प्रवासावरची काही पुस्तकं

Submitted by चिनूक्स on 17 July, 2008 - 03:40

१. The travels of Dean Mahomet - An eighteenth-century journey through India :
एखाद्या भारतीयाने लिहिलेलं हे पहिलं इंग्रजी पुस्तक.
दीन मोहमद हा एक साधा शिपाई होता. सुमारे १०-१५ वर्षं गोर्‍या साहेबाबरोबर भारतभर फिरला. असंख्य युद्ध पाहिली, आपल्या स्वकीयांविरुद्ध लढला. मग सरकारची त्याच्या साहेबावर गैरमर्जी झाली, आणि या साहेबाबरोबरच १७८४ साली हा गृहस्थ आयर्लंडला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. तिथे त्याने एक 'आयुर्वेदीक हमामखाना सुरू केला', आणि एक उत्तम 'आयुर्वेदीक डॉक्टर आणि masseur' म्हणून प्रसिद्ध झाला. मग त्याने एक करीहाऊस सुरू केलं आणि ब्रायटनला एक हॉटेल काढलं. एका
राणीच्या देशात सांस्कृतिक घुसखोरी करणारा हा आद्य भारतीय. गोर्‍या साहेबाला सर्वप्रथम बिर्याणी यानेच खिलवली, आणि इंग्रजी/फ्रेंच भाषेला 'shampoo' हा शब्दही यानेच बहाल केला. मूळ शब्द 'चम्पी'. आपल्या आयुर्वेदीक औषधांनी हा केसांना चम्पी करायचा, आणि त्याच्या त्या 'आयुर्वेदीक चम्पीला' नाव मिळालं 'shampoo'.
१७९४ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात १७६९-१७८४ या कालावधीतील त्याचे सैन्याबरोबर फिरतानाचे अनुभव आहेत.

२. A winter in Arabia : a journey through Yemen, ले -Dame Freya Madeleine Stark : २०व्या शतकात अख्खा मध्यपूर्व पालथा घालणारी ही एक अतिशय धाडसी स्त्री. जिथे पुरुषांनाही जायला भिती वाटायची, अशा अनेक देशांत ही एकटी फिरली.
The valleys of Assassins आणि The southern gates of Arabia ही तिची मी वाचलेली इतर पुस्तकं.

३. Full Tilt: Ireland to India with a Bicycle - ले. Dervla Murphy : १९६३ साली Dervla Murphy आपल्या सायकलीवर भारतात यायला निघाल्या. युगोस्लविआ, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा प्रवासातले अनुभव म्हणजे हे पुस्तक.
ही माझी अतिशय आवडती लेखिका. त्यांची सगळी पुस्तकं केवळ अफलातून आहेत.
Tibetan foothold : धरमशाला येथे तिबेटी निर्वासितांबरोबर काही काळ त्या राहिल्या. त्याचे हे अनुभव.
The waiting land : नेपाळमधील तिबेटी निर्वासितांचे अनुभव.
In Ethiopia with a mule : इथिओपिआत एका खेचरावर सामन लादून केलेला हा प्रवास.
Eight Feet in the Andes : १५२६ साली फ्रान्सिस्को पिझारो इक्वाडोरमधील कायामार्काहून पेरूच्या दिशेने निघाला. या नवीन देशात म्हणे सोन्याचा धूर निघे.. त्याला जायचं होतं कुझ्को येथे. ही इन्का साम्राज्याची राजधानी. डोंगरदर्‍या पार करत पिझारोने मग स्पेनचा झेंडा द. अमेरिकेत रोवला. Dervla Murphy, त्यांची मुलगी रेचल आणि युआना नावाचं खेचर पिझारोने तुडवलेल्या या मार्गाने निघाले. Andes पर्वतरांगांतील हा खडतर प्रवास अतिशय रोमांचक आणि तितकाच मजेदार.
On a shoestring to Coorg : रेचलबरोबर भारतात कूर्गमधील अनुभव.
Where the Indus is young: बाल्टीस्तान
Muddling through Madagascar, Through Siberia by accident ही त्यांची इतर प्रवासवर्णनं.

४. Flirting with Danger : Confessions of a Reluctant War Reporter - ले. Siobhan Darrow :
Siobhan Darrow ही एक अतिशय नावाजलेली पत्रकार. CNNमध्ये असताना रशिया, युगोस्लाविया, बोस्निया अशा अनेक युद्ध्ग्रस्त देशांत ती फिरली. तिचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच खडतर. त्याचाच हा लेखाजोखा.

५. African Laughter: Four visits to Zimbabwe - ले. Doris Lessing : Doris Lessing ही एक नोबेल पारितोषिकविजेती लेखिका. झिम्बाब्वे जेव्हा South Rhodesia होतं तेव्हा तिथल्या गोर्‍या सरकारला विरोध केल्याने तिला झिम्बाब्वेत प्रवेश नव्हता. १९८२ साली, देशातून हाकलून दिल्यावर २५ वर्षांनी त्या झिम्बाब्वेत परतल्या. या भेटीनंतर तीनदा त्या आपल्या देशाला भेट देऊन आल्या. AIDS ने घातलेले थैमान, आणि राजकारणी यांच्यात भरडली गेलेली जनता , राजकीय अराजक, दुष्काळ, यादवी आणि फारशी न बदललेली स्त्रियांची स्थिती यांचं हे वर्णन.
अतिशय ओघवती आणि सुंदर भाषा,आणि त्यामुळे उठून दिसणारं देशाविषयीचं प्रेम.. एक अप्रतिम पुस्तक.. Going Home हेसुद्धा याच पुस्तकाचे भावंडं.
१९८६ साली Doris Lessing पाकिस्तानात गेल्या. तिथल्या अफगाण निर्वासितांना भेटल्या. मुजाहिदीन नेत्यांना भेटल्या. अफगाणिस्तानात जाऊन तिथल्या स्त्रियांबरोबर राहिल्या. तिथलं भयानक, भीतीग्रस्त जीवन स्वतः अनुभवून आल्या. रशियन सैन्याने आणि मुजाहिदीन नेत्यांनी केलेली वाताहत त्यांना अतिशय अस्वस्थ करून गेली. पण त्याहूनही त्यांना व्यथित केलं ते पाश्चिमात्य देशांतील राजकारण्यांच्या अफगाणिस्तानाप्रति असलेल्या दृष्टिकोनामुळे. या पाकिस्तान्/अफगाणिस्तान भेटीचा वृत्तांत म्हणजे The wind blows away our words हे प्रवासवर्णन.

६. A journey with Elsa Cloud - ले. Leila Hadley : हे एक अतिशय सुरेख प्रवासवर्णन..बरचसं आत्मकथन सामावलेलं. लेखिकेची मुलगी अनेक वर्षं आईला दुरावलेली. दोघींत अजिबात संपर्क नाही. आणि मग एका सकाळी मुलगी आईला फोन करून सांगते की ती भारतात आहे, धरमशाला येथे. तिने आता बौद्ध धर्म स्वीकारला आहे. महिन्याभरात मायलेकींची भारतात भेट होते, आणि दोघी खर्‍या भारताचा शोध घ्यायला निघतात. भारतीय चालीरिती, सण, भाषा, धर्म , रंग, गंध या सार्‍याचं अतिशय सुंदर विश्लेषण इथे वाचायला मिळतं. आपल्याला अजिबात माहिती नसलेला भारत इथे आपल्याला मस्त समजतो.

७. A search in sacred India -ले. Paul Brunton: विसावं शतक नुकतंच सुरू झालेलं. इंग्लंडमधील एका तरूणाला स्वप्नात एक टेकडी, आणि एक मंदिर कायम दिसत असतं. हा छळ बराच सहन केल्यावर त्याला कुणीतरी सांगतं की असं मंदिर कदाचित भारतात असावं. तो तरूण भारतात येतो. मुंबईला आल्यावर त्याला कुणीतरी सांगतं की ते मंदिर दिसणं म्हणजे त्याने आपला गुरू शोधावा असा आदेश आहे. मग सुरू होतो योग्य गुरूचा शोध. सुरूवात होते नगरच्या मेहेरबाबांपासून. काही दिवसांत त्याच्या लक्षात येतं की हा बाबा भोंदू आहे. नेक्स्ट स्टॉप कांचीपीठाचे शंकराचार्य. ते जणू मनकवडे असल्याप्रमाणे त्याने काही न विचारताच सांगतात की त्याला त्याचा गुरू दक्षिणेतच सापडेल, फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण शोधल्यावर सापडतं, फक्त सापडेपर्यंत शोधावं लागतं. हा प्रवास त्या तरूणाला भारताची अद्भूत सफर घडवतो.. जादूगार, साधू, संत त्याला भेटतात.. कलकत्त्याचे लाहिरी महाशय, बनारसचे मेलेला पक्षी जिवंत करणारे साधू आणि असंच कोण कोण.. त्याचे गुरू मात्र त्याला भेटतात अरूणाचलमला.. रमण महर्षी..
आपल्यालाही माहिती नसणारा भारत इथे बघायला मिळतो..
असंच आणखीन एक पुस्तक म्हणजे Pilgrimage.. लेखिकेचं नाव आत्ता आठवत नाहीये. पाच वर्षांची असताना भारत कायमचा सोडलेली ही लेखिका वयाच्या २५व्या वर्षी एका संशोधन प्रकल्पासाठी भारतात येते. विषय हिंदू धर्म असल्याने साहजिकच भारतातील असंख्य धार्मिक स्थळांना ती भेट देते. हा प्रवास तिला अंतर्बाह्य बदलून टाकतो. तिच्या सार्‍या समजूती, समज तो खोटं ठरवतो. रमण महर्षींच्या आश्रमातील मनकवडे वृद्ध साधू, बद्रीनाथचे रावळ तिला पुरतं शहाणं करून सोडतात.
खरा हिंदू धर्म आणि संस्कृती म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे असेल, तर ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावीत. फक्त आपल्या काही श्रद्धांना धक्का लागला तर त्या बदलण्याची तयारी असावी.

८. Butter chicken in Ludhiana- ले. Pankaj Mishra : राजीव गांधी सत्तेवर आले, आणि काही वर्षांत मध्यमवर्ग श्रीमंत व्हायला सुरुवात झाली. चार चाकी गाड्या स्वस्त झाल्या, घरोघरी टिव्ही आले,कॉम्प्यूटर आले, रस्तोरस्ती STD बूथ सुरू झाले. आणि छोटी शहरं एकदम मोठी व्हायला लागली. लेखक अशाच बदलत्या छोट्या भारतीय शहरांची आपल्याला ओळख करून देतो. या प्रवासात त्याला हर तर्‍हेची माणसं भेटतात. लेखक, स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, २ पोळ्यांसाठी सगळी माहिती लेखकाला पुरवणारे नक्षलवादी.. एक सुंदर प्रवासवर्णन..
याच लेखकाचं आणखी एक प्रवासवर्णन Temptations of the West: How to be Modern in India, Pakistan and Beyond.. बॉलिवुड, काश्मीर, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान या देशांतील फिरतीचे हे अनुभव..

९. Fron Heaven Lake : Travels through Sinkiang and Nepal -ले. Vikram Seth : चीनमधील नानजिंग विद्यापीठात शिकत असताना विक्रम सेठ आपल्या वर्गमित्रांबरोबर सहलीला निघतात. तुर्फानला Heaven Lake या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका नितळ, आरस्पानी तळ्याच्या काठी ते एकट्यानेच प्रवासाला निघतात. एक परदेशी विद्यार्थी म्हणून त्यांच्यावर काही बंधनं आहेत.. पण त्यातून मार्ग काढत ते ल्हासाला जायचं ठरवतात. यात कुठेही स्थलांचं वर्णन नाही. आहेत ती फक्त माणसं आणि त्यांचे अनुभव. लेखकाला दिसलेला चीन, तिथली माणसं, आणि त्यांचं जग. दुकानं, रस्ते, मंदिरांत भेटलेली प्रेमळ माणसं, आणि त्यांचं मर्यादित विश्व. ल्हासाच्या वाटेवर केलेला ट्रकमधील खडतर प्रवास, 'आवारा हू' गाऊन दाखवल्यावर मिळालेला परवाना.. आणि तिबेटहून नेपाळमार्गे भारत. अप्रतिम भाषा.. माझं अतिशय लाडकं पुस्तक.. मी वाचलेलं हे सर्वोत्तम प्रवासवर्णन..

१०. All the world is a spittoon:Travels back to India - ले. Samit Sawhney : पुस्तकाच्या नावावरूनच याचं वेगळेपण लक्षात आलं असेल. समित साहनी हा इंग्लंडमध्ये कनसल्टंट म्हणून काम करणारा एक भारतीय तरूण. २८व्या वर्षी त्याच्या लक्षात येतं की आता आपण भरपूर पैसा कमावला आहे.. भारतात परतायला हवं.. पण इतर सर्वसामान्य प्रवाशांसारखं विमानाने प्रवास करायचा नाही. पण इंग्लंडहून भारतात यायला अनेक शतकांपासून वापरात असलेला रस्ता हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून जातो. भारतीय असल्याने पाकिस्तानचा व्हिसा मिळणे अशक्य. म्हणून मग तो दुसरा मार्ग धरतो.. इंग्लंड्-नॉर्वे-डेन्मार्क्-रशिया-मंगोलिया-चीन्-तिबेट-नेपाळ-भारत.. या प्रवासात अट एकच, विमानात बसायचं नाही.
नॉर्वेत पोलिसांना कबड्डी शिकवणे, ट्रान्स्-सायबेरीयन रेल्वीचा प्रवास, मंगोलियातील भन्नाट घोडेस्वार, आणि मग विक्रम सेठच्या मार्गाने केलेला चीन-नेपाळ-तिबेट प्रवास.. तूफान विनोदी, धमाल प्रवासवर्णन..

११. A Cook's Tour: Global Adventures in Extreme Cuisines -ले. Anthony Bourdain : Anthony Bourdain हे नाव कदाचित तुम्हाला परिचित असेल. No Reservations आणि A Cook's Tour हे त्याचे कार्यक्रम Discovery channel वर बरेच गाजलेत. या पुस्तकात हे बाबर्ची महोदय जगभर हिडतात ते विविध exotic पदार्थांच्या शोधात.. सापाचं काळीज, डुकराची आतडी, शार्कचा मेंदू आणि जपानचा फुगु मासा.. पोर्तुगाल, जपान, स्पेन, मोरक्को, कंबोडिया,रशिया या देशांतील फिरस्ती, आणि तिथलं लोकजीवन व खाद्यजीवन..

१२. Travels with myself and another - ले. Martha Gellhorn : Martha Gellhorn या एक धाडसी पत्रकार, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या पत्नी. आयुष्यभरात त्यांनी ५५ देश पिंजून काढले आणि १७ देशांत घरं केली. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या 'best horror journies'. चीनमध्ये Chiang Kai-Shek यांना भेटण्यासाठी केलेली धडपड, इस्राईलमधले हिप्पी, केनियातील जंगलात भटकताना आपल्या ड्रायव्हर-गाईडला अजिबात गाडी चालवता येत नाही, व तो जंगलात पहिल्यादाच येतोय हे दुसर्‍या दिवशी लक्षात येणं, रशियात घेतलेली एका भुमिगत लेखकाची भेट.. सतत हसवत ठेवणारं एक मस्त प्रवासवर्णन..

१३. The Lone Strider - ले. Dom Moraes (with Sarayu Srivatsa) :
Thomas Coryate हा एक स्कॉटीश तरूण जेम्स राजाचा खलिता घेऊन जहांगीर राजाला भेटायला इंग्लंडहून भारतात पायी आला. Thomas Coryate याने या प्रवासाबद्दल लिहून ठेवलं होतं. Dom Moraes यांनी त्याच्या त्या प्रवासवर्णनानुसार पुन्हा एकदा त्याच मार्गावरून प्रवास केला..त्याची ही गोष्ट..

Out of God's Oven: Travels in a Fractured Land हे या लेखकद्वयीचं दुसरं प्रवासवर्णन. काहीसं वेगळं. ६ वर्षं भारतभर हिंडून, इथल्या लोकांशी बोलून , या लोकांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि पर्यायाने भारताबद्दल लिहिलेलं हे पुस्तक..

१४. Sorcerer's Apprentice - ले. Tariq Shah : हफीझ शाह नावाचा लहानपणी भेटलेला एक पश्तुन जादुगार तारीकच्या चांगलाच लक्षात राहतो. त्या जादुगाराचा शोध घेत तारिक भारतात येतो, जादू शिकण्यासाठी. हफीझ त्याला कलकत्त्याला आपल्या हकीम फिरोझ या गुरूकडे पाठवतो. हा गुरू महिनाभर त्याची परिक्षा घेऊन त्याने स्वतःच जादू शिकावी म्हणून हाकलून देतो. तारिक मग भारतभर हिंडून असंख्य साधू, जादुगार, बैरागी, ज्योतिषी यांना भेटतो. त्यात पाण्यापासून पेट्रोल तयार करणारा गोविंद असतो, हैद्राबादचे मासळीचं औषध देणारे वैद्य असतात, आणि सत्य साई बाबासुद्धा.. एक धमाल आणि वेगळं प्रवासवर्णन..

१५. Among the believers, Beyond belief, An area of darkness - ले. V.S.Naipaul

१६. Confessions of a Yoga dropout - ले. Barbara Behrmann : योगासनं शिकायला लेखिका भारतात येते, योग्य शिक्षकाच्या शोधाचा हा प्रवास.

१७. Holy Cow -ले. Sarah Macdonald : लग्न करून भारतात येऊन राहिलेल्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराचे अनुभव.

याशिवाय Bill Bryson आणि William Dalrymple यांची सगळी पुस्तकं..

ही काही मला आवडलेली पुस्तकं.. आता जितकी आठवली, तितकी लिहिली.. अजून बरेच आहेत, पण काहींची नावं आठवत नाहीत, तर काहींचे लेखक..
पुस्तक वाचून जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्याला आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला आवडलं की होतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरिविना, वरती चिनूक्षने पुस्तकांची यादी दिलीच आहे.. माझी वाइट सवय म्हणजे काय वाचलं ह्याची यादी ठेवत नाही..
पॉल थेरॉची डार्क स्टार सफारी, द ग्रेट रेल्वे बझार, रायडिंग द आयरन रूस्टर वगैरे वगैरे.. तसेच एव्हरेस्ट आणि के२ वरच्या मोहिमांची बरीच पुस्तके.. ख्रिस बॉनिंग्टन ची पुस्तके छान आहेत एव्हरेस्ट मोहिमांवरची.. सेवन समिट्स नावाचे डिक बासचे पण छान पुस्तक आहे..

चिनूक्ष, मार्क शँडचे ब्रह्मपुत्रेच्या उगमापासुन अंतापर्यंतच्या प्रवासावरचे पण पुस्तक आहे.. ते बरे आहे..

चिनूक्ष, शतशः धन्यवाद.. लिस्ट मध्ये प्रचंड भर पडतिये तुझ्यामुळे..

मला नायपॉलची प्रवासवर्णने (?) पण आवडतात.. पण बर्‍याच भारतीयांना त्याचे भारतावरील लिखाण आवडत नाही..
India: A wounded Civilization
An area of Darkness
India: A million mutinies
Among the belivers: an Islamic journey

अरे देवा! Chinoox, हे काय केलंत? आता कधी वाचायचं हे सगळं? Happy
यादी सेव्ह करून ठेवते. धन्यवाद. Happy

अरे वा. नवीन बीबी सुरू? मस्तच्..आता इथे लिहायचं तर वरची पुस्तकं लव्कर वाचायला पाहिजेत :). चिन्मय. शंतनू, धन्स..

Holy Cow!!
मुखपृष्ठापासून ते प्रत्येक पानावर खिल्ली उडविली गेली आहे भारताची आणि भारतीयांची.
अर्थात हे माझं मत.

हैद्राबादमध्ये दम्यासाठी उत्तम मानले गेलेले औषध अजूनही मासळीच्या तोंडातून दिले जाते. हा उपक्रम एका कुटुंबाने विनामुल्य सुरु ठेवला आहे. कितीतरी लाभार्थी दुरदुरून येतात म्हणे.

Chinnu,
Holy Cow बद्दलचं तुमचं मत योग्यच आहे..
पण कधीतरी आपल्याबद्दल इतरांचं मत काय, हे जाणून घ्यायला मजा येते..

बरोबर. पण भावना दुखाविल्या जाणार्‍यांनी असल्या पुस्तकांच्या वाटेला जाउ नये. उगाच मनस्ताप होतो.

माझे मत Holy Cow बद्दल थोडे वेगळे आहे. टाकाऊ नाही पण अगदी आवर्जून वाचावे असे काहिही नाही. लेखिका prejudiced आहे तर हो म्हणता येईल पण तीने प्रामाणिकपणे ते सुरूवातिलाच नमूद केले आहे. पण नंतर पूर्ण पुस्तकभर त्याचा उल्लेख खटकत राहतो. भारताची खिल्लीपेक्षा माझे अचाट अनुभव अशा प्रकाराचे वाटले मला . जशी typical भारतावर असतात तसे नाही पण एक "अवाक झालेला आव आणून लिहिलेले वर्णन" वाटते.

त्याच्या Review मधे कोणीतरी लिहिलेले कि Too Much Holy and Too Less Cow. जे एकदम perfect आहे Happy

Holy Cow मध्ये कोणाच्या भावना दुखावण्यासारखं मला तरी काही आढळलं नाही..
आणि सगळी काही टिंगलच नाहीये..
ते तिचे अनुभव आहेत..
नायपॉलने 'India is a huge latrine' असं लिहिलं तरी ते त्याचं मत आहे, आणि त्यातही भावना दुखावण्यासारखं काही नाही..

Into Thin Air: A Personal Account of the Mount Everest Disaster by Jon Krakauer हे पण मस्त प्रवास वर्णन आहे.

चिनूक्स, असामी, अगदी बरोबर. ते पुस्तक म्हणजे तिला आलेले अचाट अनुभव.
पुस्तकांसारखी माध्यमे फार प्रभावशाली असतात. ती 'जबाबदारी' जाणून न घेता, उगाच एक पुस्तक काढून 'प्रदुषणा'ला सहाय्य करू नये, असे मला वाटते. त्या पुस्तकाचे मुखपॄष्ठ, जे इतके हास्यास्पद आहे, त्यावरून so called लेखिकेची मत पुस्तक न उघडताच लक्षात यावी.
अर्थात सर्वांचे मत माझ्यासारखेच असले पाहिजे असे नाही. मला मात्र हे पुस्तक खटकले.

चिनुक्स,
आणि मला आपल वाटायच की मी बरच वाचते म्हणुन .... Happy
यादी बद्दल खरच धन्स.

स्वाती अन रुनी दोघींना अनुमोदन. स्वातीकडनं अन असामी कडनं आलेली पुस्तकंच वाचुन होत नाहीयेत अस्जून. शिवाय मग घरातली, लायब्ररीतली आणलेली पुस्तकं आहेतच. आता त्यात ही भर. पण हे आनंददायी ओझं, अभिमानास्पद ओझं! पुस्तकांबद्दल अशी धावती माहिती लिहिलिच आहे , आता सविस्तर परिक्षणं पण येऊ द्यात!
अल बेरुनी'स इंडीया वाचलंय का?

चिनुक्स, इतक्या सगळ्या पुस्तकांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. हावरट सारखे काय वाचु नी काय नको असे होउन गेले Happy

बापरे, चिनूक्स, केवढी मोठी यादी दिली आहे, आता हे सगळं वाचून असं वाटतंय की २ महीन्याची सुट्टी घेऊन आधी हे वाचून काढावं. असो, यादी जपून ठेवेन आणि वेळ मिळेल तसे वाचेन.

केदार, ह्याच क्रॉकरचे इन टू द वाइल्ड (ज्यावरुन शॉन पेनने सिनेमा बनवला) ते पण भारी आहे.. क्रॉकर हा स्वतः एक जबरी गिर्यारोहक आहे.. एव्हरेस्ट वर पुस्तक लिहिण्यात मात्र ख्रिस बॉनिंग्टन हा बाप आहे...

आर्लीन ब्लम ने तिच्या अन्नपुर्णा मोहिमे वर लिहिलेलं पुस्तक सुद्धा एकदम मस्त आहे womens place is in top असं काहीसं नाव होतं. पंचवीस तीस वर्षं झाली ते वाचून. ब्रिटिश कांउसिल लायब्ररी एल आय सी बिल्डींग्च्या मागच्या बाजूला होती त्या दिवसात वाचलेलं पुस्तक आहे ! आता परत वाचायला हवं.
Not Suitable for women नावाने स्त्री लेखिकांच्या प्रवासवर्णनातल्या निवडक भागांचं संकलन आहे. ते वाचून थक्क व्हायला होतं.
एम एफ के फिशर चं पण एक रेलवे प्रवासावर पुस्तक आहे- अर्धवट वाचलं होतं कोणाच्या घरी आठवत नाही आता. तेहि पुर्ण वाचायचंय.

ऑक्टेव्हिओ पाझ यांचं भारताबद्द्लचं पुस्तक वाचलंय का कोणी?

शंतनु,
मी वाचलय इन टु द वाईल्ड. खरच मस्त आहे. मी सिनेमा नाही बघितला. मागच्याच वर्षी आला ना तो सिनेमा.
मला स्वतःला या दोन्ही मध्ये इन टु थिन एअर जास्त आवडले होते. मात्र ख्रिस बॉनिंग्टन चे मी अजुन काही वाचले नाही.
वाचायला हवे आता लायब्ररीतुन आणुन.

होली काउ वेगळं आहे आणि भावना दुखाऊन वगैरे न घेता तटस्थपणे एक अनुभव म्हणून आपण वाचल्यास आवडते.
चिन्मय आणि शंतनू खूपच सुरेख यादी टाकलीत.
नॉट सुटेबल फॉर विमेन मलाही आवडले होते खूप. पण त्यातल्या लेखिकांची स्वतंत्र पुस्तकं वाचायची होती ती राहून गेली.
विमेन ट्रॅवलर्सच्या, काही खास संशोधन किंवा इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी प्रवास करणार्‍या, नेचर डायरी टाइप लिखाण करणार्‍या नेचर ट्रॅवलर्स किंवा बायॉलॉजिस्ट महिला प्रवाशांची अजून काही पुस्तकं वाचली आहेत कां कोणी?

रुनि, सिनेमा देखील छान होता..

भावना दुखण्यावरुन.. नायपॉलचे भारतावरील लिखाण वाचुन अनेकांच्या भावना दुखावतात.. पण आपण जर थोडे भावनांपासून अलग राहिलो तर ह्या लोकांच्या लिखाणातून वेगवेगळी इनसाइट मिळते हे ही नसे थोडके..

चिनूक्स, पुस्तकं सुचवल्याबद्दल धन्यवाद. इथे लायब्ररीत आहेत का बघायला हवीत.

काही खास संशोधन किंवा इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी प्रवास करणार्‍या, नेचर डायरी टाइप लिखाण करणार्‍या नेचर ट्रॅवलर्स किंवा बायॉलॉजिस्ट महिला प्रवाशांची
शर्मिला, जेन गुडॉल ची आहेत तशी पुस्तकं पण ती प्रवासावरची म्हणता येणार नाहीत. एक 'आफ्रिका इन माय ब्लड' तसे असेल. मी वाचलेले नाही.

पूर्वी वाचलेली काही पुस्तकं आठवली..

१८. The Hall of a Thousand Columns : Hindustan to Malabar with Ibn Battutah - ले. Tim Mackintosh - Smith :
१३२५-१३५५ या तीस वर्षांच्या काळात इब्न बटूटाने संपूर्ण जग पालथं घातलं. प्रत्येक इस्लामी राष्ट्राला भेट देणारा (त्याकाळी) तो एकमेव मुशाफीर.. या सगळ्या फिरतीचं वर्णन त्याने 'रिहाला' या आपल्या पुस्तकात केलं आहे.
भारतात इब्न बटूटा तबाल १० वर्षं होता. महम्मद तुघलकानं त्याला दिल्लीचा काझी नेमलं होतं. त्याला भरपूर जागीर दिली होती. मग बादशहाची गैरमर्जी झाली, आणि त्यानं मालदीव बेटांवर आश्रय घेतला..मग तिथून तो श्रीलंका आणि कंबोडीयाला गेला..
इब्न बटूटाने केलेला हा प्रवास Tim Mackintosh - Smith ने केला. Travels with a Tangerine हे त्याचं पहिलं प्रवासवर्णन. यात इब्न बटूटाच्या मार्गाने, त्याच्या प्रवासवर्णनाचा आधार घेत केलेला मध्य-पूर्व आशियातील प्रवास होता.
The Hall of a Thousand Columns मध्ये लेखकानं इब्न बटूटाच्या भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय.( तुघलकाच्या दिल्लीच्या दरबाराला १००० खांब होते. बटूटाच्या प्रवासवर्णनात याचा सतत उल्लेख येतो) ५०० वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत.. इब्न बटूटाच्या प्रवासवर्णनातील स्थळं, आणि लेखकाला दिसलेली दिल्ली, कोचीन, मैसूर ही शहरं..

19. A sense of the world - How a Blind Man became history's greatest traveller : ले. Jason Roberts -

James Holmanचा जन्म १७८६ साली झाला. एडिंबराला त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलं. तो रॉयल सोसायटीचा फेलो होता. डार्विनने 'The voyage of the Beagle' या आपल्या पुस्तकात James Holman चा अनेकदा उल्लेख केलाय.
असा हा Holman १९व्या शतकात जगभर फिरला. युरप, रशिया, आशिया त्याने पालथा घातला, आणि असंख्य प्रवासवर्णनं लिहिली. 'मार्को पोलो आणि मंगो पार्क यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मुशाफिर' असा त्याचा युरोपात लौकिक होता. ब्रिटीशांनी त्याच्या गौरवार्थ आफ्रिकेतील एका नदीला त्याचं नाव दिलं आहे.
असा हा James Holman पूर्ण आंधळा होता. Sir Richard Francis Burton यांनी त्याचा 'Blind Traveller' असा उल्लेख करत त्याच्या मार्गाने जगप्रवास केला.
असा हा विलक्षण माणूस त्याच्या आयुष्याच्या अखेरीस विस्मृतीत गेला. अतिशय हलाखीचं जगणं त्याच्या नशिबी आलं. ज्या काळी अंधांना वाळीत टाकलं जायचं, त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ यायची, त्या काळात James Holmanने समाजात मानाचं स्थान मिळवलं होतं.
अशा या व्यक्तिमत्त्वाच्या प्रवासांचा घेतलेला वेध, म्हणजे हे पुस्तक.

James Holmanचं एक प्रवासवर्णन आपण इथे वाचू शकता-
http://www.gutenberg.org/etext/12528

२०. Dreams of the peaceful Dragon : ले. Katie Hickman : भूटानचं प्रवासवर्णन.


२१. At home in the Himalayas - ले. Christina Noble : लेखिकेचे हिमालयातील गिर्यारोहणाचे व भारतातील वास्तव्याचे अनुभव.

मराठी भाषेत, प्रवास वर्णनांची संख्या बरीच आहे पण आपल्याला ती पुस्तकं माहिती नाहीत. मी एक यादी देत आहे -

१) माझी मुलुखगिरी - मिलिंद गुणाजी.
२) दुर्गदर्शन - गो. नि. दांडेकर
३) माझा आफ्रिकीचा प्रवास - सिकंदर लाल
४) माझा काश्मीरचा प्रवास - गोपाळ मोरेश्वर काळे
५) माझा युरोपातील प्रवास - पांडुरंग दामोदर गुंडे
६) आनंदाच्या दाही दिशा - रविंद्र पिंगे
७) मारुती चितमपल्ली ह्यांची काही पुस्तकं ही देखील प्रवास वर्णन होऊ शकतील.
८) परदेसाई - विनय देसाई
९) अमरनाथचा सफरनामा - अनिल साठे
१०) पुर्वेकडून पुर्वेकडे - श्रीराम कवडीकर
११) यात्रा-सहल उत्तर भारताची - मालतीबाई शिरगावकर
१२) फिरवले अनंते - फिरोज रानडे
१३) बसने नर्मदा परिक्रमा - वामन गणेश खासगीवाले
१४) आफ्रिकन सफारी - केनिया - प्रभाकर अ. दामले
१५) डायरी : एका गिर्यारोहण मोहिमेची - वंदना सु. कुलकर्णी
१६) डॉलरच्या देशा - शिरीष कणेकर
१७) अमेरिका - अनिल अवचट
१८) केल्याने देशाटन - प्र. के. अत्रे
१९) माझा रशियाचा प्रवास - अण्णाभाऊ साठे
२०) भारताचे व्हेनिस - केरळ-शैला कामत
२१) चीन एक अपूर्व अनुभव - गंगाधर गाडगीळ
२२) झुलूंच्या देशात - अनिल दामले
२३) वेगळी माती, वेगळा वास - अरुणा ढेरे
२४) पश्चिमगंध - गिरिजा कीर
२५) अविस्मरणीय युगांडा -अरविंद साने
२६) आसाम मेघालय -शैला कामत
२७) महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे -शैला कामत

आणखी असतीलच नक्की.

पुलंचे पुर्वरंग आणि अपुर्वाई ही दोन पुस्तकं कित्येक वाचकांना पुलंची आत्मचरित्रच वाटलीत. मलाही तसेच वाटले. काही जणांना पुस्तकात माणसे भेटावी असे वाटतं असेल तर काहींना तिथला निसर्ग.

वा...थँक्स बी!! खूप मोठं काम केलंत.. या यादीचा नक्कीच उपयोग होईल!

पॉल थेरॉचे द ग्रेट रेल्वे बझार नुकतेच वाचुन संपवले.. १९७५ मध्ये लंडन ते टोकियो असा आशिया मार्गे आणि टोकियो ते परत लंडन असा रशिया मार्गे संपूर्ण प्रवास रेल्वेने केला त्याचे प्रवासवर्णन.. (अधे मधे विमानाने उडला तो.. अफगाणिस्तान बसने ओलांडला.. कलकत्ता ते रंगून विमान.. विएतनाम ते जपान विमान.. आणि जपानचे उत्तर टोक ते रशियाचे पुर्वेकडचे शेवटचे स्टेशन बोटीतून)..

जवळपास सलग ४ महिने हा पठ्ठ्या एका मागोमाग एक अश्या गाड्या बदलत प्रवास करत गेला.. ह्या प्रवासवर्णनामध्ये साइटसिईंग अजिबात नाहिये (काही तुरळक ठिकाणी शहरात फिरल्याचे संदर्भ येतात).. फक्त रेल्वेचा प्रवास, प्रवासात भेटलेले लोक इतकेच आहे.. प्रवासाचा बराचसा खर्च हा वेगवेगळ्या देशात दिलेले सेमिनार ह्यातुन थोडाफार निघाला होता.. आणि थोडाफार त्याच्या खिशातून (हे संदर्भ त्याच्या इतर काही प्रवासवर्णनांमध्ये येतात)..

अतिशय उत्कृष्ट नाही म्हणता येणार.. (मला स्वतःला त्याचे डार्क स्टार सफारी जास्त आवडते).. पण सलग रेल्वेचा प्रवास ही कल्पनाच इतकी मस्त आहे की... तसेच त्याची लिहिण्याची शैली थोडीशी सारकॅस्टिक, ड्राय असते.. एकुणात आवडेश..

जोरदार .... आता शोधाशोध सुरु करायला पाहीजे .. आणि सगळ्यात आधी यादी जपुन ठेवायला पाहिजे ..gr8 work चिन्मय.

Pages