही कमी लेखले नाही. किंबहुना तोरणाला ज्याप्रमाणे खिळे बळकटी आणतात त्याप्रमाणे गड राज्याला बळकटी आणतात हे त्यांचे राजकीय सूत्र होते. या सूत्राच आशय त्यांच्या घरगड्यांना उमजलेला होता आणि म्हणूनच महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळलेले असतानाही मराठ्यांनी गिरीदुर्गांचा कौशल्याने उपयोग करुन स्वराज्याचे रक्षण केले.
अमात्यांच्याच भाषेत औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखी महासंस्थाने आक्रमिली, संपूर्ण तीस बत्तीस वर्षपर्यंत या राज्यांशी अतीश्रम केला, त्यांच्या यत्नास असाध्य काय होते ?... ``परन्तु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहीले---"

तख्ताचा दुर्ग - कैदखाना

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजकारणाचे रंग बदलले. संभाजीचा पुत्र शाहू याची सुटका झाली. महाराणी ताराबाईचा पक्ष निस्तेज करुन स्वराज्याचे अर्धसत्य शाहुने मिळवले. सातार्‍याला जानेवारी १७०८ मध्ये शाहुने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शाहूंचा मुत्सद्दी पेशवा बाळाजी विश्वनाथ याने ’मराठा मंडळाची' स्थापना करून अनेक कर्तबगार मराठे सरदारांना राज्यविस्तारासाठी भव्य क्षेत्र उपलब्ध करून दिले. त्यानंतर केवळ २०-२५ वर्षात मराठ्यांनी दक्षिणेत आणि उत्तरेत विलक्षण गतीने राज्यविस्तार केला. दिल्लीच्या बादशहावर आणि झर मुधळ सुभेदारांवर वर्चस्व निर्माण केले.

राज्याच्या चौफेर विस्ताराबरोबर सह्याद्रीच्या कुशीतील गिरीदुर्गांचे महत्व आपोआप कमी झाले. तरी पण रायगड ही 'तख्ताची जागा' असल्यामुळे त्याचे महत्व ओसरले नाही. छत्रपती शाहूने प्रतिनिधींना पाठवून ५ जून १७३३ मध्ये सिद्दीचा पराभव करून रायगड ताब्यात घेतला. परंतु रायगडचे पूर्वीचे वैभव संपुष्टात आलेले होते. स्वतः शाहू रायगडावर जाण्यास उत्सुक होता. पण त्याला तो योग कधी आलाच नाही. रायगड घेण्याचा प्रदेश मात्र त्याने स्वत:च्या आधिपत्याखाली ठेवला.
यशवंत महादेव याला रायगड तालुक्याचे पोतनीस म्हणून नेमण्यात आले. १७७२ मध्ये 'तख्ताची जागा' (म्हणजे रायगड) पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असतांना पेशव्यांनी शिवाजीमहाराजांच्या सिंहासनाचा आदर करण्यासाठी खास व्यवस्था लावून दिली. सिंहासनाच्या खांबासाठी लाल मखमल वापरण्यात आली. रोज सांयकाळी सिंहासनाजवळ दिवाबत्ती लावून सरकारी अधिकार्‍यांनी मुजरे करावेत अस ठरविण्यात आले. सिंहासनासमोरील नगारखान्यात चौघडा, ताशे वाजाविण्याची व्यवस्था करण्यात आली. थोडक्यात, पेशव्यांनी सिंहासनाची प्रतिष्ठा चांगल्याप्रकारे जोपासली. परंतु रायगडचा उपयोग कैदखाना म्हणून करण्यात येऊ लागला.

ऑगस्ट १७७३ मध्ये ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्याचा खून झाला. रघुनाथरावाला पेशवेपद मिळू नये म्हणून नाना फडणविस, सखारामबापू बोकिल, महादजी शिंदे वगैरे बारा मुत्सद्द्यांनी बारभाई संघ उभारला (बारभाई संघ इतिहासात 'बारभाई कारस्थान' म्हणून प्रसिद्द आहे.) बारभाईचा कारभार चालू असताना सखाराम बापूने आपल्या स्वभावानुसार पगडी बदलली व रघुनाथरावाच्या पक्षात जाण्याचे ठरविले. तेंव्हा त्यानां पुरंदर किल्ल्यावर कैद करण्यात आले. या सुमारास शिवकालातील अभेध्द गिरीदुर्गांचा उपयोग तुरुंग म्हणून सूरू झाला होता. सिंहगड, प्रतापगड या किल्ल्यांवर राजकीय कैदी ठेवण्यात येऊ लागले.
रायगडचा उपयोगही कैदखाना म्हणून सूरू झाला. सखाराम बापूंना १७८१ मध्ये रायगडावर कैदी म्हणून आणण्यात आले. बापूंचे निधनही कैदेत असताना रायगडावर झाले. सखाराम बापू प्रमाणे मोरोबा फडणीस, सदाशीव धोंडो, शिवाजी कान्हो, बापूजी जनार्दन इत्यादी कितीतरी राजकीय कैदी बारभाई काळात रायगडावर तुरूंगाची हवा खात होते. रायगड जवळील लिंगाणा किल्ल्याचा उपयोगही कैदखाना म्हणून करण्यात येऊ लागला होता. गणेशभट परांजपे, मोरोजी नाईक वगैरे राजकीय कैदी लिंगाण्यावर होते. शिवशाहीतील महत्वाच्या आणि मोक्याच्या जागी असलेल्या गिरीदुर्गांना असे तुरुंगाचे स्वरुप आले. राजकीय हलचालींसाठी आणि शत्रूविरूद्ध डावपेच लढविण्यासाठी शिवाजीमहाराजांनी गडकोटांचा कौश्याल्याने उपयोग केलेला होता. किंबहुना महाराजांच्या यशाचे ते मोठे मर्म होते. महाराजांनीही काही किल्ल्यांचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केलेला होता. उदाहरणार्थ रायगड जवळ असलेल्या सोनगड नावाच्या किल्ल्यावर काही इंग्रजाना महाराजांनी कैदी म्हणून ठेवले होते.

परंतु उत्तर पेशवाईत महत्वाच्या किल्ल्यांचा उपयोग ही कैदखान्यासाठी होऊ लागला. रायगडही त्यातून सुटला नाही. मराठ्यांचा राज्यविस्तार उत्तर आणि दक्षिण भारतात चौफेर झालेला असल्यामुळे मावळ, घाटमाथा आणि कोकण भागातील गिरिदुर्गांवरुन राजकारण करण्याचे कारण उरले नव्हते. किल्ल्यांचा उपयोग कैदखाने म्हणून करण्यापाठीमागे मराठे मुत्सद्याचे दोन हेतू असावेत. एक म्हणजे नवे कैदखाने बांधण्यापेक्षा दुर्गम आणि अभेद्द गिरिदुर्ग 'अधिक सुरक्षित तुरुंग' म्हणून वापरणे मुत्सद्दांना अधिक सोयीचे वाटले असावे. शिवाय कैदखान्याच्या निमित्ताने किल्ल्यांची डागडुजी आणि इतर व्यवस्था अनायसे करता येणे शक्य होते. किंल्ल्यांवरील शिबंदी कैद्यांची देखभाल करण्यास उपयुक्त ठरणार होती. कोणत्याही रूपात किल्ल्यांचा वापर असावा असे मात्र मराठेशाहीतील मुत्सद्यांना निश्चित वाटत होते. कारण आणिबाणिच्या प्रसंगी किल्ले राजकारणाला उपयुक्त ठरतील अशी खात्री मराठ्यांना होती. म्हणूनच नारायणरावाच्या वधानंतर (१७७३) पुरंदर किल्ल्याचा उपयोग 'बारभाई' मुत्सद्यांनी राजकाराणासाठी केला.

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर (ऑक्टोबर १७९५) पेशवेपदासाठी आपल्याला पाहीजे ते प्यादे पुढे करून शिंदे, होळकर, नाना फडणीस इत्यादी मुत्सद्यांनी
डावपेच खेळायला सूरवात केली होती. इतर मुत्सद्यांवर मात करण्यासाठी नाना फडणीसाने महाड रायगडचा आश्रय घेतला व आपले राजकारण यशस्वी करण्यासाठी कारस्थान रचले. यावेळी नानाने रायगडच्या बंदोबस्ताची खबरदारी घेतली होती हे समकालीन पत्रावरून स्पष्ट होते. थोडक्यात, किल्ले राजकारणासाठी सुरक्षित असतात हे नाना फडणीसाने ओळखले होते.

बाजीराव आणि किल्ले

पेशवेपदाच्या सामन्यात शेवटी दुसरा बाजीराव यशस्वी झाला. (डिसेंबर १७९६) दुसर्‍या बाजीरावला पेशवेपद मिळाल्यामुळे मराठ्यांची मध्यवर्ती सत्ता निस्तेज बनली. मराठे सरदारांमध्ये दुही व एकमेकांविषयी संशय व द्वेष निर्माण होऊन बजबजपुरी माजली. दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतल्यामुळे यशवंतराव होळकरांसारख्या तडफदार सरदारांची घोर निराशा झाली. स्वत: यशवंतराव मराठा मंडळाचा ढासळू पहाणारा डोलारा सावरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. पंरतु बाजीरावाला मनातून यशवंतरावाची भीती वाटत होती.
अशा अस्थिर राजकीय परस्थितीत दुसर्‍या बाजीरावाला शिवाजी महाराजांच्या राजधानीविषयी - रायगडाविषयी- विलक्षण प्रेम वाटू लागले. डोंगरी किल्ल्यांच्या सहाय्याने आपण सर्व संकटावर मात करू असा फाजील आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण झाला. शिवाजीमहाराजांनी रायगडावरून राजकारण केले तसे आपल्यालाही करता येणे शक्य आहे असे त्याला वाटू लागले. परंतु बाजीरावाचे हे मनोरथ त्याच्या भयगंडातून निर्माण झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा उपयोग करून घेण्याचे शिवाजीमहाराजांचे असामन्य कर्तॄत्व बाजीरावाजवळ मुळीच नव्हते.

क्रमश.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती आहे मित्रा !
खरोखर........
छ.संभाजीराजांच्या नंतर कुणी कर्तबगार छत्रपती झालेच नाहीत. पुढचे सगळेच पेशव्यांच्या जिवावर महालात बसुन राजकारण करणारे निघाले. त्यामुळे पेशव्यांनी मराठी राजकारणाला आपल्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न केला. पण मुळातच छत्रपती शिवाजीमहाराजांची दृष्टी एक थोरले बाजीराव आणि काही अंशी माधवराव पेशवे सोडले तर कुणाजवळच नव्हती.
रायगड तसेच इतरही किल्ल्यांबद्दल अजुनही वाचायला आवडेल. पुलेशु Happy

नानासाहेब पेशवे (थोरले बाजीराव यांचे पुत्र आणि माधवरावाचे वडिल) हे पण बर्‍यापैकी कर्तबगार होते. त्यांच्या काळात मराठी राज्याची चांगल्यापैकी भरभराट झाली होती. पानिपताच्या पराभवाने त्या वाढत्या वैभवाला दृष्ट लागली. ही एक मोठी घटना वगळता, बाकी राज्याची घडी आणि विस्तार या बद्दल नावे ठेवण्यासारखे काही नव्हते.

महेश अनुमोदन - थोरल्या बाजीरांवानी निजामाचा पालखेडला मोठ्ठा पराभव करून मराठी साम्राज्याचा दरारा वाढवला. मुख्य म्हणजे लढायांचा विस्तार प्रचंड वाढल्यामुळे त्याचा केंद्रबिंदू किल्ल्यांवरून खाली मैदानावर आला. त्याचे बरे वाईट परिणाम होणे साहजिकच होते. त्यामुळे नंतरच्या काळात किल्ल्यांचे महत्व कमी होत जाणे हे अगदी स्वाभाविक वाटते.
शिवाजी महारांजांना किंवा संभाजी रांजाना अधिक आयुष्य लाभले असते तर त्यांनी नक्कीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती. त्यावेळी त्यांनीही रणनीतीमध्ये बदल केला असता. त्यामुळे इथे कुणी बदल केला यापेक्षा परिस्थिती कशी बदलत गेली त्यानुसार रणनीती बदलत गेली हे जास्त सयुक्तिक वाटते

नारायणरावांच्या खुनाबद्दल राघोबादादांना रामशास्त्री प्रभुणे यांनी देहान्ताची शिक्षा सुनावली होती. त्याचे पुढे काय झाले? रामशास्त्री शेवटपर्यंत पेशव्यांच्या सेवेत होते का? राघोबादादांचे पुढे काय झाले? त्यांचा मृत्यु कधी व कोठे झाला?

वेताळ... चांगली लेखमालिका सुरू केलीस. इतिहासाच्या संदर्भात लिखाण इथे तसे कमीच येते आहे.

राजांनी १६६५ मध्ये राजगड परिसरातला धोका ओळखून राजधानी कोकणात न्यायचा निर्णय घेतला नसावा. तो निर्णय त्या बराच आधी झालेला असावा. रायगड ताब्यात आल्यावर (१६५६) राजांनी काढलेले उद्गार तर आपण वरती लिहिलेले आहेतच. त्यानंतर लगोलग रायगड वर बांधकाम सुरू झाले असावे.

छत्रपती शाहूंचा मुत्सद्दी पेशवा बाळाजी विश्वनाथ याने ’मराठा मंडळाची' स्थापना करून अनेक कर्तबगार मराठे >>>

मराठा मंडळ हे छत्रपती राजारामने स्थापण केले. पुढे महाराणी ताराबाईच्या काळात ते वाढले. पेशव्याने मात्र नवीन सरदार तयार केले जसे गायकवाड, होळकर, शिंदे ई पण मंडळात पेशव्यासोबत रघूजी भोसला (नागपुर), दाभाडे माळवा प्रांती (तळेगाववाले) हे व असे अनेक मान्यवर योद्धे होते. बाजीरावाने (पहिल्या) दाभाडे, भोसले इ शी युद्ध करून त्यांना निकामी (खच्चीकरण) केले व तोच मुख्य झाला.

पंरतु बाजीरावाला मनातून यशवंतरावाची भीती वाटत होती. >> आणि तशीच भिती नाना फडणविसाची महादजी शिंद्याला. महादजीला वाटत होते की नाना त्याला कैद करेल म्हणून तो १०-१२ वर्षे पुण्यात आलाच नाही, जेंव्हा आला तेंव्हा नानाने कैद केले नाहीच. शेवटी महादजी पुण्यातच मेला. अशा अनाठायी भिती अन गैरसमजामुळे मराठा एम्पायर अन पर्यायाने आपल्यासर्वांची वाट लागली.

शिवाजीमहाराजांचे असामन्य कर्तॄत्व बाजीरावाजवळ मुळीच नव्हते >>> ते खुद्द त्याचा पुत्र संभाजीत पण नव्हते. दुसर्‍या बाजीरावाने पेशवाई लयाला घातली म्हणून त्यावर टिका होते, त्याची बाजू वगैरे मी घेत नाही पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या छत्रपतीला मुली पुरवण्यात येत होत्या (पेशव्यास वारंवार तसे पत्र जात होते) हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. अ रा कुलकर्णींनी दुसर्‍या बाजीरावाबद्दल बरेच चांगले लिहिले आहे. ते शोधून इथे लिहिल वाटल्यास.

धन्यवाद पक्का भटक्या
<<राजांनी १६६५ मध्ये राजगड परिसरातला धोका ओळखून राजधानी कोकणात न्यायचा निर्णय घेतला नसावा. तो निर्णय त्या बराच आधी झालेला असावा. रायगड ताब्यात आल्यावर (१६५६) राजांनी काढलेले उद्गार तर आपण वरती लिहिलेले आहेतच. त्यानंतर लगोलग रायगड वर बांधकाम सुरू झाले असावे.>>
नक्कीच प.भ., कदाचित तो निर्णय आधी झालेला असावा. पण १६६५ मधे मिर्झाराजे जयसिंगच्या फौजा जेंव्हा राजगडापर्यंत आल्या त्याचवेळी रायगडाला राजधानी करण्याचा निर्णय महाराजांनी पक्का केला असावा.

धन्यवाद केदार
<<ते खुद्द त्याचा पुत्र संभाजीत पण नव्हते.>>
संभाजीच्या कर्तॄत्वची साक्ष त्याची आठ वर्षाची पराक्रमी 'कारकीर्द' देते.

केदार, संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या कर्तुत्वाच्या कार्यकक्षा वेगवेगळ्या होत्या. आता उदाहरणच द्यायचे झाले तर शिवाजीराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाचा सरदार मिर्झा जयसिंग स्वराज्यात घुसल्यानंतर राजांना माघार घेऊन तह करावा लागला होता. मग ज्यावेळी औरंगजेब आपला संपूर्ण फौजफाटा घेऊन उतरल्यावर काय परिस्थिती असेल.
जर का शिवाजीराजांच्या कारकिर्दीतच औरंगजेबाने हा निर्णय घेतला असता तर चित्र काय असते याचा विचार व्हायला हवा. त्यात पुन्हा थोरल्या राजांचे शत्रू हे उघड होते. लखूजी जाधवराव सासरे असले तरी ते उघडपणे शत्रुपक्षात होते. त्याउलट संभाजीराजांची शक्ती घरगुती भांडणातच जास्त खर्च झाली.
संभाजीराजांनी उताविळ होऊन काही चुका जरूर केल्या त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्यांचे दुर्दैव असे की त्या चुका त्यांना अंतापर्यंत सोसाव्या लागल्या...
राजांच्या हातून काही चुका झाल्या नाहीत का...
सिद्दी मसूदला स्वराज्याच्या सरहद्दीवरच रोखून धरण्यासाठी राजांनी पन्हाळगडाची निवड केली. पण हा निर्णय किती महागात पडू शकला असता. तसेच दिल्लीला जाऊन औरंगजेबाला भेटण्याचे.
औरंगजेब हा अत्यंत पाताळयंत्री आणि खुनशी आहे. त्याने आपल्या सख्ख्या भावांचे खून पाडलेत हे महाराजांना माहीती होते पण त्यांनी मिर्झा जयसिंगच्या वचनावर विश्वास ठेऊन आमंत्रण स्वीकारले.
आता प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रचंड अक्कलहुशारीने चकवा देत आपली सुटका करून घेतली ही गोष्ट खरी असली तरी त्यांना आपल्या सर्वांच्या सुदैवाने नशिबाची साथ मिळाली हे देखिल तितकेच खरे आहे.
ज्या प्रमाणे लखुजी जाधवरांवाना प्रतिकाराची संधीही न देता भर दरबारात मुलांसह ठार करण्यात आले तसाच निकाल औरंगजेबाने त्याच दिवशी दिला असता तर कल्पनाही करवत नाही.
माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की, कर्तुत्वाच्या बाबतीत आपण कुणाचीही तुलना करूच शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या परिघात काय कार्य करतो हे दुसर्या परिघातल्या परिमाणांची पट्टी लाऊन मोजता येणे अशक्य आहे.

राजांची थोरवी निर्विवाद आहे पण म्हणून संभाजीराजे कमी होते असे म्हणता येणार नाही...उलट शूर वडीलांचा तितकाच शूर मुलगा म्हणून त्यांचे कर्तुत्व तितक्याच मोलाचे आहे

>>> नारायणरावांच्या खुनाबद्दल राघोबादादांना रामशास्त्री प्रभुणे यांनी देहान्ताची शिक्षा सुनावली होती. त्याचे पुढे काय झाले? रामशास्त्री शेवटपर्यंत पेशव्यांच्या सेवेत होते का? राघोबादादांचे पुढे काय झाले? त्यांचा मृत्यु कधी, कसा व कोठे झाला?

मी वर माहितीसाठी हे विचारलं होतं. ही माहिती कोणाकडेच नाही का? का माझी विचारायची जागा चुकली?

त्यात पुन्हा थोरल्या राजांचे शत्रू हे उघड होते. लखूजी जाधवराव सासरे असले तरी ते उघडपणे शत्रुपक्षात होते.

>>> तुला थोरल्या राजांचे म्हणजे शहाजी राजे म्हणायचे आहे का?

सिद्दी मसूदला स्वराज्याच्या सरहद्दीवरच रोखून धरण्यासाठी राजांनी पन्हाळगडाची निवड केली. पण हा निर्णय किती महागात पडू शकला असता.

>>>> ही चूक कशी झाली? उलट तो रणनीतीचा एक भाग होता.

>>राजांच्या हातून काही चुका झाल्या नाहीत का...
>>आता प्रत्येक ठिकाणी त्यांनी (महाराज) प्रचंड अक्कलहुशारीने चकवा देत आपली सुटका करून घेतली ही गोष्ट खरी असली तरी त्यांना आपल्या सर्वांच्या सुदैवाने नशिबाची साथ मिळाली हे देखिल तितकेच खरे आहे.

शिवाजी महाराजांबद्द्लची ही दोनही वाक्य जरा अतिशयोक्ति वाटतात. नशिबापेक्षा महाराजांच्या व्यक्तीमत्त्वामुळे व दुरद्रुष्टीमुळेच त्यांनी या सर्व संकटांवर मात केली. ईंग्रजांकडुन देशाला असलेला धोका त्यांना २०० वर्ष आधीच कळला होता म्हणुनच त्यांनी आरमाराची उभारणी केली. आणि महाराजांची जरब एवढी होती की औरंगजेबाच्याच दरबारात त्याच्याच सरदारांसमोर त्याला मान वर करुन जाब विचारुनही महाराजांच्या केसालाही औरंगजेबाला धक्का लावता आला नाही. हे सगळे नशिबाचा भाग नसुन महाराजांच्या कर्तुत्त्वाचा, व्यक्तीमत्त्वाच्या दारार्यामुळे शक्या झाले. आणि शिवाजी महाराजांना जे हिंदवी स्वराज्य घडवायचे होते त्यासाठी त्यांना असल्या असंख्य दिव्यातुन जावे लागणार याची बालपणापसुनच जाणीव होती. म्हणुनच त्यांनी कर्तबगार सरदार जमवलेच पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांची मेलेली अस्मिता जागी केली जेणेकरुन अशा संकटातुन जाताना त्यांचे काही बरेवाईट झालेच तर त्यांनी पाहीलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न व महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभीमान अढळ राहील. जे बर्याच अंशी झालेही कारण कोणतेही स्थिर नेत्त्रुत्व नसतानाही सामान्य जनता बलाढ्य औरंगजेबाशी त्याच्या अंतापर्यंत लढ्त राहीली.

पण लेख छान जुळुन आलाय्...आणखीन वाचायला आवडेल.

ही माहिती कोणाकडेच नाही का? का माझी विचारायची जागा चुकली? >>> राघोबादादा बद्दल लगेच आठवत नाही पण घरची बाडं पाहून लिहितो.

बंडुपंत - हो मान्य आहे अतिशयोक्त वाटत असतीलही...
पण तुम्हाला खरेच वाटते का केवळ राजांचा दरारा होता म्हणून औरंगजेबाने त्यांना ठार मारले नाही. ज्या दिवशी राजांनी आपली सुटका करून घेतली त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांना दुसर्या वाड्यात हलवून तिथे हालहाल करून मारण्याचा डाव होता. याची कुणकुण महाराजांना नक्कीच लागली असणार म्हणूनच त्यांनी त्वरेने हालचाली केल्या. माझा मुद्दा तो नाही, मला म्हणायचे होते त्यावेळी स्वराज्याची संकल्पना नीटशी रुजलेलीच नव्हती. त्यामुळे जर महाराजांचे काही बरेवाईट झाले असते तर पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे पुन्हा एकदा सर्व मराठी सरदार बादशहांच्या दरबारी रुजू झाले असते. महाराज सिंहासनाधीश झाल्यानंतरही, त्याच्या मृत्यूनंतरही त्यांचा सख्खा जावई मोगलांना मिळाला तर बाकीच्यांचे सोडाच...

जे बर्याच अंशी झालेही कारण कोणतेही स्थिर नेत्त्रुत्व नसतानाही सामान्य जनता बलाढ्य औरंगजेबाशी त्याच्या अंतापर्यंत लढ्त राहीली.

हो नक्कीच. पण हे कधी झाले...राजांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या अपूर्व अशा बलिदानानंतर, राजाराम महाराजांच्या आणि नंतर ताराराणीच्या प्रखर लढ्यानंतर....

ज्यावेळी महाराज आग्र्याला गेले त्यावेळी ते सिंहासनाधीश नव्हते, बरेचशे मराठी सरदार त्यांना एक जमिनदार म्हणूनच मानत होते, त्यांना वतन आणि अन्य कागदपत्रांवर बादशहाची मोहर जास्त महत्वाची वाटत होती. त्यात महाराज प्रचंड मोगली सैन्याशी तह करून मग औरंगजेबाचे मनसबदार बनण्याचे सांगत दिल्लीला गेले होते. त्यामुळे जर बरेवाईट झाले असते तर प्रतिकाराची आग उसळली नसती आणि अशा धाडसाचे असेच परिणाम होणार असे निष्कर्ष काढून आपले लोक रिकामे झाले असते.

भटक्या - नाही इथे संभाजी आणि शिवाजी राजे असा विषय सुरू होता म्हणून मी शिवाजी राजांना थोरले राजे म्हणालो.

ही चूक कशी झाली? उलट तो रणनीतीचा एक भाग होता.

हा नक्कीच रणनितीचा एक भाग होता आणि त्याबद्दल इतिहासकारांनी त्याचे कौतुकही केले आहे. नुकत्याच पायावर उभ्या राहू लागलेल्या स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी विचारांती उचललेले ते पाऊल होते. पण त्याची दुसरी बाजू अशी की पन्हाळा आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा अदिलशहाला जास्त जवळचा होता. त्यामुळे एक नेताजी पालकर सोडला तर अन्य कुणी सिद्दी मसूदवर हल्ला करू जाणे शक्य नव्हते. त्यातही तो पराभूत झाला.
परंतु हाच डाव महाराजांच्या अंगावर उलटू शकला असता. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये
त्यामुळे स्वराज्याची नुकसानी झाली असती तरी महाराजांना काही होता कामा नये याचा विचार करून जर त्यांनी तोरणा निवडला असता तर आजूबाजूच्या किल्ल्यांवरच्या शिबंदीने वेढा घातलेल्या सिद्दी मसूदचे चावे घेऊन त्याला हैराण करून सोडले असते. सगळे किल्ले एकदम घेणे त्याच्या बापालाही शक्य नव्हते. त्यामुळे पाठलाग करणार कुणाचा आणि कसा...
सर्व कुटुंबकबिला आणि दप्तरे प्रतापगड किंवा अशाच सुरक्षित ठिकाणी पाठवून राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड अशा बलाढ्य किल्ल्यांनी वेढलेल्या अडचणीच्या ठिकाणी सिद्दीला ओढला असता तर कदाचित (कदाचित म्हणतोय मी कारण त्यावेळची परिस्थिती सांगता येत नाही) पन्हाळा ते विशाळगड हे पलायनपर्व करावे लागले नसते.

आणि माझे इथे एक डिस्क्लेमर आहे....
कृपया कोणीही असा गैरसमज करून घेऊन नये की मी इथे त्यांच्या नशिबाचा उल्लेख करून त्यांच्या कर्तुत्वाला कमी लेखत आहे. महारांजाचे शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, धाडस सर्वच अलौकीक आणि त्यांच्यावर टिका करण्याचा माझ्यासारख्या पामराला काहीच अधिकार नाही. परंतु, इतिहासाची पाने चाळताना असे वाटून जाते की हा निर्णय जर असा घेतला असता तर...
अर्थात या जर-तर ला काही अर्थ नाही. पण आपल्याच मनाचे समाधान.

शिवाजी राजांना थोरले राजे म्हणालो
>>> मग लखुजी सासरे कसे झाले? ते तर शिवाजी राजांचे आजोबा की रे.. Happy

आता राजांनी पन्हाळगड का निवडला ते बघुया..

लढाई कोणामध्येही झाली तरी नुकसान सामान्य जनतेचे होते. गावे-घरे, शेत-प्राणी हे सामान्य जनतेचेच जातात म्हणून शक्यतो स्वराज्याच्या हद्दीत लढाई होऊ द्यायची नाही हे धोरण राजांनी आखले होते. अफझलखान आला तेंव्हा ते राजगड उतरून प्रतापगडी जाऊन बसले कारण तेंव्हा स्वराज्याची दक्षिण हद्द वाई होती. अफझलखान मारल्यावर जी मोहीम राजांनी उघडली त्यात त्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि स्वराज्याची दक्षिण हद्द ती बनली. सिद्दी त्याचा इतका मोठा फौजफाटा घेऊन पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत राजांना तोरणा किंवा सिंहगड गाठता आला नसता का? उलट त्यांनी मुद्दामून पन्हाळा निवडला. अर्थात तेंव्हा पन्हाळा ते विशाळगड अशी दौड मारावी लागेल असे त्यांना देखील वाटले नसेल. पावसाळा सुरू झाला की आपण इथून निघू शकू असे त्यांनी ठरवले असावे. शिवाय तेंव्हा मुघलांशी उत्तर कोकणातील भागाविषयी तह केलेला होता. पण मुघलांनी दगाबाजी केली आणि स्वराज्यावर शास्ताखानाला पाठवले.

नंतर कधीही राजांनी मुघ्लांवर विश्वास ठेवला नाही. त्यांना आग्रा भेट ही नाईलाजाने करावी लागली होती.

नारायणरावांच्या खुनाबद्दल राघोबादादांना रामशास्त्री प्रभुणे यांनी देहान्ताची शिक्षा सुनावली होती. त्याचे पुढे काय झाले? रामशास्त्री शेवटपर्यंत पेशव्यांच्या सेवेत होते का? राघोबादादांचे पुढे काय झाले? त्यांचा मृत्यु कधी व कोठे झाला?

प्रा. डॉ. श. गो. कोलारकर यांच्या 'मराठ्यांचा इतिहास' या पुस्तकात याबद्दल खालील माहिती मिळाली:
(ख.खो.दे.जा.)
नारायणराव यांच्या मृत्यूनंतर पेशवा होण्यास एकटे राघोबादादा उरले होते. म्हणून नाईलाजाने राघोबादादांना पेशवेपद द्यावे लागले. त्या सुमारास हैदर अलीने मराठी सरदारांवर हल्ला करून त्यांना कर्नाटकात रहाणे कठीण करून टाकले. म्हणून राघोबादादांना कर्नाटक मोहिम हाती घ्यावी लागली. ते तिकडे गेले असतानाच इकडे पुण्यात रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथरावांवरील नारायणारावाच्या खुनाचा आरोप सिद्ध करून सरकारी रीत्या आपला अधिकृत निवाडा जाहीर केला. त्यात राघोबादादा यांना देहांतशासन देण्याची शिक्षा दिली.
राघोबादादांनी रामशास्त्री प्रभुणे यांनाच बडतर्फ केले, ते बिचारे माहुलीला निघून गेले!
राघोबादादांविरुद्ध असलेली मंडळी नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई यांच्या नेतृत्वाखाली(?) एकत्र झाली. आणि बारभाई कारस्थानास सुरुवात झाली. मग मराठे सरदार नि राघोबा यांच्यात लढाया सुरु झाल्या. छत्रपती, नागपूरचे भोसले, इंग्रज हे सगळे मिळून एक मोठाच गुंता निर्माण झाला. शिवाय शेवटी मराठा सरदारांनी निजामाची मदत घेऊन राघोबादादा यांना पळून जाण्यास भाग पाडले.
लवकरच नारायणारावांचा पुत्र जन्माला आला. वयाच्या चाळीसाव्या दिवशी त्याला पेशवेपद देऊन त्याच्या वतीने पेशवाईचा कारभार नाना फडणवीस, सखाराम बापू व काही सर॑दार बघू लागले.

तरी राघोबादादांनी इंग्रजांची मदत घेऊन पेशवा बनण्यासाठी बरीच वर्षे, १७८२ पर्यंत, प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी राघोबा दादा यांना पेशव्यांनी दरमहा २५००० रु. पेन्शन देण्याचे मान्य केले, नि राघोबादादा कोपरगावला निघून गेले. अत्यंत निराश होऊन शेवटी ११ डिसेंबर १७८३ रोजी कचेश्वर येथे त्यांचे निधन झाले.

तेंव्हा पन्हाळा ते विशाळगड अशी दौड मारावी लागेल असे त्यांना देखील वाटले नसेल. पावसाळा सुरू झाला की आपण इथून निघू शकू असे त्यांनी ठरवले असावे. शिवाय तेंव्हा मुघलांशी उत्तर कोकणातील भागाविषयी तह केलेला होता. पण मुघलांनी दगाबाजी केली आणि स्वराज्यावर शास्ताखानाला पाठवले.

एक्झॅटली, मलाही तेच म्हणायचे होते.. दूरदृष्टी दाखवून त्यांनी हा निर्णय घेतला पण अंदाज चुकल्यामुळे तो महागात पडू शकला असता ना. मला हेच म्हणायचे आहे की त्यांचेही काही अंदाज चुकले, त्यांच्या हातूनही काही चूका झाल्या. ते काय देव नव्हते..तेही माणूसच होते. पण त्यांनी अक्कलहुशारीने आणि मिळालेल्या थोड्या नशिबाच्या साथीने त्यावर मात केली. हे संभाजीराजांच्या बाबतीत झाले नाही. त्यांच्या चुका स्वराज्यासाठी घातक ठरल्या आणि अंती स्वतसाठी प्राणघातक...ते त्याबाबतीत प्रचंड दुर्दैवी ठरले

कर्तृत्वाच्या बाबतीत बोलायचे झाले तर औरंगजेब कधी ना कधी दक्षिणेत उतरणार हे उघड होते. त्यामुळे तो उतरल्यानंतर काय करायचे यावर पिता-पुत्रांची चर्चा झालेली असणे सहजशक्य आहे. आणि संभाजीराजांनी महाराजांचा आकस्मिक मृत्यू धीराने पचवून त्यांची योजना तडीस नेलेली दिसते.
औरंगजेब आल्यावर स्वराज्याचे अन्य शत्रूही हात धुवून घ्यायला टपलेच होते. त्यामुळे तो येण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन संभाजीराजांनी पोर्तुगिज व्हॉईसरॉयला धडकी भरवली, जंजीरा त्यांनी जवळपास जिंकतच आणला होता. त्यामुळे ज्यावेळी औरंगजेब आला त्यावेळी हे दोघेही फारश्या हालचाली न करता स्वस्थ राहीले. हे त्यांचे कर्तृत्व नव्हे काय.

पण संभाजीराजांची बदनामीच अधिक झाली आणि त्यांच्या कार्याकडे कुणीच पाहिले नाही. साधी गोष्ट आहे, कादंबरीकार रंगवतात तसे संभाजी बदफैली, तापट, उतावीळ असा असता तर महाराष्ट्राची जनता त्याच्या पाठीशी उभी राहीली असती काय

सिद्दी जौहर स्वराज्यावर चाल करून येतो आहे, हे समजल्यावर महाराजांना स्वतःच्या संरक्षणासाठी आधीच आत सह्याद्रीच्या रांगांत धाव घेऊन बचाव करता आला असता; पण शत्रूला ते स्वराज्याच्या सीमाप्रदेशात पन्हाळगडावर आडवे गेले. शत्रूच्या जास्तीत जास्त रसदेचे नुकसान होऊ देऊन त्याला पन्हाळगडच्या वेढ्यात दीर्घकाळ तिष्ठत बसायला लावून त्यांनी ऐन पावसाळ्याचा मुहूर्त पकडला. कारण त्यांना इथल्या झऱ्यांची, वाहत्या ओढ्यांची आणि डोंगरमाथ्यावर फुटणाऱ्या ढगांचीही कल्पना होती. जुलै महिन्यात तर पन्हाळा, शाहूवाडी भागात इतका धुवॉंधार पाऊस पडतो, धुकेही माजते की, दहा-पंधरा हातांवरचेसुद्धा दिसत नाही. अशा चिखल-पावसात शत्रूकडून हत्ती आणि तोफखाना घेऊन पाठलाग होणे तर केवळ अशक्‍यच. असा पर्जन्याचा पडदा सोबतीला घेऊनच राजांनी सिद्दी जौहरच्या हातावर तुरी दिली होती.

संगमेश्‍वरला संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस मुळात जिवंत कसे ठेवले? औरंगजेबाचा इतिहास पाहता कुशाग्र बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दारा नावाच्या त्याच्या भावासकट त्याने आपल्या कोणत्याही शत्रूला दिसा-दोन दिसांच्या पलीकडे जिवंत ठेवले नव्हते. मात्र, औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या आपल्या मुठीत हव्या होत्या. सुरवातीला येसूबाई धावत आपल्याकडे येईल आणि आपल्या धन्याच्या प्राणाची भीक मागण्यासाठी आपल्या पायावर गडाबडा लोळेल, असे त्याला वाटत होते. मात्र, कपाळीच्या कुंकवापेक्षा येसूबाईने हिंदवी स्वराज्याच्या भाळावरील स्वातंत्र्याच्या दिव्याला अधिक महत्त्व दिले! त्याच वेळी आपली गर्दन दहा वेळा छाटली गेली तरी शिवरायांचे स्वप्न टिकले पाहिजे, अशी भूमिका शंभूराजांनी घेतली होती. तसे गुप्त संदेशही इकडून तिकडे जात असत. शेवटी या थोर राजपुत्राने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राष्ट्रासाठी आपले शिरकमल अर्पण केले. तेव्हा नाशिककडचे दोन-तीन किल्ले वगळता स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. जगाच्या इतिहासात देशाच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे "राष्ट्राय स्वाहा' करून मृत्यूला मिठी मारणारा असा बाजिंदा राजकुमार दुसरा कोणी जन्मला नाही अन्‌ त्याच्या तेज:पुंज कर्तृत्वाला समजून न घेता त्याच्यावर हकनाक बदनामीची राळ उठवणारा महाराष्ट्रासारखा दुसरा करंटा प्रांतही कुठे नसेल.

Pages