अमृतसरी छोले

Submitted by अल्पना on 20 June, 2011 - 06:14
amritsari chhole
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक वाटी काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, एक मोठा टॉमेटो, एक इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा जीरेपुड, २ चमचे छोले मसाला, एक चमचा आमचुर पावडर, हळद, मीठ

क्रमवार पाककृती: 

काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवावेत. सकाळी साधारण: १५-२० मिनीट कुकरमध्ये मीठ घालून कमी पाण्यात शिजवून घ्यावेत.

एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, हिरव्या मिरच्या आणि आलं काढावं. त्यात हे शिजलेले चणे अर्धवट मॅश करून घालावेत. आता बाकीचे सगळे मसाले कपभर पाण्यात मिक्स करून छोल्यांमध्ये घालावे. गरज असेल तर थोडं मीठ घालावं. गॅसवर ठेवून कमी आचेवर १५-२० मिनीट किंवा त्यापेक्षा जास्तही शिजू द्यावे.

मधून अधून हलवत रहावं. पाणी आटल्यास वरून अजून थोडं पाणी घालता येईल. याची कन्सिसटंसी पावभाजीच्या भाजीसारखी असते. जितका जास्तवेळ गॅसवर हे शिजेल तितकी छान चव येते. वरून कोथिंबीर घालायची. हवं असल्यास कच्चा कांदा उभा चिरून वर घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हे असे छोले इथे कुलच्यांबरोबर खायला मिळतात. बॉन या कंपनीचे रेडीमेड कुलचे बेकरी सेक्शनमध्ये मिळतात. (मला औरंगाबादला पण मिळाले होते. ) तव्यावर बटर लावून हे कुलचे गरम करायचे आणि त्याबरोबर हे छोले खायचे. सोबत मिठी किंवा नमकीन लस्सी आणि किसलेल्या मुळ्याची कोशिंबीर.

हे छोले करताना तेल अजिबात घालायचे नाही. याची चव हे जसंजसे शिजत जातात तसतशी वाढत जाते. बाहेर हे चोले ज्या भांड्यात बनवतात ते पुर्णवेळ गॅसवर असते.

मसाल्याचं प्रमाण चव घेवून कमी जास्त करता येतं. Happy

मसाला मिक्स करून शिजवताना गॅसऐवजी मायक्रोवेव्हमध्ये शिजवले तर १०-१५ मिनीटं लागतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, कांदा परतायचा नाही. नंतर शिजवताना शिजतो कांदा. इथे दिल्लीला अमृतसरी छोले कुलचे या नावाने जे छोले कुलचे मिळतात ते या पद्धतीने केलेले असतात.
आपल्या चवीप्रमाणे मसाले कमी-जास्त करायचे. आंबटपणासाठी थोडी आमचुर पावडर घायालची. नो कटकट रेसेपी आहे ही.

करून पहाणार लगेच. हे मी जलंधर/ अमृतसर इथे रस्त्यावरचे खाल्लेत. काय अप्रतिम चव लागते!!
त्यांचा उच्चार मात्र 'अंबरसरी छोले' असा वाटतो.

छान

अल्पना, रेसिपी मस्तच आहे एकदम. नक्की करेन या आठवड्यात.

ती कुलचाची रेसिपी पण विचारून देशील का?

मिनोती, मी ज्यांच्याकडे खाल्ले त्या भाभी कुलचे रेडिमेडच आणतात. पावासारखे दोन कुलच्यांचे पाकिट असते. ते फक्त तव्यावर बटर लावून गरम केले होते.
बहूतेक यिस्ट वापरून बनवता येतिल. साबांना विचारते, त्यांना कदाचित माहित असेल.

वत्सला, थिअरॉटिकली तरी स्लो कुकरमध्ये छान व्हायला हवेत. पण मी अजून कधीच स्लो कुकर वापरला नाहीये.

हो मेधा, पंजाबीमध्ये अमृतसरचा उच्चार अंबरसर असा करतात म्हणून ते अंबरसरी छोले. Happy

अनु, स्लो कुकरमधे नक्कीच छान होतिल. सारखे लक्ष पण ठेवावे लागणार नाही. सकाळी उठल्यावर लावले तर डिनरपर्यंत मस्त शिजतिल Happy

अभी छोले पकानाच पडेम्गा... ला ग ला है Proud

मी टू!
ह्या आठवड्यात करणारच आहे छोले, ह्या पद्धतीने करेन. ठेवले की बघायला लागत नाही हा मोठाच प्लस! Happy फोटोही काढेन Wink

मंजू बेकरीचे पदार्थ मिळणार्‍यांकडे मिळतिल कुलचे. मला औरंगाबादला तर स्पेंसर्स मध्ये पण दिसले होते.

हो, बरोबर. नुसता मैदा किंवा रवा अधिक मैदा. आंबवण्यासाठी यिस्ट /दही.
परंतू मी आत्तापर्यंत कुणाला घरी कुलचे बनवताना बघितलं नाही. हॉटेलात बनवत असतात ते कदाचीत भाजायला तंदूर वैगरे वापरत असतिल. मी जे विकत आणते पिझ्झा बेससारखे वाटले मला. फक्त आकार लंबगोलाकार. त्यांना खायच्या आधी तव्यावर भाजायचं. छोले-कुलचे विकणार्‍या गाड्यांवर /ठेल्यांवरपण असेच (पिझ्झा बेस टाइपचे) कुलचे असतात.
मंजू मी परवाच केले होते असे छोले, पण यावेळी आम्ही पराठ्यांबरोबरच खाल्ले. आता किमान १-२ महिने तरी केले किंवा आणले जाणार नाहीत कुलचे. ज्यावेळी आणेन त्यावेळी नक्की फोटो टाकेन. मला नेटवर मी विकत आणते तश्या कुलच्यांचा फोटो दिसला नाही.

Pages