फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

Submitted by मोहना on 7 June, 2011 - 21:01

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग, वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास." ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

रहस्यकथा आणि नाट्यलेखन करणार्‍या सुझन स्वत:ला प्रथितयश मानत नाहीत. त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल असंही त्यांना वाटत नाही. आणि तरीही परदेशातल्या कुणालातरी त्यांच्या नावे फेसबुक खातं तयार करता आलं ही वस्तूस्थिती आहे. सुझनमात्र फेसबुकमध्ये योग्य ठीकाणी खुणा करुन खाजगीपणा जपल्याच्या समाधानात होत्या. कुणीतरी त्यांच्या नावाचं खातं आधीच तयार केलं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. नग्न देहावरती सुझनचा चेहरा वापरण्याचा किळसवाणेपणा आणि त्या सोबत येणार्‍या असंख्य गोष्टी... यावरुनच हे आंतरजाल जग किती धोकादायक आहे हे लक्षात येतं, तरीही आपण मात्र आपल्याबाबतीत हे होणार नाही असं समजून आपले, आपल्या कुटुंबाचे फोटो वेगवेगळ्या संकेतस्थळांवर/खात्यांवर प्रदर्शित करतो. आपल्या मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी ते पहावेत या इच्छेने. केव्हा केव्हा खाजगीपणा जपण्याची सर्व खबरदारी घेऊन तर कधीतरी कोण जाणार आहे उगाचच माझ्या वाट्याला असं वाटून तेवढीही तसदी घेतली जात नाही.

सुझनना तर फेसबुकचं काडीमात्रही आकर्षण नव्हतं. त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनच्या दरम्यान जनसंपर्क अधिकारी वायली यांनी चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी फेसबुक उत्तम आहे ह्याची कल्पना दिली तेव्हा प्रथम त्यांची तयारीच नव्हती. वेळ फुकट घालवायचं एक ठिकाण असंच त्यांचं फेसबुकबद्दल मत होतं पण आधुनिकतेला बाजूला सारताना साहित्य जगतात एकटं पडण्याच्या भितीने त्यांनी फेसबुकवर जायचं मान्यं केलं.

सुरुवातीचा आठवडा जुन्या परिचिताशी संपर्क साधण्यात कसा गेला ते कळलंही नाही. आणि अचानक एक दिवस वायलीचं ई मेल आलं, विषय अधोरेखित होता - फेसबुक. सुझनना वाटलं आधुनिक जगात प्रवेश झाल्याबद्दल स्वागत करणारं पत्र असेल. पण तसं नव्हतं. ते पत्र होतं त्यांच्या दुसर्‍या खात्याबद्दल. लिहलं होतं.
"गुगल केल्यावर तुमचं जे खातं येतं ते पाहून बेचैन व्हायला झालं. तुम्हाला हे कळवणंही त्रासाचं वाटलं तरी तुमच्या कानावर जावं म्हणून कळवित आहे."
ते खातं पाहून सुझनना धक्काच बसला. स्वत:च्या चेहर्‍यावरचे अश्लिल, संभोगासाठी उद्युक्त करणारे भाव पाहून शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही काळ सुन्नावस्थेत गेला. हा चेहरा त्यांचा कधीतरी वर्तमानपत्रात आलेला, कुठल्यातरी संकेत स्थळावर असलेला होता. सुझनना काय करावं या प्रश्नाने घेरुन टाकलं. मुळात संगणक प्रकाराशी फार सख्यं नाही. आणि आता हे काय वाढून ठेवलं होतं? कुणाशी संपर्क साधला की ते फोटो, खातंच नाहीसं होईल? समोर ’फेसबुक फॉर डमीज’ पडलेलं. त्यातले दूरध्वनीक्रमांक त्यांनी तातडीने फिरवले, पण उपयोग झाला नाही. त्यांना एकदम नेहमीच्या रस्त्यावर येता जात फेसबुकचं पाहिलेलं कार्यालय आठवलं. दूरध्वनिकार्यालयात फोन करुन त्या कार्यालयाचा काही माहिती मिळते का ते पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. हे खातं त्यांनी फेसबुकवर यायच्या आधीचं होतं. याचाच अर्थ कुणी त्यांचं नाव ’गुगल’ केलं की हे असे फोटो, प्रतिक्रिया प्रथम पहायला मिळणार. सगळय़ा असफल प्रयत्नांनंतर एकच करता येण्यासारखं होतं. फसव्या फेसबुक खात्यावर जायचं, तिथे तुम्ही असल्याचं खात्री करणारं जे चित्र असतं त्यावर टिचकी मारुन आपल्या खर्‍या फेसबुकचा दुवा द्यायचा. सुझननी त्यांच्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना सार्‍यांनाच ही विनंती केली.

"रोज सकाळी उठल्याउठल्या धडधडत्या अंतकरणाने मी संगणक उघडे. फेसबुकच्या संचालकांकडून काही प्रतिसाद नव्हताच आणि माझं नकली खातं नष्ट होण्याची लक्षणं नव्हती. पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे तक्रार काय नोंदवणार? नुकसान काय झालं म्हणून सांगणार? माझं हे रुप पाहून लोकांनी पुस्तक विकत घेणं बंद केलं म्हणायचं? याला पुरावा कुठून आणायचा? पोलिस काही करु शकले नाहीत. फेसबुक प्रशासनालाही अगणित ईमेल केली. प्रत्येकवेळी तोच पुस्तकी प्रतिसाद. तुमची तक्रार पोचली. हो पण पुढे काय?" अतिशय विषण्ण अवस्थेतला हा त्यांचा प्रश्न.

पुढे काय? सुझनची झोप उडाली. संभाषणात लक्ष लागेना. लेखन तर बंदच पडलं. मुलं कशी वाढत होती, काय खात पित होती याचं भान नष्ट झालं. त्याचं निराशेने ग्रासलेले मन उभारी घेईना. सगळ्याचा कडेलोट मैत्रीणीबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर झाला.
"तुझं नाव गुगल केलं मी आज" मैत्रीणीच्या बोलण्याने सुझनचा चेहरा कसानुसा झाला.
"तुला क्षणभरही वाटलं......" पुढचं बोलणं मैत्रीणीकडून यावं, तिने ती शक्यताही नाकारावी असं वाटत असतानाच मैत्रीणीने नुसतेच खांदे उडवले, शरमलेल्या चेहर्‍याने ती म्हणाली,
"तूच असशील असं नाही वाटलं पण....."
२० वर्ष ओळखत होत्या त्या दोघी एकमेकींना, पण तरीही मैत्रीणीच्या मनाला ही शंका चाटून जावी यात सुझनना फार मोठा पराभव वाटला. एक चांगली व्यक्ती, लेखिका म्हणून लोकांनी ओळखावं यासाठी वेचलेले क्षण धुळीला मिळाले. रॅगिंगमुळे मुलं आत्महत्येपर्यंत का पोचतात हे कळलं तेव्हा असं त्यांना वाटतं. अस्वस्थ मनस्थितीत सुझननी याबाबत पाऊल उचलायचं निश्चित केलं. त्यांनी आपल्या वकिल पुतण्याला याबाबत लक्ष घालावं म्हणून विनंती केली. एका आठवड्यात फेसबुककडून काही कळलं नाही तर काय करायचं ते बेनने, त्यांच्या पुतण्याने निश्चित केलं पण त्याआधी सुझनना त्यांनी जे सांगितलं ते सुझनच्या कल्पनेपलिकडचं होतं. स्वत:च्या फसव्या खात्यावरिल शव्द न शब्द वाचायचा, तिथे असणार्‍या सर्वांचे चेहरे / फोटो नीट पहायचे आणि कुणा परिचिताचं हे काम नाही ना याची खात्री करायची.
"हे वाचण्याचं काम म्हणजे कुणीतरी बर्फाच्या लादीवर फेकून दिल्यासारखं होतं. गुदरमवून टाकणारी भितीची एक थंडगार लाट शरिरातून गेल्यासारखं. तिथे काय नव्हतं माझ्याबद्दल. संभोग वर्णनं, अश्लिल चित्र आणि माझ्या नावाने लिहलेले प्रतिसाद..., किळसवाणे, शरीर सुखासाठी आमंत्रित करणारे, त्याबद्दल सल्ला विचारणारे. यातल्या काही मित्र, मैत्रीणींची संख्या हजारांवर होती. याचाच अर्थ माझे हे फोटो खूप लोकांनी पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती." एकेक शब्द उच्चारतानाही त्यांचे कान, गाल शरमेने लाल होतात.

न समजणारं संगीत, भाषा, दूरदर्शनवरील कार्यक्रम असं करत हा प्रकार कोणत्या देशातून चालू असावा एवढा शोध लागला, नंतर शहर आणि शेवटी शाळा. मान्यवर शाळा. पण सुझन त्या शाळेचं नाव सांगत नाहीत. शाळेच्या संकेतस्थळावर त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, बदला घ्यावासा वाटायला लागला, त्या मुलांचे गळे दाबावेत ही भावना दृढ झाली. पण काही क्षणच. भान आलं तेव्हा त्यांना आपण असा विचार करु शकतो, ही पातळी गाठू शकतो याचीच शरम वाटली. विषण्ण मनस्थितीत त्यांनी चर्चच्या पाद्रींचा सल्ला घेतला. क्षमेचा सल्ला न देता त्यांना त्रास देणार्‍या मुलांना धडा शिकवावा असा सल्ला होता तो. त्यांच्या पुढे दोन पर्याय होते. त्या मुलांना असा काही धडा शिकवायचा की ती आयुष्यातून उठतील. त्यांच्या देशाचे कायदे खूपच कडक होते आणि या गुन्ह्यासाठी तुरुंगवास हा एकच पर्याय होता. अमेरिकेत पैशाचं नुकसान भरुन काढण्यासाठी त्या मुलांवर त्या खटला करु शकल्या असत्या पण ते खर्चिक होतच आणि पुरावा? या मुलांनी त्यांच्या अंतरात्म्याचा एक तुकडा तोडला, आत्मविश्वास धुळीला मिळवला याकरता अजूनतरी खटला नाही दाखल करता येत. सुझनपुढे खटला हा एक पर्याय होता नाहीतर पूर्णत: दुसरा मार्ग. शेवटी तोच त्यांनी स्विकारला. त्यांनी त्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ई मेल पाठवलं, विस्ताराने लिहलं. खूप विस्ताराने आणि त्यात फेसबुक खातं बंद व्हावं ही मागणी केली.

दुसर्‍याच दिवशी मुख्याध्यापकांचं पत्र आलं. त्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल सुझनचे आभार मानले होते आणि फेसबुकचं खातं बंद होईल याची खात्री. आणि तसं ते झालं. पण त्यांच्या ’मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. त्या मुलांनाही. मुख्याध्यापकांनीही मुलांना हाच प्रश्न वारंवार विचारल्याचं सुझनना लिहलं होतं. अनुत्तरित प्रश्न. त्या मुलांच्या दृष्टीने सुझन म्हणजे एक खेळणं होतं, मुखवटा! नाव, चेहरा याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. चेंडू हवेत उडवला, काही काळ त्याच्याशी खेळलं आणि त्यांचा त्यातला रस संपला. त्या म्हणतात,
"आणि हेच फार भितीदायक वाटतं मला. इंटरनेटमुळे इतक्या सहसहजी माणसाचं खेळणं बनून जातं. बदनामीही अशी होवू शकते की माणूस आयुष्यातून उठेल."

अगदी खरं, आज हे सुझनच्याबाबतीत झालं. कदाचित तेच उद्या आपल्या बाबतीत होवू शकतं, आपल्या मुलांच्या बाबतीत. सुझन म्हणतात,
"तुमचं नाव, चेहरा... आणि त्याचं हे असं होतं. खरच असं झालं की ही लहानसहान बाब उरत नाही हे मी अनुभवाने सांगते. आणि त्यामुळेच मी मुख्याध्यापकांना एक विनंती केली. अशी विनंती की त्याचे परिणाम, शेवट मला कधीच कळणार नाहीत."

काय केलं त्यांनी? मुलांना शिक्षा देण्याची मुख्याध्यापकांना विनंती केली पण अगदी वेगळ्या तर्‍हेची. त्यांच्या या कृतीमुळे सुझनवर काय परिणाम झाले हे त्या मुलांनाच नाही तर पालकांनाही कळावं ही अट घातली त्यांनी. आपल्या हुशार, मान्यवर शाळेत जाणार्‍या मुलांचं कर्तुत्व आणि त्याचे सुझनवर झालेले परिणाम दोन्ही त्यांना कळावेत याकरता ते खातं मुलांच्या सोबत बसूनच पालकांनी पहावं ही अट घातली.

खरच शिकली ती मुलं धडा? झाला बदल त्यांच्या वृत्तीत? पाहिलं ते अश्लिल वर्णनांनी, चित्रांनी भरलेलं खातं त्यांच्या पालकांनी? सुझनना त्याची कल्प्नना नाही. त्या म्हणतात.
"माझं चारित्र्यहनन केलं त्यांनी. फार कठीण होतं ते परत मिळवणं. पण मिळवलं मी झगडून. हतबलता, हात पाय गळणे याचा खरा अर्थ कळला मला. सुडाने पेटून उठणं म्हणजे काय हे कळलं तसंच क्षमा करण्यातून काय समाधान मिळतं हेही कळलं. आणि हेच कारण आहे त्या मुलांची नावं न सांगण्याचं किंवा त्यांच्या देशाचं नाव न घेण्याचं. त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्याचं भवितव्यच नष्ट व्हावं असं नाही मला वाटत. त्यांची नावं सांगितली तर झोप उडेल माझी. क्षमेला काही अर्थ उरणार नाही. आता मी शांत चित्ताने झोपू शकते, आणि लिहते. लिहती राहू शकते."

गुलमोहर: 

चांगला लेख! अंजलीची पोस्टही आवडली. अमेरिकेत खोटे फेसबुक अकाउंट काढणे हा आता गुन्हा आहे पण दुसर्‍या देशातून कुणी चाळे केले तर काय ?

मंदार, आडो Lol

लोक्स, तुम्ही जर्मनीतली फेबु संबंधित एक बातमी वाचलीत का? परवाचीच गोष्ट आहे!

एका मुलीने आपल्या १६ व्या वाढदिवसानिमित्त पार्टी ऑर्गनाईझ केलेली आणि ती इव्हेंट फेबुवर टाकली, पण तिने चुकून प्रायव्हसी सेटिंग पब्लिक ठेवली, त्यामुळे लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिले. १५,००० लोकांनी येण्याचे कन्फर्मेशन दिले. जेंव्हा त्या मुलीच्या ही गोष्ट/ चुक लक्षात आली, तेंव्हा तिने फेबुवर इव्हेंट कॅन्सल केला, पण तोवर तब्बल १,५०० लोक तिच्या घरी शुभेच्छा आणि केक सह हजर झाले. जसजशी गर्दी लोटायला लागली, तसा मुलीने मग तिथून पळच काढला आणि तो इव्हेंट दुसर्‍या ठिकाणी साजरा केला. मुलीच्या आईवडीलांना सिक्युरिटी ठेवावी लागली. ही बातमी भारतीय टिव्हीवर पण दाखवली होती म्हणे! इंडियन एक्सप्रेसमध्ये सुद्धा आली होती ही बातमी...

फेबुची प्रंचंड लोकप्रियता यावरुन दिसते. तसेच लोकांच्या दुर्दम्य उत्साहाचेही कौतुकच करावेसे वाटते.... फेबुची ही पण दुसरी एक बाजू Happy

ती बातमी आणि तिचा व्हिडिओ http://www.theblaze.com/stories/facebook-invite-mistake-1600-people-cras... इथे सविस्तर बघता येईल....

वाढदिवसानिमित्त १५,००० लोक Rofl
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

शिवाय, आपण काय करतो हे सतत टाकायची ज्यांना सवय आहे त्यांना ती भोवणार आहे

.

विचार करायला लावणारा लेख.
जेव्हा ऑर्कुट प्रचंड लोकप्रिय होतं, तेव्हा माझं ऑर्कुट अकाऊंट नाही म्हणून माझ्यावर किती तु.क. पडायचे ते मला आठवलं.
शेवटी दबावाला बळी पडून फेबु वापरायला लागले. पण ह्या अशा बातम्या वाचून टेंशन येतं !

>> फेसबुकवर ... फारच ओपन अ‍ॅक्सेस असतो
अनुमोदन. त्यांच्यावर बरीच टिकाही झालीये.
कित्तेकांचे पिकासाचे अल्बम पब्लिक दिसतात. मी तर हल्ली अल्बमची लिंक देण्यापेक्षा निवडक फोटोची लिंक जवळच्या मित्रांना मेल करतो.
Geo-tagging तर disable केलेलच चांगलं.

काही नाही, सर्व गोष्टींचा कन्ट्रोल हा आपल्याच हाती असतो. आपणच जर आ बैल मुझे मार अस केल तर बैल गप्प बसेल का ?
पुर्वी एकत्र कुटूंब पद्धती, वाडा संस्कृती, इ. असल्यामुळे लोक लहानपणापासुन सोशल होते. आता असे नसल्यामुळे लोकांना बोलायला कोणी तरी हवे असते, मनातले शेअर करायचे तर कोणाजवळ करावे, मग हे असले प्रकार चालू होतात. जे लोक कमकुवत मनाचे आहेत ते जास्त बळी पडत असावेत.
ही दुनिया मायाजाल, मनुजा जाग जरा !
फसू नको, तू सावध वाग, रे मनुजा जाग !

मला माझे अनेक जूने मित्रमैत्रिणी भेटले हे खरे आहे, पण आता संपर्क ईमेलने किंवा फोननेच असतो. त्या चव्हाट्यावर फार काही लिहिता येत नाही हेही खरेच.
पण आजकाल कुठलीही साईट उघडा, फेसबुक वर जाऊन लाईक करा, अशी गळच घातलेली असते. किती लाईक पडले, यावरुन जाहिरातदारांचा प्रतिसाद ठरतो वाटतं.

एक रूल ऑफ थंब म्हणजे जी माहिती कधीच सार्वजनिक होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल ती माहिती कुठेही पोस्ट करू नका. फेसबुकवरील प्रायव्हसी ऑप्शन्स किचकट आहेत पण फेसबुक वापरणार असाल तर ते माहित असलेले बरे. यात गूगल सर्च केल्यास तुमचे प्रोफाइल न येण्याचाही पर्याय आहे.

याउलट फेसबुकवर अकाउंट उघडल्या उघडल्या आपले मेल मधले कॉन्टॅक्ट्स शोधून आपोआपच अ‍ॅड होतात <<<
माफ कर मुली पण हे आपण पासवर्ड पुरवला तरच होतं. बर्‍याचश्या नेटवर्किंग साइटसवर आत गेल्या गेल्या इन्व्हाइट फ्रेंडस साठी तुमचे सगळीकडचे मेल अकाउंटस आणि पासवर्डस विचारतात. ते द्यायचे नाहीत. स्किप करायचं.

फेबु वर स्टेटस मेसेजेस. फ्रेंडस ओन्ली करायचे. त्यातही लिस्टपैकी अमुक लोकांना स्टेटस दिसणार नाही असंही करू शकता. तेच प्रत्येक फोटोलाही करायचे. अ‍ॅज अ थम्ब रूल कुठल्याही अ‍ॅप्लिकेशनवर क्लिकायचे नाही. कुठल्याही अ‍ॅप्लिकेशनला अलाउ करायचे नाही. कुठल्याही कुतूहलाला बळी पडायचे नाही म्हणजे उदाहरणार्थ तुमचा २० वर्षांनंतरचा चेहरा, तुमची प्रोफाइल किती जणांनी बघितली, तुमच्याबद्दलच्या प्रश्नांना कुणी आणि काय उत्तरे दिलीयेत.. इत्यादी.

एवढी सगळी कवचकुंडलं चढवूनही व्हायचं ते होणारच असतं तुमच्या नशिबात असेल तर. Sad

ज्यांना यातले कळते त्यांच्यासाठी काही प्रश्न.
माझ्या फेसबूक पानावरील माहिती, जसे माझ्या 'मित्र' व्यक्तींचे फोटो, चोरून त्यांच्यावर काही बदनामी कारक करण्याची शक्यता आहे का?

त्या मित्रांना 'अमित्र' बनवून, माझ्या फेसबूक पानावरील त्यांचे नावनिशाण पुसून टाकता येईल का?
माझ्या नकळत माझ्या मुळे कुणाला त्रास व्हावा असे मला वाटत नाही.

मागे एकदोनदा माझ्या इ-मेल मधून, माझ्या संपर्कातील लोकांना व्हायरस पाठवण्याचे प्रकार झाले आहेत. तसे लोक जर माझ्या फेसबूकवर घुसले तर उगाच माझ्या 'मित्र' व्यक्तींना धोका.

विषयांतर नसेल अशी आशा वाटते. इथे बा. रा. मधे एका रवी नावाच्या कॉलेजकुमाराने एक मुलाबद्दल वाईट फोटो आंतर्जाला वर टाकले, नि त्यामुळे त्या बिचार्‍या मुलाने आत्महत्या केली. त्या रवीवर खटला केला आहे, पण तो खटला कधी पूर्ण होईल, त्यावर निकाल काय लागेल, नि खरोखर कुणि दोषी ठरले तर त्यांना काय शिक्षा होईल, हे सर्वच अनिश्चित. उलट 'बातमी' या नावाखाली पुनः पुनः त्या गोष्टीचा उल्लेख करून त्या दिवंगत मुलाच्या कुटुंबियांना परत परत नको त्या आठवणी!!

म्हणजे खटला जिंकले तरी त्यातून जास्तच मनःस्ताप!!

एकूण काय, उगाच जगातल्या गोष्टींवर टीका करण्यापेक्षा, आपण जास्त हुषार बनून, सावध राहून, वाईट लोकांच्या वाईट गोष्टींवर मात करणे हा एकच खात्रीलायक उपाय आहे.

बाप्रे! मी फेबु बर नाही म्हणुन अगणित तु क फेस करावे लागतात. पण मी जाम बधत नाही. मीपण तु क फेकुन देते. असच ऑर्कुटबद्दल.
हे सगळं खुप भयंकर आहे.

माझ्या फेसबूक पानावरील माहिती, जसे माझ्या 'मित्र' व्यक्तींचे फोटो, चोरून त्यांच्यावर काही बदनामी कारक करण्याची शक्यता आहे का? >>> हे कोणीही सांगू शकत नाही... त्यापेक्षा एकदम अनोऴखी लोकांना अ‍ॅड करायचच नाही.... हाकानाका Happy

त्या मित्रांना 'अमित्र' बनवून, माझ्या फेसबूक पानावरील त्यांचे नावनिशाण पुसून टाकता येईल का?
<< हो ... तुमच्या frnd list मध्ये जावून जे जे लोक तुम्हाला नकोयेत त्यांना डिलीटून टाका Happy

ही दुनिया मायाजाल, मनुजा जाग जरा !
>> महेश, खरे आहे रे.. Happy
हेच एक तेवढे सत्य आहे. Proud

पूर्वी ऑर्कुट वापरायचे लोक. त्यात माझे दोन तीनशे 'फ्रेन्ड्स' झाले होते. अचानक पब्लिकने ऑर्कुट वापरायचे सोडून दिले आणि फेसबुककडे वळले. म्हणजे ते तीनशे लोक जे जमा केले होते, ते सगळे वाया गेले. तिकडून कुणाशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर कुणी उत्तर पण देणार नाही आता. पुन्हा तेच आता फेसबुकवर करायचे!

ह्या दोनतीनशे लोकांपैकी वीस-तीस लोकांशी माझा संबंध होता. तेही सगळे चांगले मित्र किंवा जवळपासचे लोक असल्यामुळे फोनवर किंवा वैयक्तिक संपर्क होताच. उरलेल्या अडीचशे लोकांना अ‍ॅड करून तसा काही फायदा झाला नाही. माणसाची एवढी क्षमताच नाहीये की इतक्या लोकांशी एकावेळी संपर्क ठेवून असेल! समजा रोज फक्त १० लोकांनी मला मेसेज केले तरी त्या सर्वांना उत्तरं देताना माझी फेफे उडेल.

हे कमी म्हणून की काय, ट्विटर नावाचा प्रकार आहे. मध्यंतरी गूगलने 'गूगल बझ' सुरू केले तर पब्लिकने तिथेही अकाऊंट सुरू करून टीपी करायला सुरूवात केली होती. रोज नवनवीन फॅड.

जेव्हा ऑर्कुट सुरू झाले होते तेव्हा नवीन असल्यामुळे रोज उठून लोकांच्या प्रोफाईल, अपडेट्स बघत बसायचो. त्यात भरपूर वेळ जायचा आणि मन थकून जायचे. लोकांच्या नादात आपले आपल्याकडेच लक्ष नाही. आपली सुखदु:खं कमी की काय म्हणून त्यावर लोकांनी लिहिलेली उसनी सुखदु:खं भोगायची. म्हणून एक दिवस ठरवून ऑर्कुट वापरणे पूर्णपणे सोडून दिले. आणि नंतर विचार केल्यावर कळले की तसे करण्याने माझ्या जीवनात काहीही फरक पडला नाही. जगाच्या मागे वगैरे काही पडलो नाही. जे मित्र आहेत, ते अजूनही मित्र आहेत. म्हणून मग पुन्हा फेसबूकवर हे उद्योग करायचे नाही असे ठरवले. तेव्हा मी आता फेबुवर आठवड्यातून एकदा वगैरे जातो. विनोद आणि असतील तर एक दोन लेखाच्या लिंका पाहतो. पंधरा मिनिटांनी बाहेर.

हे माध्यमही प्रगल्भ होईल कधीतरी, पण ते होईतो आपला वेळ गेलेला असतो त्याचे काय? शेवटी आपले आपणच पहावे लागते.

लेखाचा विषय हा नाहीये. पण तशीच चर्चा सुरू झाली म्हणून मला लिहावेसे वाटले.

फचिन, लेखाचा विषय नाही असं म्हणता येणार नाही. त्यानिमित्ताने सोशल नेटवर्किंग वर काय करावं करू नये किंवा कसं वापरावं कसं वापरू नये यावर चर्चा झाली तर ते हवंच आहे. Happy

फचिन, तू जे दिले आहेस माझ्या बाबतीत पण अगदी १०१% तसेच आहे.
सुरूवातीला मी त्या ऑर्कूट प्रकाराबद्दल साशंक होतो, असे दिसले की सगळेच उठसूट तिकडे आहेत, म्हणून मग अकाऊंट उघडले, सुरूवातीला खुप उत्साही होतो, पण नंतर कामाच्या रेट्यामुळे अचानक कमी झाले. नंतर फेसबुकवर पण अकाऊंट उघडले पण का कोण जाणे ऑर्कूट एवढे फेसबुक आवडले नाही. आता तर सर्वात असुनही कशातच नाही अशी स्थिती आहे. Happy

बापरे, दहा बारा तासात बरीच चर्चा झालेली दिसते. मला वाटतं सर्वानी स्वतःला 'गुगल' करुन पहायला हवं. या ना त्या प्रकारे आपले, मुलांचे फोटो असतात आंतरजालावर. सगळे प्रतिसाद वाचले नाहीत अजून पण,
Kiranyake <<<<<एक चांगला लेख आहे हा. काही शंका मनात येतात. भारतासारख्या ठिकाणीही आता सायबर गुन्ह्यांबद्दल जागृती झालेली आहे. गुन्हे शोधले जातात, लोक तक्रारी दाखल करतात मग अमेरिकेसारख्या देशातल्या स्त्रीने इतकं गलितगात्र व्हावं हे खटकतय. तिला खाजद्\गी हॅकरच्या मदतीने कुणी हा चावटपणा केलाय हे शोधून काढणं सहज शक्य होतं. अमेरिकेत इतकं ज्ञान तर असेलच प्रत्येकाला.. अर्थात ही शंका आहे माझी.>>>.

सुझननी म्हणूनच त्यांच्या पुतण्याचा सल्ला घेतला असावा. त्याच्याद्वारे त्यांना मार्ग सापडला मग पुढच्या गोष्टी करण्याची गरज उरली नसावी. आणि शोधून काढलं तरी कोर्टाचा खर्च खूप असतो तो परवडायला हवा, त्यात ही मुलं परदेशातली. त्या गलितगात्र झाल्या कारण ह्या अशा प्रकाराची अपेक्षाच केली नाही त्यामुळे, नंतर त्यांनी पुरवलाच की पिछा या प्रकरणाचा.

फचिन, मी फेसबुक वरचा वेळ अगदी मर्यादीत ठेवलाय. कामाशिवाय जो मोकळा वेळ मिळतो त्यात रोज काहीतरी वाचायचं / लिहायचं / व्हिडीओवर बघायचं / गाणी ऐकायची / पायी फिरायचे / काहीतरी शिजवायचे / गच्चीवर आरामात कॉफीचे घुटके घेत आसमंत न्याहाळायचा... असे नियमित पणे केल्यावर आपोआप, वेळेची वाटणी झाली. फेसबुकवरच्या अगदी मित्रांच्याही प्रत्येक पोस्टवर कमेंट देत नाही. पण अधूनमधून सगळ्यांना, आपली आठवण राहील असे बघतो.

ह्म्म... कुठल्याही सोशल नेटवर्कींग साईटवर खबरदारी हाच उत्तम उपाय. कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हा दुसरा धडा. तरूण पिढीला तर हे आधी शिकवायला हवं.
नीधपच्या पोस्टीला पूर्ण अनुमोदन.

नीधपताई, मी ते फेबु फारसे वापरत नाही. अ‍ॅप्लिकेशन्स मध्ये जातांना येणारी वॉर्निंग वाचूनच किती तरी गोष्टी उत्सुकता असूनही पहायच्या टाळल्या आहेत. पण मी अकाउंट ओपन करतांना सुरुवातीला काय केले ते आठवत नाही, पण ओर्कुटवरचे सगळे फ्रेंड्स आपोआप अ‍ॅड झालेत, एवढे आठवते. तू म्हणालीस, तसेच मी पासवर्ड अ‍ॅक्सेस दिला असणार.... मला बर्‍याच गोष्टी माहिती नव्हत्या, विशेषत: अल्बम कस्टमाईज सेटिंगविषयी. तुझा प्रतिसाद वाचून फेबू हेल्प सेंटरवर जाऊन सगळे समजून घेतले आणि सगळे सेटिंग्ज बदलून टाकलेत. धन्यवाद गं. Happy

ओर्कुटवरचे सगळे फ्रेंड्स आपोआप अ‍ॅड झालेत <<<
असे आहे होय. मला असे वाटायचे की, मी फेसबुकाचा सदस्य होण्यापूर्वी माझ्या ई-पत्त्यावर ज्यांच्याकडून फेसबुक-रिक्वेस्ट आली होती ते मी सदस्य झाल्यावर लगेच आपोआप अ‍ॅड झाले. मला वाटायचे फेसबुक हा ऑर्कूटाचा प्रतिस्पर्धी आहे!

Pages