ऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा

Submitted by नरेंद्र गोळे on 26 April, 2011 - 07:07

मुळात सृष्टीवरील सर्वच ऊर्जा ही इथली नाही. ती एकतर सृष्टीच्या जन्मासोबत इथे आलेली आहे किंवा सतत होत असणार्‍या किरणांच्या वर्षावातून इथवर येत आहे. आलेल्या ऊर्जेची विविध रूपे आपण ह्यापूर्वी पाहिली. आता आपण निरंतर इथवर येत राहणार्‍या 'प्रारण' ऊर्जेचे दोहन कसे करता येईल, ती सक्षमखर्ची पद्धतीने, पुरवून पुरवून कशी वापरता येईल, न पेक्षा, वाया जात असल्यास, अडवा व जिरवा धोरणाने इथेच खिळवून ठेवून नंतर कशी वापरता येईल, हे पाहणार आहोत.

सूर्यकिरणे वगळता इतर ग्रहतार्‍यांपासून इथवर येणारी किरणे क्षीण प्रकाशकिरणे असल्याने त्यांद्वारे माहितीच काय ती मिळविता येते. सूर्यकिरणांचा उपयोग मात्र ऊर्जा मिळविण्यासाठी होतो. प्रकाश मिळविण्यासाठी होतो. तसेच माहिती मिळविण्यासाठीही होतो. सूर्यकिरणे कायमच पृथ्वीच्या कुठल्या ना कुठल्या भागावर पडत असतात. आणि त्यांचा उपयोग मनुष्यप्राण्याने घेतला वा न घेतला तरीही त्या सर्व किरणांतील ऊर्जेचे अभिशोषण पृथ्वीतलावर होतच असते. ह्या अभिशोषणाच्या दरम्यानच जर ती ऊर्जा विशिष्ट प्रकारे विद्युत ऊर्जेत साठविता आली तर अंतिमतः सक्षमखर्ची वीज मिळविता येते.

प्रारण पृथ्वीबाहेरूनच येते असा आपला समज असतो. प्रत्यक्षात निसर्गतःच किरणोत्सारी असणार्‍या मूलद्रव्यांकडून पृथ्वीवरही इतर सर्व चराचर वस्तू ह्या नैसर्गिक प्रारणाचा सामना करतच असतात. ह्या ऊर्जेचा विद्युतऊर्जानिर्मितीसाठी उपयोग होतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. कारण हे प्रारण मनुष्याला नियंत्रित करता येत नाही. केवळ सांभाळून वापरता येते. कर्करोगाच्या पेशी इतर सामान्य पेशींच्या मानाने किरणोत्साराचा सशक्त मुकाबला करू शकत नाहीत. हे लक्षात आल्यावर मनुष्याने किरणोत्साराचा उपयोग करून कर्करोगाची पीछेहाटच नव्हे तर नायनाट करण्यात लक्षणीय यश मिळविलेले आहे.

इतर अवकाशस्थ वस्तू चमचम करतात. आपल्यापर्यंत किरणे पाठवितात. मग आपली पृथ्वीही चमचम करते का? चंद्राला व इतर अवकाशस्थ ग्रहगोलांना ऊर्जेचे प्रापण (म्हणजे ट्रान्स्मिशन, ट्रान्स्मिशनला प्रेषण, पारेषण असेही दुसरे प्रतिशब्द वापरात आहेत) करते का? ह्याचे उत्तर 'हो' असे आहे. अनादी कालापासून अवकाशस्थ वस्तूंकडून प्राप्त झालेली ऊर्जा साठवत असतानाच प्रकाशकीय (प्रकाशकी= प्रकाशाचा अभ्यास करणारे शास्त्र) नियमांप्रमाणे ती ऊर्जा काही प्रमाणात बाहेरही पाठविली जाते. म्हणूनच पृथ्वी अवकाशातून 'निळ्या संगमरवरासारखी' दिसते. राजा बढेंनी तिला 'गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी?' असा प्रश्न कवितेत विचारला होता त्यावरील चर्चा मनोगत डॉट कॉमवर कुठेतरी आहे.

सृष्टीवरील कर्ब-द्वि-प्राणिल वाढल्यास बाहेरील प्रारण इथवर येऊ शकते मात्र सृष्टीचे प्रारण बाहेर जाण्यास अटकाव होतो. थंड प्रदेशांतील देशांत वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी काचेची घरे करतात. त्यांना 'हरितगृह (हरितकुटी अथवा ग्रीन हाउस)' म्हणतात. काचेमुळे प्रारणे आत येऊ शकतात मात्र पाणी व बर्फ आत शिरू शकत नाही. आतली ऊर्जा बाहेरही जाऊ शकत नाही. अशाच प्रकारचा हा प्रभाव असल्याने ह्यास 'हरितकुटी न्याय (ग्रीन हाउस इफेक्ट)' म्हणतात. सर्व प्रकारची सरपणे/इंधने जाळली असता कर्ब-द्वि-प्राणिल निर्माण होतोच. आणि हरितकुटी न्यायाने सृष्टी तापतच राहते. म्हणून इंधने जाळून विकास घडवताना कायमच आपण सृष्टीतापाची चिंता करत राहायला हवी.

आण्विक, सौर, पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत सृष्टीतापाची चिंता करावी लागत नाही. म्हणून त्यांना 'हिरवे (ग्रीन)' ऊर्जास्त्रोत म्हणतात. पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) म्हणतात.

आणखीही एका गोष्टीची नोंद इथे घ्यायलाच हवी की प्रारण ऊर्जास्त्रोत अनादी, अखंड, अनंत काळपर्यंत सदोदित उपलब्ध राहू शकणारा, निरंतर ऊर्जास्त्रोत आहे. आपण आपल्या सर्वच ऊर्जा गरजा ज्यावेळी ह्या ऊर्जास्त्रोताद्वारे पूर्णांशाने भागवू शकू, तो दिवस ऊर्जेतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल. तो साधेपर्यंत ज्ञात ऊर्जास्त्रोतांकडून अज्ञातांचा शोध घेण्याचे काम आपण अखंडित, निरंतर करीत राहावे हेच श्रेयस्कर आहे.
.
http://urjasval.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users