मार्केटिंगवाले, त्यांचे फंडे (पिच्छा ) आणि उपाय

Submitted by सांजसंध्या on 1 June, 2011 - 04:10

सध्या मला मित्रमैत्रिणींपेक्षा मार्केटिंगवाल्यांचेच फोन जास्त येतात. इन्स्युरन्सवाले. टेलिमार्केटिंगवाले, एमएलएम वाले, ट्रॅव्हल एजंटस, मोटेल्सवाले, क्रेडीट कार्डवाले, कर्ज घ्या म्हणणारे, बक्षीस लागलय असं सांगणारे असेच लोक यात असतात. त्यांना नंबर कुठून मिळतो हे कोडं आहेच, पण वेळोवेळी येणारे फोन, त्यांचा लोचटपणा, प्रत्येक एक्स्क्युज वर रेडीमेड उत्तर द्यायची हातोटी आणि मुख्य म्हणजे नको असलेला पाठलाग यामुळे बेजार व्हायला होतं. ( सध्या हा ससेमिरा चुकवायची सोय आहे म्हणा.. )

तुम्हाला पण येउन गेलेले असे अनुभव आणि तुम्ही त्यांना कसं ट्रीट केलंत हे इथं शेअर करावं असं वाटतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सुरूवात करावी लागेल नाही का ?

मला तसं लोकांना उडवून लावता येत नाही. पण माझ्या एका मित्राचा किस्सा शेअर करण्यासारखा आहे.
त्याला एका इन्श्युरन्स एजंटचा सारखाच फोन येत होता. नको म्हणून सांगितलं तरी एक बार मिलो म्हणायचा. ऑफीसला येउ का, घरी येऊ का असं खूप दिवस चाललं होतं.

एक दिवस तो खूपच घायकुतीला आला होता. म्हणून मग याने कोल्हापुरातल्या शाहू महाराजांच्या पॅलेसजवळ बोलवलं. तो म्हणाला सकाळी येउ का ? हा हो म्हणाला. नऊ वाजता ? तर हा हो म्हणाला.

त्याचा नौ वाजता याला फोन आला. मै पहुंच गया हूं. हा म्हणाला ठीक आहे. पुन्हा काही वेळाने फोन आला.. साब मै यहा खडा हूं. हा पुन्हा ठीक म्हणाला. असं खूप वेळ चाललं. शेवटी एक वाजता त्याचा फोन आला तेव्हा तो वैतागलेला होता.

हा म्हणाला आप कौनसे गेट पे हो ? तो म्हणाला चार नंबर
हा म्हणाला.. मै तो एक नंबर कि बात कर रहा था..

तो एक नंबर ला येऊन थांबला. पुन्हा फोन वर फोन. शेवटी चार वाजता त्याचे पेशन्स संपले. त्याचा आवाज चढला. बरच काही बोलला.

हा फक्त शांतपणे म्हणाला " बात तुम्हारे आने कि हो रही थी. मै आउंगा ये बात कहा हुई ? "

बिच्चारा इन्श्युरन्स एजंट !

हा हा !!!

मी तीन वेळा आयडीयाच्या साईट वर डू नॉट कॉल साठी रजिस्टर केलं पण तरीही असले फोन चालूच.

(१) मी एक तर अनोळखी नंबर असेल तर सहसा फोन घेतच नाही. (तसे काही ओळखीचे नंबर पण बघून घेत नाही ते सोडा Wink )
(२) घेतलाच तर मार्केटींगवाल्यांचा असेल तर काहीही न बोलता सरळ कट करतो.

ट्र्फिक सिग्नल चित्रपटात असाच एक क्रेडीट कार्डवाला एका भाईगिरी करणार्‍या गुंडाला पिडत असतो... सरते शेवटी एक दिवस कंटाळून तो गुंड त्याला त्याच्याच अड्ड्यावर बोलवतो आणि यथेच्छ धुलाई करतो.

माझ्या आयटीवाल्या भावाच्या सिमकार्डवर माझे सिमकार्ड मिळाल्याने मला नेहमी इन्शुरन्सवाल्यांचे फोन येतात. सरळ 'आयेम अ हाउसवाईफ आणी नॉट इन्टरेस्टेड' सांगते. सवयीने नंबर माहितीचे होतात... ४१ने स्टार्ट होणारे कधी खुप शुन्य असलेले नंबर...मग फोनच उचलायचा नाही.

ऑफिसमधे असताना माझ्या फोनला मी एक विशिष्ठ प्रोफाईल सेट केली आहे. फोन आला की फक्त एकदा बीप वाजते. म्हणून इग्नोर करणं सोप्पं जातं.

वेस्टिन, व इतर हॉटेलांचे कार्डसाठी फोन. लोन साठी फोन व मेसेजेस, ऑफर्स, त्यात कामाच्या गड्बडीत अस्ले तर फार वैताग येतो. एकाने मला आर यू मुस्लिम असे विचारले होते तेव्हा मी त्याला फार सुनावले होते. कट करते नॉरमली पण कधी कधी त्रास दिला तर आहेच : )

माझी एक मैत्रिण फोनवर तो मार्केंटिंगवाला खुपच घायाकुतीला आला की नीट शांतपणे सगळं ऐकून घेते मध्ये शंका वगैरे पण मस्त विचारते.. मग सगळं झालं की सांगते प्लॅन छान आहे पण माझ्याकडे सध्या पैसे नाहियत. निदान पहिला हप्ता तू भरशील का? तो मार्केंटिंगवालाच फोन कट करतो. Proud

मला ईतक्या शांतपणे बोलता येत नाही.. Sad पण प्रयत्न करुन बघायचय. कोटक, एचडीएफसी, एलआयसी अशी नावे ऐकल्यावर मी लगेच फोन कट करते.. किंवा नं च्या शेव टी ३-४ शून्य असतात असे फोन घेतच नाही.

एकदा हिंदी मार्केटींगवाल्याला मी पिडलं होतं की मला फक्त मराठीच बोलता येतं. पाच मिनिटं शोधाशोध करुन एक मराठी बोलणारा माणुस शोधला. मग त्याला मी मराठीत सांगितलं "मला हे उत्पादन नकोय" Proud

मोबाईल सर्व्हिसबाबत नवीन स्किम सांगण्यासाठी फोन आल्यावर, "मी इंटरेस्टेड नाही" असं प्रथम सांगतो.
तरीही मार्केटिंगवाला “स्कीम सांगतो” असं म्हणाला तर मी त्याला सांगतो की
"देखिये, आप स्कीम तो बताएंगे लेकिन मेरे ध्यानमें कुछ भी रहता नहीं. मैं ’गझनी’ हूँ, १५ मिनट में सब भूल जाउँगा…. बेहतर होगा आप मुझे मेल करें और उस में सब डीटेल्स दे दीजिए "

यावर त्याने मेल-आयडी विचारला तर त्याला सांगतो की, "मेरा आय-डी आपके पास होना ही चाहिए.
ढूंढ लेना ..... फोन के लिए धन्यवाद.... आप का दिन शुभ हो"
शेवटची २ वाक्ये मार्केटिंगवाल्यांच्या टिपिकल स्टाइल मध्ये मीच बोलल्याने, तो स्वत:च फोन बंद करतो.

वर संध्याने कोल्हापुरचा किस्सा सांगितला आहे, त्याच लाईनमधला हा दुसरा :

माझ्या बहिणीचे लग्न ठरले. सध्या मुहुर्त शोधण्यासाठी पंचांगापूर्वी 'मॅरेज हॉल'ची उपलब्धता पाहणे हे अतिमहत्वाचे ठरले आहे, इतकी ही कार्यालय अ‍ॅडव्हान्समध्ये गेलेली असतात. तर एकदाचा तसा हॉल बूक झाला आणि मग लग्नाच्या बाकीच्या तयारीला सीनिअर मंडळी लागली.

बुकिंगच्या तिसर्‍याच दिवशी घरातील एक मोबाईल वाजला. तिकडून एक तरूणी (आवाजावरून तर तरूणीच वाटत होती...!) बोलली, "अभिनंदन, आपल्या घरी लग्नकार्य आहे असे समजले." यावर मी गोंधळून गेलो, ते अशासाठी की 'ही कोण बया आणि हिने त्यात अभिनंदन करण्यासारखे काय आहे?" तरीही एक सौजन्याचा उपचार म्हणून मी 'थॅन्क्स' म्हटले आणि 'आपण?" अशी पृच्छाही केला. तर तिने उत्साहाने सांगायला सुरूवात केली, "मी कोल्हापुरातील लक्ष्मी रोडवरील मे.द्वारकादास शामकुमार या प्रसिद्ध कापड दुकानातून बोलत्ये. आमच्याकडे स्त्री आणि पुरूष या दोघांसाठी 'आहेरा' देण्याकरीता लागणारा सर्व स्टॉक सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तुम्ही अवश्य भेट द्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही हा फोन करत आहोत."

कापड दुकानदार खरेदीसाठी ग्राहकाला फोन करतात हे मी प्रथमच अनुभवले. कारण लग्नसराईत अशा दुकानात उसळलेली तोबा गर्दी पाहता याना ग्राहकाची गरजच कशी पडेल असा प्रश्न सर्वानाच जाणवतो. तरीही त्याना आमचा मोबाईल नंबर कसा मिळाला ही उत्सुकता मला लागून राहिल्याने इकडचे तिकडचे दोनचार वाक्ये बोलून मी तिची (फोनवरच) रजा घेतली आणि विचारले, 'पण मॅडम, तुम्हाला हा नंबर कुणी दिला?' तर त्याला उत्तर होते, 'आम्ही शहरातील सर्व मंगल कार्यालयांच्या संपर्कात असतो आणि तुम्ही तिथे बुकिंग करतेवेळी जी माहिती फॉर्ममध्ये भरली आहे, तिथे तुमचा नंबरही आहेच. खरेदीसाठी जरूर या. धन्यवाद..."

काय बोलणार ?

ट्युशन क्लासेसवाले सुद्धा शाळेतुन ९वी १०वीच्या पोरांचा डेटा घेतात. माझा पोरगा नववीला गेलाय...सुरु झालेत त्यांचे कॉल्स! मग त्यांना 'आम्ही ऑलरेडी अमुक तमुक क्लासला टाकलय' असं सांगावं लागतं.
सगळा मार्केटींगचा जमाना आहे. Sad
१०वर्षांपुर्वी माझ्या मुलाला शाळेत टाकलं तेव्हा बसच्या काकांनी स्वतः फोन करुन त्यांच्या रिक्षा/बसची माहिती दिली. एखाद्या एरीयातल्या किती पोरांनी शाळेत प्रवेश घेतला.. हे सगळं जमवतात हे लोक.

आम्ही शहरातील सर्व मंगल कार्यालयांच्या संपर्कात असतो आणि तुम्ही तिथे बुकिंग करतेवेळी जी माहिती फॉर्ममध्ये भरली आहे, तिथे तुमचा नंबरही आहेच. खरेदीसाठी जरूर या. धन्यवाद...">> वेगळाच अनूभव.

मला अगदी खूप येत नाहीत. पण आले की फक्त
"आय अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड. थँSSSSSSक्यूSSSSSS ....."
एवढंच बोलते आणि फोन ठेवते. पण ते थँक्यु म्हणण्यात खूप उत्साह दाखवते आणि एकदम जोरात बोलते. पुन्हा फोन येत नाहीत. प्लीजच नोट. Proud

आधी या विषयावर झालीय चर्चा इथे. पण हा न संपणारा विषय आहे. मी भारतात उतरल्याबरोबर सिम कार्ड बदलले कि हे फोन सुरु होतात. मी काहीही न बोलता फोन खिशात ठेवून देतो. काहि फोनवर तर आपण फोन घ्यायच्या आधीच बोलणे सुरु होते.

आधी या विषयावर झालीय चर्चा इथे. पण हा न संपणारा विषय आहे. मी भारतात उतरल्याबरोबर सिम कार्ड बदलले कि हे फोन सुरु होतात. मी काहीही न बोलता फोन खिशात ठेवून देतो. काहि फोनवर तर आपण फोन घ्यायच्या आधीच बोलणे सुरु होते.

तुम्हा सर्वांपेक्षा मी वेगळी असेन बहुतेक. मला ही बरेच फोन येतात. पण मी पोलाईटली मला आत्ता गरज नाही असं सांगते. खरं तर काही चांगल्या स्किम्स ही सुचवतात हे लोक. मधे hdfc च्या RD अकाऊंट साठी फोन आला होता मला... मला प्रॉड्क्ट बरं वाटलं. त्यामुलीने कॉर्डिनेट करून त्या रिप्रेझेंटेटिव्ह ला घरी पाठवून फॉर्म वर सही घेतली... भर दुपारी आला होता तो मुलगा... Sad त्याला कॉल देणारी मुलगी; तिला सुद्धा यातून काही इंसेंटिव्हज मिळत असतील.
ज्याची त्याची आपल्या पोटासाठी लढाई.. Sad मी कधीही या लोकांशी उद्धटपणे बोलत नाही.. न जाणो मी त्यांच्या जागी असते आणि मला असं कोणी उडवून लावलं असतं तर? हा प्रश्न नेहमी माझ्या डोक्यात येतो...

दक्षिणा, तुझं म्हणणं अगदी पटण्यासारखं आहे. त्यांची ती नोकरी आहे, त्यावर त्यांचं पोट अवलंबून असतं. म्हणूनच मी म्हटलंय की प्रथम शांतपणे "मला यात इंटरेस्ट नाही" असं सांगतो पण, जर समोरचा माणूस अती आग्रहाने गळी पडू लागला तर मग आपल्यालाही टाळाटाळ/टोलवाटोलवी अशा प्रकारचा मार्ग अवलंबावा लागतो.

एखाद्या स्कीमची माहिती सांगणं एकवेळ ठीक आहे, पण "आपका फोन नंबर इस स्कीम के लिए चुना गया है..... " इ. इ. बतावणी केल्यासारखं मार्केटिंग होत असल्याने ग्राहक वैतागतात. मार्केटिंगचा माणूस आपल्याला टोपी घालायच्या इराद्याने संपर्क करतोय असा ग्राहकाचा समज/गैरसमज निर्माण व्हायला सद्ध्याच्या काळातलं हे गळेपडू मार्केटिंग तंत्रच जबाबदार आहे हे विसरून चालणार नाही.

समोरचा आपल्याला मूर्खात काढतोय हे कहीकधी पचत नाही. नम्रपणे नकार दिल्यावरही सतत एखाद्याच्या मागे लागलं, त्याची नकाराची कारणं खोडून काढायचा प्रयत्न केला गेला तर मग ते टॉर्चर ठरतं.

किरण्यके....तुम्ही हा "टॉर्चर" मुद्दा छेडला ते ठीक झाले. वेळकाळस्थळस्थिती याचे कोणतेही भान या सर्व्हेवाल्यांना नसते, किंबहुना त्याची क्षितीही त्याना वाटत नाही. उदा. एकदा मी आणि माझा मित्र त्याच्या एक ज्येष्ठ नातेवाईकाच्या अंत्ययात्रेत होतो. जरी प्रत्यक्ष आम्ही "खांदेकरी" नसलो तरी त्यांच्या पाठोपाठच होतो. तितक्याच मित्राचा सेल घणघणला, तो त्या आकस्मिक आवाजाने थोडासा ओशाळलाही. मी अन् तो थोडेसे बाजूला झालो. मीच घेतला त्याचा फोन. फोन अर्थातच 'एका एक्सायटींग [फोनकर्त्याचा शब्द] ऑफर" बाबतच होता. मी नम्रपणे त्याला वस्तुस्थिती सांगितली. बोलणारा मराठी माणूसच होता, तेव्हा 'अंत्ययात्रा' म्हणजे काय हे त्याला सविस्तर सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. तो जास्त बोलला नाही हे खरे. तरीही त्याची चिकाटी दांडगी. मोबाईल बंद करण्यापूर्वी म्हणतो, "ओके सर, हॅव अ गुड डे !"

च्यामारी...आम्ही चाललोय मयताला...आणि हा पठ्ठ्या म्हणतोय, "दिवस चांगला जाऊ दे !" ~ हे देखील एकप्रकारचे टॉर्चरच !

माझ्या साबा-साबुंचा स्वभाव मिस्कील! आमच्या घरी एकदा फोन आला आणि साबांनी उचलला. सगळं नीट ऐकून घेतलं. मग "तुम्ही कोण बोलताय" असं पलिकडून विचारल्यावर 'मी इथे कामाला येते, साहेब नाहीत घरात. मग करा फोन' म्हणाल्या! पुन्हा कधी फोन नाही आला. हे ऐकून सासर्यांनी अजून एक भन्नाट कल्पना सुचवली. "आपण नीट ऐकायचं, आणि बोलण्याचा रागरंग बघून शेवटी, 'काय सांगू हो! माझं कोणीच ऐकत नाही...घरातले त्रास देतात...बरं झालं तुम्हीच फोन केलात, आता जरा माझं दु:ख शेअर करतो...तुमच्या स्किम्स बद्दल मी ऐकलं, आता माझं तुम्ही ऐका..' "
त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही हे फोनवर ऐकून गडाबडा लोळायचे बाकी होतो!

Pages