२५ जून १९८३

Submitted by फारएण्ड on 23 June, 2008 - 16:28

२५ जून १९८३, विंडीज ला हरवून भारताने विश्वचषक जिंकला. दूरदर्शन ने एक दिवसाचे सामने थेट प्रक्षेपित करायला बहुधा तेव्हाच सुरूवात केली.
तेव्हा घरात टीव्ही असणे हे एवढे कॉमन नव्हते, काही गावांत्/शहरात बूस्टर लावल्याशिवाय तर काही ठिकाणी तरीही टीव्ही दिसत नसे.
त्यावेळच्या तुमच्या आठवणी काय आहेत? मॅचेस तुमच्या कडे दिसल्या का? विजय तुम्ही कसा साजरा केला? आजूबाजूला कसा साजरा होताना बघितला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्हा मी छोटा असल्यामुळे (पाचवीत) विश्वकप वैगरे जिंकला ह्या बद्दल काही जास्त वाटले नाही. एक मॅच जिंकली असेल एवढेच वाटले. आमच्या घरी तर टिव्हीही न्हवता. पण माझे वडिल ऐस टी (लाल डब्बा) कडुन क्रिकेट खेळायचे कधी कधी , त्यांच टिम मधील माणसांनी नंतर कुठल्यातरी दिवशी घरी आरडा ओरडा केल्याचे आठवते. कदाचित दुसरा दिवस असावा.
माझी स्वत:ची आठवन मात्र नंतर त्या मॅचची टेप शाळेत दाखविली तेव्हाची आहे. त्यातही ती आधीच प्ले केली होती व आमच्या मास्तर ने ती रिवाईंड करायला सुरु केल्यावर सर्व गोष्टी मागे मागे जातानाच जास्त आठवतात. त्यात बहुतेक एक सिक्स मारलेला बॉल लॅन्ड होताना एक माणुस कोट काढत होता तर मला त्याने कोट काढता काढता कॅच घेतली असे वाटले होते. Happy
थोडा मोठा झाल्यावर मात्र भरुन बिरुन आले होते. आता तर त्या मॅचची अनेक पारायन झालीत. श्रिकांत ने मारलेले स्वेकर कटस आणि मोहींदर ने मार्शल ला मारलेला पुल काय जबरी वाटतो अजुनही. त्या मॅच बद्दल सविस्तर लिहीता येईल एवढा खजीना आहे.

वल्ड कप फायनल पेक्षा मला बेन्सेन् हेजेस चांगले आठवते. (तेव्हा घरी टिव्ही असल्यामुळे).

फारेन्ड तू जन्मला होतास तेव्हा? Light 1
.
आम्ही डबडा रेडिओवर कॉमेंटरी ऐकत होतो. मध्ये मध्ये नीट ऐकायला पण येत नव्हते. तेव्हा होती क्रेझ त्यामुळे बेश्ट वाटले होते एकदम. नंतर कधीतरी रन्गीत टीव्ही, व्हीसीआर आणि त्या मॅचची टेप असे सगळे भाड्याने आणून ती मॅच पाहिली होती.
.
>>वर्ल्ड कप फायनल पेक्षा मला बेन्सेन् हेजेस चांगले आठवते. (तेव्हा घरी टिव्ही असल्यामुळे).
हो. Happy

२५ जून १९८३ म्हंटले की मला दुसर्‍या दिवशीच्या केसरीतील "विंडीज चा धुव्वा, विश्वचषक भारताकडे" हा मथळा आणि त्याशेजारी हातात कप घेतलेला कपिल चा भरघोस हसताना फोटो आठवतो. कप्तान म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर २-३ महिन्यांतच ही कामगिरी त्याने केली. त्या आधी त्या सीझन मधे बरेच काही घडले होते. cricinfo वर अयाज़ मेमनने खूप छान लिहीले आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य क्रिकेटरसिकांच्या आठवणीही जवळजवळ तेवढ्याच गमतीदार असतील.

"त्यांच्याकडे असे चार बॉलर आहेत...", आमच्या पेक्षा दोन चार क्रिकेट सीझन जास्त पाहिलेले आमचे काही मित्र गप्पा मारताना सांगत असलेले माझ्या लक्षात आहे. पाक कडून इम्रान ऐन भरात असताना भारताने बेदम मार खाल्यावर गावसकर ची कप्तानपदावरून उचलबांगडी झाली, तसेच गुन्डाप्पा विश्वनाथ, दिलीप दोशी वगैरेंची संघातून. एका दिवशी संध्याकाळी मित्राच्या पायरीवर बसून शेजारच्या घरातील रेडिओवर ऐकलेल्या बातम्यात हे ऐकत असल्याची ही आठवण आहे. त्यानंतर भारत वेस्ट इंडीज दौर्‍यावर जाणार होता आणि त्या संदर्भात ते "चार बॉलर" वाक्य होते. म्हणजे एक इम्रान असताना ही अवस्था तर तेथे रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल आणि गार्नर असताना काय होईल वगैरे.

भारत ती सिरीज अपेक्षेप्रमाणे हरला पण काही गोष्टी तरीही चांगल्या घडल्या: मोहिंदर अमरनाथ पाक दौर्‍याप्रमाणे तेथे ही चांगला खेळला (तो दोन्ही पाय व बॅट स्टम्प्स ना समांतर ठेवून उभा राहायचा ते मजेदार वाटायचे, तसेच इतर बोलर्स क्रीज जवळ आल्यावर पळण्याचा वेग वाढवतात, हा स्लो होत असे व शेवटी बॉल टाकावा का नाही असा विचार करत थांबतो की काय असे वाटताना बॉल टाकत असे, ते ही Happy ), कपिल ने ही एकदा घणाघाती खेळ करून शतक मारले. तसेच या दौर्‍यात भारताने विंडीज ला पहिल्यांदाच वन डे मधे हरवले. २०-२० च्या जमान्यात सुद्धा वेगवान वाटेल अशा ३८ चेंडूत ७२ धावा त्या तोफखान्यासमोर क्षेत्ररक्षणाचे आणि नो बॉल वगैरेंचे आत्ताएवढे कडक नियम नसताना मारल्या.

त्यानंतर हा वर्ल्ड कप आला. भारतात याचा कोणाला पत्ताही नव्हता. एक दिवसीय सामने म्हणजे कसोटी सामन्यांव्यतिरिक्त इतर सामने दौर्‍यात असत तसाच प्रकार वाटायचा. आणि आपले (बरेचसे) ढेरपोटे खेळाडू अशा झटपट सामन्यात काही करू शकतील असे कोणालाच वाटायचे नाही (तरी ५० ओव्हर्स मधे २४० धावा म्हणजे खूप होत्या तेव्हा). ते गावसकर ने ६० ओव्हर्स मधे ३६ धावा केल्या (१९७५) ते सर्व नंतर जास्त प्रकाशात आले. मला तेव्हापर्यंत ऐकल्याचे कधीच आठवत नाही.

वर्ल्ड कप ची पहिली आठवण म्हणजे पुन्हा बातम्या: "भारत ने वेस्ट इंडीज को हरा दिया है" हे संध्याकाळच्या कोणत्यातरी हिंदी बातम्यात ऐकले. ही ती पहिली मॅच. मला वाटते येथूनच लोकांचे कुतूहल वाढले. मग मधे फारसे काही ऐकले नाही. या मॅचेस आधी टीव्ही वर सुद्धा दाखवत नव्हते. मग एकदम कळाले की त्या झिम्बाब्वे च्या मॅच मधे कपिल ने १७५ (नाबाद) धावा मारल्या, आणि हे ही कळाले की काहीतरी पत्रकारांच्या बहिष्कारामुळे त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. तोपर्यंत भारताकडून कोणी वन डे शतक ही मारले नव्हते, कपिल ने जे मारले ते एकदम तेव्हाचे वर्ल्ड रेकॉर्डच केले.

मग पुन्हा ऑस्ट्रेलियाला हरवले वगैरे त्याबद्दल फारसे लक्षात नाही. आणि मग आपण सेमी फायनल मधे पोहोचलो. तरीही कोणालाही त्यापुढे भारत फार जाईल असे वाटत नव्हते. मात्र दूरदर्शन ने आता थेट प्रक्षेपण करण्याचे ठरवले त्यामुळे हे दोन सामने भारतात पाहता आले.

सेमी मधे इंग्लंड च्या धावांचा पाठलाग करताना आपला खेळ सुरूवातीला संथच होता. मोहिंदर जरी मॅन ऑफ द मॅच असला तरी तो होता तोपर्यंत अवघड वाटत होते. यशपाल चांगला खेळला पण खरी मॅच संपवली ती संदीप पाटील ने. आधीच्या वर्षी कसोटी मधे बॉब विलीस च्या एकाच ओव्हर मधे सहा फोर त्याने मारले होते, या मॅच मधे बहुधा असेच ४-५ फोर एकाच ओव्हर मधे मारले त्याने. आणि भारत फायनला पोहोचला.

पुन्हा तेव्हाच्या विंडीज कडे पाहता कोणालाही भारत जिंकण्याची काहीच शक्यता वाटत नव्हती. त्यात तोपर्यंत वन डे क्रिकेट एवढे बोकाळले नव्हते त्यामुळे नंतर बर्‍याच वेळा बघितलेले "अपसेट्स" लोकांना एवढी माहीत नव्हते. बॅटिंग मधे पहिल्यापासूनच पडझड होऊन शेवटी फक्त १८३ धावाच झाल्या तेव्हातर फक्त समोर दाखवतायत म्हणून बसायचे असे सगळे जण बघत होते...

पण संधूने ग्रिनीज चा पोपट करून स्टंप उडवला आणि एकदम सगळे जागे झाले. ग्रीनीज ने सोडलेला बॉल आणि उडालेला स्टंप हे दृष्य मूळ सामन्यातले का नंतर असंख्य वेळा बघितलेल्या टेप्स मधले आहे लक्षात नाही पण अजूनही डोळ्यासमोर आहे. पण आमच्या येथे तेव्हा थोड्यावेळानंतर दिवे गेले आणि मधे काही वेळ काही पत्ता लागला नाही काय चालले आहे. नंतर काही वेळाने एक जण कोठून तरी बातमी काढून आला, "हेन्स गेला, लॉईड गेला, आणि मुख्य म्हणजे रिचर्ड्स गेला", आम्हाला वाटले कोणीतरी दिले ठोकून, पण मग दिवे आले आणि ते खरे होते हे कळाले. तरी नंतर दूजॉ वगैरे चिकटून बसले होते आणि तसे रन्स ही फारसे नव्हते त्यामुळे पुन्हा भीती वाटू लागली. आणि मग बॅट्समन ला "हा आज नक्की बॉल टाकणार आहे का नाही" असा विचार करायला लावणारा मोहिंदर बोलिंग ला आला आणि त्याने विकेट्स पटापट काढल्या. या अंतिम सामन्यात नक्कीच मोहिंदर मॅन ऑफ द मॅच होता (आणि त्याला दिलाही).

नंतर मात्र तो कपिल चा कॅच पुन्हा पुन्हा पाहिला आम्ही. मग समारंभ चालू झाला. असंख्य इंग्लिश लोकांसमोर एक एक करून आपले खेळाडू आले आणि (बहुधा प्रिन्स चार्ल्स कडून) कप वगैरे स्वीकारला. किरमाणी येताना त्याच्या टकलावर कोणीतरी गमतीने मारलेली टपली अजूनही आठवते. तेव्हा शाळेच्या इतिहासात ऐकलेल्या इंग्रजांच्या गोष्टी आणि त्यांचे तेव्हाचे क्रिकेटमधीलही प्रभुत्व त्यामुळे तेव्हातरी लॉर्ड्स, इंग्लंड वगैरे ला "साहेब" टच होता (तेव्हा जर कोणी आपला शर्ट वगैरे काढून त्या गॅलरीत फिरवला असता तर पुलंच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत तो मंगळदास येतो आणि "हे फेदरवेट.." वगैरे गरजतो तेव्हा "कोण हा वेडा येथे आलाय" जशी प्रतिक्रिया होते बहुधा तशीच भारतातील लोकांची सुद्धा झाली असती Happy ), त्यामुळे ते कोट टाय वगैरे घातलेले सगळे साहेब आणि त्यात विजयी भारतीय संघ हे चित्र खूप वेगळे दिसले.

वर्ल्ड कप फायनल पेक्षा मला बेन्सेन् हेजेस चांगले आठवते...>>>> मला पण.. शास्त्रीला ऑडी मिळाली होती ते दृश्य पाहुन अगदी कृत़कृत्य झाल्यासारखे वाटले होते जणु काही मलाच मिळाली होती Proud

    अर्थात नंतर काही वेळा १९८३ वर्ल्ड कप फायनल आणि मॅच जिंकल्यावर फेसाळती शॅंपेन उडवत आपल्या टिमने केलेला जल्लोष याचे रेकॉर्डिंग पाहतानाचा अनुभवही खूप छान होता.. आपल्या टिमचा एकदम अभिमान वाटला...

    मला तर मदन लाल मॅन ऑफ द मॅच वाटतो. (त्याला दिले नाही) त्यानेच पहील्या तिन चांगल्या विकेट्स घेतल्या आहेत. मोहींदर ही बेस्टच त्याने रनस पण काढले पण त्याचा विकेटस ह्या फार नंतरच्या ६० वर ५ असतना वैगरे. रिचर्डस जाई पर्यंत हवा फार तापलेली होती. कपील ने उलट पळत जाऊन त्याच्या कॅच घेतला तिथे खरी कलाटनी मिळाली. नंतर लोक पटापट येऊन गेले.
    ग्रिनीज चा पार पोपट झाला तेव्हा. त्याचे तसे आउट होने हे फक्त मोहींदरच्याच हेल्मेट बिफोर स्टॅम्पच्या आउट होन्याची कम्पेअर होऊ शकते Happy
    अजुन लिहीनार आहेस का? डिटेलात लिही की.

    आधीच्या वर्षी कसोटी मधे बॉब विलीस च्या एकाच ओव्हर मधे सहा फोर त्याने मारले होते, या मॅच मधे बहुधा असेच ४-५ फोर एकाच ओव्हर मधे मारले त्याने.>>>>>>
    त्याने ४ चौकार मारले होते अस वाचलय मी लोकसत्तामध्ये. त्याची नंतर ड्रेस्सिन्ग रुम मधील कॉमेंट जबरा आहे.
    तो म्हणला होता की बॉब विलिस अजुन सुधारला नाही. Happy
    कपिलने घेतलेला तो कॅच पाहिलाय कुठल्यातरी क्लिपिंग मध्ये. सहीच कॅच.
    अख्खी मॅच फिरवण्याची शक्ती होती ती.
    कपिलने झिंबाब्वे विरुद्ध मारलेले १७५ रन्स बघण्यासाठी आत्मा अजुनही तळमळतोय पण आता
    "बॅक टु द फ्युचर" हा एकच उपाय असेल. Happy

    .............................................................

    अरे हो बहुतेक स्टार क्रिकेट वर ह्या जुन्या मॅचेस दाखवणार आहेत.
    नीट बघुन सांगतो जर काही श्येड्युल असेल तर.
    .............................................................

    पहिली लढत : भारत वि. वेस्ट इंडिज, ओल्ड ट्रॅफर्ड (९, १० जून १९८३)

    धावफलक : भारत ६० षटकांत ८ बाद २६२ (यशपाल शर्मा ८९, संदीप पाटील ३६; मायकल होल्डिंग १२-३-३२-२, लॅरी गोम्स १०-०-४६-२) विजयी वि. वेस्ट इंडिज ५४.१ षटकांत २२८ (अॅन्डी रॉबर्ट्स नाबाद ३७, जोएल गार्नर ३७; रवी शास्त्री ५.१-०-२६-३, रॉजर बिन्नी १२-१-४८-३). भारताचा ३४ धावांनी विजय. सामनावीर : यशपाल शर्मा.

    दुसरी लढत : भारत वि. झिम्बाब्वे, लिस्टर (११ जून १९८३)

    धावफलक : झिम्बाब्वे ५१.४ षटकांत १५५ ( पॅटरसन २२, बुचार्ट नाबाद २२; मदनलाल १०.४-०-२७-३, बिन्नी ११-२-२५-२) पराभूत वि. भारत ३७.३ षटकांत ५ बाद १५७ (संदीप पाटील ५०, मोहिंदर अमरनाथ ४४). भारताचा पाच गडी राखून विजय.

    सामनावीर : मदनलाल.

    तिसरी लढत : भारत वि. ऑस्ट्रेलिया, नॉटिंगहॅम (१३ जून १९८३)

    धावफलक : ऑस्ट्रेलिया ६० षटकांत ९ बाद ३२० (ट्रेव्हर चॅपेल ११०, यलॉप नाबाद ६६, किम ह्युज ५२; कपिल देव १२-२-४३-५) विजयी वि. भारत ३७.५ षटकांत १५८ (कपिल देव ४०, श्रीकांत ३९; के मॅकले ११.५-३-३९-६). ऑस्ट्रेलियाचा १६२ धावांनी विजय.

    सामनावीर : ट्रेव्हर चॅपेल.

    चौथी लढत : भारत वि. वेस्ट इंडिज, लंडन (१५ जून १९८३)

    धावफलक : वेस्ट इंडिज ६० षटकांत ९ बाद २८२ (विवियन रिचर्ड्स ११९; रॉजर बिन्नी १२-०-७१-३) विजयी वि. भारत ५३.१ षटकांत २१६ (मोहिंदर अमरनाथ ८०, कपिल देव ३६; मायकल होल्डिंग ९.१-०-४०-३, रॉबर्ट्स ९-१-२९-२). वेस्ट इंडिजचा ६६ धावांनी विजय. सामनावीर : विवियन रिचर्ड्स.

    पाचवी लढत : भारत वि. झिम्बाब्वे, टनब्रिज वेल्स (१८ जून १९८३)

    धावफलक : भारत ६० षटकांत ८ बाद २६६ (कपिल देव नाबाद १७५, सय्यद किरमाणी नाबाद २४, बिन्नी २२; रॉसन १२-४-४७-३, करन १२-१-६५-३) विजयी वि. झिम्बाब्वे ५७ षटकांत २३५ (करन ७३; मदनलाल ११-२-४२-३). भारताचा ३१ धावांनी विजय.

    सामनावीर : कपिल देव.

    सहावी लढत : भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेल्स्मफोर्ड (२० जून १९८३)

    धावफलक : भारत ५५.५ षटकांत २४७ (यशपाल शर्मा ४०, संदीप पाटील ३०, कपिल देव २८; आर हॉग १२-२-४०-३, जेफ थॉमसन १०.५-०-५१-३) विजयी वि. ऑस्ट्रेलिया ३८.२ षटकांत १२९ (अॅलन बॉर्डर ३६; मदनलाल ८.२-३-२०-४, रॉजर बिन्नी ८-२-२९-४). भारताचा ११८ धावांनी विजय. सामनावीर : रॉजर बिन्नी.

    उपांत्य लढत : भारत वि. इंग्लंड, मँचेस्टर (२२ जून १९८३)

    धावफलक : इंग्लंड ६० षटकांत २१३ (फॉलर ३३, टॅवरे ३२; कपिल देव ११-१-३५-३, मोहिंदर अमरनाथ १२-१-२७-२) पराभूत वि. भारत ५४.४ षटकांत ४ बाद २१७ (यशपाल शर्मा ६१, संदीप पाटील नाबाद ५१, अमरनाथ ४६). भारताचा सहा बळी व ३२ चेंडू राखून विजय. सामनावीर : मोहिंदर अमरनाथ.

    अंतिम लढत : भारत वि. वेस्ट इंडिज, लंडन, लॉर्ड्स (२५ जून १९८३)

    धावफलक : भारत ५४.४ षटकांत १८३ (श्रीकांत ३८, संदीप पाटील २७, मोहिंदर अमरनाथ २६; अॅन्डी रॉबर्ट्स १०-३-३२-३, माल्कम मार्शल ११-१-२४-२, मायकल होल्डिंग ९.४-२-२६-२, गोम्स ११-१-४९-२) विजयी वेस्ट इंडिज ५२ षटकांत १४० (रिचर्ड्स ३३, दुजाँ २५; मदनलाल १२-२-३१-३, मोहिंदर अमरनाथ ७-०-१२-३, संधु ९-१-३२-२). भारताचा ४३ धावांनी विजय. सामनावीर : मोहिंदर अमरनाथ.

    मटा वरुन साभार.

    केदार,सही रे... तू तर एकदम झकास डिटेल्स दिलेस की Happy

    मला अजुनही ते दिवस आठवतात. दुरदर्शन वर सेमी-फायनल आणि फायनल दाखवली होती. आमचा दहावीचा 'निकाल' नुकताच लागला होता. त्यामुळे कसलेही टेंशन नव्हते. पहिल्या चार लठतींच्या निकलानंतर भारत काही विशेष पराक्रम दाखवु शकणार नाही अशीच भावना होती. पण कपिल देव च्या 'त्या' खेळी नंतर एकदम उत्सुकता वाढली. मी दोनही सामने बघीतले. वेस्ट इंडीज चे कोणते तरी दोन फलंदाज एकदम फोर्म मधे होते आणि सौलीड चोपत होते, तेव्हाच सुनील गावसकर ने कपिल ला गोलंदाज बदलण्यास सुचविले आणि मोहिंदर ने गोलंदाजी सुरु केली. मला वाटते पाहिल्याच ओवर मधे एक विकेट गेली . आपण लै खुश झालो. पण नंतर रिचर्डस आला आणि परत सगळे निराश झाले होते. मग परत कपिलची जिगर बघायला मिळाली. मला आठवते कपिलने बरेच अंतर मागे धावत एक सुंदर झेल घेतला आणि रिचर्डस आउट झाला. शेवटची विकेट मोहिन्दर ने घेतली.

    अजुन काही आठवणी : तेव्हा आमच्या कडे कृष्ण-धवल टी. वी. होता. प्रक्षेपणाची क्वालीटी सो-सो होती. चेंडु एकदम सीमापार गेल्यावरच दिसत असे. देशाच्या बर्‍याच भागात टी. वी. दिसत नसे, काहि शहरांमधे विडीओ हाल्स मधे नंतर या सामन्याचे रेकोर्डींग दाखवले गेले... ६-७ तासाची विडीओ केसेट होती.

    वर्ल्ड कप सुरु व्हायच्या आधी ऑस्ट्रेलीयाचा कप्तान किम ह्युज हा एकच द्रष्टा होता. (अगदी कपिलासुद्धा वाटले नसेल) त्याने एका मुलाखतीत साम्गितले होते " I think INDIA is a dark horse in this tournament." ह्याबद्दल कपिलने त्याला त्या कपाचा एक कान द्यायला हवा असे आमच्या पार्कातल्या ग्रुपचे म्हणणे होते. पहिले काही सामने आपली टिम फ्ल्युकने जिंकते आहे असेच वाटत होते. मग नेहमीची धाकधुक वाटायला लागली-नेहमीप्रमाणे आपली टिम अरर्ध्यावरुन फिरणार की काय. पण त्यामुळे कॉमेंट्री एकण्याची एक वेगळीच tension वाटायचे. टोनी कोझियर हा त्यावेळेचा best commentrator होता.

    तेंव्हा सेमी आणि फायनलचे सामने दुरदर्शनने थोडेसे रिले केले होते. आणि त्यातही नेमहीप्रमाणे "जात" दाखवली होती. फायनल आधी अर्ध्यावरुन चालू केली आणि मध्येच बंद करून "आओ मारी साथे" किंवा "What's the Good Word" सारखा कार्यक्रम चालू केला होता. त्यामुळे लॉईडची विकेट दिसली नव्हती.

    जिंकल्यावर अख्खे शिवाजीपार्क रस्त्यावर होते. एक वेगळेच वातावरण होते. नाच - ढोल वगैरे नव्हते पण तरीही उत्साह होता. त्यानंतर भारतात कप आल्यावर निघालेली मिरवणुक. एका बसच्या टपावर कप घेऊन खेळाडू बसले होते. जेम्तेम बस जाईल एव्हढाच रस्ता होता. सर्व मुंबई रस्त्यावर लोटली होती.

    "वर्ल्ड कप Indian Subcontinent" मध्ये आला."-इति इम्रान.

    ती रात्र कधीच विसरणार नाही (भारतात रात्री मॅच संपली) !!!!

    मी १३ वर्षांचा होतो त्यामुळे जवळपास संपूर्ण सामना लक्षात आहे. माझा सहा वर्षांनी लहान धाकटा भाऊही पूर्ण मॅच संपेपर्यंत जागला होता

    विशेष लक्षात राहिलेले क्षण --
    -- गावसकर लवकर आउट झाला आणि आम्ही एकदम निराश झालो
    -- श्रीकांतने उजव्या गुढघ्यावर बसत मारलेला लाजबाब कव्हर ड्राईव्ह
    -- बलविंदरसिंग संधूच्या ड्रीम बॉलवर, ग्रिनीजने बॅट उंचावून 'वेल लेफ्ट' केले आणि झपकन तो बॉल आत शिरून ऑफ स्टंफ उडवून गेला
    -- रिचर्ड्सची बेदरकार चाल आणि झपाट्याची खेळी
    -- कपिलने घेतलेला रिचर्डसचा केवळ अशक्यप्राय झेल
    (रिचर्डस गेला हे मेंदूत पोचायला लागलेला एक मिनिटाचा उशीर आणि मग जागेवरून उठून केलेला 'क्रिकेट स्पेशल' डान्स Happy
    -- विंडीजचा स्कोअर १२०+ झाल्यावरची घालमेल
    -- मोहिंदरने घेतलेली शेवटची विकेट
    -- सगळी कॉलनी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर
    (कपिलच्या १७५ कधी काळी कुणाच्या प्रायव्हेट मिनिकॅमवरून यू ट्युबवर याव्या ही आशा !!! अधिकृत चित्रिकरण उपलब्ध नाहीये !!)
    -----
    अवांतरः 'डार्क हॉर्स' हा शब्द तेव्हा पहिल्यांदा समजला होता. किम ह्यूजचे मनापासून आभार Happy

    Happy मला पण ऐन फायनल च्या फायनल मोमेन्ट्स मधे दिवे गेलेलेच आठवतेय! आम्ही रेडियोवर ऐकत होतो कॉमेंट्री. टीव्ही एका शेजार्‍यांकडे होता फक्त. मग दिवे आल्यावर बक्षिस समारम्भ मात्र बघायला मिळाला. तेव्हा शाळेत होतो आम्ही. काहीतरी मोठी अचीव्मेन्ट झाली आहे हे समजत होतं. पण एवढी मोठ्ठी ते आता जास्त कळतय. तेव्हा क्रेझ आताइतकीच होती, खुषी , कौतुकं पण भरपूर होती. पण मीडिया हाईप, अवाढव्य जल्लोष नव्हता आजच्या इतका. कदाचित टीव्ही , इंटरनेट नव्हते म्हणून असेल.

    मला चान्गलेच आठ्वते.त्यामध्ये प्रकर्षाने म्हणजे शेवटची विकेट पड्ल्यापडल्या मैदानात धावलेले प्रेक्षक आणी
    अक्षरशः साश्टान्ग नमस्कार घालून ओक्साबोक्सी रडणारे वेस्ट इन्डिजचे समर्थक. अने़कजण अगदी सर्वस्व हरवुन
    बसले होते.

    मला वाटत होल्डिंग मैदानावर हताश होऊन उपडा पडला होता.

    रिचर्ड्स आउट होईपर्यंत असा काही खेळत होता की मॅच ३०-४० ओव्हर्समध्येच संपेल असे वाटले होते. त्याच्यानंतर दुजाँने थोडा त्रास दिला. पण मोहिंदरला "लेट कट" मारयच्या प्रयत्नात तो बोल्ड झाला आणि हुश्श झाले.

    मैत्रेयीने लिहील्याप्रमाणे आजच्यासारखे मिडीया हाईप नव्हते. त्यामुळे त्यानंतर झालेले सोहळेदेखील बघण्यासारखे वाटले. त्यावेळी "अभी आपको कैसा लगता है?.... क्या गावस्कर को रिटायर होना चाहिये?.... अगर आपको लगता है कि मॅन ऑफ मॅच मोहिंदर होना चाहिये तो टाईप किजिए १२३४५ पर A या मदनलाल तो B... कपिल आपने रिचर्ड्स का कॅच लिया तभी आपको कैसा लगा?..." असले अज्ञान पुर्ण प्रश्न विचारले जात नसल्याने समिक्षा ऐकायला आणि वाचायला पण मजा यायची.

    अहाहा. २५ जून १९८३!!
    कधी आली नि कधी गेली कुणास ठाउक.
    तेंव्हा ना इ-मेल, ना इंटरनेट! कधी कधी टीव्हीवर आठवड्यातून एकदा हिंदी सिनेमाचा प्रोग्रॅम असे.
    क्रिकेटमधे काय चालले आहे? ५०-५० मॅचेस म्हणजे काय? कशा होत असतील? का होत असतील? त्याचा उपयोग काय? कोण जिंकले, कोण हरले? भारतातर्फे अजूनहि वाडेकर, नबाब ऑफ पतौडी खेळतात का? गावास्कर कोण? विश्वनाथ कोण? लाला अमरनाथ नि विजय मांजरेकर यांची मुले म्हणे भारतातर्फे खेळतात? वशीला असणार नि काय? आजकाल भारताच्या टीमचा कॅप्टन कोण? आताशा म्हणे श्रीलंकेला क्रिकेटमधे टेस्ट मॅचचा दर्जा दिलाय! त्यांच्याविरुद्ध तरी भारत जिंकेल का?
    काहीच माहित नाही!!
    २००१ मधे ऑस्ट्रेलिया भारतात आले होते. तेंव्हा ओस्ट्र्लियात बसून टेस्ट मॅचेस पाहिल्या नि मग क्रिकेटबद्दल बरेच काही काही इथे समजू लागले. म्हणजे द्रविड, गांगुली, सचिन तेंडूलकर, ही नावे ओळखीची झाली.
    नि मग cricingo वगैरे वरून क्रिकेटवर लक्ष ठेवता येऊ लागले. (नि काय दिसले तर IPL. प्रिती झिंटा, शाहरुख खान. यांचे क्रिकेटमधे काय काम हा प्रश्न पडतोच.)

    समजण्या एव्हढा मोठा नक्कीच होतो, मी पुर्ण वेळ रेडिओ ला कान लावुन बसायचे. दहावीचे वर्ष, आई अभ्यासा साठी ओरडायची...आमच्याकडे नियमीतपणे षटकार, क्रिडांगण ही पाक्षीके यायची. आता हे मिळतात कां? आपल्या हिरोंचे फोटो व्यावस्थीत पणे पुढे अनेक वर्ष जपवून ठेवली होती.

    मला कपिलची ती खेळी १७५ ची खेळी आजही (कानाच्या) स्मरणात आहे. त्या सायंकाळच्या ७ च्या अडथळा आणणार्‍या बातम्यांचा (हिंदी मग इंग्रजी) राग यायचा. अंतिम सामन्यामधे आपले १८३ चे तुटपुंजे अव्हान आणि समोर हेन्स, ग्रिनिज, रिचर्ड्स, लॉईड, दुजॉ (महा चिवट होता) सारखे महारथी, थोडे हताश झालो होतो, पण रात्री जिंकल्यावर आनंदाने बेहोष पण झालो होतो. नाचुन, ओरडून आनंद व्यक्त केला... पुढे कितीतरी दिवस ह्या आनंदाची शिदोरी पुरली. काही महिन्यातच वेस्ट इंडिया भारताच्या दौर्‍यावर आली आणि मग ५-० असा पांढरा रंग देवुनी गेली (पराभवाचे उट्टे काढले).