जवसाचा गोड भात

Submitted by दिनेश. on 11 July, 2008 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तान्दूळ, मूगडाळ, ओवा, बाळ्शेपा, बडिशेप, गूळ, तूप

क्रमवार पाककृती: 

खास बाळाच्या आईसाठी हा भात आहे. यासाठी थोडी तयारी करून ठेवावी लागेल.
दोन कप बारिक तांदूळ आणि दोन कप मूग डाळ धुवुन वाळवून घ्यावेत. कढईत मंद आचेवर दोन्ही तांबूस रंगावर भाजून घ्यावेत.
एवढ्या प्रमाणाला एक चमचा ओवा, दोन चमचे बाळशेपा आणि चार चमचे बडिशेप वेगवेगळे भाजून घ्यावे. बाळशेपा म्हणजेच दिलसीड्स व बडिशेप यांची भरड पूड करून हे सगळे जिन्नस एकत्र करून ठेवावे.
अर्धाकप जवस भाजून त्याची पूड करून वेगळी ठेवावी,
भात करतेवेळी एक चमचा साजूक तूप गरम करून त्यात एखादी वेलची वा लवंग टाकावी. मग वरील मिश्रणातले एक कप मिश्रण परतावे. दोन कप गरम पाणी घालून भात शिजू द्यावा. त्यातच एक चमचा जवसाची पूड आणि भात नीट शिजल्यावर लिंबाएवढा गूळ घालावा. झाकण ठेवून भात मुरु द्यावा. खाताना थोडे तूप घ्यावे. हा भात काळपट दिसला तरी खूप चवदार लागतो. गरम वा गार कसाही खाता येतो. आणि बाळाच्या आइसाठी उत्तम आहार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एका व्यक्तिसाठी, पूर्ण जेवण.
माहितीचा स्रोत: 
स्वनिर्मित
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते ओवा, बडिशेप आणि बाळशेपाचं मिश्रण कधी घालायचं? जवसाला इंग्रजीत काय म्हणतात?

हे मिश्रण डाळ तांदूळातच मिसळून ठेवायचे, म्हणजे तांदळाला त्याचा छान वास लागतो.
जवसाला इंग्लिशमधे फ्लॅक्स सीड्स म्हणतात.