बिलोरी आरसा!

Submitted by नीधप on 24 April, 2011 - 00:04

अर्थात जुनीच.
----------------------------------------------
आरश्याने पाठीमागे दडवून ठेवलेला मुखवटा
दुपारी भेटला मला.
तेव्हा आरश्याचा चेहरा पडला
त्याचं बिंग फुटलं.
त्या विखुरलेल्या तुकड्यात
शंभर, हजारांच्या संख्येनं दिसत होता
एक वाकडातिकडा चेहरा

तूच आहेस ही
मुखवट्याने आरोप केला.

तो भयानक होता.
तो लाजिरवाणा होता.
तो माझाच होता.

'यासाठीच सांगत असतो
काही गुपितं गुपितंच बरी'
आरसा तुकड्यातुकड्यातून
खदाखदा हसला.

तुकड्यांना गप्प करण्यासाठी
मी माझा चेहराच तुकड्यांवर मारला
मुखवटाही मारला

आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं.
माझा चेहरा दिसेनासा होत गेला.

- नी

गुलमोहर: 

कविता सुरेख जमलिये..
>>तो भयानक होता.
तो लाजिरवाणा होता.
तो माझाच होता.

'यासाठीच सांगत असतो
काही गुपितं गुपितंच बरी' >> यासाठी प्रचंड अनुमोदन.. Happy

पुलेशु! Happy

चांगली कविता... कितीतरी दिवसांनी बिलोरी हा माझा लाडका शब्द पुन्हा भेटला..>>>

बिलोरी हा शब्द भेटला पण माझ्यामते योग्य अर्थाने भेटला नाही. बिलोरी बांगड्यांच्या काचांना म्हणतात असे मी ऐकून आहे. 'हासणे बिलोरी होत जाणे' हे जाणवून घेता आले नाही. क्षमस्व!

पण ही कविता खूपच आवडली. दर्जेदार एकदम!

अभिनंदन!

-'बेफिकीर'!

बांगड्यांना बिल्लोरी हे माझ्या मते हिंदीत म्हटलं जातं.... ''चूडी बिल्लोरी'' असे कासार ओरडत गावोगावी हिंडत.

आरश्यालाही बिलोरी म्हणतात भूषणजी... म्हणजे जो आरसा माणसाची पूर्ण छवि दाखवतो....त्या किंग साईझ आरश्यास ''बिलोरी'' आरसा असं म्हणतात.

आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं....... हे ते हसणं मोठ्ठं होत गेलं या अर्थाने कवितेत आलं आहे.

उत्तम कविता,आवडली. Happy

आरश्यालाही बिलोरी म्हणतात भूषणजी... म्हणजे जो आरसा माणसाची पूर्ण छवि दाखवतो....त्या किंग साईझ आरश्यास ''बिलोरी'' आरसा असं म्हणतात.

आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं....... हे ते हसणं मोठ्ठं होत गेलं या अर्थाने कवितेत आलं आहे.>>>

ओके!

अनंत ढवळेंचा हा शेर आता मला वेगळ्या अर्थाने वाचून पाहिला पाहिजे.

फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली

यात बांगडीच्या काचा या दृष्टीने 'सूट' होत होते असे वाटते. 'पूर्ण छबी दाखवणार्‍या आरशाची काच' या दृष्टीने अर्थ लावून पाहतो.

धन्यवाद !

नीधप, अवांतराबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

सही!

'यासाठीच सांगत असतो
काही गुपितं गुपितंच बरी'
>>>
अगदी अगदी!

आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं.
माझा चेहरा दिसेनासा होत गेला.
>>>
वा!

खासच!

सुरेख कविता. Happy

<< जो आरसा माणसाची पूर्ण छवि दाखवतो....त्या किंग साईझ आरश्यास ''बिलोरी'' आरसा असं म्हणतात. >>
बिलोरीचा अर्थ आज कळला.

स्वार्थ जणू भिंतीवरचा, आरसा बिलोरी
आपलीच प्रतिमा होते, आपलीच वैरी

आजपर्यंत या कडव्यातील बिलोरीचा अर्थच लागत नव्हता.

जो आरसा माणसाची पूर्ण छवि दाखवतो....त्या किंग साईझ आरश्यास ''बिलोरी'' आरसा असं म्हणतात.>>>>
'बिलोरी' शब्दाचा हा अर्थ योग्य वाटत नाही. ज्या वस्तूवर काही crystal cutwork नक्षीकाम केलेले असते तिला बिलोरी हे विशेषण देतात.

माझ्या माहितीनुसार बिलोरी लखलखीत काचेला म्हणतात. काचेच्या बांगड्यांना बिलवर म्हणतात तो बिलोरचाच अपभ्रंश.
बिलोरी आरसा म्हणजे स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा / लखलखीत / उत्तम प्रतीचा आरसा - असं असावं.

('समुद्र बिलोरी ऐना.. सृष्टीला पाचवा म्हैना' आठवत असेलच. Happy )