इतर काही गंभीर कविता

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 03:42

समोर रक्ताचा ओघळ वाहत असताना
त्याला सहन करतो पांढरपेशी माणूस
रक्ताला सरावलेली पावलं
घसरत नाहीत त्यावरून
आणि निर्ढावलेलं मन
बघू शकतं,
दुसरया मनांच्या झालेल्या चिरफाळ्या
थंडपणे

------------------------------------------------------------------------------------

माणसाला स्वप्नांची सवय झाली आहे
सुंदर, सुखी आणि आनंदी
माणसाला वास्तव नाही पचवता येत
कारण ते कटू असतं
वास्तवाच ओंगळ आणि गलिच्छ अस्तित्व
त्याला मान्य नसतं
आणि अशा वास्तवाचं दर्शन झाल्यावर
तो कोलमडून पडतो

------------------------------------------------------------------------------------

इथे मरण महाग आहे
किड्यामुंग्यांसारखी जगतात माणसं
पण सगळेच एका मौतीला महाग आहेत
जीवनेच्छा खूप चिवट आहे
माणूसच माणसाला खातोय आणि जगतोय
तरीही इथे मरण महाग आहे
इथे कुणासमोर रक्ताचे सडे शिंपले जात आहेत
कुणी दुसरयाचे लचके तोडतोय
एकमेकाचे गळे दाबल्यानंतरही
लोंबकळणारी जीभ घेऊन
जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत

प्राक्तन पाटील

गुलमोहर: