आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
पण वडाला चार फेर्‍या मारुन पुजा करुन ते झाड कापण्या पासुन वाचवता येतं हा विचार नाही दिसला. वॅलेंटाईन डे साजरा करू पण वट पौर्णीमेच्या दिवशी एकमेंका बद्दल असलेल प्रेम नुसतं विश करुन प्रकट करणार नाही . पण वटपौर्णीमेला वटपौर्णीमा करणार्‍यां कडे आणि समस्त नवर्‍याकडे तुच्छ कटाक्ष टाकुन "असा बुरसटलेल्या विचारांचा सण नाही करत जा", असं दाखवुन देण्यात धन्यता मानली जाते आणि त्याच स्वागत होतय.
सातजन्म आणि उपवास या पलिकडे काही न दिसणार्‍या आजच्या आधुनिकतेला काय म्हणावं?

आणि त्यावरच्या बुद्धीहीन प्रतिक्रीया वाचुन भोवळ यायची पाळी.. सात जन्म कसं आणि काय.. अरे काय? वरचा मजला वापरा जरा.

हा धागा मुद्दाम तंत्रज्ञान या विभागात उघडला आहे. प्रथां आणि सणां बाबत वैज्ञानिक पातळीवर चर्चा व्हावी येवढीच इच्छा, देव नको, धर्म नको. मग तो सण कुठल्या का धर्माचा असो. संस्कृती आणि सणं म्हंटल की करा हेटाळाणी, या प्रवृत्तीची मना पासुन वाईट वाटलं आणि संसृतीच्या आडुन नसते उद्योग करणार्‍यांना भर चौकात गोळ्या घालायला हव्यात, त्यांच्या मुळेच आपल्या संस्कृतीची ही गत झाली आहे.

त्या मुळे ज्याना खरोखरच कळत नाही आहे ते ठिक आहे पण हे असच आहे हे छाती ठोकपणे सांगणार्‍यानी थोडा विचार करावा, आपल्या मतं पुढे रेटण्यासाठी चर्चा करु नये. (हुसैनच्या बीबी वर जे चालू).

आपल्या चालीरितीचं आणि सणांच विज्ञाननिष्ठ निरुपण हे ह्या विभागाच प्रयोजन आहे.
फुका टाईमपास नको आणि वैयक्तीक आरोप तर अजिबात नको.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असो ज्यांना चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही त्यांच्या साठी हा विभाग नाही ज्यांना चर्चा करायची आहे ते करतिल,पटल तर घेतिल नाहीतर सोडुन देतिल. मीच योग्य आहे हे माझे म्हणणे नाही, पण माझे विचार हे इतरांशी चर्चा करुन चु़कीचे असतिल तर ते सुधारुन घेण्याचा माझा प्रयत्न आणि ज्यांना सण साजरे करण्यात आनंद मिळतो त्यांना अजुन एक दृष्टीकोन प्राप्त होईल.

देव मानणारे देव आहे म्हणुन पटवुन देउ शकत नाहीत तसं देव न मानणारे, देव नाही म्हणुन पटवुन देउ शकत नाही. हा वादही तसाच निरर्थक होत चालला आहे, असाम्याला अनुमोदन. चर्चा करावी किंवा नाही ह्या बद्दल मी विभाग उघडलेलाच नाही, ज्यांना चर्चा करयची आहे त्यांनी सहभागी होउन चर्चा करावी.

वरील नंदिनीचे पोस्ट मला आवडले, तिने खरा प्रॉब्लेम काय आहे ते सांगितले आहे. वडाच्य फांद्या घरी आणुन पुजा करणे हे संपुर्ण चुक आहे. बाकीकडे कशाला माझी आईच हल्ली जवळ वडाच झाड न मिळाल्याने वडाची पारंबी घरी आणुन पुजा करते. आता बोला.. Sad आणि समजुन सवरुन सण साजरे करावे ही तिचीच् शिकवण.
"आनंदाची गोष्ट अशी की, कित्येक भटजी "घरी" येऊन ही पूजा नविन नवरीला सांगतात." >> ह्यात आनंदाची गोष्ट काय आहे?

इथे झालेली चर्चा ही कुठे ही वयक्तीक पातळीवर न जाता योग्य मुद्दे मांडुन झाली म्हणुन तुम्हा सर्वाचे आभार. मुळ मुद्द्याला वळुया.

ह्या विभागाच्या मुळ उद्देशा कडे वळत, मला ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्य त्या इथे मांडतो. ह्या कथा आहेत हे मान्य पण आपल्या संस्कृतीत त्यांना अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. इथे लज्जागौरीची म्हणजेच रेणुका देवीची कथा दिली आहे.
http://www.esakal.in/aadishakti/sadeteen_mahur_renuka.aspx

वरती स्त्रीयांवर अत्याचार करणार्‍या प्रथा आपल्या संस्कृतीत आहेत हे मत बर्‍याच जणांनी माडले आहे. हि कथा वाचुन स्त्रीयाक्ष्ह काय देवीही ह्यातुन सुटलेल्या नाहीत. ह्या कथे मागचा उदात्त हेतू देखिल लेखकानी दिला आहे तरीही तो न पटण्या सारखा आहे. अहिल्येची कथा वाचतान देखिल तेच जाणवते. अहिल्येची शिळा झाली, इंद्र मात्र मोकाट. रामच्या पदस्पर्शाने (पदच का? अश्रू वगैरे चालले असते) तिला मुक्ती मिळते, ईथे देखिल स्त्रीची अवहेलनाच जास्त दिसते. एकी कडे शक्ती पिठं मानायची आणि कथा अवहेलनेची. महाभारत आणि रामायण ह्यात देखिल असंख्य कथा अशाच आहेत. ह्यातुन बोध घेण्या सारखं मला काही दिसत नाही. अशा ग्रंथांना आपण धर्म ग्रंथ मानतो. महाभारत आणि रामायण मुलांना दाखवायलाही भीती वाटते. नक्की काय बोध ह्या कथा देऊ पहाता आहेत? मला तरी हिंदी सिनेमे पाहुन त्यात बोध घेण्या सारखं काय आहे हे शोधण्या सारखं वाटत.
इतरांची मत जाणुन घ्यायला अवडतिल, कृपया देवी देवतांवर कंमेट्स नको, आपण कथा आणि फक्त कथांसारा बद्दल बोलू.

आपल्या पुराणकथा किंवा कथापुराणे ही धार्मिक वाङ्मयामध्ये मोडतात.त्याउलट ग्रीक मायथॉलॉजी ही सद्ध्या तरी केवळ पौराणिक कथा,पुराणकथा या स्वरूपात उरली आहे.त्यातून कोणताही बोध किंवा तात्पर्ये,प्रबोधने शोधली जात नाहीत.त्यांना नीतिकथाही मानले जात नाही. त्या कथांना अनुसरून आज वागावे अशी अपेक्षा तिथे कोणी ठेवत नाही. फार तर या वाङ्मयाच्या काळात समाजजीवन कसे राहिले असेल याचा मानववंशशास्त्रीय शोध घेण्यासाठी त्यांचा अभ्यास केला जातो.आपल्याकडे मात्र अशा स्वरूपाच्या प्रत्येक कथेमागे काही बोध,तदनुसार आचरणाची अपेक्षा असते.श्रावणातल्या कहाण्यांच्या शेवटी 'जसे त्या बाईचे अथवा गृहस्थाचे भले झाले तसेच तुमचेही(तशा आचरणाने) होवो,अशी प्रार्थना असते. ग्रीक मायथॉलॉजी आणि हिंदू पुराणकथा यामध्ये हा एक मोठा फरक आहे.

सत्यजित, चालूदे मग तुमचं...
["देव नाही म्हणुन पटवुन देउ शकत नाही"... कंटाळा आला हे ऐकून, यावर लिहायचं होतं पण तो इथला विषय नाही]
>> ग्रीक मायथॉलॉजी ...त्यातून कोणताही बोध किंवा तात्पर्ये,प्रबोधने शोधली जात नाहीत
???? हिरा, ग्रीक धर्म आचरणारेच अस्तित्वात नसतील तर इतर कशाला त्यांच्या कथांमधून बोध घेतील???

सॅम | 21 June, 2011 - 14:52 >> तुझ्या ह्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. मी चर्चा थांबवली पण तुझ्या प्रतिसादाला उत्तर देण गरजेच आहे असे समजतो.

मग वडाभोवती उगाच दोरे गुंडाळणार्‍यांचा का येत नाही? त्यांना थोडीच पर्यावरणाशी काही घेणंदेणं असतं? ते थोडीच तुझ्यासारखे 'विज्ञाननिष्ठ निरुपण' करतात. तरिही तुझा या प्रथेला विरोध दिसत नाही. त्यामुळे एकंदर काय, 'कुठल्या का' कारणासाठी जुन्या चालिरिती पाळण्यात तुला रस वाटतोय, असा सूर निघतो. जी लोकं अंधपणे पाळणार नाहीत त्यांच्यासाठी 'विज्ञाननिष्ठ निरुपण'!!! >> पाळणार्‍यांनी आणि न पाळणार्‍यांनी दोघानीही ते समजुन केल्यास जास्त योग्य. वडाच्या फांद्या तोडुन घरी पुजा करणार्‍यांचा मी विरोध करतोच आहे. मा़झ्या एका तरी पोस्ट मध्ये मी ते कराच असं म्हंटलेल नाही.

उलट जुन्या चालीरिती अंधळेपणाने पाळणार्‍यांपेक्षा त्या त्यागणारे निदान थोडातरी विचार करतात... >> मान्य, पण थोडा अजुन विचार करा, योग्य ते बदल घडावा म्हंटल तर काय चुक आहे. दोन गोष्टी फायद्याच्या आहेत त्या तरी चालु ठेवा.

मग वडाभोवती उगाच दोरे गुंडाळणार्‍यांचा का येत नाही? >> एक उदाहरण देतो. लोक आपली जागा रस्त्याच्या कामासाठी किंवा अजुन कुठल्या कामासाठी प्रशासनाने बळकावू नये म्हणुन त्यावर देवळं बांधतात. जर धागे दोरे बांधुन, वडाची पुजा करुन जर वाडाच्या झाडाच सौरक्षण होणार असेल तर काय हरकत आहे, बांधा वडाला काय पिंपळ, गुलमोहर, आंबा सागळ्याला डेरेदार वृक्षांना दोरे गुंडाळा. माझं तर असं मत आहे की तुमच्या जवळपास वडाच झाड नसेल तर तुमच्या जवळपास असणार्‍या कोणात्याही मोठ्या वृक्षाला फेर्‍या मारा आणि पुजा करा. नाहीतर त्या खाली एक दगड ठेउन हळद कुंकू लावा पुजा करणार्‍यांची कमी नाही. मग कोणी त्याच्या फांद्या छाटायचाही विचार करणार नाहित.

सत्यजित, नक्की तू क्शाची कीव करतोयस अन कशाचं समर्थन ? खरंच प्रश्न पडला आहे Happy
आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
वटपौर्णीमेला वटपौर्णीमा करणार्‍यां कडे आणि समस्त नवर्‍याकडे तुच्छ कटाक्ष टाकुन "असा बुरसटलेल्या विचारांचा सण नाही करत जा", असं दाखवुन देण्यात धन्यता मानली जाते आणि त्याच स्वागत होतय.
सातजन्म आणि उपवास या पलिकडे काही न दिसणार्‍या आजच्या आधुनिकतेला काय म्हणावं?

>>>> हे तुझं ओपनिंग स्टेटमेन्ट
एकी कडे शक्ती पिठं मानायची आणि कथा अवहेलनेची. महाभारत आणि रामायण ह्यात देखिल असंख्य कथा अशाच आहेत. ह्यातुन बोध घेण्या सारखं मला काही दिसत नाही. अशा ग्रंथांना आपण धर्म ग्रंथ मानतो. महाभारत आणि रामायण मुलांना दाखवायलाही भीती वाटते. नक्की काय बोध ह्या कथा देऊ पहाता आहेत?
>>> आणि हे लेटेस्ट !! हे परस्पर विरोधी नाही का ????

लिहायचं नाही म्हटलं तरी लिहावं लागतंय.

<<मग वडाभोवती उगाच दोरे गुंडाळणार्‍यांचा का येत नाही? >> एक उदाहरण देतो. लोक आपली जागा रस्त्याच्या कामासाठी किंवा अजुन कुठल्या कामासाठी प्रशासनाने बळकावू नये म्हणुन त्यावर देवळं बांधतात. जर धागे दोरे बांधुन, वडाची पुजा करुन जर वाडाच्या झाडाच सौरक्षण होणार असेल तर काय हरकत आहे, बांधा वडाला काय पिंपळ, गुलमोहर, आंबा सागळ्याला डेरेदार वृक्षांना दोरे गुंडाळा. माझं तर असं मत आहे की तुमच्या जवळपास वडाच झाड नसेल तर तुमच्या जवळपास असणार्‍या कोणात्याही मोठ्या वृक्षाला फेर्‍या मारा आणि पुजा करा. नाहीतर त्या खाली एक दगड ठेउन हळद कुंकू लावा पुजा करणार्‍यांची कमी नाही. मग कोणी त्याच्या फांद्या छाटायचाही विचार करणार नाहित.>>

झाडांचं, वनराईचं महत्त्व लोकांना डायरेक्ट नाही का समजणार? त्यासाठी दोरे, शेंदूर कशाला लागतात ? एकीकडे पूजेच्या नावाने वडाच्या फांद्या तोडल्या जातात.
होळीला अख्खी जिवंत झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात (वर आहेच, तुम्ही हे आमच्याच सणांच्या बाबत बोलता, म्हणून) आणि असे दोरे बांधल्याने झाडं वाचणार?
जे वृक्षसंवर्धनाचा प्रयत्न करतात, नवी झाडं लावतात, जगवतात त्यांना यातलं काही लागत नाही.
आजकाल लोकांना तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व पटलंय म्हणून जागा नसली तरी कठड्यावर, खिडकीत डालडाच्या डब्यात का होईना लोक तुळस लावतात. त्याला धार्मिक.सांस्कृतिक आधाराची गरज नाही भासत.

सत्यजित, नक्की तू क्शाची कीव करतोयस अन कशाचं समर्थन ? खरंच प्रश्न पडला आहे >> मी फक्त आपल्या परिवर्तनशील संस्कृतीच समर्थन करतो आहे. जर बदल घडवायचे आहेत तर ते कोणते असावेत आणि कशा स्वरुपाचे असावेत.

मी वर एका पोस्ट मध्ये म्हंटल आहे,

"इतर धर्माचे त्यांच्या अघोरी प्रथा देखिल धर्म म्हणुन पाळता आहेत आणि आपला धर्म परिवर्तनशील असुन देखिल आपण धर्म त्यागायला निघालो आहोत आणि कारण नसताना देखिल आपल्या संस्कृतीची हेटाळणी करण्यात धन्यता मानतो आहोत" जर इतर धर्मांशी तुलना केल्यास हिंदू धर्म हा परिवर्तनशील आहे. ते लोक ओरडुन सांगता आहेत आम्ही ग्रेट, तर मग आपण चांगल असुन देखिल का वाईट वाईट बोंबलायच? आपल्या धर्मात काय चांगल आहे हे शोधून ते अंगिकारायला काय हरकत आहे, जे वाईट आहे ते सोडुन देऊ. मला जे चांगल आणि वाईट दिसल ते दोन्ही लिहील आहे, म्हणुन विरोधाभास.

मला तरी हिंदी सिनेमे पाहुन त्यात बोध घेण्या सारखं काय आहे हे शोधण्या सारखं वाटत.

इथे वाचा -
http://www.maayboli.com/node/26679

"त्या त्या दशकातले सिनेमे पाहिले की त्यावेळच्या एकंदर समाज मनोवृत्तीचे, त्यांच्या राहण्या, जेवण्या, रितीरिवाजांच्या, पेहरावाच्या संस्कृतिचे दर्शन इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मांकडे बाकी समाजाची बघण्याची, बघण्याच्या बदलत गेलेल्या नजरियाची प्रक्रियाही निरखता येते. हिंदी सिनेमांचं हे सर्वात मोठं आणि देखणं वैशिष्ट्य की त्यात अनेक जिनसी संस्कृती एकजिनसीपणे सामावून जाऊ शकल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी संस्कृती आपापल्या गुणवैशिष्ट्यांसह पडद्यावर साकारल्या."

त्यातून बोध काय घ्यायचा हा नेहेमीप्रमाणे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे. खरेच, आपली भारतीय संस्कृति किती उच्च आहे, सर्वांना सामावून घेते. किंवा कुणि म्हणतील, मला नाही आवडले वगैरे वगैरे.

तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व पटलंय म्हणून जागा नसली तरी कठड्यावर, खिडकीत डालडाच्या डब्यात का होईना लोक तुळस लावतात. त्याला धार्मिक.सांस्कृतिक आधाराची गरज नाही भासत >> हो? मग आधीच्या लोकांनी विचार न करता तुळस लावली होती का? तुळस का लावायची याचा आज विचार झाला म्हणुन वैज्ञानिक महत्त्व शोधलंत. बर.. आणि इतर धर्मीयांच्या घरात पहीली का हो तुम्ही तुळस? का नाही? त्यांच्यासाठी वैज्ञानिक महत्त्व नाही का? चला एक तरी प्रथा तुम्हाला उपयोगी वाटली तर... अजुन शोधा सापडतिल मीही शोधतोच आहे.

इथे वाद पुरे, वाद घालायचा म्हणुन घालणार असाल तर विपू आहेच,

सत्या, तुला काय म्हणायचंय आणि तू काय म्हणतोयस यात उगाचच वेळ चालला आहे आणि गोंधळ वाढतो आहे असं नाही का तुला वाटत?
सरळ क्रमांक देऊन सण/रूढी, त्याचा तुला लागणारा अर्थ आणि त्यात करावेसे वाटणारे बदल - अशी तुझी लिस्ट का करत नाहीस?

>>सरळ क्रमांक देऊन सण/रूढी, त्याचा तुला लागणारा अर्थ आणि त्यात करावेसे वाटणारे बदल
सहमत.

नक्की काय म्हणायचे आहे (आणि काय नाही) कळलेले नाही.

>>इतर धर्मीयांच्या घरात पहीली का हो तुम्ही तुळस
हो. पाहिली आहे. मुस्लिम व ख्रिश्चन (दोन वेगवेगळ्या) घरात.

अशा ग्रंथांना आपण धर्म ग्रंथ मानतो. महाभारत आणि रामायण मुलांना दाखवायलाही भीती वाटते. नक्की काय बोध ह्या कथा देऊ पहाता आहेत?

अगदी १०१ % अनुमोदन. विशेषतः महाभारत

>>> महाभारत आणि रामायण मुलांना दाखवायलाही भीती वाटते. नक्की काय बोध ह्या कथा देऊ पहाता आहेत?

नक्की कसली भीति वाटते?

बोध घेण्यासारखा पुष्कळ आहे. उदा. पित्याने दिलेल्या वचनाकरता श्रीरामांनी वनवासाला जाणे, लक्ष्मणाची भ्रातृभक्ती, हनुमंताची दास्यभक्ती, भोळ्या शबरीची परमेश्वरभक्ती, कर्णाचे दानशूरत्व, . . . ज्याला जो बोध पाहिजे तो त्याने घ्यावा.

mansmi18 | 17 June, 2011 - 11:17
छ्या ! भाउबीज, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, रामनवमी, पाडवा, लक्ष्मीपुजन, हनुमान जयंती, व्यासपौर्णिमा आपण उगाच साजरी करतो. काय पण विज्ञानाचा बेस नाही. सगळ्या साल्या बुरसटलेल्या अंधश्रद्धा! बंद करायला हवेत हे सगळे सण..
>>>>>>>>>>

विज्ञानाचा बेस असल्याशिवाय मी काही करणार नाही असं वाटत असेल त्यांनी करू नयेत ते सण.......

निखळ आनंदासाठी जे करतात त्यांनी करावेत!!!!!!!!! हाकानाका ! Lol

कारण भाउबीजेच्या दिवशी भावाबहिणीची भेट व्हावी असा उद्देश आहे.... मुलगी सासरी गेल्यावर आणि भाऊही त्याच्या संसारात मग्न झाल्यावर हा दिवस खरच आनंद घेऊन येणारा असतो.... Happy

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पूर्ण परिवार एकत्र जमावा.... त्यांनी मिळून अपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करावी.... गोडधोड करून खावं असा उद्देश आहे.........

त्यामुळे विज्ञान विज्ञान करत बसण्यापेक्षा त्या त्या सणांमधून मिळणार्या आनंदाकडे लक्ष द्यावे.........

करवा चवथ च्या सर्व स्त्रीपुरुषांना शुभेच्छा .

या सणाबद्दल माहिती हवी आहे.

ad[1].jpg

मेल मधे अशी माहीती मिळाली.>>>>> चॉपीपेस्त>>>>>

कडवा चौथ चा इतिहास
===============

कडवा चौथ या व्रतास आधुनिक काळात करवा चौथ असेही म्हणतात. उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. मायानगरी मधे मुख्यत्वे उत्तर भारतियांचा अधिक भरणा असल्याने या सणाचे महत्त्व देशवासियांना पटलेले आहे. पण दगडांच्या देशात आजही हा सण साजरा करत नसल्याचे आढळून येते. कदाचित हा दगड कसा चाळावा असा विचार भोळ्या भाबड्या महिला करत असाव्यात. त्यामुळेच हा मुलूख चाणाक्षपणात मागे पडला असावा. सांप्रतकाळी व्यापारउदीम आदि मधे मुलखातला माणूस मागे का असे विचारण्याची पद्धत रूढ झाली परंतु निदान झालेले नाही असे निरीक्षण आहे.

अवंतीपूरचे महाराज विशालदेव यांना युद्धाचा छंद होता. आजूबाजूचा मुलूख जिंकून तो आपल्या साम्राज्यास जोडून घ्यावा किंवा खंडणी (मानधन) स्विकारावे व बदल्यात त्या राजाला मांडलिक म्हणून राज्य करू द्यावे हा त्यांचा दिनक्रम होता. यामुळे त्यांना राज्याबाहेर रहावे लागे. अवंतीपूरच्या महाराणी सुलक्षणादेवी या कट्टर पतीव्रता होत्या. महाराज जेवल्य़ाशिवाय त्या अन्नाला स्पर्शसुद्धा करत नसत. महाराज जवळपासच्या राज्यात असतील तर कबूतर, ढोलवादन इत्यादी दळणवळणाच्या साधनांनी ते आपले भोजन झाले आहे असा सांकेतिक संदेश पाठवित असत. पण जेव्हां त्यांची स्वारी दूरवरच्या प्रदेशात असे तेव्हां मात्र संदेशवहनाची व्यवस्था नसल्याने महाराणींना उपवास घडत असे. (खंडेराय मालिकेतील यंत्र हे पुष्पक विमानाप्रमाणेच कदाचित खाजगी उपयोगासाठीच असावे असे दिसते. जनतेसाठी असे शोध खुले करण्याची प्रथा नसावी असा निष्कर्ष या ठिकाणी अयोग्य होणार नाही.

युद्ध लांबले की महाराजांचा मुक्काम वाढत असे. यामुळे महाराणींची तब्येत ढासळू लागली. युद्धातून परत येणे हा मोठाच अपशकून मानला जात असे. कधी कधी महाराजांचे लक्षही महाराणींच्या तब्येतीकडेच असे. त्यामुळे ते बेचैन असत. अशाच अवस्थेत त्यांना मानहानीकारक पराभवाला तोंड द्यावे लागले. या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. इकडे महाराणींनाही आपल्यामुळेच महाराजांचा पहिलावहिला पराभव झाला असे वाटू लागले. पण दोघांचीही विचित्र अवस्था झालेली होती. व्रत पतीसाठीच असल्याने राजाला काही बोलता येत नव्हते.

एका ज्येष्ठ मंत्र्याच्या कानी ही चिंता गेली. त्याने प्रधानजींना युक्ती सांगितली. प्रधानजींनी महाराजांना एकांतात गाठून यावर तोडगा सुचवला. त्याप्रमाणे एके दिवशी महाराणी भल्या पहाटे रथावर आरूढ होऊन भद्रावती पर्वताकडे कूच करत्या झाल्या. तीन दिवसांचा अथक प्रवास करून त्या पर्वताशी पोहोचल्या. इथून पुढची चढण ही स्वत:च चढायची होती. महाराणींनी आपल्या पातिव्रताच्या तेजाच्या जोरावर हे दिव्य पार पाडलं. पर्वतशिखरावर एक नागासाधू अंगाला राख फासून बसला होता. एव्हढ्या थंडीतही त्याला काही होत नव्हतं. तो अत्यंत तापट होता. पण महाराणी उपाशीपोटी पर्वत चढून आल्याचं पाहून त्याचं काळीजही द्रवलं.

महाराणींची व्यथा त्याने अंतर्मनाने जाणली आणि महाराणीस एक वस्तू दिली. तिचं काय करायचं ते ही सांगितलं. त्याप्रमाणे महाराणी पुन्हा महाली आल्या. पुढच्या वेळी महाराज जड पावलांनी निरोप घेऊन युद्धाव्र गेले. या वेळी त्यांचा मुक्काम लांबला. तेव्हां महाराणींनी नागा साधूचा उपाय करण्य़ाचं ठरवलं.

त्या राजवाड्याच्या छतावरच्या गवाक्षात गेल्या. तिथे त्यांनी ती वस्तू हळूच बाहेर काढली आणि तीमधून चंद्राकडे पाहू लागल्या. लोकहो, ही वस्तू म्हणजेच चाळण हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आलेच असावे. त्यांनी महाराजांचं स्मरण करून चंद्राकडे पाहीले आणि काय आश्चर्य !

त्यांना चाळणीच्या जाळीवर महाराजांचे चित्र दिसू लागले. महाराजांनी हरणाची शिकार केली असून त्याच्या मांसावर ते ताव मारून जेवत असल्याचे त्या माउलीने डोळे भरून पाहीले. महाराजांचे पोट भरल्याचे पाहून महाराणींना समाधान वाटले. आजच्या प्रमाणे मला सोडून माझा नवरा काय मस्त मज्जा करतोय असा विचारही त्यांच्या मनात आला नाही.

त्या दिवशी चतुर्थी होती. साधूने सांगितल्याप्रमाने व्रत संपन्न झाले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे आता रोजच्या रोज उपवास करायची गरज नव्हती. ज्या दिवशी महाराणी पहिल्यांदा चाळणीतून चंद्राकडे पाहतील त्याच दिवशी पुढेही हे व्रत केल्यास पतीचं व्रत आपोआपच पूर्ण होते असं साधूने समजावून सांगितलेले होते. मग हे व्रत महाराणीने आपल्या खास दासीलाही दिले. अशाच पद्धतीने पुढे ते पसरू लागले. महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी दवंडी पिटवून पूर्ण साम्राज्यात कडवा चौथ हे व्रत केलं जावं असे आदेश काढले.

मित्रहो नुकतेच जे दस्त आणि ग्रंथ प्राप्त झालेले आहेत त्यावरून डिश अ‍ॅंटेनाचं तंत्रज्ञान याच कल्पनेवरून आल्याचे कळते. पूर्वी ज्या जाळीच्या डिश यायच्या त्यावर कृत्रिम उपग्रहाची किरणे पडून त्या मध्यभागी असणा-या एलएनबी नामक उपकरणात एकत्र होत, तिथून त्या दूरचित्रवाणी संचामधे घुसत असत. हेच तंत्रज्ञान वापरून इंटरनेट, फोन, व्हिडीओफोन ही वापरले जाऊ लागले.

आपल्या महान ऋषीमुनींनी मात्र क्रुत्रिम उपग्रहाऐवजी नैसर्गिक उपग्रहाचा वापर करून त्याच काळात थ्री जी तंत्रज्ञान विकसित केले होते याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. खंडेराय मालिकेतील टॅब हे सुद्धा याच तंत्रज्ञानावर चालत असावे.

आजच्या या दिनी या व्रताची कहाणी आपणा सोबत वाटून घेतली. चाळते व्हा या शुभेच्छा !

सर्व प्रथांना शास्त्रीय कारणे असलीच पाहिजेत का? गंमत म्हणून काही करायचे नाही का? का आपले उगीचच भारतीय म्हंटले की वाईट. बरे हिंदू धर्म हे कारण तर फारच निंदनीय.
आपल्या प्रथांमागील कारणे आता सगळे विसरलेत. म्हणून या प्रथा वेडेपणाच्या वाटतात.

पण होळीची धुळवड नि मिश्चिफ नाईट यात कितपत अंतर आहे? मग धुळवडच का वेडेपणाची? ईस्टर, ख्रिसमस हे छान का?

अरे सगळेच कसे अमेरिकनच कशाला असायला पाहिजे? वॅलेण्टाइन डे केला तर कुणि वेडे का म्हणत नाहीत?

मुसलमानांच्या सणांबद्दल तर बोलूच नका, तिथे शास्त्र वगैरे नसले तरी चालते तुम्हाला. सुट्टी पण देता त्या सणांना! भारतीय सणांना सुट्टी दिली तरच तुम्हाला शास्त्र, काम होत नाही असले आठवते.

भारतीयांची जास्तीत जास्त बदनामी भारतातले भारतीयच करतात, त्यांना भारताबद्दल स्वाभिमान नाही, इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखणे हे सगळे भारतातले भारतीय!
मग जगातल्या अज्ञ लोकांनी टिंगल केली की आपण पण आपल्याच सणांची टिंगल करायची.

काही गरज नाही.

झक्की,

<मुसलमानांच्या सणांबद्दल तर बोलूच नका, तिथे शास्त्र वगैरे नसले तरी चालते तुम्हाला. सुट्टी पण देता त्या सणांना! भारतीय सणांना सुट्टी दिली तरच तुम्हाला शास्त्र, काम होत नाही असले आठवते. >.

या वाक्याबद्दल तुमचा निषेध. तुमचं आरक्षणाबद्दलचं वक्तव्यही असंच हीन होतं. न राहावून हे लिहितो आहे.

झक्की, अध्यायत्मिक विचारांमध्ये नाही का दोन टोकं असतात? एक म्हणजे सगळ्यात देव बघणारे/मानणारे आणि एक असतात ते काहीच देव नाही, देव असं काही अस्तित्वातच नाही असं मानणारे. दोन्ही विचारसरण्या त्यांच्या परीनी बरोबर आहेत आणि त्या त्या विचारसरणीच्या साधकांना त्या त्या मार्गानी अंतिम तेच लक्ष्य (सत्य) साधता आलेलं आहे. लफडं कुठे होत असेल तर ह्या दोन्ही मधली म्हणजे एक विचारसरणी, म्हणजे काही काही गोष्टीत देव आहे हे मानायचं अन काही गोष्टीत नाही.
एक तर तुम्ही तुमच्या बाजीप्रभू किंवा बाबूराव मशीनगन आपटे पर्सनॅलिटीला शोभेल असं सगळ्याच धर्मांमध्ये अर्थ आहे शास्त्र आहे असं म्हणा किंवा कोणा मध्येच नाही. ही असली अधली मधली पोजिशन घेऊ नका, त्याच्यानी तुमच्या पोस्टीच्या लॉजिकचा पार भुगा होऊन जातो बघा. Happy
बॉटमलाईन, धर्मांचे, व्रतवैकल्यांचे वाभाडे काढताना एखाद्या धर्माला सूट किंवा एखाद्या धर्माला जास्त झोडपू नका. सगळेच धर्म, त्यांचा नीट, योग्य काँटेक्स्ट मध्ये अर्थ घेवून पाळले तर नीट वाटतात नाहीतर सगळेच आपल्याला खड्ड्यात घालू शकतात.

>>मुसलमानांच्या सणांबद्दल तर बोलूच नका, तिथे शास्त्र वगैरे नसले तरी चालते तुम्हाला. सुट्टी पण देता त्या सणांना! भारतीय सणांना सुट्टी दिली तरच तुम्हाला शास्त्र, काम होत नाही असले आठवते.<<

झक्किंचा हा पाॅइंट वॅलिड आहे. मोहर्रमच्या मिरवणुकित होणार्या प्रकाराचं, सैतानाला दगड मारण्यामागचं शास्त्र जाणुन घ्यायला आवडेल... Happy

कडवा चौथ>>>>>>>>>हाहाहा:
आजच्या प्रमाणे मला सोडून माझा नवरा काय मस्त मज्जा करतोय असा विचारही त्यांच्या मनात आला नाही.>>>>>>>>>> Lol

भारतीयांची जास्तीत जास्त बदनामी भारतातले भारतीयच करतात, त्यांना भारताबद्दल स्वाभिमान नाही, इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखणे हे सगळे भारतातले भारतीय!

Happy अहो आम्ही पुरोगामी बदनामी करतोय म्हणुन तर तुमचा हिंदु धर्म सुधारतोय अशी टिमकीही वाजवली जाते हे वाक्य टाकायला विसरलात. हे वाक्य मी इथे माबोवरच वाचलेय, तुम्हीही वाचले असावे.

एनीवेज, पुराणातल्या कथा शोधायला गेल्यावर असल्या चमत्कृतीपुर्ण कथा सापडायच्याच.. त्यावर टिका करयात काहीही अर्थ नाही कारण आज कोणीही ह्या मुळ गोष्टीसाठी पुजा, व्रत वैकल्य करत नाही. असे असते तर समस्त बायकांनी वटसावित्री करायचे कधीच सोडले असते. प्रत्येक जन्मात हाच सासरचा सेट?? कोणाला हवाय?? Happy

हल्लीसुधा पुजा व्रत वैकल्य पाळली जातात कारण त्या निमित्ताने घरात गोड धोड केले जाते, देवाला हात जोडले जातात. पुजा अर्चा होते. नाहीतर नेहमीचा रगडा आहेच. उठा आणि ऑफिसला पळा. रोज रोज तेच ते . या निमित्ताने काही वेगळे केले जाते.

रोजचे रुटिन कधीतरी बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे याचे प्रत्येकाचे ठोकताळे आहेत. काही लोक रिसॉर्ट्सला जातात, काहीजण मित्रमैत्रिणी घरी बोलवुन पार्ट्या करतात. तर काही सणवार साजरे करतात. ज्याला जे आवडते ते तो करतो.

काहीनी पुराणातल्या कथांना आजच्या युगाचे संदर्भ लावुन आजच्या युगात योग्य होईल अशा त-हेने सणवार पाळायला सुरब्वात केलीय. तेही योग्यच. त्यांना जे जसे पटतेय ते तसे करताहेत.

यात कोणी कोणाला का हसावे हे कळत नाही. तुम्हाला पटत नाही, तर तुम्ही करु नका. सिम्पल.

सुनियाद, कडवा चौथची कहाणी वाचुन प्रचंड Rofl

तुमच्या या कथेमुळे हा धागा वर आला आहे आणि त्याचबरोबर 'बोवांचा' कडवेपणाही. Wink हिंदु धर्म /शास्त्र/सण यांच्याबद्दल काही बोललं की लगेच यांच पित्त खवळतं. पण प्रतिवाद करताना यांना ख्रिसमस्/मोहर्रम आठवतो. वय वाढलं की कडवेपणाही वाढत जातो असं दिसतंय. पण भारतात येऊन शेंडी-गंध लावुन राहतील कां?? मग तेव्हा भारतातले लोक अस्सेच, अमेरीका कित्ती चांगली याचे तारे तोडायला तय्यार.

सगळीच गम्मत. असो. हटकेश्वर!! हटकेश्वर!!

हिंदु धर्म /शास्त्र/सण यांच्याबद्दल काही बोललं की लगेच यांच पित्त खवळतं. पण प्रतिवाद करताना यांना ख्रिसमस्/मोहर्रम आठवतो

अहो या वयातही त्यांची स्मरणशक्ती शाबुत आहे ते पाहा. इथे लोकांना हिंदु धर्माचा इतका राग येतो की फक्त तोच आठवतो. झक्कींना हिंदुसोबत बाकीचे धर्म अजुनही आठवतहेत. देव त्याना असेच ठणठणीत दीर्घायु देवो. धर्मांना आणि झक्कींनाही. Happy

बाकी कुठल्याही धर्माच्या नावाने कितीही ठणाणा केला तरी जोवर पृथ्वीवर मानव आहे तोवर धर्म आहे, कारण धर्म मानवाने निर्माण केलाय. धर्म काही जात नाही आणि त्याच्या नावाने केलेल्या चर्चाही जात नाहीत. वेळ घालवायचा असेल तर धर्म हे अतिशय उत्तम साधन आहे.

Pages