प्रवासावरची काही पुस्तकं

Submitted by चिनूक्स on 17 July, 2008 - 03:40

१. The travels of Dean Mahomet - An eighteenth-century journey through India :
एखाद्या भारतीयाने लिहिलेलं हे पहिलं इंग्रजी पुस्तक.
दीन मोहमद हा एक साधा शिपाई होता. सुमारे १०-१५ वर्षं गोर्‍या साहेबाबरोबर भारतभर फिरला. असंख्य युद्ध पाहिली, आपल्या स्वकीयांविरुद्ध लढला. मग सरकारची त्याच्या साहेबावर गैरमर्जी झाली, आणि या साहेबाबरोबरच १७८४ साली हा गृहस्थ आयर्लंडला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. तिथे त्याने एक 'आयुर्वेदीक हमामखाना सुरू केला', आणि एक उत्तम 'आयुर्वेदीक डॉक्टर आणि masseur' म्हणून प्रसिद्ध झाला. मग त्याने एक करीहाऊस सुरू केलं आणि ब्रायटनला एक हॉटेल काढलं. एका
राणीच्या देशात सांस्कृतिक घुसखोरी करणारा हा आद्य भारतीय. गोर्‍या साहेबाला सर्वप्रथम बिर्याणी यानेच खिलवली, आणि इंग्रजी/फ्रेंच भाषेला 'shampoo' हा शब्दही यानेच बहाल केला. मूळ शब्द 'चम्पी'. आपल्या आयुर्वेदीक औषधांनी हा केसांना चम्पी करायचा, आणि त्याच्या त्या 'आयुर्वेदीक चम्पीला' नाव मिळालं 'shampoo'.
१७९४ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात १७६९-१७८४ या कालावधीतील त्याचे सैन्याबरोबर फिरतानाचे अनुभव आहेत.

२. A winter in Arabia : a journey through Yemen, ले -Dame Freya Madeleine Stark : २०व्या शतकात अख्खा मध्यपूर्व पालथा घालणारी ही एक अतिशय धाडसी स्त्री. जिथे पुरुषांनाही जायला भिती वाटायची, अशा अनेक देशांत ही एकटी फिरली.
The valleys of Assassins आणि The southern gates of Arabia ही तिची मी वाचलेली इतर पुस्तकं.

३. Full Tilt: Ireland to India with a Bicycle - ले. Dervla Murphy : १९६३ साली Dervla Murphy आपल्या सायकलीवर भारतात यायला निघाल्या. युगोस्लविआ, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा प्रवासातले अनुभव म्हणजे हे पुस्तक.
ही माझी अतिशय आवडती लेखिका. त्यांची सगळी पुस्तकं केवळ अफलातून आहेत.
Tibetan foothold : धरमशाला येथे तिबेटी निर्वासितांबरोबर काही काळ त्या राहिल्या. त्याचे हे अनुभव.
The waiting land : नेपाळमधील तिबेटी निर्वासितांचे अनुभव.
In Ethiopia with a mule : इथिओपिआत एका खेचरावर सामन लादून केलेला हा प्रवास.
Eight Feet in the Andes : १५२६ साली फ्रान्सिस्को पिझारो इक्वाडोरमधील कायामार्काहून पेरूच्या दिशेने निघाला. या नवीन देशात म्हणे सोन्याचा धूर निघे.. त्याला जायचं होतं कुझ्को येथे. ही इन्का साम्राज्याची राजधानी. डोंगरदर्‍या पार करत पिझारोने मग स्पेनचा झेंडा द. अमेरिकेत रोवला. Dervla Murphy, त्यांची मुलगी रेचल आणि युआना नावाचं खेचर पिझारोने तुडवलेल्या या मार्गाने निघाले. Andes पर्वतरांगांतील हा खडतर प्रवास अतिशय रोमांचक आणि तितकाच मजेदार.
On a shoestring to Coorg : रेचलबरोबर भारतात कूर्गमधील अनुभव.
Where the Indus is young: बाल्टीस्तान
Muddling through Madagascar, Through Siberia by accident ही त्यांची इतर प्रवासवर्णनं.

४. Flirting with Danger : Confessions of a Reluctant War Reporter - ले. Siobhan Darrow :
Siobhan Darrow ही एक अतिशय नावाजलेली पत्रकार. CNNमध्ये असताना रशिया, युगोस्लाविया, बोस्निया अशा अनेक युद्ध्ग्रस्त देशांत ती फिरली. तिचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच खडतर. त्याचाच हा लेखाजोखा.

५. African Laughter: Four visits to Zimbabwe - ले. Doris Lessing : Doris Lessing ही एक नोबेल पारितोषिकविजेती लेखिका. झिम्बाब्वे जेव्हा South Rhodesia होतं तेव्हा तिथल्या गोर्‍या सरकारला विरोध केल्याने तिला झिम्बाब्वेत प्रवेश नव्हता. १९८२ साली, देशातून हाकलून दिल्यावर २५ वर्षांनी त्या झिम्बाब्वेत परतल्या. या भेटीनंतर तीनदा त्या आपल्या देशाला भेट देऊन आल्या. AIDS ने घातलेले थैमान, आणि राजकारणी यांच्यात भरडली गेलेली जनता , राजकीय अराजक, दुष्काळ, यादवी आणि फारशी न बदललेली स्त्रियांची स्थिती यांचं हे वर्णन.
अतिशय ओघवती आणि सुंदर भाषा,आणि त्यामुळे उठून दिसणारं देशाविषयीचं प्रेम.. एक अप्रतिम पुस्तक.. Going Home हेसुद्धा याच पुस्तकाचे भावंडं.
१९८६ साली Doris Lessing पाकिस्तानात गेल्या. तिथल्या अफगाण निर्वासितांना भेटल्या. मुजाहिदीन नेत्यांना भेटल्या. अफगाणिस्तानात जाऊन तिथल्या स्त्रियांबरोबर राहिल्या. तिथलं भयानक, भीतीग्रस्त जीवन स्वतः अनुभवून आल्या. रशियन सैन्याने आणि मुजाहिदीन नेत्यांनी केलेली वाताहत त्यांना अतिशय अस्वस्थ करून गेली. पण त्याहूनही त्यांना व्यथित केलं ते पाश्चिमात्य देशांतील राजकारण्यांच्या अफगाणिस्तानाप्रति असलेल्या दृष्टिकोनामुळे. या पाकिस्तान्/अफगाणिस्तान भेटीचा वृत्तांत म्हणजे The wind blows away our words हे प्रवासवर्णन.

६. A journey with Elsa Cloud - ले. Leila Hadley : हे एक अतिशय सुरेख प्रवासवर्णन..बरचसं आत्मकथन सामावलेलं. लेखिकेची मुलगी अनेक वर्षं आईला दुरावलेली. दोघींत अजिबात संपर्क नाही. आणि मग एका सकाळी मुलगी आईला फोन करून सांगते की ती भारतात आहे, धरमशाला येथे. तिने आता बौद्ध धर्म स्वीकारला आहे. महिन्याभरात मायलेकींची भारतात भेट होते, आणि दोघी खर्‍या भारताचा शोध घ्यायला निघतात. भारतीय चालीरिती, सण, भाषा, धर्म , रंग, गंध या सार्‍याचं अतिशय सुंदर विश्लेषण इथे वाचायला मिळतं. आपल्याला अजिबात माहिती नसलेला भारत इथे आपल्याला मस्त समजतो.

७. A search in sacred India -ले. Paul Brunton: विसावं शतक नुकतंच सुरू झालेलं. इंग्लंडमधील एका तरूणाला स्वप्नात एक टेकडी, आणि एक मंदिर कायम दिसत असतं. हा छळ बराच सहन केल्यावर त्याला कुणीतरी सांगतं की असं मंदिर कदाचित भारतात असावं. तो तरूण भारतात येतो. मुंबईला आल्यावर त्याला कुणीतरी सांगतं की ते मंदिर दिसणं म्हणजे त्याने आपला गुरू शोधावा असा आदेश आहे. मग सुरू होतो योग्य गुरूचा शोध. सुरूवात होते नगरच्या मेहेरबाबांपासून. काही दिवसांत त्याच्या लक्षात येतं की हा बाबा भोंदू आहे. नेक्स्ट स्टॉप कांचीपीठाचे शंकराचार्य. ते जणू मनकवडे असल्याप्रमाणे त्याने काही न विचारताच सांगतात की त्याला त्याचा गुरू दक्षिणेतच सापडेल, फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण शोधल्यावर सापडतं, फक्त सापडेपर्यंत शोधावं लागतं. हा प्रवास त्या तरूणाला भारताची अद्भूत सफर घडवतो.. जादूगार, साधू, संत त्याला भेटतात.. कलकत्त्याचे लाहिरी महाशय, बनारसचे मेलेला पक्षी जिवंत करणारे साधू आणि असंच कोण कोण.. त्याचे गुरू मात्र त्याला भेटतात अरूणाचलमला.. रमण महर्षी..
आपल्यालाही माहिती नसणारा भारत इथे बघायला मिळतो..
असंच आणखीन एक पुस्तक म्हणजे Pilgrimage.. लेखिकेचं नाव आत्ता आठवत नाहीये. पाच वर्षांची असताना भारत कायमचा सोडलेली ही लेखिका वयाच्या २५व्या वर्षी एका संशोधन प्रकल्पासाठी भारतात येते. विषय हिंदू धर्म असल्याने साहजिकच भारतातील असंख्य धार्मिक स्थळांना ती भेट देते. हा प्रवास तिला अंतर्बाह्य बदलून टाकतो. तिच्या सार्‍या समजूती, समज तो खोटं ठरवतो. रमण महर्षींच्या आश्रमातील मनकवडे वृद्ध साधू, बद्रीनाथचे रावळ तिला पुरतं शहाणं करून सोडतात.
खरा हिंदू धर्म आणि संस्कृती म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे असेल, तर ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावीत. फक्त आपल्या काही श्रद्धांना धक्का लागला तर त्या बदलण्याची तयारी असावी.

८. Butter chicken in Ludhiana- ले. Pankaj Mishra : राजीव गांधी सत्तेवर आले, आणि काही वर्षांत मध्यमवर्ग श्रीमंत व्हायला सुरुवात झाली. चार चाकी गाड्या स्वस्त झाल्या, घरोघरी टिव्ही आले,कॉम्प्यूटर आले, रस्तोरस्ती STD बूथ सुरू झाले. आणि छोटी शहरं एकदम मोठी व्हायला लागली. लेखक अशाच बदलत्या छोट्या भारतीय शहरांची आपल्याला ओळख करून देतो. या प्रवासात त्याला हर तर्‍हेची माणसं भेटतात. लेखक, स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, २ पोळ्यांसाठी सगळी माहिती लेखकाला पुरवणारे नक्षलवादी.. एक सुंदर प्रवासवर्णन..
याच लेखकाचं आणखी एक प्रवासवर्णन Temptations of the West: How to be Modern in India, Pakistan and Beyond.. बॉलिवुड, काश्मीर, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान या देशांतील फिरतीचे हे अनुभव..

९. Fron Heaven Lake : Travels through Sinkiang and Nepal -ले. Vikram Seth : चीनमधील नानजिंग विद्यापीठात शिकत असताना विक्रम सेठ आपल्या वर्गमित्रांबरोबर सहलीला निघतात. तुर्फानला Heaven Lake या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका नितळ, आरस्पानी तळ्याच्या काठी ते एकट्यानेच प्रवासाला निघतात. एक परदेशी विद्यार्थी म्हणून त्यांच्यावर काही बंधनं आहेत.. पण त्यातून मार्ग काढत ते ल्हासाला जायचं ठरवतात. यात कुठेही स्थलांचं वर्णन नाही. आहेत ती फक्त माणसं आणि त्यांचे अनुभव. लेखकाला दिसलेला चीन, तिथली माणसं, आणि त्यांचं जग. दुकानं, रस्ते, मंदिरांत भेटलेली प्रेमळ माणसं, आणि त्यांचं मर्यादित विश्व. ल्हासाच्या वाटेवर केलेला ट्रकमधील खडतर प्रवास, 'आवारा हू' गाऊन दाखवल्यावर मिळालेला परवाना.. आणि तिबेटहून नेपाळमार्गे भारत. अप्रतिम भाषा.. माझं अतिशय लाडकं पुस्तक.. मी वाचलेलं हे सर्वोत्तम प्रवासवर्णन..

१०. All the world is a spittoon:Travels back to India - ले. Samit Sawhney : पुस्तकाच्या नावावरूनच याचं वेगळेपण लक्षात आलं असेल. समित साहनी हा इंग्लंडमध्ये कनसल्टंट म्हणून काम करणारा एक भारतीय तरूण. २८व्या वर्षी त्याच्या लक्षात येतं की आता आपण भरपूर पैसा कमावला आहे.. भारतात परतायला हवं.. पण इतर सर्वसामान्य प्रवाशांसारखं विमानाने प्रवास करायचा नाही. पण इंग्लंडहून भारतात यायला अनेक शतकांपासून वापरात असलेला रस्ता हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून जातो. भारतीय असल्याने पाकिस्तानचा व्हिसा मिळणे अशक्य. म्हणून मग तो दुसरा मार्ग धरतो.. इंग्लंड्-नॉर्वे-डेन्मार्क्-रशिया-मंगोलिया-चीन्-तिबेट-नेपाळ-भारत.. या प्रवासात अट एकच, विमानात बसायचं नाही.
नॉर्वेत पोलिसांना कबड्डी शिकवणे, ट्रान्स्-सायबेरीयन रेल्वीचा प्रवास, मंगोलियातील भन्नाट घोडेस्वार, आणि मग विक्रम सेठच्या मार्गाने केलेला चीन-नेपाळ-तिबेट प्रवास.. तूफान विनोदी, धमाल प्रवासवर्णन..

११. A Cook's Tour: Global Adventures in Extreme Cuisines -ले. Anthony Bourdain : Anthony Bourdain हे नाव कदाचित तुम्हाला परिचित असेल. No Reservations आणि A Cook's Tour हे त्याचे कार्यक्रम Discovery channel वर बरेच गाजलेत. या पुस्तकात हे बाबर्ची महोदय जगभर हिडतात ते विविध exotic पदार्थांच्या शोधात.. सापाचं काळीज, डुकराची आतडी, शार्कचा मेंदू आणि जपानचा फुगु मासा.. पोर्तुगाल, जपान, स्पेन, मोरक्को, कंबोडिया,रशिया या देशांतील फिरस्ती, आणि तिथलं लोकजीवन व खाद्यजीवन..

१२. Travels with myself and another - ले. Martha Gellhorn : Martha Gellhorn या एक धाडसी पत्रकार, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या पत्नी. आयुष्यभरात त्यांनी ५५ देश पिंजून काढले आणि १७ देशांत घरं केली. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या 'best horror journies'. चीनमध्ये Chiang Kai-Shek यांना भेटण्यासाठी केलेली धडपड, इस्राईलमधले हिप्पी, केनियातील जंगलात भटकताना आपल्या ड्रायव्हर-गाईडला अजिबात गाडी चालवता येत नाही, व तो जंगलात पहिल्यादाच येतोय हे दुसर्‍या दिवशी लक्षात येणं, रशियात घेतलेली एका भुमिगत लेखकाची भेट.. सतत हसवत ठेवणारं एक मस्त प्रवासवर्णन..

१३. The Lone Strider - ले. Dom Moraes (with Sarayu Srivatsa) :
Thomas Coryate हा एक स्कॉटीश तरूण जेम्स राजाचा खलिता घेऊन जहांगीर राजाला भेटायला इंग्लंडहून भारतात पायी आला. Thomas Coryate याने या प्रवासाबद्दल लिहून ठेवलं होतं. Dom Moraes यांनी त्याच्या त्या प्रवासवर्णनानुसार पुन्हा एकदा त्याच मार्गावरून प्रवास केला..त्याची ही गोष्ट..

Out of God's Oven: Travels in a Fractured Land हे या लेखकद्वयीचं दुसरं प्रवासवर्णन. काहीसं वेगळं. ६ वर्षं भारतभर हिंडून, इथल्या लोकांशी बोलून , या लोकांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि पर्यायाने भारताबद्दल लिहिलेलं हे पुस्तक..

१४. Sorcerer's Apprentice - ले. Tariq Shah : हफीझ शाह नावाचा लहानपणी भेटलेला एक पश्तुन जादुगार तारीकच्या चांगलाच लक्षात राहतो. त्या जादुगाराचा शोध घेत तारिक भारतात येतो, जादू शिकण्यासाठी. हफीझ त्याला कलकत्त्याला आपल्या हकीम फिरोझ या गुरूकडे पाठवतो. हा गुरू महिनाभर त्याची परिक्षा घेऊन त्याने स्वतःच जादू शिकावी म्हणून हाकलून देतो. तारिक मग भारतभर हिंडून असंख्य साधू, जादुगार, बैरागी, ज्योतिषी यांना भेटतो. त्यात पाण्यापासून पेट्रोल तयार करणारा गोविंद असतो, हैद्राबादचे मासळीचं औषध देणारे वैद्य असतात, आणि सत्य साई बाबासुद्धा.. एक धमाल आणि वेगळं प्रवासवर्णन..

१५. Among the believers, Beyond belief, An area of darkness - ले. V.S.Naipaul

१६. Confessions of a Yoga dropout - ले. Barbara Behrmann : योगासनं शिकायला लेखिका भारतात येते, योग्य शिक्षकाच्या शोधाचा हा प्रवास.

१७. Holy Cow -ले. Sarah Macdonald : लग्न करून भारतात येऊन राहिलेल्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराचे अनुभव.

याशिवाय Bill Bryson आणि William Dalrymple यांची सगळी पुस्तकं..

ही काही मला आवडलेली पुस्तकं.. आता जितकी आठवली, तितकी लिहिली.. अजून बरेच आहेत, पण काहींची नावं आठवत नाहीत, तर काहींचे लेखक..
पुस्तक वाचून जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्याला आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला आवडलं की होतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय,
कालच तुझ्या यादीतले Full Tilt: Ireland to India with a Bicycle आणलय लायब्ररीतुन :). वाचुन झाले की सांगेन कसे वाटले ते.

वरच्या list मधले tariq shah चे Sorcerer's Apprentice मागे आणून वाचले. मनोरंजक आहे. प्रवास वर्णन म्हणून पटत नाही. बरेचसे प्रसंग थोडा पदरचा मीठ मसाला घालून फुलवले आहेत असे वाटत राहते पण overall खिचडी नीट जमलिये. पुस्तक वाचल्याचा पश्चा:ताप होत नाही.

वा ! वा ! जबरी. आता यातली पुस्तकं मिळवून वाचायला पाहिजे.

छान उपक्रम (आणि याद्या).

मी जेंव्हा(-जेंव्हा) भारतात जातो तेंव्हा एखाद्या नवीन भागाला भेट द्यायचा प्रयत्न करतो. मग त्याआधी त्या भागाचे एखादे तरी पुस्तक वाचणे अपरिहार्य असते. याच उपदव्यापातुन दोन सुंदर पुस्तकं वाचायला मिळाली:

(१) Banaras: City of Light by Diana L. Eck
(२) A Goddess in the Stones: Travels in India
by Norman Lewis (हे ओरीसा ला जातांना)

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

'अष्टचक्री रोमायण' नावाचे एक पुस्तक वाचनात आले होते.

लेखक: प्रवीण कारखानीस

लेखक आणि इतर सात तरूण, चार मोटर सायकल घेऊन मुंबईहून रोमला गेले, त्या रोमहर्षक प्रवासाचे वर्णन यात आहे.
प्रवासाचा काळ १९७८ च्या आसपासचा आहे.
हे पुस्तक मिळाले तर नक्की वाचा.

Pages