रेखाचित्र

Submitted by कमलाकर देसले on 26 June, 2011 - 06:52

Image (12).jpg
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

ऊन माळते असे की ,जसा गजरा माळते
वाळवणासारखी तू बये उन्हात वाळते
कुणी वाचत का नाही तुझ्या दु:खाची कहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

ऊन वारा पावसाळा ,किती सोसणार माती
किती स्वभावाची बये तूच सांभाळते नाती
वेड्यासारखी राबते अशी कशी तू शहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

कधी आटतच नाही तुझ्या वात्सल्याचा झरा
तुला जाणता जाणता होतो देवही बावरा
कधी राधेचा वसंत,कधी मीरेची विराणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

चित्रकाव्य- कमलाकर देसले

गुलमोहर: 

रेषांची लय खूप मस्त! आणि कविता पण समर्पक! दोन्ही सुंदर. अजून अशीच सुंदर चित्रकाव्यं बघायला आणि वाचायला आवडतील.

छान Happy

मित्रांनो ,आपण सगळे मुळात रसिक कलावंत आहात .त्यामुळे आपली दाद मला खूप प्रेरक वाटते .खूप खूप धन्यवाद !

Pages