पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतेच गोव्याला गेलो होतो तेव्हाचा अनुभव. या धाग्याची सुरवात करण्यास तो अनुभवच कारणीभूत ठरला आहे.

गोव्याला 'बिगफूट' या ठिकाणी एका एका ग्रुपला आत सोडतात आणि तिथे मांडलेले देखावे बघताना मागे त्या देखाव्यांचं वर्णन करणारी कॅसेट सुरू असते. प्रत्येक ठिकाणी काही मुली उभ्या राहून आता या देखाव्याचं वर्णन आहे, ते जे कॅसेटवर सांगताहेत ते इथे दाखवलं आहे वगैरे सांगत असतात. आम्हीही असे फिरत होतो. ते देखावे सुरू असतानाच मध्येच मार्ग एका सुवेनीर शॉपमधून जातो. (का ते ईश्वराला माहित!). तर आम्हीही त्या दुकानात घुसलो. काही वेळानी बाहेर आलो तर पुढे जो देखावा होता तिथे कॅसेट सुरूच नव्हती. आवाज कुठून भलत्या ठिकाणीच सुरू होता. आणि तिथे असलेली गाईड आपल्या इतर मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसलेली. तिला विचारलं की हे काय? तर म्हणे तुम्ही दुकानातून उशीरा आलात म्हणून ती ऑटोमॅटिक कॅसेट आपल्या वेगानं पुढे गेली. आता तुम्ही पुढे जाऊन ऐका. पण मग या इथल्या दॄष्यांचं काय? तर म्हणे तो चान्स गेला. दुकानात जाण्यापूर्वीच्या कॅसेटवरच्या निवेदनात दुकानात फक्त २ मिनिटं थांबा असं आहे म्हणे. हे आम्ही ऐकलच नव्हतं. आता देखाव्यांचं वर्णन सुरू असताना मधेच दुकानात किती वेळ थांबायचं हे सांगण्याची आयडियाही भारीच. शिवाय त्या दुकानाच्या आधी एक मुलगी एका प्रकारच्या दिव्यात तेल कसं घालायचं आणि मग तो सुलट केला तरी तेल कसं पडत नाही याचं प्रात्यक्षिक करून दाखवते. ते बघत असताना 'दुकानात केवळ दोन मिनिटं' ही सुचना कशी कानी पडणार? पण आम्हीही खट असल्याने पुढचा गृप येईपर्यंत तिथेच थांबलो आणि उरलेलं वर्णन पुन्हा ऐकलं. त्या गाईड मुली वैतागलेल्या वाटल्या. माझ्यामते ही प्रवाशांची फसवणुकच आहे.

मी हैदराबाद्ला फिरायला गेलो होतो. जाताना एका हॉटेलच बुकींग अ‍ॅडव्हान्स पाठवुन केल होत. हॉटेलमधे दुपारी १:३० वाजता मधे पोचल्यावर रिसेप्शन मॅनेजरने मला जवळच्या रेस्टॉरंट मधे जेऊन यायला सांगितल. दुपारचे चार वाजले तरी रुम मिळेना. गोडित विचारल तर रिसेप्शन वाला मॅनेजरने फिरुन या, तुमच सामान क्लॉक रुम मधे ठेवा अस सांगितल. मग मात्र मी त्याला धुतला.

शेवटी मीच अस म्हणालो की ए.सी. रुम नसेल तर साधी द्या पण रुम पाहिजेच. यावर तो म्हणाला हे आधी सांगितल असत तर दिली असती की. मी म्हणालो पण ए.सी. रुम बुक करुनही का नाही मिळाली ? यावर तो म्हणाला की आज जे पॅसेंजर जाणार होते त्यांनी मुक्काम वाढवला. त्यांना हाकलुन कस देणार ?

हे खर की सिझनला माझ्यापेक्षा जास्त रेट देणार दुसरा कस्टमर मिळाला हे परमेश्वर जाणे. शेवटी साध्या रुम मधे तीन दिवस राहिलो.

दुसरा एक प्रसंग. यात आम्ही अक्षरशः पोळून निघालो आणि तरीही खुप हसलो देखिल. रागही येत होता आणि भारी विनोदी प्रसंगही घडला. त्याची कहाणी.

आम्ही काही नेहमी शिर्डीला जाणारे नाही. अनेकानेक वर्षांपूर्वी शाळेतून ट्रिपला गेले होते त्यानंतर गेल्या वर्षी गेलो. आमची कार जरा कमी गर्दीचा भाग पाहून थांबली. उतरतोय नाही तर एक माणूस धावत आला आणि 'चला चला, ४ नंबरच्या गेटवरून थेट दर्शन होतय' असं सांगत आम्हाला विचार करायची संधीही न देता घेऊन गेला. त्याच्यामागोमाग आम्ही पटापट गेलो. तो आधी त्याच्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. चपला काढायला सांगितल्या आणि देवाकरता ताटं आमच्या हातात कोंबली. त्यात काहीबाही नेहमीच्या वस्तु होत्या. शाल पण घालून ताटाचं वजन आणि पैसे वाढवण्याचा त्याचा मनसुबा आम्ही तेवढ्यात हाणून पाडला. आणि मग आम्हाला दर्शनाकरता त्या सुप्रसिध्द ४ नंबरच्या गेटकडे सन्मानपूर्वक घेऊन जाण्याऐवजी केवळ हाताने दिशा दाखवण्यात आली.

आम्ही अनवाणी निघालो. मनात विचार करत होते की काय ही साईबाबांची कृपा. ज्या गेटमधनं दर्शन सुरू आहे त्याच गेटसमोर आपली कार थांबली. Happy तर ते ४ नंबरचं गेट खरंच लागलंही. पण त्यातून आत गेल्यावर जो भुलभुलैय्या सुरू झाला. भर दुपारची वेळ, अंगण तापलेलं आम्ही चटाचट पाय उचलत धावतोय - रिकाम्या रांगांमधून. बिचारी माझी लेकही हायहुय करत धावत होती. दीर्-जाऊ, त्यांचा मुलगा सगळी मंडळी आपली धावतायत. नवरा शहाणा. तो देवळात वगैरे येण्याच्या भानगडीत पडत नाही म्हणून बाजारातच फिरत होता. आम्ही असे धावत असताना एक भलंमोठं गेट लागलं आणि आम्ही पुन्हा मेन रस्त्यावर! आणि तिथून मग साग्रसंगित पुन्हा मेन रांगेत उभे. म्हणजे असं गेटवरून दर्शन वगैरे काही नव्हतच. प्रवेश केवळ मेन गेटवरूनच होता. कदाचित उत्सवाच्या प्रसंगी किंवा गर्दिच्या दिवशी ही इतर गेट्स उपयोगी असतील पण एखाद्या सामान्य दिवशी अशा मार्केटिंग गिमिक्सना प्लीजच फसू नका.

नितीनचंद्र सगळ्यांच्या मते तुमचाही अनुभव इथे योग्य आहे फक्त हॉटेलचे नाव द्यावेत म्हणजे बाकीच्यांना काळजी घेता येईल. गैरसमज नसावा.

गोव्याचेच अनुभव,
गोव्यात बीचवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची फसवणुक होऊ शकते.
लहान वयातली मुलं जी ग्रुप करुन गोव्यात येतात त्यांना फॉरेनर सोबत फोटो वगैरे काढून देतो असे सांगुन, पैसे उकळणे वा कॅमेरा पळवने असे उद्योग सर्रास चालतात.

काही गुंड लोक हातचलाखी चा खेळ दाखवतात, ज्यात दर्शकाला तीन पैकी कोणत्या वाटी खाली लाल गोटी आहे हे ओळखायचे व बरोब्बर आल्यास तो जी किंमत लावेल त्याच्या दुप्पट पैसे मिळतात. या दर्शकांमधे त्याचे काही साथीदार असतात. ते बरोब्बर वाटीवर पैसे लावतात आणि हजारो रुपये जिंकल्याचे दाखवतात. मग ते पाहुन सामान्य लोक त्यास हमखास बळी पडतात. आणि जर एखादा खरच जिंकला तर त्यास हारे पर्यंत खेळण्यास भाग पाडतात अथवा पैसे हिसकावून घेतात.

सिंगापूर प्रवासात घेण्याची एक खबरदारी. तिथे एकदाच ठराविक दिवसांकरता MRT चा पास काढून बस किंवा ट्रेनमधून कितीही वेळा फिरता येतं. आम्ही ३ दिवसांचा पास काढला प्रत्येकी २०+आणखी काही सिंगापुरी डॉलर्सचा. त्यातले प्रत्येकी २० डॉलर्स हे डिपॉझिट म्हणून घेतलेले त्यामुळे परत मिळणार होते. त्यात जास्तीत जास्त कसं फिरता येईल वगैरे ठरवलं ('पैसा वसुल' भारतीय मनोवृत्ती, दुसरं काय!) त्याप्रमाणे फिरलोही. शिवाय लेकीला डबलडेकर खुप आवडली म्हणून मिळेल त्या डबलडेकरात वरती आणि सगळ्यात पुढे बसून शहरात फिरलो वगैरे वगैरे. पण पास घेताना एका महत्त्वाच्या गोष्टिकडे दुर्लक्ष झालं होतं. पासाची मुदत संपल्यावर तो काही ठराविक तिकिट काउंटर्सवर जमा करून आपलं डिपॉझिट परत मिळवायचं असतं. पास घेताना त्यांनी सांगितलं की ५ दिवसांच्या आत डिपॉझिट घ्यायला हवं. आम्ही गेले डुलत डुलत पाचव्या दिवशी तर आमचं डिपॉझिट काही मिळालच नाही. कारण ५ वा दिवस हा तो पास इश्श्यु केल्या दिवसापासूनचा मोजतात, संपल्यानंतरचा नाही. म्हणजे मुदत संपल्यावर पुढच्या दोन दिवसांत आम्ही डिपॉझिट क्लेम करायला हवं होतं. पण पहिल्यांदा गेलेल्या प्रवाशांना हे कसं कळणार?

असो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

सिमल्याला काही दुकानात डेबीट / क्रेडीट कार्ड दिले तर ते आत घेऊन जातात. थोड्या वेळाने पावतीवर सही घेतली जाते. पण इकडे परत आल्यावर बॅलन्स चेक केला तर ते दोन काय चार पाच वेळा स्वाईप केल्याचं आढळत. आधीच्या ट्रॅन्झॅक्शनमधल्या रकमेची पावती दाखवतच नाहीत. फोन केला तर तक्रार करा म्हणतात. बँकेकडे फोन केला तर बघू, करू अशी उत्तरं मिळतात..

उत्तरांचल मधे गढवाल भागात कस्तुरीमृगाच्या पोटातील कस्तुरी विकतात. त्याला कस्तुरीचा घमघमाट असतो. लोक हे महागडे कस्तुरी विकत घेतात. दहा एक दिवसात त्यातून वास यायचा बंद होतो. खरतर हरणाचे केस लावलेली ती एक गोल वस्तू असते आणि तिच्यावर सेंट मारलेला असतो.. सावधान !

मामी, पहिला प्रसंग यात अजिबातच बसत नाही असे वाटते. तुम्हांला त्यांनी तेथे थांबून दिले यातच सगळं आलं.

शिर्डी चा प्रसंग बाफ च्या विषयाला धरून आहे.

सिंगापोर चा प्रसंग ही फसवणूक नाही, small print चा भाग आहे. तुम्ही नीट विचारले असते तर तुम्हांला त्यांनी खरे आधीच सांगितले असते. फारतर, 'नुकसान होऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी' या विषयाखाली ते चालेल.

नितिनचंद्र यांनी जर हैद्राबाद च्या त्या हॉटेल चे नाव जाहीर केले तर त्यांचा अनुभव पूर्णपणे संबंधित आहे.

मिलिंदा,

हा केवळ फसवणुकीच्या प्रसंगाचा धागा नाहीये. जर धाग्याच्या इंट्रोडक्शनमधले वर्णन वाचलंत तर लक्षात येईल की, काही खास टिप्स - ज्यामुळे पर्यटकांची सोय होईल किंवा निदान गैरसोय होणार नाही - इथे दिल्यात तर इतरांना उपयोगी होईल.

हॉटेलचा हा प्रसंग खरंतर कोणत्याही हॉटेलात घडू शकतो. म्हणून मी तसं म्हटल. असो.

'बिगफूट' मध्ये तुम्ही दिवसभर राहिलात तरी त्यांच काही म्हणणं नाही. तिथे त्यांच्याकडून वेळेवर बंधन नाहीये पण एक टूरिस्ट म्हणून तुम्हालाच वेळेच बंधन असत ना. एकाच ठिकाणी पुढचा गृप कधी येईल याची वाट बघत कशाला बसायचं?

पण , मग तो ट्रॅप पण नाहीये.
आणि सोय / गैरसोय बद्दल बोलायचं तर धाग्याचं शीर्षक सर्व समावेशक नाही असं वाटतं... किमान ते शीर्षक चुकीचा समज करुन देतं असं म्हणू शकतो.

मिलिंदा , किती किस पाडायचा. ? Uhoh
ट्रॅप आहे शिर्षकात , याचा अर्थ चुकुन बारीक प्रिंट वाचायची राहुन जावु शकते आणि काय प्रसंग उदभवू शकतो ते लिहिल(किंवा अशा टाइपचे प्रसंग) म्हणुन बिघडल काहीच नाही.
निदान लोकांना उपयोगी पडनार्‍या धाग्यावर तरी इतकं ,हे शिर्षकात बसत आणि बसत नाही वगैरे काटेकोरपणाचे प्रतिसाद येवू नये अस वाटत. धाग्याचा मेन उद्देश्य तर बाजुलाच रहातो पण नविन प्रतिसाद देणारे लोक पण थांबु शकतात. नुकसान सगळ्यांचच.

लहान वयातली मुलं जी ग्रुप करुन गोव्यात येतात त्यांना फॉरेनर सोबत फोटो वगैरे काढून देतो असे सांगुन, पैसे उकळणे वा कॅमेरा पळवने असे उद्योग सर्रास चालतात.

<<<< Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

सीमा, I beg to differ.

वरती ट्रॅप म्हटलं आहे, तेव्हा मी सांगितलं की एकतर शीर्षक गंडलं आहे किंवा किस्से गंडले आहेत. कोणत्या धाग्याच्या अंतर्गत काय लिहायचं हे कळलं आणि ते त्याप्रमाणे लिहीले गेले तर ते शोधताना पण उपयोगी पडतं असा माझा अनुभव आहे.

पहिल्या किश्श्यात काय ट्रॅप आहे हे मला न कळल्यामुळे मा बु दो स. Happy

अर्थात, माझं मत दुर्लक्षित करायचा पर्याय पण आहेच की Happy

हे विषयाला धरून नाही .. तेव्हा मिलींदा, मामी, सीमा यक डाव माफी ..

पण वर टिल्लूच्या पोस्टमधील दुसरा पॅरॅग्राफ म्हणजे कुठेही रस्त्यावर चालत असलेला सट्टा सदृशच आहे ना .. (किती तरी हिंदी चित्रपटांची सुरूवात अशा प्रसंगानेच झालेली दाखवली आहे .. मग लहान अनाथ मुलं कशी ह्यातून जुगारी होतात, वाईट मार्गाला लागतात, स्ट्रीट स्मार्ट होतात काही प्राण, अमिताभ बच्चन ह्यांच्या काही चित्रपटांत असलेल्या कॅरॅक्टर्स सारखे वगैरे सारखे निपजतात ) .. ह्यात पर्यटकांचा संबंध कळला नाही) ..

मिलींदा यांच्याशी सहमत...पहिल्या प्रसंगात जर त्यांनी कॅसेटमध्ये स्पष्ट सांगितले असेल तर तो ट्रॅप कसा काय..तुम्ही ती सूचना नीट ऐकली नाही ही तुमची चूक झाली ना..त्यांनी तशी काही सूचना दिलीच नसती तर तुमचे म्हणणे रास्त होते...
तोच प्रकार सिंगापूरबाबत - थोडी चौकशी केली असतीत तर हा मनस्ताप टळला असता. यात त्यांनी ट्रॅप करून जास्त पैसे काढले असे वाटत नाही.
शिर्डीचा मात्र अगदी चपखल...सर्वांनीच लक्षात ठेवावा असा...सुदैवाने मी तुमच्या नवर्‍याच्याच जातीचा आहे..मी देखील सगळे तासन तास रांगेत उभे असतात तेव्हा छानपैकी गाडीत झोप काढतो. खरे आत्मिक समाधान..:)

सशल >> तसं पाहीलं तर मग कोणताही प्रसंग कुठेही होऊ शकतो,
क्रेडिट कार्डचा प्रसंग इतरत्र होऊ शकतो, हॉटेलचा प्रसंग, मंदिरातील फसवणुक ई. त्यामूळे जर तुम्ही अनुभवला/पाहीला असेल तर लिहावयास काय हरकत.
जर तोच प्रसंग लास वेगास मधे कसिनो मधे घडला असे लिहिले असते तर तेंव्हा "पर्यटकांचा काय संबंध" असे वाटले असते का?

सांजसंध्या, तुमच्या क्रेडिट कार्ड बरोबर काही नोटिसेस आल्या असतील त्यात "Dispute" बद्द्ल काहीतरी फाईन प्रिन्ट असेल ती पाहा. त्यात सहसा एक नंबर दिलेला असतो, किंवा पत्ता. त्याच नं वर फोन केल्यावर अशी उत्तरे मिळत असतील तर त्या पत्त्यावर लेखी डीटेल पत्र लिहा आणि कुरियर किंवा पोस्टाची रिसीट मिळेल अशा पद्धतीने पाठवा. क्रेडिट कार्ड कंपन्या बांधील असतात त्यावर अ‍ॅक्शन घ्यायला. फोन चे रेकॉर्ड आपल्याकडे प्रूफ म्हणून असेलच असे नाही, पण पत्राची रिसीट त्याकरता वापरता येइल.

हे सगळे करायला ३० का ९० दिवसाची मुदत असते. ती ही त्या फाईन प्रिन्ट मधे असेल.

मिलींदा यांच्याशी सहमत...पहिल्या प्रसंगात जर त्यांनी कॅसेटमध्ये स्पष्ट सांगितले असेल तर तो ट्रॅप कसा काय..तुम्ही ती सूचना नीट ऐकली नाही ही तुमची चूक झाली ना..त्यांनी तशी काही सूचना दिलीच नसती तर तुमचे म्हणणे रास्त होते...
>>> नाही आशु. 'ती' सुचना येण्याच्या आधी आपण एका स्टॉलवर जातो. तिथे एक मुलगी आपल्याला मॅजिक लँपचं प्रात्यक्षिक करून दाखवते आणि ती बोलत असते त्याचवेळी मागे ती रेकॉर्ड चालत असते. जवळ जवळ सगळे पर्यटक ती सुचना ऐकत नसणार. आणि हे तिथल्या लोकांना माहितही असणार. पण ती गाईड मुलगी काही तोंडाने सांगत नाही की दुकानातून दोन मिनिटात बाहेर या म्हणून.

आम्ही तिथे असताना नेमके श्री महेंद्र (ज्यांनी बिगफुट आणि आतलं दगडी मीराबाईचं चित्र बनवलं आहे) ते होते. मला जाणवलेली तृटी मी त्यांच्या कानावर घातली. पण त्यांनीही 'कॅसेटमध्ये आहे तशी सुचना' असंच उत्तर दिलं. पण यात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आहे की मध्येच ते मॅजिक लँप, सुवेनिर शॉप आल्यामुळे टुरीस्ट आणि कॅसेट यांच्यातली लिंक जाते. आमच्या नंतर जे टुरीस्ट आले ते ही पुन्हा कॅसेट सुरू झाली तरीही सुवेनिर शॉपमध्येच होते. इतर कोणाचा बिगफुटचा अनुभव असेल तर ऐकायला आवडेल.

शिर्डीच काय कुठल्याही तीर्थस्थळी असा प्रकार आहे.....शिर्डी आणि शनिशिंगनापुर ला जरा जास्तच आहे.....अस कोणी जरी गाडीजवळ येउन त्रास देउ लागला तर आम्ही local आहोत रे बाबा दुसरे लोक शोध अस सांगायच्.....बस मधुन उतरताना हे एजंट लोक जे कार्ड देतात ते घ्यायच नाही.....त्याना आपल्या मागे आले तरी काहीच उत्तर द्यायच नाही की विचारायच नाही.....तुम्ही काही विचारल तर तो तुम्हाला लवकर सोडत नाही.....
शनिशिंगनापुरला तर हे एजंट लोक गाड्यावरुन पाठिमागे लागतात.....त्यासाठी काही टीप्स
१. शिर्डी वरुन शनिशिंगनापुरला जाताना गाड्यावरच्या एजंट लोकांचा खुप त्रास होतो ..... त्यामानाने घोडेगाव वरुन शनिशिंगनापुरला जाताना कमी त्रास होतो....
२. गाड्यावरती काही एजंट मागे लागले तर सरळ गाडी बाजुला घेउन ५-१० मि थांबणे.....दुसरा काहीच उपाय नाही....(माझे गाव शनिशिंगनापुरपासुन २०किमी आहे .....)
३. कुठल्याही दुकानातुन फक्त पुजेचे सामन घ्यावे श्रद्धा असेल तरच नाहीतर बाकी इतर पुजा .... यंत्र याच्या फंदात पडु नये......

कधी कधी काही गोष्टी लिगल मध्ये अशा बसवलेल्या असतात की आपल्याला फसवणूक वाटते..पण त्या सिध्द करु शकत नाही.. त्यात नरो वा कुंजरो वा असे सांगणारेही येतात्...त्यात फसवलेले नसते..पण शेवटी आपल्या मनाचे समाधान होत नाही..
आता सिंगापूर मधले उदाहरण.. त्यात जर गाईड ने २ मि. ची लिमीट सांगीतली असती तरी चालले असते..पण जर दुकानदारा कडून त्याला कमिशन मिळणार असेल तर तो/ती सांगणार नाही..काहीजणांनी तिथेच खरेदी केली तर गाईडला फायदाच..
मध्ये काश्मीर ला गेलो होतो...तिथे गाईड एका च शालीच्या कारखान्यात घेऊन जायला उत्सूक होता.. बाकीची वेळ पाळली गेली नाही तरी चालेल्..पण ही वेळ पाळायला तो धावत होता. ह्यात फसवणूक काहीच नाही...पण शेवटी स्वस्त मिळाली नाही वस्तु म्हणुन आपण खट्टू..

मिलींदा जी शोधायची अडचण सांगतो तीही खरी आहे...आताशी शोधणे (google search) ही कला झाली आहे...काही दिवसांनी मी माझ्या resume मध्ये लिहीणार आहे की "able to search fast in google" Happy
तुम्हाला नक्की काय पाहिजे आणी शोधताना ते कसे लवकर मिळेल ह्यावर बराच research चालू आहे... online ad industry नी त्याला खूप नीट वापरते.. तुम्ही काय शोधले आहे...कधी, कोणत्या वेळेला..तुमचे status (FB, social etc..) काय आहे त्यावर ads target होतात..
असो..

मथुरेला गेले असतील ना बरेच जण ?

कृष्णजन्मभूमी म्हणून प्रत्येक पंड्या वेगळ्याच मंदिरात घेऊन जातो आणि हीच अस्सल जागा आहे हे ठणकावून सांगतो. एका ठिकाणी तर कृष्णाचा जन्म कुठे झाला नेमकी ती जागा दाखवायला तयार होते. योग्य ती देणगी द्यावी लागत होती फक्त. विशेष म्हणजे इथं फसवणुकीपासून सावध रहा असा नम्र इशाराही देण्यात आला.

आणि वादग्रस्त म्हणून बंदोबस्तात असलेलं ठिकाण वेगळंच होतं. आता यातला एकाचाच दावा खरा असेल ना ?

काही कॉमन ट्रॅप्स-
१.VAT refunds. |प्रत्येक देशात याचे वेग वेगळे नियम असतात आणि सगळेच दुकानदार ते तुम्हाला सांगतिलच असे नाही. उदा. सिंगापुरात बिला बरोबर दुकानातुन एन्डोर्स केलेला येक फॉर्म लागतो , तो नसला तर रिफन्ड मिळणार नाही. या नियमांची आधिच माहिती करुन घेणे श्रेयस्कर.

२. खुप जास्त किमतीला वस्तु गळ्यात मारणे- उदा. थायलंड मधिल जेम फॅक्टरी. फॅक्टरी दाखवणारी व्यक्ती ते जेम तीथे किती स्वस्त मिळतात आणि तुम्हाला हे बाहेर विकुन कितीतरी फायदा होइल ई. सांगुन स्वस्त खडे महागात विकतात.

३. डुप्लिकेट वस्तु/पदार्थ - उदा. श्रीनगर ला दाल लेक मधे केशर / शिलाजीत विकणारे शिकारा घेउन फिरतात. थोडेसे केशर वाटित पाण्यात टाकुन रंग ही दाखवतात आणि प्रत्यक्षात रंगवलेले गवत विकतात.

४. गल्ली बोळात नेउन लुबाडणे- स्वस्त किंवा काही खास वस्तु विकायच्या बहाण्यानी मुख्य रस्त्या पासुन आत नेउन लुबाडळे जाते. उदा. शांघाय नान्जिन स्ट्रीट, भाषेची अडचण असल्याने प्रावासी ईथे काही फार करु शकत नाहीत.

होय, सचिन ट्रॅव्हलचा असा अनुभव आहे.

सिमला, कुलू मनालीची टूर होती. त्यांनी जिथे जिथे चहा, पाण्यासाठी थांबवले ती सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती. पण ह्याबाबतीत केसरी वाले पण तिथेच गाड्या थांबवत असल्याने नक्की ट्रॅव्हल कंपनीचा दोष की तिथे सगळीकडेच असे असते की हे विशिष्ठ धाबेवाले टूर मॅनेजर्सना जास्त कट देतात आणि बाकी मनमानी करतात हे मला माहीत नाही.

तिथे कुलूला ज्या दुकानात ऑथेंटिक म्हणून नेले तेथे कपडे बरेच महाग पडले.. आणि ८०० रु चे ड्रेस मटेरील देखिल १५० रु च्या इतर दुकानातील मटेरीअल सारखेच फुले पडून खराब झाले.

फुलकारीचे कपडे सिमल्यानंतर कुठे दिसले नाहीत. पण टूर मॅनेजरने खूप मिळतील पुढे पुढे असे सांगीतले.

आता तुम्ही ठरवा सापळा, सुचना की काय ते.

चोराची आळंदी चा अत्यंत वाईट अनुभव..
तिकडे ज्ञानेश्वर माऊली साठी नारळ आणी फुलांचे ताट घेतले.. त्याला विचारायचे विसरलो किती रु. झाले..
आम्हाला वाटले असती १०-२० रुपये किंवा ५० रु. खुप झाले तर. आम्ही परत आलो दर्शन करुन तर त्या महाभागाने रु.३०० मागितले मी अवाक झालो आणी सोबतचे मित्र सुध्दा खुप वेळ वाद घातला पण त्या ***(&*(&^*(&*(&*(&*(& दुकानदाराला लोकल दुकानदारानी सपोर्ट केला.. आम्ही पण बाराचे होतोच सगळ्या ठीकाणी बोंब मारुन आलो की हे प्रसादाचे ताट ३००रु. ला देतात कोणी घेऊ नका ... अतिशय विक्षीप्त अशी लोक आहेत तिथली ... देवाच्या नावाने चोर धंदे कशाला करतात देवच जाने Uhoh
जेंव्हा आम्ही पैसे देतच नाही म्हणालो तर त्या माकडानी आमचे चप्प्ल बुट लपवले घरात जाऊन .. आता आजुन राडा नको म्हणुन गुपचुप पैसे देऊन निघावे लागले.. आणि वाईट वाटणारी एकच गोष्ट म्हणजे तिथल्या तमाम जनते पैकी एकही जण ह्या &*&*(&(*& च्या विरुध्द बोलला नाही ..
माऊलींची ईछा म्हणून तो विषय तेंव्हाच डोक्यातुन काढुन टाकला पण आळंदी च्या लोकां विषयी आता फार काही चांगले वाटत नाही..

मुन्नार आणि उटी या दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे:

टी इस्टेट मध्ये फिरायला गेले असताना जागोजागी चहा (पत्ती, पावडर, फ्लेवर्ड चहा) मिळणारी दुकानं आहेत. ते सँपल म्हणुन चवीला जो थोडा चहा देतात तो चांगला असतो. पण (सो कॉल्ड) तोच विकत घेऊन घरी येऊन केला की अतिशय बेक्कार चहा होतो.
आश्चर्य म्हणजे टाटा टी इस्टेटमधला चहाही तसाच बेक्कार निघाला. ( भरपुर किंमत होती, ४००-५०० रु. किलो).

जाईजुई ला अनुमोदन. माझाही सचिन ट्रॅव्हल्सचा असाच अनुभव आहे सिमला-कुलू-मनालीचा. इथे मुद्दामहून त्यांची कोणाशी तुलना करण्याचा हेतु नाहि, पण जे अनुभवले आहे / बघितले आहे ते मांडतो आहे.

वाटेत जेवण्यासाठी आणि चहासाठी बस थांबवलेली सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती [एकच अपवाद - चंदीगढ-दिल्ली बॉर्डर जवळचे हॉटेल]. जेवण्यासाठीचे हॉलही सुमार होते आणि केसरीवालेही त्याच हॉटेलमध्ये असले तरी त्यांना दिलेले हॉल आणि पदार्थ नक्कीच उजवे दिसत होते. [मी चुकून(!) एकदा केसरीच्या हॉलमध्ये शिरलो होतो.]

मनालीमध्ये सकाळी सुरेख सूर्यप्रकाश होता आणि संध्याकाळी पावसाचे भाकीत होते [जे नंतर खरे ठरले]. टूरलीडरला हे सांगूनही सकाळी नाश्त्याच्या वेळेला एका मराठी माणसाची 'ओळख' करून देण्यात आली. त्याचे मनाली मध्ये दुकान आहे आणि मराठी माणसानेच मराठी माणसाला मदत केली पाहिजे अशा अर्थाचे भाषण करून झाले. मग त्याच्या दुकानाची पत्रकेही स्वत: टूरलीडर्सनी उत्साहाने वाटली. मग गाड्या ह्या मराठी माणसाच्या 'अगरवाल' नावाच्या दुकानाकडे नेण्यात आल्या. [तिथे घेतलेले सगळे केशर घरी आल्यानंतर फेकून द्यावे लागले, हे सांगायला नकोच.] सगळी सकाळ अशी बाजारहाट करण्यात घालवल्यानंतर संध्याकाळी पावसात आम्ही site-seeing केलं. पुढे एका sports-club मध्ये खेळ खेळून निघताना एका टूरलीडरला तिथल्या game arranger बरोबर commission साठी घासाघिस करतानाही बघितलं.

ह्याच टूरमध्ये 'कुफ्री'ला २५० रुपये देऊन घोडेस्वारी केली. घोडेवाल्याने १ तासात ५ पॉईंट दाखवणार सांगितले आणि १५ मिनिटात एका ठिकाणी घेऊन गेले. उतरा आणि फिरा इथे पाऊण तास. तिथे एकाच जागी ५ दुर्बिणी लावल्या होत्या ५ दिशांना तोंड करून आणि त्यातून बघण्यासाठी ५० रुपये वेगळे. आमच्या ग्रूपमध्ये एकाकडे मस्त SLR camera with Telescopic Lens होता, तर त्यालाही फोटो काढू दिले नाहित ५० रुपये दिल्याशिवाय. हि जबरदस्ती तिथल्या स्थानीक लोकांची होती, पण ट्रॅव्हलवाल्यांनी ह्याबद्दल एका शब्दानेही कल्पना दिली नव्हती. खरंतर, ते आम्हाला जेव्हा कुफ्रीला घेऊन गेले तेव्हा ह्या घोडेवाल्यांच्या ग्रूपशिवाय दूसरा कोणताही ग्रूप तिथे ऊपलब्ध नव्हता. पण टूरलीडरकडे तक्रार केल्यावर उत्तर मिळाले की, ही additional activity आहे आणि ती करायची की नाही ह्याचा निर्णय तुमचा असेल असे आधीच सांगितले होते.

आणि शेवटचा अनुभव ह्याच टूरमधला - रोहतांग पास ला जाताना वाहतूक-मुरंबा टाळण्यासाठी पहाटे ३ वाजता उठवून नेण्यात आले. वाटेत ३:३० ला एका छोट्या दुकानासमोर गाडी थांबवून snow-suits भाड्याने घेण्याचा सल्ला देण्यात आला. [परत इथेही आग्रह नाही - निर्णय तुमचा]. आता ३ वाजता उठून निघाल्यावर परत गाडीत डुलकी लागली होती, त्यामुळे मेंदू विचार करण्याच्या स्थितीत नव्हता. गुमान २५० रुपये देऊन कपडे भाड्याने घेतले आणि मोज्यांसाठी ५० रुपये. निघालो. वाटेत अर्ध्या-पाऊण तासाने मध्येच [दुर्दॅवाने] जाग आली आणि तशीच दुकाने रांगेने उभी दिसली. प्रत्येकापुढे फलक होता - Rent-out Snow suits for entire day. Rs. 50 only. झोप जी काही उडाली ती पुन्हा लागली नाही. Lol

Pages