PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम !

Submitted by रुणुझुणू on 9 May, 2011 - 08:25

" किती जोरात बोलतोस ? जरा हळू बोल."
......"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय."

" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत ?"
......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. "आई असं का करतेय ?"

" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही."
....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.
हे सगळं ती बोलत होती, ह्यावर पाळी येऊन गेल्यावर तिचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही.

हा लेख वाचत असणार्‍यांपैकी कित्येक जणींनी ही परिस्थिती स्वतः अनुभवली असेल.
मासिक पाळीच्या आधी होणार्‍या ह्या त्रासाची PMS ह्या नावाने बर्‍याच जणींना ओळखही असेल.

पण हे प्रकरण नेमकं आहे काय ? का होतो हा त्रास ? सगळ्याच स्त्रियांना होत असेल कि काहीजणींनाच ? ह्यातून काही गंभीर तर नाही ना उद्भवणार ? सगळ्यांत महत्वाचं म्हणजे....ह्यावर काही उपाय ?

PMS....अर्थात प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ह्याची सोप्या भाषेतील व्याख्या अशी करता येईल.

" मासिक पाळीच्या साधारणपणे दोन आठवडे आधीपासून होणारे त्रासदायक शारीरिक आणि मानसिक बदल."

वैद्यकीय भाषेत सांगायचं तर...

" PMS is a condition which manifests with distressing physical, behavioural & psychological symptoms, in the absence of organic or underlying psychiatric disease, which regularly recurs during the luteal phase of each menstrual cycle & which disappears or significantly regresses by the end of menstruation."

ह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे.
थोडेफार शारीरिक बदल जवळजवळ ८०-९० % स्त्रियांमध्ये होतात. पण त्यांच्या दैंनदिन आयुष्यात त्यामुळे फारसा अडथळा येत नाही.

साधारणपणे २०-३०% स्त्रियांना हा त्रास जास्त होतो....म्हणजेच त्यांच्या ' क्वालिटी ऑफ लाईफ ' वर विपरीत परिणाम होण्याइतका !

PMS चे प्रकार ----

१. सौम्य (Mild) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात कसलाही व्यत्यय येत नाही.

२. साधारण (Moderate) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात व्यत्यय येतात. पण तरीही ती स्त्री आपली कामं उरकू शकते, लोकांमध्ये मिसळू शकते.(Suboptimal functioning)

३.तीव्र (Severe) - ह्या स्त्रिया ह्या दिवसांमध्ये वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्य हाताळू शकत नाहीत. ह्या सगळ्यातून अंग काढून घेतात. (withdrawl)

४. प्रिमेन्स्ट्रुअल एक्झॅजरेशन / मेन्स्ट्रुअल मॅग्निफिकेशन - ह्यामध्ये मुळातच काहीतरी मानसिक आजार असू शकतो, ज्याची लक्षणं ल्युटिअल फेजमध्ये वाढतात, आणि ही लक्षणे पाळी संपल्यानंतरही पूर्णपणे नाहीशी होत नाहीत.

५. PMDD (Premenstrual dysphoric diosrder) - हे PMS चे आणखी तीव्र स्वरूप. ह्याचा संबंध गुणसूत्रांशी आढ्ळून आला आहे. साधारण ५-६ % स्त्रियांमध्ये हे तीव्र स्वरुप दिसून येतं.

नेमकं घडतं काय ?
वर एवढ्या ठिकाणी 'शारीरिक आणि मानसिक लक्षणे' हा शब्द आला आहे.
काय असतात PMS ची लक्षणे ?

अ. शारीरिक बदल-

१. ओटीपोट गच्च झाल्यासारखं वाटणे (ब्लोटिंग)
२. स्तनांमध्ये जडपणा वाटणे, दुखणे
३. चेहर्‍यावर पिम्पल्स येणे
४. घट्ट शौच
५. वजनात वाढ
६. शरीरावर सूज येणे
७. अतिभूक लागणे किंवा भूक न लागणे
८. थकवा येणे
९. झोप न लागणे किंवा सारखं झोपावंसं वाटणे
१०. डोकेदुखी

ब. मानसिक बदल-

१. उगीचच रडू येणे
२. अस्वस्थ, निराश, हताश वाटणे
३. चिडचिड होणे
४. अति हळवं होणे
५. मनस्थितीत टोकाचे बदल होणे
६. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता न येणे
६. आत्महत्येचे विचार मनात येणे

एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्त्रियांमधील अपघातांचं, आत्महत्येचं, किंवा गुन्ह्यांचं प्रमाण ल्युटिअल फेजमध्ये जास्त असतं.

हा घडतं हे सगळं ?

१९३१ मध्ये अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ञ- डॉ..फ्रँक आणि डॉ. हॉर्नी ह्यांनी पहिल्यांदा ह्या आजाराचा एक खराखुरा आजार असा उल्लेख केला. ( त्यांना मनापासून धन्यवाद ! )
त्याआधी ह्या लक्षणांकडे कोणीच गंभीरपणे पहात नव्हतं.

(अर्थात अजूनही कित्येक लोक ह्या आजाराकडे 'बायकांच्या विनाकारण आणि नेहमीच्या तक्रारी' अशाच नजरेने बघतात!)

ह्या सगळ्या बदलांचा ट्रिगर म्हणजे ओव्ह्युलेशन !
( ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांडातून बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, ही साधारणपणे पाळी यायच्या १४ दिवस अगोदर घडते.
पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ओव्ह्युलेशनपर्यंतच्या काळाला फॉलिक्युलर फेज म्हणतात आणि ओव्युलेशन ते पुन्हा पाळी चालू होण्याच्या काळाला ल्युटीअल फेज म्हणतात.)
ओव्ह्युलेशननंतर शरिरात होणार्‍या हॉर्मोनल बदलांमुळे ( आणि त्यासोबतच होणार्‍या मेंदूतील सिरोटोनिन नावाच्या न्युरोट्रान्समिटरच्या पातळीतील बदलामुळे ) PMS ची लक्षणे चालू होतात.

तसेच PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते, असं एका संशोधनात आढळून आले आहे.

बाकी काही थेअरींवर अजून संशोधन चालू आहे.
उदा.- १. जीवनसत्वांची कमतरता
२. थायरॉईडचे आजार
३. पर्सनॅलिटी फॅक्टर्स

PMS चे निदान --

रक्तातील साखरेची पातळी मोजली की मधुमेहाचं निदान करता येतं तसं PMS चं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत करता येणारी कुठलीही ठोस चाचणी नाही !

ह्या आजाराचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे लक्षणांची नोंद. ( Symptom Diary )
तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक जे काही बदल जाणवतील त्याची रोजच्या रोज नोंद करून ठेवायची. साधारणपणे २-३ महिने अशी नोंद केल्यावर ह्या लक्षणांचा ठराविक पॅटर्न,तसेच ह्यातील ठळक लक्षण समजून येते. त्यावरून हा आजार नक्की PMS च आहे का, आणि असेल तर किती तीव्र स्वरुपाचा आहे, हे ठरवता येतं.

PMS सारखीच लक्षणे असलेले काही आजार-
१. नैराश्य
२. हायपोथायरॉईड
३. अ‍ॅनिमिया ( रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे )
४. मायग्रेन

मग ह्यापासून PMS वेगळा कसा ओळखणार ?

PMS चं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी लक्षणे पाळी चालू झाल्यावर नाहीशी होतात आणि पुढचे किमान दोन आठवडे लक्षणरहित जातात. असं होत नसेल तर हा वेगळा आजार असण्याची शक्यता जास्त !

अशावेळी लवकरात लवकर संबंधित तपासण्या करून घ्यायला हव्या.

PMS वर उपाय काय ?

PMS बरा करणारा किंवा त्याचं समूळ उच्चाटन वगैरे करणारा काहीच उपाय अजून सापडलेला नाही !
पण तो आटोक्यात रहावा किंवा त्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून उपाययोजना नक्कीच करता येते.

१. आहार-विहारातील बदल---

ज्या काळात ही लक्षणे जाणवतात, त्या काळात आहारातील काही बदलांमुळे बरीच मदत होते.
१. मीठाचे ( आणि खारवलेल्या पदार्थांचे ) प्रमाण कमी करा.
२. एकावेळी पोटास तड लागेल इतकं खाण्यापेक्षा थोडं थोडं विभागून खा.
३. जंक फूड टाळून फळं आणि भाज्यांचा जास्त वापर करा.
४. कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा वापर वाढवा किंवा/आणि कॅल्शिअमचे सप्लीमेंटस घ्या.
५. कॉफी आणि अल्कोहोल शक्यतो टाळा किंवा मर्यादित प्रमाणात घ्या.
६. तंतुयुक्त पदार्थांचा आहारात वापर वाढवा.
७.मल्टिविटामिन ( विशेषतः विटामिन- बी-6 ), मॅग्नेशिअम चे पूरक डोस घ्या.
८. ई-जीवनसत्वाचे पूरक डोस घ्या.

२. व्यायाम--

आहाराइतकाच महत्वाचा आहे व्यायाम.
( इथेही आलाच का व्यायाम ? " कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा ! Wink )

पोहणे, सायकल चालवणे, चालणे किंवा एरोबिक व्यायाम ह्या सगळ्याचा फायदा होतो.
नेमकं काय घडतं व्यायाम केल्याने ?

आधी उल्लेख केल्याप्रमाणे PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते.
व्यायाम केल्याने शरीरामध्ये पुरेसे बीटा-एण्डॉर्फिन्स तयार होतात. त्यामुळे मनस्थिती प्रसन्न रहाण्यास मदत होते.

३. ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम करा.

४.आवडीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. जबाबदारीची किंवा खूप कार्यक्षमता लागणारी कामे ( उदा.- ठरवून करण्याजोगा एखादा समारंभ, मिटींग ) शक्य असल्यास ल्युटिअल फेजच्या आधी ठेवा.

५.औषधोपचार--
ओव्ह्युलेशन हा जर ट्रिगर फॅक्टर म्हणून सर्वमान्य झाला आहे तर ओव्ह्युलेशन होऊ न देणे हा अर्थातच ह्या आजारावरचा लॉजिकल उपाय म्हणून वापरला जातो आणि त्याचा बर्‍याच स्त्रियांना उपयोग होतो.

गर्भनिरोधक गोळ्या वापरत असताना ओव्ह्युलेशन होत नाही. उदा.- ओवराल-जी, नोवेलॉन, फेमिलॉन.
ह्या प्रकारच्या गोळ्यांनी काही जणींना मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात.
नवीन ' यास्मिन ' नावाच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्यांच्यामुळे हे दुष्परिणाम होत नाहीत.
यास्मिनमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी बर्‍याच उलटसुलट चर्चा होतात. पण स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या जागतिक संस्था ह्या आजारासाठी यास्मिन रेकमेंड करतात.

-- इस्ट्रोजेन पॅचेस हासुद्धा PMS वरील एक उपाय म्हणून वापरला जातो.
( गर्भाशय काढलेलं नसेल तर नुसते इस्ट्रोजेन पॅचेस वापरल्यास गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे हे पॅचेस प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोनसोबतच आणि अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानेच वापरावेत.)

-- डॅनॅझॉल, सुप्रिफॅक्ट अशा नावाची काही औषधे ह्या आजारावर वापरली जातात. पण ह्यांचेही काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

-- स्तनांचे दुखणे, पोटात कळ येणे ह्यासाठी वेदनाशामक औषधे वापरली जातात.

अ‍ॅण्टिडिप्रेसन्टस्--

PMS वरील उपचारांमध्ये ह्या औषधांचा मोठ्ठा सहभाग आहे. अगदी कॉमनली वापरलं जाणारं औषध म्हणजे- फ्लुओक्झेटिन (Fluoxetine)
ह्या औषधाचं काम म्हणजे शरीरातील सिरोटिनिनची पातळी टिकवून ठेवणे.
( वर वाचलेलं आठवलं का ? सिरोटोनिनची पातळी कमी असलेल्या स्त्रियांमध्ये PMS ची लक्षणे जास्त दिसून येतात.)
ही औषधे बर्‍याचदा पाळीच्या आधीचे दोन आठवडे घेण्यासाठी दिली जातात.
सलग पूर्ण महिनाभर घेण्यासाठी दिली असतील तर बंद करताना एकदम बंद करू नयेत. असं केल्याने सगळी लक्षणे रिबाऊंड होण्याची शक्यता असते.

६. शस्त्रक्रिया--

जेव्हा वरील सगळे उपाय करूनही त्रास होत राहतो, तेव्हा हा शेवटचा पर्याय म्हणून विचारात घेतला जातो.
( असं खूप कमी वेळा होतं. त्यामुळे घाबरू नका ! )
ह्यामध्ये गर्भाशय आणि दोन्ही ओवरी काढून टाकल्या जातात.
शस्त्रक्रिया करण्याच्या आधी काही विशिष्ट औषधांनी कृत्रिम मेनोपॉज घडवून आणला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेचा फायदा होईल की नाही ह्याची चाचणी घेता येते.

सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं .....PMS चा त्रास आहे म्हणून त्याच्यामुळे आणखी काही गंभीर शारीरिक आजार उद्भवत नाही.
औषधोपचार केले तर PMS आटोक्यात राहू शकतो !

...... मग पुढच्या महिन्यात PMS ची लक्षणं दिसायला लागली की ?........
होठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल....भैय्या ( मैय्या !) ऑल इज वेल !!!

____ रुणुझुणू ( स्त्रीरोगतज्ञ )

******************************************************************************************************
डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश पी. एम. एस. ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख आधी संयुक्तासाठी लिहिलेला आणि त्यामध्येच प्रकाशित केला होता.
संयुक्ता व्यवस्थापकांनी केलेल्या सूचनेनुसार बाकीच्या माबोकरांना वाचत यावा म्हणून हा लेख सार्वजनिक केला आहे. Happy

मला आधी वाटायचं की पी.एम.एस म्हणजे 'हाय रे स्त्री- जन्मा!' च्या चालीवर हे आपल्याच वाट्याला येतं म्हणून येणारं फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा चिडचिड, रागराग असावा. जसं प्रेग्नन्सी मध्ये (काही) बायांना आपल्या बेढब शरीराचा उबग यायला लागतो, कुठे जायला नकोसं वाटतं आणि आपल्यावर अशी वेळ आलेली असताना त्याला कारणीभूत असा तो पुरुष मात्र आहे तसाच असतो-त्यात काही बदल नाही हे पाहून बायका आपल्या नवरयाचा आणि पर्यायाने काहीवेळा समस्त पुरुषजातीचा रागराग करतात तसलंच काहीसं. नंतर या पी.एम.एस वर मैत्रिणींच्या पोस्टी पडायला लागल्यावर, त्यांच्या घरातली आदळ आपट, स्फोटक वातावरण वगैरे पाहून त्यातला गंभीरपणा जाणवला.

पण ज्या २०-३०% स्त्रियांना हा त्रास होतो तो अपरिहार्य असतो का? म्हणजे मला म्हणायचंय की आपल्याला हा त्रास होतोच हे जाणून घेऊन चिडचिड, रागराग वर तुम्ही सांगितलेले खास उपाय न करता, नेहमीचंच रुटीन राखून, याचा बाऊ न करता त्या बाईला ताब्यात नाही का ठेवता येणार? म्हणजे एखाद्या नातं तुटल्यानंतच्या प्रोसेससारखं. त्यानंतर आपल्याला थोडा का होईना-त्रास होणारच असतो पण त्यातली inevitability लक्षात आली की आपण करून घेतो त्या मनस्तापातली निरर्थकता लक्षात येते तसंच. कारण यावर तिला कोणीही कितीही मदत करु पाहिली तरी हा 'तिच्या' शरीरातला बदल असल्याने त्याबद्दल तिनेच काय ते समजून-सवरुन करणं भाग आहे.

मला काय म्हणायचंय हे लक्षात येईल की नाही हे माहीत नाही पण असो,

लेख माहितीपूर्ण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचनीय आणि माझ्या माहितीत भर घालणारा होता.

थँक्स!

मणिकर्णिका,हार्मोन्स मुळे तसेच न्युरोट्रान्समिटरमुळे जे काही होते ते काही पाळीचा बाऊ केल्यामुळे होत नाही. खरे तर नेहमीसारखेच रुटिन सुरु असते आणि अचानक तुमच्या इच्छेविरुद्ध हे घडते. असे वारंवार घडल्यावर स्त्रीला 'असे का?' हा प्रश्न पडतो.नातं तुटल्यावरचा मनःस्ताप वेगळा. तिथे तुम्ही स्वतःला समजावू शकता कारण त्रासावर कसे रिअ‍ॅक्ट करायचे हे बरेचसे तुमच्या हातात आहे. इथे मुळात सामान्यतः एखाद्या परिस्थीत तुम्ही नेहमी जसे वागता त्यापेक्षा भिन्न असे वर्तन घडते. उदा. एरवी मुलाचे धाडकन दार लावणे खटकत नाही पण या फेजमधे रागाचा पारा वर जातो. नंतर आपला असा कसा तोल गेला याचा स्वतःलाच प्रश्न पडतो. माझ्या मित्राच्या आईला अचानक हा त्रास सुरू झाला. तोही तीव्र! आठ दिवसापूर्वीच्या काकू याच का असा प्रश्न पडावा असं वागायच्या.

मला माझ्या डॉक्टरांने सांगितले की, PMS व हायपोथायरॉइड दोन्ही तसे संबधित आहेत. ते नक्की कसे ते आता माझ्य लक्षात नाही.
पण हार्मोनल इम्बॅलेन्स असल्याने होते..

लेख आवडल्याबद्दल धन्यवाद. Happy
मणिकर्णिका,
<< पण ज्या २०-३०% स्त्रियांना हा त्रास होतो तो अपरिहार्य असतो का? >> हो.
एक उदाहरण देते. बघ पटतंय का.
जोरात पडून गुडघ्याला ( किंवा इतर कुठेही ) लागल्यावर, जखम झाल्यावर कळ येते. ही कळ अपरिहार्य असते. कारण त्या जखमेमुळे काही केमिकल बदल घडलेले असतात, ट्रान्समिटर्सद्वारे हे बदल मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मग दुखण्याची जाणीव होते.
प्रत्येकाचा पेन थ्रिशोल्ड वेगवेगळा असतो. त्यानुसार ह्या दुखण्याचा त्या व्यक्तीला किती त्रास होतो, हे अवलंबून असतं.
तसंच काहीसं पी.एम.एस. मध्ये होतं. लेखात लिहिल्याप्रमाणे ओव्ह्युलेशनमुळे होणारे हॉर्मोनल बदल हे होतातच. त्या बदलामुळे घडणारे शारीरिक आणि मानसिक बदलही अपरिहार्य असतात. Happy
आणि त्यामुळेच स्वातीने सांगितल्याप्रमाणे अगदी नेहमीच्याच घटनांवर अशावेळी त्या स्त्रीचा वेगळा प्रतिसाद येऊ शकतो.

<< वर तुम्ही सांगितलेले खास उपाय न करता, नेहमीचंच रुटीन राखून, याचा बाऊ न करता त्या बाईला ताब्यात नाही का ठेवता येणार? >> तुमचं नेहमीचं रुटीन जर योग्य, हेल्दी असेल तर विशेष काही करावं लागणार नाही. पण तसं ते फार क्वचित असतं ! म्हणून हे उपाय.

छान लेख Happy धन्यवाद
दिनेशदा, कळण वळण राहिल दूरचं, कैतरी ऐकिव माहितीवर चेष्टा/खिल्लीयुक्त शब्दात या विषयाची वासलात लावली जाते. किम्बहुना, वरील माहिती "शिक्षणात" अन्तर्भुत असली पाहिजे. सशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना "आधीपासूनच" असणे जरुरीचे आहे. Happy

सशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना "आधीपासूनच" असणे जरुरीचे आहे
१००% सहमत लिंबूटिंबू ! बरेचदा 'तुला काय करायचय या बायकी गोष्टीत नाक खुपसुन' असे म्हणून घरातील स्त्रीयाच मुलांना एकंदरीतच स्त्रीस्वास्थ्याबाबत अनभिज्ञ ठेवतात. मुलीच्या बाबतीत 'निमुटपणे सोसायचे' हेच बाळकडू असते. असा त्रास होऊ शकतो हे इंन्शुलीन्च्या गडबडीमुळे डायबेटिसची व्याधी जडते एवढ्या सहजतेने शिकवणे गरजेचे!

अत्यंत सुंदर माहिती रुणुझुणू! सर्वांना वाचण्यासाठी हा लेख खुला केलास, हे चांगले झाले. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली तरीही अत्यंत दुर्लक्षिलेली, अन्नुलेखाने मारली गेलेली ही गोष्ट आहे. लक्षणे, कारणे माहिती होतीच, पण उपाय तुझ्या लेखामुळेच समजले आहेत... धन्स गं Happy

उत्तम विषय फारच चांगल्या पध्दतीने मांडलायस, रुणुझुणु.
असे विषय चर्चेला आल्याने पुरुषांना आणि स्त्रीयांनाही स्वतःकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची नजर येईल. दर महिन्याला स्त्री या आवर्तनातून जात असते. त्यावेळी शरीरात आणि मेंदूत किती केमिकल लोच्या होत असतो हे लक्षात आलं की त्याला सामोरं जायला मनाची तयारीही करता येईल असं वाटतं.

मामी अनुमोदन..

कधी कधी कोड्यात टाकणा-या वागण्याने पुरूषांना मनःस्ताप होतो . पण अशी माहीती घेतली तर दृष्टीकोण बदलू शकतो असं वाटतं. प्रामाणिकपणे कबूल करायचं तर मला यातली बरीचशी माहीती नव्हती आणि करून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता.

लेख खरच छान आहे. धन्यवाद..

सर्वांना धन्यवाद.:)
सशक्त कौटुम्बिक जीवनाकरता या व अशा स्वरुपाच्या माहिती स्त्रीपुरुष दोघान्ना "आधीपासूनच" असणे जरुरीचे आहे.>> लिंबुटिंबू, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. ह्या आजारामुळे नातेसंबंध तुटण्याइतपत ताणले गेलेले पहायला मिळतात. आधीपासूनच माहिती असेल तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.

<< असा त्रास होऊ शकतो हे इंन्शुलीन्च्या गडबडीमुळे डायबेटिसची व्याधी जडते एवढ्या सहजतेने शिकवणे गरजेचे! >>सौ टके की बात. Happy

<< प्रामाणिकपणे कबूल करायचं तर मला यातली बरीचशी माहीती नव्हती आणि करून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हता.>> हा प्रामाणिकपणा खूप आवडला अल शेषन ( वल्द किरण !) Happy It's never late to learn good things !

प्रज्ञा,लेख आवडला.
संयुक्ता पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना खुला केल्याबद्दल धन्यवाद.
मी सुद्धा या आजारपणाने त्रस्त होते पूर्वी.
अतिशय जास्त रडारड्,सुसाईडल थॉटस. वैगेरे वैगेरे.
पण आता एक बाळ झाल्यावर बरीच इंटेंसिटी कमी झालेय.
माझं नशीब की हे सगळे कळणारा आणि समजावून घेणारा नवरा आणि घरातील मंडळी मिळालियत.
माझ्या पेशंटच्या घरातल्यांना तर समजावणेही कठिण होतं या आजाराबद्दल.

<< माझ्या पेशंटच्या घरातल्यांना तर समजावणेही कठिण होतं या आजाराबद्दल.>> हो गं, खूप खोलात समजावून सांगायला तितका वेळही देता येत नाही.आणि सांगितलं तरी पटकन लक्षात येण्यासारखा तितका सोप्पा विषय नाही हा. बायकांच्या चिडचिडीवर पांघरूण घालायला काढलेल्या योजना आहेत, असा पक्का समज असतो. Happy

लिंब्याभाउंना अनुमोदन.
मेनोपॉज जवळ येऊ लागल्यावर या लक्षणांची तीव्रता वाढते काय?

खूप छान लेख रुणु. खूपच माहीतीपूर्ण. ज्या पुरुषांनी हे वाचून चांगले प्रतिसाद दिलेत त्यांचेही कौतुक.

प्रोफेशनल एथिक्सचा भाग म्हणून लेखाखालचं नाव काढून टाकण्यासाठी लेख संपादित केला आहे.
बाकी माहितीत काही बदल केलेला नाही. Happy

रुणुझुणू,

लेखाबद्दल धन्यवाद! पुरुषांनी काय करावं याविषयी वाचायला आवडेल. इथे इंग्लंडमध्ये कचेरीत सरळ बायका सांगतात "It's my pms. Don't annoy me."

आ.न.,
-गा.पै.

हैला सिटी घुमा के बोल भैय्या स्टाइल लेख एकदम आवडेश...

अपुन तो आपके बडे पंखे होने के सोच रहे है.....रुणुझुणू...:)

गंभीर विषयावरचं हल्कंफुल्कं लिखाण....तुमचं तर पेशंट व्हायला पण आवडेल....;)

आगाऊ,
तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून गेलं होतं.
मेनोपॉज आल्यावर ह्या लक्षणांची तीव्रता वाढू शकते. शिवाय ज्या स्त्रियांना पीएमएस चा त्रास जास्त होतो त्यांना मेनोपॉजची लक्षणेही जास्त तीव्र स्वरूपात जाणवू शकतात असं एका अभ्यासात आढळून आलं आहे.
कारण दोन्ही गोष्टींच्या मुळाशी हॉर्मोन्सचे असंतुलन हेच कारण असते.

<< पुरुषांनी काय करावं याविषयी वाचायला आवडेल. इथे इंग्लंडमध्ये कचेरीत सरळ बायका सांगतात "It's my pms. Don't annoy me.">>
गामा पैलवान,
त्या बायका स्वतःच उत्तर देऊन तुमचं काम सोप्पं करतायेत ना. त्या सांगतायेत तसं - Don't annoy them ! Happy
त्यांच्या चिडचिडीकडे थोडं दुर्लक्ष करायचं कारण ही चिडचिड हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे होत असते.
मदत करावीशी वाटण्म हीच तुम्ही चढलेली पहिली आणि महत्वाची पायरी आहे.

वेका, (नाव भारीये :))
ठांकु.
पेशंट नक्की व्हा....पण ऑब्स्टेट्रिकच्या व्हा, गायनॅकच्या नको ! Wink
(ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे गर्भावस्था आणि प्रसूतीशास्त्र)

रुणुझुणू,

>> पेशंट नक्की व्हा....पण ऑब्स्टेट्रिकच्या व्हा, गायनॅकच्या नको ! Wink

आमच्या नशिबी दोन्ही नाही हे किती चांगलं आहे! Wink

असो.

>> त्यांच्या चिडचिडीकडे थोडं दुर्लक्ष करायचं

हे बोलायला सोप्पं आहे. पण फट म्हणता ब्रह्महत्या होते! Uhoh आणि बाहेरून काही कळंत नाही. त्यामुळे प्रत्येक बाईशी जपूनच बोलावं लागतं. अर्थात हा प्रकार इथे इंग्लंडमध्ये खुलेआम चर्चिला जातो. पण भारतात वेगळी परिस्थिती असावी. तिथले पुरुष खरोखरच अनभिज्ञ असतात. मीही तसाच होतो.

आ.न.,
-गा.पै.

Pages