चांदो आणि मी!

Submitted by आनंदनंदिनी on 6 April, 2011 - 09:05

मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..

'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..

'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'

चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..

'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'

चांदो हसला,
चांदणीला म्हणाला,

'तू हो पुढे, मी आलोच जरा'

मला घेऊन मग चंद्र
मागल्या दरी आला
पायऱ्यांवर विसावत
हळूच मला म्हणाला..

'पोरखेळ नाही गं!
तुला चिडवत होतो जरा..'

'चांदो, का रे असं नेमका
माझ्या वर्मावर बोट ठेवतोस?
रोज रोज आकाशातून
मलाच का असा छळतोस?
मुकी माझी प्रीत आता
मनामध्ये मावत नाही
रात्रीशी बोलावं म्हटलं,
तर तुलाही माझ्याविना करमत नाही!
जा तुझ्या चांदणीकडे..
बिलगून बस तिला..
रोजच्या सारखंच आभाळातून
वेडावून दाखव मला!'

चांदो म्हणाला..
किती चिडतेस राणी?
तुझ्या त्या वेड्याची
आज सांगणारे तुला कहाणी..
तो ही अस्साच..
तुझ्यासारखा..खुळ्यागत वागतो,
ढगांवर तुझंच नाव लिहितो

'असं कसं नाव पुसलं?'
म्हणून वाऱ्याशी भांडतो!

तू इथे, अन तो तिथे
एकट्यानंच झुरताय!
तुम्हा दोघानाही खरं
थोडं एकांत हवाय!

तेवढ्यात समोर
पावलं काही वाजली..
'त्याला' घेऊन चांदणी
माझ्या अंगणी आलेली!

'thank you चांदो!
तुला रे कसं माझ्या मनातला
अचूक किडा कळला?'

हसला गालात अन म्हणाला,

'अस्साच नाही चांदणीशी माझा टाका भिडला!'

हात माझा चंद्रानं हळूच
त्याच्या हाती गुंफला,
चांदणीला कवेत घेऊन,
तो ही मग ढगांत दडला!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चंद्राशी संवादाची संकल्पना चांगलीच आहे.
पण “अचूक किडा कळला?”
या ओळीतला ’किडा’ हा शब्द,
कवितेतल्या गोडव्याच्या बाजाला मारक ठरतोय असं माझं वैयक्तिक मत.
-----------------------------------------------------------------------------------
अवांतर :

मा.बो. वर नवीन दिसताय म्हणून एक सांगावसं वाटतं.
एकाच दिवशी अनेक कविता टाकल्यात,
तर इथल्या प्रवाहात त्या कुठच्या कुठे वाहून जातील.
अधून मधून काही दिवसांची गॅप घेऊन एक एक कविता पोस्ट केलीत, तर लोकांना
वाचायला, विचार करायला आणि प्रतिसाद द्यायलाही वेळ मिळेल.

वाह ! अप्रतिम ! फारच सुंदर रचना आहे.
हे कस वाटतय सांगा !
तुला रे कसा माझ्या मनातला
अचूक भाव कळला?

@ महेश..

तुमच suggestion छानच आहे!
पुढच्या वेळी असा विचार करुन बघेन नक्की!!!

@ अमितः धन्नो!

या ओळीतला ’किडा’ हा शब्द,
कवितेतल्या गोडव्याच्या बाजाला मारक ठरतोय असं माझं वैयक्तिक मत. >> हो. त्यापेक्षा तो भाव हा शब्द जास्त शोभुन दिसेल.

@भानुप्रिया तुम्ही चांगल्या कवित लिहित आहात. अशच लिहित रहा. Happy

@ All
आपल्या सूचनांबद्दल आभार..

तुम्हा सगळ्यांचाच मुद्दा योग्य आहे..पण काहि काहि शब्द आपल्या 'असण्याचा' भाग असतात..तसंच आहे हे काहिसं..

मुद्दाम ठरवून असं नाहि..पण सहज ते तसंच लिहिलं जातं!!!

पण तुम्हा सगळ्यांच्या सुचनांचा नक्कि विचार करेन!!!

धन्नो!!!

--भानु--

तुमची ही कविता अनेक वेळा वाचली, जणू काळजात रूतून बसलीये एखाद्या रूपेरी बाणासारखी.
कदाचित जरा स्वानुभवाशी जुळणारी असल्याने असे होत असेल Wink

कविता छान आहे
फक्त वर सुचवल्याप्रमाणे, मर्मा च्या जागी वर्म आणि किड्याच्या जागी भाव हे सुचीवलेले बदल कविता जास्त उठावदार करतील...
तरीही कविता साध्या व सोप्या शब्दात थेट हृदाला भिडते...

छानच Happy

Pages