चिवळीची भरडाभाजी

Submitted by चिनूक्स on 1 May, 2011 - 00:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

१. चिवळ - अर्धा किलो
२. तुरीच्या डाळीचा भरडा - अडीच - तीन वाट्या
३. कांदे - दोन मोठे
४. कैरी - एक मध्यम
५. लसूण - दहा कळ्या
६. तेल
७. तिखट
८. मीठ
९. हळद

क्रमवार पाककृती: 

१. चिवळीची भाजी निवडून बारीक चिरा.
२. या भाजीत डाळीचा भरडा, आवडीप्रमाणे तिखट, एक चमचा हळद, मीठ, पाणी घालून हे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण फार सरसरीत नसावे.
३. या मिश्रणाचे लहान गोळे करून कुकरमध्ये किंवा पातेल्यात वाफवून घ्यावेत.
४. हे गोळे गार होऊ द्यावेत, आणि नंतर त्यांचे जरा मोठे तुकडे करावेत. लसूण पाकळ्या जाडसर ठेचून घ्याव्यात.
५. कढईत तेल तापवून जिरं, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
६. नंतर लसूण, बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली कैरी, थोडं तिखट, चिमूटभर हिंग घालून परतावे.
८. कांदा गुलाबी झाला की त्यात फोडलेले भरड्याचे गोळे घालून परतावे, आणि एक वाफ येऊ द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. चिवळीच्या भाजीचे भरडा घातलेले गोळे नुसते खायलाही चांगले लागतात. वरून फक्त कच्चं तेल, किंवा लसणीची फोडणी घ्यायची.
२. हे गोळे घालून भरडा भातही करता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके , मग डाळ भिजत घालून भरडा करायचाय का ? भरडा म्हणजे नुसती वाटलेली डाळ का ?तसं सविस्तर लिहिशील का ?

डाळीचा भरडा करण्यासाठी अगोदर डाळ धुवायची, मग दहापंधरा मिनिटं भिजत घालून वाळवायची. डाळ नीट वाळली की भाजून मिक्सरमधून भरडा काढायचा.

तुमच्या रेसिपीज नेहेमीच वेगळ्या आणि छान असतात,तुमच्या लिखाणासारख्याच. ही पण करून बघणार. फोटो टाकाल का ह्या रेसिपीचा? ते टायपो म्हणजे काय?

छान रेसिपी. ह्याच पध्दतीने इतर पाल्यांची भाजीही करता येईल. Happy मी आधी ही भाजी कधी खाल्ली नाहीए, बाबांकडून नुस्तंच ह्या भाजीचं वर्णन ऐकलं आहे... म्हणे आमरसाबरोबर चिवळीची भरडाभाजी फार फंडू लागते.

ही भाजी दिसते कशी? फोटो टाकला तर कळेल आम्हाला. रेसिपीवरुन तर करुन बघावीशी वाटतेय. ही कुठली प्रांतविशेष आहे ? नागपूरकडची का? Happy

हा बीने जुन्या मायबोलीवर टाकलेला चिवळीचा फोटो - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/123191.html?1172605308

ही भाजी विदर्भात बरेचदा केली जाते. पुण्यात क्वचित बघितली आहे.

... म्हणे आमरसाबरोबर चिवळीची भरडाभाजी फार फंडू लागते.>>>>>>>

अगदी बरोबर.

चिनूक्सा, कु. फे. हे. पा.?
(आधीच आज सकाळपासून नागपूरच्या आठवणींनी बेचैन आहे. त्यात मायबोली उघडल्याबरोबर ही रेसिपी.:()

ओह पाहिलीय पाहिलीय ही भाजी. आमच्या बाजारात असते. पण तिचे नाव पण माहित नव्हते आणि करायची कशी तेही. आणली पाहिजे आता. Happy

हो मी टाकला होता फोटो. अकोल्यात तर चिवळीची भाजी फार फार प्रसिद्ध आहे. उन्हाळा आला की वेगवेगळ्या भाज्या घेऊन येतो. घोळ पण ह्याच दिवसातली. लग्नात घोळीची डाळ्-शेगंदाणा भाजी असतेचं असते विदर्भात.

माझ्या सासुबाई थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात हे मुठ्ठे. तुरीची डाळ भिजवून उपसतात. त्यात ही चिवेची(चिवईची / चिऊची) भाजी चिरून घालतात. हिरवी मिरची, लसूण वाटून लावतात. बारीक चिरलेला कांदा. सगळे एकत्र करतात. आणि त्याचे हलक्या हाताने मुठ्ठे करून वाफवतात. परत फोडणीला नाही घालत.

या खानदेशी कढीबरोबर खाल्ले जातात हे मुठ्ठे - http://www.maayboli.com/node/13713

घोळीची भाजीची पाने वगैरे चिवईच्या भाजीपेक्षा बरीच मोठी असतात.

चिवईचा झुणका अप्रतीम लागतो. स्लर्प!!!

चिवळी ही भाजीच नवीन आहे माझ्यासाठी. कृती पण नवीन. मी चिवळी ऐवजी शेपू अथवा मेथी घेतल्यास कुणाची हरकत नसावी Wink