ओरिसा: आळूपोटळं तरकारी (फोटोसहीत)

Submitted by सावली on 5 May, 2011 - 22:59

मी रेसिपी टाकतेय म्हणजे धक्का बसला का? कारण खरतर टाकायची या विचारानेच मला धडधडत होतं Wink हे काही माझं क्षेत्र नव्हे. पण काही दिवसापूर्वी जपान बीबी वर मी 'परवर' म्हणाले तर सायो, आडो आणि मंजिरीला बहुतेक ते पडवळ वाटले. म्हणून मग ही रेसिपी नवऱ्याला करायला लावून साग्रसंगीत लिहून घेतली इथे टाकण्यासाठी. मध्ये मध्ये फोटो सुद्धा काढले.
लेक विचारत होती कि तू फोटो कशाला काढतेस, इंटरनेट वर टाकणार का?

तर ही आळूपोटळं तरकारी
आळू - बटाटा
पोटळं - परवर (फोटो खाली बघा)

लागणारा वेळ:
माहीत नाही. Wink (विचारुन सांगू का?)

लागणारे जिन्नस:

१. अर्धा किलो परवर (खाली फोटो बघा.)
२. तीन लांबट बटाटे
३. एक मोठा / दोन छोटे कांदे
५. एक टोमॅटो कापून
६. २ टे.स्पू. आलं, लसूण, जिरे, लालमिरची, धणे यांची पेस्ट
७. तेल
८. हळद, तिखट, मीठ चवी पुरते

क्रमवार पाककृती:
१. परवरची टोकं काढून त्यांचे अर्धे भाग करावे.
२. बटाटे पण अर्धे करावे. फार मोठे असतील तर साधारण अर्ध्या परवरच्या आकाराचे होतील असे कापावे.
३. कांदे बारीक (खूप बारीक नव्हे) कापावे.
४. नॉन स्टिक फ्रायपॅन मध्ये १ टे.स्पू तेल टाकून मंद आचेवर परवर आणि बटाटे परतावे.(लवकर शिजणारे बटाटे असतील तर परवर व बटाटे वेगवेगळे परतावे)
५. थोडे सोनेरी झाले कि (पूर्ण शिजवू नयेत ) काढून ठेवावे.
६. कढई मध्ये २टेस्पू तेल टाकावे आणि गरम करावे.
७. गॅस जरा मंद करून त्यात एक टीस्पू साखर टाकावी. ही साखर रंगासाठी आहे.
८ साखर गडद कॅरेमल रंगाची झाली (म्हणजे जराशी जळली Wink ) कि लग्गेच कांदा टाकून परतावे. यामुळे कांदा छान लालसर दिसेल. जास्त जळू देऊ नका नाहीतर कोळसा मधे मधे दातात येईल Wink
९. कांदा शिजत आला कि (६) मधली पेस्ट टाकावी आणि परतावी.
१०. सगळे तेल सुटे पर्यंत आणि सोनेरी होईपर्यंत चांगले परतावे.
११. हळद आणि तिखट टाकुन पुन्हा एकदा परतावे.
१२. आता टोमॅटो टाकावा आणि त्यावर थोडं मीठ भुरभुरावे.म्हणजे टोमॅटो मऊ होतो आणि त्याचा लगदा लगेच होतो.
१३. या सगळ्यात आधी परतलेले परवर आणि बटाटे टाकावे.
१४. एकदा परतून हवे तसे (साधारण दोन / तीन कप ) पाणी टाकून मीठ टाकावे.
१५. बटाटे आणि परवर शिजे पर्यंत झाकण टाकून शिजवावे. (परवर अगदी मऊ शिजत नाही. त्याचे साल कडकच राहत)
१६. गरम भाताबरोबर खावे.

वाढणी/प्रमाण:
तीन माणसांसाठी.

अधिक टिपा:
१. परवर अगदी मऊ शिजत नाही. त्याचे साल कडकच राहते.
२. ओरिसा मध्ये रस्सा भाजी केली तरीही जेवताना फोडणी घातलेले वरण, अजून किमान एक पाले भाजी आणि एक परतलेली भाजी असतेच. हे सगळे फक्त भाताबरोबर खायचे असते.
३. खूप प्रश्न विचारू नयेत कारण यात माझे काही एक्स्पर्टिज नाहीत. Light 1

माहितीचा आणि करणारा स्रोत:
नवरा

कापलेले परवर, टोकं काढून टाका. बिया तशाच ठेवा. 

परतलेले परवर

नुकतेच कढईमध्ये टाकलेले  

तयार तरकारी 

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोवळ्या परवरात नसतात कडक बिया. या परवरात खवा भरुन, पाकात घोळवून एक गोड पदार्थ करतात. रुचिरा मधे आहे.

आमच्याकडे परवराची भाजी आवडीनं खाल्ली जाते. मी परवरं उभी अर्धी चिरून मग आडवे पातळ काप करते. गोल पातळ कापली तरी चालतील. जून असतील तर बिया काढून टाकायच्या. तेलावर मोहरी, हिंगाची फोडणी करून त्यात वालाची डाळ (जरा १० मिनिटं आधी भिजवून) टाकून परतून घ्यायची. मग बारीक चिरलेला कांदा घालून परतायचा. तो लाल झाला की परवरं, हळद, तिखट, मीठ घालून शिजवायची. थोडं थोडं पाणी (भाजी करपणार नाही इतपत) टाकायचं. एक वाफ आली की त्यात धणा पावडर आणि जिरे पावडर, किंचित साखर घालून शिजवायचं. वर झाकणात पाणी घालतं तर भाजीत जास्त घालावं लागत नाही. सुकी भाजी, वर कोथिंबीर घालून आणि हवं तर लिंबू घालून चपाती बरोबर खायची. ही भाजी, दही आणि चपाती हे कोम्बो फारच मस्त लागतं. दही-भाताबरोबर पण छान लागते. तसंही सगळ्या सुक्या भाज्यांबरोबर दही मस्तच लागतं. उदा. कारली, तोंडली वगैरे.

अगंगंगं नानबा- नहीऽऽऽऽ तुमने वही किया जिसका मुझे डर था.
तू आत्ताच पुढील सुमारे ७० पोस्टींची सोय केलीस बघ. Light 1
आता येतीलच प्रश्न
परवर म्हणजेच तोंडली म्हणजेच गिलके म्हणजेच दोडके म्हणजेच शिराळे म्हणजेच दुधीभोपळा का ? Proud

स्व्पनाली- नवीनच पाकृ. Happy

रैना , Proud
एकदा चुकुन परवर आणलेलं पण त्याचं काय नी कसं करावं हेच माहित नसल्याने वाया गेली भाजी. तरी तोंडली जास्त आवडतील असं वाटतं .

मी बहुतेक हे आणून तोंडलं समजून त्याची कोरडी भाजी करून झाली आहे म्हणजे! Happy

परवर म्हणजेच तोंडली म्हणजेच गिलके म्हणजेच दोडके म्हणजेच शिराळे म्हणजेच दुधीभोपळा का ?
>> पडवळ राहिला की Happy (मला बरेच वर्ष 'दोडका-पडवळ', 'गाय-म्हैस', 'शेळी-बकरी' ह्यातला फरक कळायचा नाही.खूप जणांनी क्लासेस घेतले.. माझा घोळ कायम असायचा.. शेळी बकरी सोडून बाकीच्यातले फरक आता कळतील (बहुतेक) असं म्हणेतो हा 'तोंडली-परवर' प्रकार आलाय :()

आम्ही पडवळ म्हणतो.. काही नवीन नाहिये..

पण इतकी मोठाली चिरुन १ तास लागेल ना शिजायला Sad
बंगाली आणि ओरीया अशीच चीरतात पण..

छान दिसतीय पण.. अशी करुन बघेन

छान भाजी सावली.
रैना, मुख्य प्रश्ण राहीला परवर नसेल तर तोंडली चालतील का? (मला खरच हा प्रश्ण पडला आहे.)

रैना Lol
इन्द्रधनु हो शिजायला थोडा वेळ लागतोच.

तोंडली आवडणार्‍यांनी तोंडली टाकुन करुन बघा आणी सांगा इथेच. Happy

परवर
१) परवर मोठे असतात, हाताला कडक लागतात. शिवाय यांचा रंग गडद हिरवा असतो.
२) त्यावर ज्या शिरांसारख्या उभ्या झिगझॅग रेघा असतात त्या पांढुरक्या असतात.
३) कापताना करकरीत वाटतात. हाताला/सुरीला चिकट लागत नाहीत
४) कापले असता मोठ्या बिया दिसतात.
५) पिकलेले परवर पिवळट दिसतात.

तोंडली
१) तोंडली मऊ आणि बरिच छोटि असतात. रंग पोपटी असतो.
२) त्याच्यावरच्या उभ्या झिगझॅग रेघा थोड्या गडद रंगाच्या असतात. नख लावले तर लगेच आत जाते.
३) कापताना हाताला चिकट लागतात.
४) कापल्यावर बिया अगदी नाजुक दिसतात. (नाजुक नसल्या तर ती तोंडली जुन असतात)
५) पिकलेली तोंडली पिवळट दिसतात.

हुश्श... फरक लिहा प्रश्न पुर्ण केला!

धन्यवाद सावली! तुमच्या कृतीने आज ही भाजी केली. चवदार लागली. तेच ते खोबरं-खसखस वाटण,गरम मसाले, काळे मसाले, चिंच, गूळ प्रकरण नसल्यामुळे जरा वेगळी चव आवडली. कॅरामेल रंगासाठी साखर घालायला विसरले. कोथिंबीर संपवायची म्हणून ती पण घातली. बाकी काही फरक केला नाही.

राखीने या पाककृतीची आठवण करून दिली म्हणून तिला धन्यवाद! Happy

parvarbhaji-maayboli.jpg

मृण्मयी, मस्तच दिसतेय भाजी Happy
रंग पण छान आलाय आणि कोथिंबिरी मुळे अजुन सुंदर दिसतेय Happy
करुन इथे फोटो दिल्याबद्दल खुप खुप आभार.

धन्यवाद!

नेहमीच्या भुकट्या वापरण्यापेक्षा ताजे धणे आणि जिरे वाटणात घेतल्यामुळे खरंच मस्त चव आली. वाटणात घेतलेल्या लाल मिरच्या बर्‍यापैकी तिखट आहेत. वाटीभर ताक प्यावं झालं. Proud

रेसिपी आणि फोटो दोन्ही मस्तच.

मी परवर फ्राय भाजी करते तोंडल्यासारखी. कधी बटाटा टाकून किंवा न टाकता. कोवळ्या परवराची छान होते तशी. बिया नसतात.

आई गुजराथची असल्याने ही भाजी केली जाते आमच्याकडे. तिथे फेमस आहे.

मस्त लागते ही भाजी. फार आवडते Happy
मी अशीच चिरुन जरा जास्त तेलावर असेच बटाटे आणि परवर परतते आणि सोनेरी झाल्यावर मीठ घालून ढवळून झाकण ठेवून वाफेवर शिजवते. गरज पडली तर दोन चमचे पाणी घालायचे.
शिजल्यावर वरुन लाल तिखट आणि धणे पावडर फक्त. चमचमीत लागते ही तळलेली कोरडी भाजी एवढ्याच मसाल्यांवर.

सध्या बिहारात नोकरी ला असल्यामुळे रोजच आलू परवल ची भाजी होते, थोडा वैतागलो आहे पण ही भाजी उत्तम असते परवल ही अतिशय पौष्टिक अन बहुगुणी भाजी आहे त्याचे अजुन काही प्रकार करतात

१ लांब लांब स्ट्रिप्स कापून केलेली वांगयाची असतात तशी भजी अतिशय मस्त लागतात चवीला (आतून मऊ असतात बाहेरून कुरकुरित)

परवल २ भागात चिरून मधला गर काढून त्याला चासनी म्हणजे पाकात बुडवून बनवलेला एक मिठाई चा प्रकार पण असतो, नाव आठवत नाही

परवलला हरा आलू सुद्धा म्हणतात, ह्या भाजी ला स्वतःची काही चव नसते तस्मात् ज्या दुसऱ्याभाजीत घालाल तिची किंवा इतर मसाल्यांची चव परवल नीट "जस्प" करतात! तसेच कुरकुरीत किंवा मऊ कुठल्याही पद्धतीने शिजवली तरी उत्तम लागतात

अजुन एक रेसिपी सांगायची होती, भरवां परवल फ्राय ह्यात परवल अर्धे चिरून त्यातला गर कोरून काढतात तो गर थोड़े कच्चे सरसो तेल मीठ मसाला वगैरे घालुन नीट मळुन घेतात आता परवल माधे हा मसाला भरून ते दोर्याने बंधतात व खरपुस भाजतात उत्तम तोंडीलावणे होते हे व वर सांगितल्या प्रमाणे ब्लांड असते तस्मात् मसाले मस्त अब्सोर्ब होतात

Pages