ऊर्जेचे अंतरंग-१३: ऊर्जेच्या गरजेची विस्तारती क्षितिजे

Submitted by नरेंद्र गोळे on 31 May, 2011 - 08:19

आपली स्थापित वीजनिर्मितिक्षमता आणि वर्तमान पंचवार्षिक योजनेदरम्यान (२००७-२०१२) त्यात आपण घालणार असलेली भर खालील तक्त्यात दाखवलेली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा, जानेवारी २००८ मध्ये, असा दावा आहे की २०१२ मध्ये खालीलप्रमाणे स्थापित क्षमतेत भर पडल्यास आपल्या ऊर्जाविषयक गरजा पूर्णपणे पुरवता येतील.

पुनर्नविनीक्षम ऊर्जास्त्रोतांत छोटे जलविद्युतप्रकल्प २०१.४६७ कोटीवॅट(SHP-Small Hydro Projects), पवनऊर्जाप्रकल्प ७५१.१५४ (Wind Power Project), जैव वस्तुमान शक्ती आणि जैव वस्तुमान वायुकरण प्रकल्प १२५.२६२ कोटीवॅट (BP&BG-Biomass Power and Biomass Gasifier Projects), शहरी व औद्योगिक कचर्‍यातून ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प आणि सौर विद्युत प्रकल्प ७.६४० कोटीवॅट (U&I-Urbon & Industrial waste to energy and Solar) यांचा समावेश आहे.


मात्र, हे सारे आज माहीत असलेल्या ऊर्जेच्या मागणीवर आधारित आहे. प्रत्यक्षात आपला देश विकसनशील आहे. जसजसा विकास होत जातो, तसतशी नवनवीन क्षेत्रे विकासासाठी खुली होत जातात. त्यांच्या नव्या गरजा निर्माण होतात. त्या पूर्व-अनुमानित असू शकत नसल्यामुळे, ऊर्जेची मागणी अनपेक्षित प्रमाणात वाढत जाते. ऊर्जा नियोजनास धक्का पोहोचतो. आणि ऊर्जेचा तुटवडा पुन्हा भासू लागतो. ऊर्जेची मागणी ह्याप्रकारे वाढती असणे हेच विकसनशील असण्याचे लक्षण आहे. विकसित देशांत ऊर्जानियोजन परिपूर्ण होऊ शकते. आपल्याकडे ते फसल्याचेच कायम का दिसत असते, ह्याचे कारण हे आहे. ही फसगतीची भावना सामान्य माणसापासून तर केंद्रीय नियोजन आयोगापर्यंत सर्वांनाच सतावत आहे.

हे कसे, ते आपल्या घरच्याच संदर्भात बघू या. १९७१ साली आमच्या घरात सर्व दिवे १५ वॅटचे असत. ते पुरेसे वाटत असत. रॉकेल, पेट्रोमॅक्स, मेणबत्त्या इत्यादी तत्कालीन अन्य स्त्रोतांच्या मानाने ते प्रकाशमान भासत. संडास-मोर्‍यांमध्ये दिवे लावण्याची गरजही तेव्हा मानत नसत. तेव्हा सर्व घराचा विद्युतभार १५ वॅट x ५ खोल्या = ७५ वॅट असे. पुढे १९८१ मध्ये प्रत्येक खोलीत प्रकाशनळ्या (ट्यूबलाईट, ४० वॅट) असणे गरजेचे वाटू लागले. आकाशवाणीसंच (रेडिओ ५० वॅट) हवा झाला. पाण्याकरता विहिरीवर क्षेपक बसवला (५०० वॅट). अशाप्रकारे तेवढ्याच माणसांना, त्याच घरात ७५० वॅट स्थापित क्षमतेची गरज निर्माण झाली. नंतर १९९१ पर्यंत, दूरदर्शनसंच (टी.व्ही. २०० वॅट) आला. शीतकपाट (फ्रीज २०० वॅट) आले. पाणी तापवायचा तापक आला (गीझर ३,००० वॅट). कपडे लावण्याचे यंत्र आले (इस्त्री ७५० वॅट). स्थापित क्षमता सहा पटीने वाढली. आज ज्या घरांत वातानुकूलन (ए‌सी ३,००० वॅट) आहे त्यांचेकडे ती आणखी सहापटीने वाढलेली आहे. घरात असंख्य विद्युत उपकरणे गरजेची झालेलीच आहेत. पंखे, मिसळण यंत्र (मिक्सर), अन्नप्रक्रियक (फूड प्रोसेसर), स्वयंपाक-भट्टी (ओव्हन), दाढीची यंत्रे, केस सुकवणारी यंत्रे (हेअर ड्रायर), कपडे धुण्याचे यंत्र (वॉशिंग मशीन) वगैरे वगैरे. ह्यामुळे कुणाही माणसाला, नव्या घरात जोडणी देतांना जेव्हा वीज-मंडळ "किती वीज लागेल?" असा प्रश्न विचारते, तेव्हा किती लागेल ह्याचे जे उत्तर आपण देत असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त वीज आपण लगेचच वापरू लागतो.

तेव्हा ऊर्जेच्या संदर्भात माणसाची "हवे हवे ची हाव सरेना, किती हिंडशी गावे" अशी अवस्था असते. ऊर्जेच्या गरजेची क्षितिजे कायमच विस्तारती असतात. मग ऊर्जेचे नियोजन माणसाने, कुटुंबाने, गावाने, प्रांतांनी आणि देशाने साधावे ते कसे? कुठेतरी पांघरूण पाहून पाय पसरण्याचा उपायही वापरावाच लागणार आहे. तर अन्यत्र इतर उपायांचाही शोध घ्यावाच लागणार आहे. त्यात अनावश्यक र्‍हास टाळण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. तो खालीलप्रमाणे.

आजच्या जगात, ऊर्जा म्हणजे वीज हे समीकरण झालेले आहे. ऊर्जेबाबतच्या इतर सर्व प्रकारच्या गरजा, जशा की प्रकाश, उष्णता, परिवहन, संदेशवहन, पाण्याचे क्षेपण (pumping) इत्यादी सर्व गरजा आपण विजेच्या साहाय्याने साध्य करतो. प्रत्यक्षात बहुतांश वीज उष्णतेपासूनच निर्माण केली जात असते आणि त्या परिवर्तनादरम्यान ७०% ऊर्जेचा र्‍हास होत असतो. हे लक्षात घेता उष्णतेबाबतच्या आपल्या गरजा आपण विजेद्वारे साधणे काटकसरीचे नाही. इष्टही नाही. म्हणून त्याकरता सौर ऊर्जेसारख्या पुनर्नविनीक्षम ऊर्जेचा वापर करावा असे आपले राष्ट्रीय धोरण आहे. महानगरपालिकांनी नवीन इमारतींना बांधकाम पूर्णतेचे प्रमाणपत्र देण्याकरता, इमारतीच्या गरम पाण्याबाबतच्या गरजा सौर तापकाद्वारे साध्य करण्यासाठी, सौर तापक बसवून घेतलेला असणे अनिवार्य करावे. ह्याचे दोन मोठे फायदे आहेत. सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन मिळून वीजवापरावरील भार कमी होईल. आणि विजेद्वारे उष्णता मिळवण्यात होणार्‍या ७०% ऊर्जा र्‍हासास टाळता येईल. यामुळे विकास झपाट्याने होईल. कमी खर्चात होईल. कमी प्रदूषक होईल (कारण, होणारा ७०% ऊर्जार्‍हास परिसराचे तापमान वाढण्यासच कारणीभूत होत असतो).

काही वेळेला (खरे तर कित्येकदा) वातानुकूलित खोल्यांमध्ये केस सुकवणारी यंत्रे, कपडे लावणारी यंत्रे, पाणी तापवणार्‍या चुली, कॉफी मेकर इत्यादी उष्णताकारक यंत्रे चालू असलेली आढळून येतात. ह्यात ही यंत्रे पुरेशी सक्षम ठरत नाहीतच, शिवाय वातानुकूलन यंत्रांवरही अतिरिक्त अनावश्यक भारही पडत असतो. हे आपल्याला टाळता येईल का? तुमच्या आसपास असे काही तुमच्या नजरेस पडत असेल तर इथे अवश्य सांगा. आपण त्यावरचे उपायही शोधू आणि त्या उपायांचा प्रसारही करू म्हणजे ऊर्जावापर जास्तीत जास्त सक्षमखर्ची (मूल्यप्रभावी) होऊ शकेल.
.
.
http://urjasval.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

मायबोलीवरील माझे इतर ऊर्जाविषयक लेखन खालीलप्रमाणे आहे.

http://www.maayboli.com/node/24995 ऊर्जेचे अंतरंग-०१: ऊर्जेची महती
http://www.maayboli.com/node/25017 ऊर्जेचे अंतरंग-०२: स्थितीज ऊर्जा
http://www.maayboli.com/node/25172 ऊर्जेचे अंतरंग-०३: गतीज ऊर्जा
http://www.maayboli.com/node/25219 ऊर्जेचे अंतरंग-०४: रासायनिक ऊर्जा
http://www.maayboli.com/node/25303 ऊर्जेचे अंतरंग-०५: आण्विक ऊर्जा
http://www.maayboli.com/node/25339 ऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा
http://www.maayboli.com/node/25360 ऊर्जेचे अंतरंग-०७: शून्य ऊर्जेकडे वाटचाल
http://www.maayboli.com/node/25486 ऊर्जेचे अंतरंग-०८: मोजू कसा, किती मी तुज
http://www.maayboli.com/node/25539 ऊर्जेचे अंतरंग-०९: ऊर्जेची मूलतत्त्वे

http://www.maayboli.com/node/12561 वीज, वीजक आणि वीजकविद्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users